ऑलिम्पिकच्या इतिहासात “काळा दिवस” म्हणून या दिवसाची नोंद केली आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


लेखक- मनोज शेडबाळकर

५ सप्टेंबर, १९७२ – म्युनिक, जर्मनी.

आजचा दिवस ऑलिम्पिक इतिहासातला एक काळा दिवस म्हणून नोंदला जाईल याची कुणाला पुसटशीही कल्पना नव्हती.

२६ ऑगस्ट, १९७२ला सुरू झालेल्या ऑलिम्पिकला दीड आठवडा होऊन गेला होता. आयोजक, स्पर्धक, प्रेक्षक दर चार वर्षांनी होणार्‍या या महोत्सवात जोशाने सहभागी झाले होते. मार्क स्पिट्झने जलतरण स्पर्धेतील सात वेगवेगळ्या प्रकारात विश्वविक्रम करत सातही सुवर्णपदके पटकावून खळबळ उडवून दिली होती. कोणत्याही खेळाडूने केलेली आत्तापर्यंतची ही सर्वोच्च ऑलंपिक कामगिरी. (हा विक्रम पुढे २००८ पर्यंत; माईकल फेल्प्सपर्यंत अबाधित राहिला.)

Rowing, Diving, Swimming, Gymnastics वगैरे खेळांच्या सर्व स्पर्धा संपल्या होत्या व एकूण १७ दिवस चालणार्‍या या स्पर्धेची सांगतेकडे वाटचाल सुरू होती.

सगळे सुरळीत सुरू असताना अचानक इस्रायली खेळाडूंवरील हल्ल्याच्या बातमीने सर्वजण हादरून गेले. इस्राईलच्या दोन खेळाडूंची हत्या आणि बाकी नऊ जण (इस्रायली खेळाडू, कोच व रेफ्री) ओलीस – खुद्द ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये!

सर्व स्पर्धाप्रकार तातडीने थांबवले गेले. अचानक स्पर्धा थांबवली जाण्याची ही बहुदा पहिलीच वेळ. या नाट्याला पहाटे पहाटे सुरूवात झाली. स्पोर्ट्स बॅग घेतलेल्या आठ ‘खेळाडूंनी’ ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये प्रवेश केला. ट्रॅकसूट व संपूर्णपणे खेळाडूसारखा पेहराव असल्याने कुणाला काहीच शंका आली नाही.

निर्धोकपणे हे सर्वजण इस्रायली खेळाडूंच्या निवासस्थानापाशी पोहोचले. या सर्व दहशतवाद्यांनी स्वतःचे खेळाडूंमध्ये इतके बेमालूम वेशांतर केले होते की ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना एका सहा सात फुटी कुंपणावरून उड्या माराव्या लागल्या व हा ‘शॉर्टकट’ तिथल्याच काही अमेरिकन (खर्‍या) खेळाडूंनी अजाणतेपणे या दहशतवाद्यांना दाखवला – आपल्यासारखेच खेळाडू समजून.

thepostman
या इमारतीत व शेवटच्या मधल्या खिडकीच्या खोलीत हे सगळे नाट्य सुरू झाले.

बनावट किल्लीच्या सहाय्याने दहशतवाद्यांनी इमारतीत प्रवेश मिळवला. प्रवेश मिळाल्यानंतर काही मिनीटांतच अत्यंत चपळाईने हालचाली करत सगळेजण ग्रेनेड, पिस्टल्स आणि राईफल ने शस्त्रसज्ज झाले. हा सगळा साठा स्पोर्ट्स बॅगांमध्ये लपवला होता.

दहशतवाद्यांनी आता मोर्चा खेळाडूंच्या खोल्यांकडे वळवला व हाती असलेल्या किल्ल्यांच्या सहाय्याने दरवाजे उघडण्याची खटपट करू लागले. या आवाजाने एक रेफ्री – Yossef Gutfreund जागा झाला.

दारापाशी होणारा आवाज व गडबड कशाची आहे हे पहायला गेल्यावर त्याला दारातून आत येण्याचा प्रयत्न करणारा व चेहरा झाकलेला एक दहशतवादी दिसला व त्या दहशतवाद्याच्या हातातील AKM (AK-47 चे एक भावंड) राईफल ही डोकावत होती.

