आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
श्रीकृष्ण हे आपल्या भारतीय संस्कृतीतलं एक महत्त्वाचं दैवत आहे. कोणत्याही रुपात असला तरी तो आपल्याला तितकाच आवडतो. मग ते त्याचं बालरुप असो, गोकुळात राधेच्या आणि गवळणींच्या खोड्या काढणारं असो, कंस किंवा नरकासुराचा वध करणारं असो, गोवर्धन पर्वताला आपल्या करंगळीवर उचलणारं असो किंवा अर्जुनाला गीता सांगणारं रूप असो, हे सर्व आपल्याला तितकेच मनापासून आवडतात. श्रीकृष्ण हा एकच देव असा आहे, की ज्याला आपण केवळ देव म्हणून न पाहता एक प्रियकर म्हणूनही पाहतो. बाकी सर्व देवांच्या बाजूला त्यांची पत्नी असते जसं शंकरासोबत पार्वती, रामासोबत सीता पण कृष्णासोबत असते त्याची प्रेयसी राधा. आजही आपल्याकडे राधा-कृष्ण यांचं प्रेम हे आदर्श मानतात. आज कृष्णाच्या काही वेगळ्या स्थानांबद्दल जाणून घेऊया.
१. श्रीकृष्ण मठ, उडुपी, कर्नाटक
कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात मंगलोरजवळ उडुपी इथं हे मंदिर आहे. याची स्थापना इ.स. तेराव्या शतकात तत्कालीन वैष्णव सांप्रदायिक गुरु माधवाचार्य यांच्या मार्फत झाली. त्या काळात मुघलांनी मोठ्या प्रमाणात हिंदूंची देवळं उद्ध्वस्त करण्याचा प्रकार चालवला होता.
अशीच कोणत्यातरी स्थानावरून भक्तांमार्फत ही मूर्ती होडीतून दुसरीकडे नेली जात असताना होडी अचानक वादळात सापडली. जेथे हे वादळ सुरू होतं, त्याच ठिकाणी समुद्रकिनारी माधवाचार्य ध्यानधारणा करत होते. त्यांनी मिळालेल्या दृष्टांतानुसार आपल्या शक्तीने वादळ शमवून ही मूर्ती होडीबाहेर काढून तिथं स्थापन केली.
या मंदिराबद्दल अजून एक कथा सांगतात, ज्यात देव आणि भक्त यांचं नातं आपल्याला दिसून येतं. कनकदास नावाचा एक महान कृष्णभक्त त्या काळात होऊन गेला. त्या काळात प्रचलित असणाऱ्या जातीव्यवस्थेनुसार कनकदास शूद्र असल्याने त्याला मंदिरप्रवेश नाकारला गेला. परंतु खऱ्या भक्ताला अशा छोट्या गोष्टींनी कधी फरक पडत नसतो. कनकदासानेदेखील या गोष्टीमुळे दुःखी न होता आपली कृष्णभक्ती श्रध्दापूर्वक तशीच पुढे चालू ठेवली. दररोज तो मंदिर परिसरात येई व आत जाता येत नसल्याने मंदिराच्या पाठीमागे जाऊन तेथून देवाला वंदन करून परत जाई. हा त्याचा रोजचा क्रम चालू होता.
त्याच्या या भक्तीला कृष्ण पावलाच. एके दिवशी अचानक एक चमत्कार झाला, कनकदास नेहमीप्रमाणे मंदिराच्या पाठच्या भिंतीकडून नमस्कार करून निघणार एवढ्यात त्याच्या समोर अचानक लख्ख प्रकाश पडला. त्याने समोर पाहिलं तर, मंदिराच्या मागच्या भिंतीत एक खिडकी तयार झाली होती अन त्या खिडकीतून तो श्रीकृष्ण हसतमुखाने त्याच्याकडेच पाहत होता. कनकदासाला समोरून दर्शन घेता येत नव्हतं म्हणून देवानं स्वतःच त्याच्यासाठी आपलं तोंड मागे फिरवलं.
या मंदिरात प्रवेश करायच्या आधी दोन शिवमंदिरं लागतात. त्यांची नावं ‘अनंतेश्वर’ व ‘चंद्रमौळीश्वर’ अशी आहेत. इथल्या प्रथेप्रमाणे श्रीकृष्ण मंदिरात जाण्याआधी या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घ्यायची पद्धत आहे. कन्नड भाषेत ‘उडुपा’ म्हणजे लहान मुलगा. त्यामुळे इथली श्रीकृष्णाची मूर्तीसुद्धा बालगोपाल स्वरुपातच असून त्याच्या एका हातात दही घुसळायची रवी आणि दुसऱ्या हातात त्याची दोरी आहे. कृष्णाला दही, दूध, लोणी हेच पदार्थ आवडतात म्हणूनही असं असू शकेल. या मंदिरात खूप सुंदर असा महाप्रसाद मिळतो. तसंच इथून जवळच वैष्णव संप्रदायाचा मठदेखील आहे, जो त्यांच्या अष्टमठांपैकी एक मानला जातो.