Yossefने ओरडून आपल्या सहकार्‍यांना जागे केले, एक जड वजन दरवाज्याच्या आतील बाजूने लावले व हाताने दरवाजा घट्ट बंद करून मदतीसाठी आरडाओरड करू लागला. हे आवाज ऐकून वेटलिफ्टींग कोच Tuvia Sokolovsky एक काचेची खिडकी तोडून पळून गेला.

८ दहशतवाद्यांच्या ताकतीपुढे एकट्या Yossef चे प्रयत्न अपुरे पडले व दहशतवाद्यांनी खोलीत प्रवेश मिळवला. Yossef ला बंदी बनवून ते बाकीच्या खेळाडूंचा शोध घेवू लागले. पुढचा नंबर होता Yossef एक सहकारी Moshe Weinberg . या कुस्तीच्या कोचने प्रतिकार करायचा प्रयत्न केला, एका दहशतवाद्याने Moshe च्या गालात गोळी मारून त्याला जखमी केले व त्याला सोबत घेवून आणखी खेळाडूंचा शोध सुरू केला. यादरम्यान काही इस्रायली खेळाडू काय घडते आहे याचा अंदाज आल्याने मिळेल त्या मार्गाने पळून गेले.

Moshe ने प्रसंगावधान राखत या दहशतवाद्यांना दुसर्‍या खोलीकडे न नेता सरळ तिसर्‍या खोलीमध्ये नेले जिथे सहा रेसलर्स आणि वेटलिफ्टर्स होते. कदाचित् Moshe ला त्या सशक्त खेळाडूंकडून प्रतिकाराची अपेक्षा असावी पण ते सर्वजण झोपेतून नुकतेच जागे झाल्याने गोंधळून गेले व कोणताही प्रतिकार न करता दहशतवाद्यांच्या स्वाधीन झाले.

Moshe व सर्व ओलीस घेऊन दहशतवादी पुन्हा पहिल्या खोलीकडे येताना Mosheने पुन्हा हल्ला करून एका दहशतवाद्याला बेशुध्द केले व दुसर्‍यावर तिथल्याच एका सुर्‍याने वार केले. दहशतवाद्यांनी बंदूकीच्या सहाय्याने Moshe ला शांत केले – कायमचे. आणखी एक वेटलिफ्टर Yossef Romano ने ही प्रतिकार करून एका दहशतवाद्याला जखमी केले पण लगेचच Yossef वर गोळ्या झाडून त्याचाही कायमचा बंदोबस्त केला गेला.

या गडबडीचा फायदा घेवून दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेला Gad Tsobari हा रेसलर सुटका करून घेवून पळून जाण्यात यशस्वी झाला. दोन खेळाडू ठार व नऊ जण ओलीस! रक्ताळलेली सकाळ उजाडली. हळूहळू एक एक गोष्टी उजेडात येवू लागल्या.

“ब्लॅक सप्टेंबर” या पॅलेस्टाईन गटाच्या दहशतवाद्यांनी हे सगळे घडवून आणले होते. अपुरी व ढिली संरक्षण व्यवस्था आणि एका बाजूला असलेले इस्रायली खेळाडूंचे अपार्टमेंट याचा पुरेपूर फायदा घेत दहशतवाद्यांनी हा रक्तपात घडवून आणला होता व इस्राईल-पॅलेस्टाईन संबंध बघता हा रक्तपात इथेच थांबणार नाही याचीही सर्वांना खात्री पटली होती.

दहशतवाद्यांच्या हातात नऊ निष्पाप खेळाडू सापडले होते आणि केवळ त्यांचे “ज्यू” व “इस्रायली” असणे दहशतवाद्यांना पुरेसे होते.

  • Ze’ev Friedman (वेटलिफ्टर)
  • David Berger (वेटलिफ्टर)
  • Yakov Springer (वेटलिफ्टींग जज)
  • Eliezer Halfin (रेसलर – कुस्तीपटू)
  • Yossef Gutfreund (रेसलींग रेफ्री)
  • Kehat Shorr (शूटींग कोच)
  • Mark Slavin (रेसलर)
  • Andre Spitzer (फेन्सींग कोच)
  • Amitzur Shapira (ट्रॅक कोच)

या नऊ खेळाडूंच्या हातापायांना व नंतर एकमेकांना बांधून त्यांचा संपूर्णपणे ताबा घेवून दहशतवादी पुढच्या कामाला लागले. सर्व खेळाडूंनी आपले भवितव्य हताशपणे नियतीकडे सोपवले होते. प्रतिकार करणार्‍या Moshe Weinbergच्या गालावर गोळी मारून त्याला जायबंदी करणार्‍या व नंतर त्याला निर्दयीपणे ठार मारणार्‍या दहशतवाद्यांचा कृरपणा खेळाडूंना बंदी बनवल्यानंतरही सुरूच राहिला.

बंदूकीच्या धाकाने काही खेळाडूंना अत्यंतिक मारहाण केली गेली, घृणास्पद प्रकार म्हणजे आधीच मरण पावलेल्या Yossef Romanoचे गोळ्यांनी चाळण झालेले व रक्ताने माखलेले शव बंदी खेळाडूंच्या पायाशी आणून टाकून दिले गेले, या सर्व खेळाडूंना जरब बसावी म्हणून.

दहशतवाद्यांनी मागण्या जाहीर केल्या. इस्रायलच्या ताब्यात असलेल्या २३४ पॅलेस्टीनीयन कैद्यांची सुटका करून त्यांना इजिप्तला पोहोचवणे व जर्मनीच्या ताब्यात असलेल्या दोन कैद्यांची सुटका.

इस्रायलने त्यांच्या त्या वेळच्या धोरणाप्रमाणे लगेचच नि:संदिग्ध शब्दात उत्तर दिले, “कोणत्याही वाटाघाटी केल्या जाणार नाहीत”.

एकदा वाटाघाटी करण्याचे धोरण अवलंबले की भविष्यातली परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होते, हा या धोरणामागचा विचार!

आपल्या मागण्यांमागचा गंभीरपणा अधोरेखीत करण्यासाठी दहशतवाद्यांनी Moshe चा मृतदेह कृरपणे अपार्टमेंट बाहेर टाकून दिले. सर्व ओलीस ज्यू असल्याने जर्मनीची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली. जर्मनीने ज्यू खेळाडूंच्या बदल्यात अमर्यादीत पैसा देवू केला, उच्चपदस्थ जर्मन ऑफिसर्स ओलीसांच्या बदल्यात ओलीस म्हणून देऊ केले पण दहशतवाद्यांनी आपला निर्णय बदलला नाही.

वाटाघाटी करण्यास नकार देणारा इस्राईल..
निर्णय न बदलणारे दहशतवादी..
जर्मनीचे त्यावेळचे नेतृत्व..
संपूर्ण ऑलंपिक..
आख्खे जग..

काहीतरी चमत्कार घडून हे कोडे सुटावे, ही परिस्थिती बदलावी अशी इच्छा करत होते.. आपआपल्या देवांना प्रार्थना करत होते…

thepostman
Munich Massacre च्या घटनेचे प्रतिनिधित्व करणारे छायाचित्र.

परिस्थिती पुढे सरकण्यासाठी काहीतरी घडणे गरजेचे होते. अचानक ओलीसांच्या अपार्टमेंटची एक खिडकी उघडली आणि काही कागद फेकले गेले. ते दहशतवाद्यांचे मागणीपत्र होते. यावर इस्राईलच्या ताब्यातल्या २३४ कैद्यांची नावे टाईप केली होती. दहशतवाद्यांबद्दलही माहिती होती.

“ब्लॅक सप्टेंबर” या क्रूर दहशतवादी गटाने हे अपहरण केले होते. यांचे नेतृत्व करत होता इस्सा (Luttif Afif) आणि त्याचा उजवा हात होता टोनी (Yusuf Nazzal.)