उडुपी हे कोकण रेल्वेमार्गावरचं एक स्टेशन आहे. तिथं उतरुन या श्रीकृष्ण मंदिरात जाता येतं.
२. श्री देवकीकृष्ण, माशेल, गोवा –
देवकी ही कृष्णाची जन्मदात्री माता तर त्याचं पालनपोषण केलं यशोदामातेनं, त्यामुळेच कृष्णाला ‘द्वैमातुर’ म्हणतात. श्रीकृष्णाचं बालरुप असलेलं उडुपीनंतरचं भारतातील हे कदाचित एकमेव मंदिर असेल. इथे कृष्णाची आई देवकी त्याला आपल्या कडेवर घेऊन बसली आहे. देवकीचा पुत्र या ठिकाणी तिच्यासोबतच आहे म्हणूनच या मंदिराला ‘देवकीकृष्ण मंदिर’ असं म्हणतात. हे मंदिर गोव्यात फोंडा तालुक्यात माशेल या गावी आहे.
या देवस्थानाची जत्रा पौष महिन्यात दोनदा भरते. त्यापैकी पौष शुद्ध द्वितीयेला होणारी छोटी जत्रा, तर पौष पौर्णिमेला भरणारी ‘मालनीपुनव’ ही मोठी जत्रा मानली जाते. याच्या व्यतिरिक्त या मंदिरात वर्षभर बरेच सण-उत्सव साजरे होत असतात. त्यापैकी नवरात्रोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी अर्थात गोकुळाष्टमी या दोन उत्सवांना विशेष महत्व आहे.
नवरात्रात रोज देवापुढे कीर्तन होतं. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा या दिवशी देवाचा रथोत्सव होतो. येथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, श्रीकृष्ण ज्यावेळी पालखीत बसतो त्यावेळी तो देवकी मातेच्या कडेवर बसतो. पण रथात मात्र तो एकटाच चढतो. गोकुळाष्टमी उत्सवाच्या वेळी दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो, ज्यात दही व पोह्यांचे गोळे करून ते सर्वांना प्रसाद म्हणून वाटतात. संध्याकाळी श्रीकृष्णाच्या लीलांवरती आधारित ‘गवळणकाला’ सादर केला जातो.
३. श्री संमोहन कृष्ण, मोहनूर, तामिळनाडू –
तामिळनाडूमधल्या नामक्कल जिल्ह्यातील मोहनूर इथं हे ‘श्री प्रसन्न कल्याण वेंकटेश पेरुमाळ’ म्हणजेच श्री विष्णूचं मंदिर आहे. तामिळ भाषेमध्ये श्री विष्णूला ‘पेरुमाळ’ असं म्हणतात. कुठल्यातरी भक्ताच्या प्रार्थनेवर प्रसन्न होऊन इथं प्रकट झालेला हा देव म्हणजे तिरुपतीचा बालाजीच आहे. या मंदिरात एका गाभाऱ्यामध्ये श्री व्यंकटेश, श्री लक्ष्मी (श्रीदेवी) तसेच श्री पद्मावती (भूदेवी) यांच्या मूर्ती आहेत.
दुसऱ्या एका गाभाऱ्यात आगळीवेगळी अशी श्री संमोहन कृष्णाची मूर्ती स्थापन केली आहे. ही मूर्ती अर्धनारीश्वर रुप घेतलेली आहे. एरव्ही शंकर-पार्वती आपल्याला या रुपात दिसतात. पण इथे मात्र आपल्याला श्रीकृष्णाचं अर्धनारीश्वर रुप पहायला मिळतं. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे सहसा श्रीकृष्णाच्या मंदिरात त्याच्या बाजूला राधा उभी असते. इथे तसं नाही. इथे श्रीकृष्णासोबत त्याची पत्नी रुक्मिणी हीच आपल्याला या अर्धनारीश्वर रुपात दिसते.
उजवीकडे कृष्ण व डावीकडे रुक्मिणी अशी या मूर्तीची रचना आहे. मूर्तीवर वस्त्र व दागिनेसुद्धा त्याच पद्धतीने घातलेले असतात. हे अगदी आगळंवेगळं असं रूप आपल्याला पहायला मिळतं.
या व्यतिरिक्त काही अनोखी कृष्ण मंदिरं तुम्हाला माहिती असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.