दहशतवाद्यांची ओळख पटली आणि एक एक धक्कादायक गोष्टी उजेडात येऊ लागल्या. दहशतवाद्यांपैकी काही जण ऑलिम्पिक स्टेडीयममध्ये वर्कर म्हणून काम करत होते. ऑलिम्पिक व्हिलेजची इत्यंभूत माहिती त्यांच्याकडे होती. त्याहीपुढची बाब म्हणजे एक दहशतवादी इस्रायली खेळाडूंच्या अपार्टमेंटमध्येच हल्ल्याच्या आधी काही तास वावरत होता – वर्कर म्हणून. त्याच अपार्टमेंट मध्ये रहाणारे उरूग्वे आणि हाँगकाँगचे खेळाडू सुखरूप बाहेर पडले आणि इस्राईल हेच लक्ष्य आहे ही बाब पुन्हा एकदा अधोरेखीत झाली.

किती खेळाडू ओलीस ठेवले गेले आहेत याची खात्रीशीर माहिती कुणालाच नव्हती. ओलीसांपैकी किती जण सुरक्षित आहेत, किती जण जखमी आहेत या बाबत उलटसुलट अफवा बाहेर पसरल्या होत्या आणि या सर्व अफवा न्यूज रिपोर्टर्स छातीठोकपणे प्रक्षेपित करत होते.

४००० रिपोर्टर्स आणि २००० कॅमेरा क्रू ची अक्षरश: जत्रा भरली होती. अफवांमध्ये अफवांचीच भर पडतच होती आणि हे सगळे नाट्य दहशतवादी ओलीसांसोबत “लाईव्ह” बघत होते.

नक्की किती दहशतवादी आहेत हे ही अजूनही स्पष्ट झाले नव्हते. वाटाघाटींचे आणखी प्रयत्न सुरू झाले. वाटाघाटींमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी एक कमिटी स्थापन केली गेली या कमिटीमध्ये एक पोलीस प्रमुख Manfred Schreiber (श्रायबर) व दोन (राजकारणातले) मंत्री होते.

चेहरा ओळखू नये म्हणून चेहर्‍याला बूटपॉलीश लावलेले, स्कार्फ आणि मास्कने चेहरा लपवलेले दहशतवादी पोलीसांशी बोलू लागले. इस्साने पहिली वेळ दिली होती दुपारी १२ वाजताची. अपहरण केल्यापासून केवळ ७ तासात मागण्या पूर्ण होण्याचा हट्ट त्याला सोडावा लागला. ही वेळ पुढे ढकलली गेली.

पोलीस प्रमुख श्रायबरने इस्राईल ‘हो’ म्हणत आहे, ‘सहकार्य करत आहे’ अशी थाप मारून आणखी वेळ मिळवला. असा वेळ आणखी पाच वेळा मिळवला गेला. डेडलाईन पाच वेळा पुढे ढकलण्यात श्रायबर यशस्वी ठरला.

वाटाघाटी हळूहळू पुढे सरकत होत्या, ऑलिम्पिकमधले काही स्पर्धाप्रकार मात्र अजूनही सुरूच होते. सगळीकडून वाढत्या दबावामुळे शेवटी ते थांबवले गेले. ऑलिम्पिक व्हिलेजमधले वातावरण खूप निवांत आणि आरामशीर होते. या घटनेचा मागमूसही कुठे दिसत नव्हता. खेळाडू सराव करत होते, बीचवर पहुडल्यासारखे निवांतपणे ऊन खात पडले होते आणि विक्रेते खाद्यपदार्थ विकत होते आणि या सगळ्याचेही “थेट प्रक्षेपण” सुरू होते. ओलीसांच्या अपार्टमेंटबाहेर गर्दी वाढतच होती. घटनेचे गांभीर्य बहुदा लक्षात आले नव्हते किंवा न लक्षात आल्यासारखे सगळे वातावरण होते.

इस्साबरोबर वाटाघाटींचे बरेच प्रयत्न झाले. सगळे दहशतवादी अत्यंत आत्मविश्वासू आणि ठाम दिसत होते. चर्चेत कोणतीही गोष्ट सहजासहजी मान्य करत नव्हते आणि कोणताही कच्चा दुवा समोर येऊ देत नव्हते. कोणतीही माहिती मिळत नाही हे पाहून क्रायसीस टीमने आणखी एक शक्कल लढवली व ओलीस जिवंत आहेत का याची खात्री करून घेण्यासाठी ओलीसांशी प्रत्यक्ष बोलण्याचा आग्रह धरला.

जर्मन बोलणार्‍या Andre Spitzer ला खिडकीजवळ हात बांधलेल्या अवस्थेत उभे केले गेले, दोन दहशतवादी बंदुका ताणून मागे उभे होते. संभाषण सुरू झाले-

“जिवंत ओलीसांची संख्या किती आहे?” या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करताना Andreला मारहाण करत मागे ओढले गेले व खिडकी बंद झाली. पुन्हा वाटाघाटींचे गुर्‍हाळ सुरू झाले. श्रायबर पुन्हा इस्साशी बोलण्याचा, त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न करू लागला.

संध्याकाळचे पाच वाजले.  वाटाघाटींचे फलीत म्हणजे दोन ऑलिम्पिक अधिकार्‍यांना आत येऊन खेळाडूंची पाहणी करून देण्यासाठी इस्साने होकार दिला. श्रायबर पोलीस असल्याने त्याला इस्साने प्रवेश नाकारला. आत अत्यंत हृदयद्रावक दृश्य होते. भिंतीवर; जमिनीवर रक्ताचा सडा पडला होता, गोळीबाराने भिंतीचे पोपडे पडले होते, झटापटीच्या खुणा होत्या आणि रक्ताने माखलेले एक प्रेत पडले होते.

thepostman

हातापायांना बांधलेल्या ओलीसांना एका खोलीत एकत्र बसवले होते. दहशतवाद्यांचा सर्वत्र पहारा होता. आत जाणार्‍या एका अधिकार्‍याला श्रायबरने एक विशेष काम दिले होते. आत किती दहशतवादी आहेत हे मोजायचे. या अधिकार्‍याला चार किंवा पाच दहशतवादी दिसले. बाहेर आल्यावर त्याने ही माहिती श्रायबरला दिली. त्या क्षणापासून “चार किंवा पाच” दहशतवादी गृहीत धरून सगळी गणिते आखली गेली.

इस्राईल अजूनही आपल्या निर्णयावर ठाम होते. इस्राईलने स्वत:ची कमांडो टीम पाठवण्याची तयारी जर्मनीकडे दर्शवली, जर्मनीने ही विनंती अमान्य केली. शेवटी जर्मनीनेच पुढाकार घेत एक रेस्क्यू टीम पाठवून ओलीसांची सुटका करण्याचा निर्णय घेतला. ट्रॅकसूट घातलेल्या व सब मशिनगनने सज्ज झालेल्या जर्मनीच्या पोलीसांचे पथक बोलावले गेले. अपार्टमेंटच्या आजूबाजूला व छतावर “पोझीशन्स” घेऊन ते पुढच्या आदेशाची वाट बघू लागले.

बाहेर काहीतरी घडते आहे याची जाणीव दहशतवाद्यांनाही झाली होती. अचानक श्रायबरच्या लक्षात आले रेस्क्यू टीमचा ठावठिकाणा त्यांना तंतोतंत कळत होता व त्या अनुषंगाने ते बाल्कनीत येऊन छताकडे बघत होते. हेही उघड झाले की रेस्क्यू टीमच्या तयारीपासून ते पोझीशन्सपर्यंत सगळ्या गोष्टी “थेट प्रक्षेपित” केल्या गेल्या होत्या.

रेस्क्यू टीमला मागे घेतले नाही तर दोन ओलीसांना ठार मारण्याची धमकी इस्साने दिली. रेस्क्यू मिशन अचानकपणे सुसाईड मिशनमध्ये बदलले गेलेले पाहून, रेस्क्यू टीमला तातडीने मागे बोलावले गेले. हल्ल्याच्या आदेशांची वाट बघणार्‍या रेस्क्यू टीमला आदेश मिळाले ते मिशन रद्द झाल्याचे. ओलीसांच्या सुटकेचे सर्व प्रयत्न थांबवले गेले. वेळ निघून जात होता. काहीतरी होवून कोंडी फुटण्याची सर्वजण वाट बघत होते.

अचानक संध्याकाळी उशीरा इस्साने एका विमानाची मागणी केली व कैरो (इजिप्त) येथे जाण्याची मागणी केली. ओलीसांना कोणत्याही परिस्थितीत या प्रकारे जर्मनीबाहेर जाऊ देण्याची तयारी जर्मन सरकारची नव्हती. दहशतवादी ऑलिम्पिक व्हिलेज पासून विमानतळापर्यंत दोन हेलिकॉप्टर व तिथून पुढे एका मोठ्या विमानाने कैरोला जाणार होते.

ओलीसांच्या सुटकेसाठी आणखी एक प्रयत्न करायचे पोलीसांनी ठरवले. दहशतवादी व ओलीस अपार्टमेंटपासून हेलिकॉप्टरपर्यंत पायी चालत जाताना दहशतवाद्यांवर हल्ला करायचा असा प्लॅन ठरला. इस्साने या मार्गाचे आधी निरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि जर्मन सरकारचा हा प्रयत्नही फसला.

या मार्गावर लपून बसलेले सगळे जर्मन अधिकारी हटवण्यात आले.

जर्मन पोलीसांची हल्ल्याची तयारी बघून इस्साने पायी जाण्यास नकार दिला व अपार्टमेंट पासून हेलिकॉप्टरपर्यंतचे केवळ २०० मीटर अंतर जाण्यासाठी बसची मागणी केली. ओलीसांना घेवून दहशतवादी बसमध्ये चढले आणि एक धक्कादायक गोष्टीचा उलगडा झाला. ओलीसांचा ताबा एकूण आठ दहशतवाद्यांनी घेतला होता. “चार किंवा पाच दहशतवादी” या तयारीने असलेल्या सर्वांनाच हा जबरदस्त धक्का होता.

विमानतळाकडे जाण्यासाठी हेलिकॉप्टर्सनी टेक ऑफ घेतला आणि “मिडीया सर्कस” ही त्यांचा पाठलाग करत विमानतळाकडे निघाली. तिकडे विमानतळावर आणखी एका रेस्क्यू प्लॅनची तयारी सुरू होती. कैरोला जाणार्‍या विमानातील संपूर्ण स्टाफची जागा वेष बदललेल्या जर्मन पोलीसांनी घेतली. कंट्रोल टॉवरवर तीन स्नायपर सज्ज केले गेले. आणखी एक स्नायपर विरूध्द दिशेला रनवेवर एका ट्रकच्या मागे आणि एक स्नायपर जमिनीवर एका अगदी छोट्या फूटभर उंचीच्या भिंतीच्या आडोशाला (झोपून) लपला होता.

इस्सा विमानाची तपासणी करायला गेला की त्याच्यावर विमानातील अधिकारी हल्ला करतील व बाकीच्या दहशतवाद्यांना स्नायपर्स टिपतील असा प्लॅन ठरला. ऑलिम्पिक व्हिलेज ते विमानतळ हे २५ किमीचे अंतर पार करून हेलिकॉप्टर्स विमानतळावर पोहोचली आणि कंट्रोल टॉवरसमोर उतरली.

विमानाची तपासणी करण्यासाठी इस्सा आणि एक दहशतवादी विमानाकडे गेले. विमानात कोणीही नव्हते. रिकामे विमान बघून इस्साला धोक्याची जाणीव झाली. शक्य तेवढ्या वेगाने तो व त्याचा सहकारी हेलिकॉप्टरकडे धावू लागले. अचानक विमानतळाचा परिसर प्रखर प्रकाशाने उजळून निघाला आणि प्रचंड गोळीबारास सुरूवात झाली.

रात्री १०:३० वाजता विमानतळावर सगळे नाट्य सुरू झाले. विमानाची तपासणी करायला गेलेले इस्सा आणि टोनी हेलिकॉप्टरच्या दिशेने धावत होते. कंट्रोल टॉवरवरच्या एका स्नायपरने इस्सा आणि दुसर्‍याने टोनीला लक्ष्य बनवून गोळ्या झाडल्या. मांडीत गोळी लागल्याने टोनी जखमी झाला व रनवेवर कोसळला. तरीही तो कसाबसा उठला व धडपडत एका हेलिकॉप्टरच्या मागे पोहोचण्यात यशस्वी झाला. इस्साही सुखरूप हेलिकॉप्टर जवळ पोहोचला.

विमानाची तपासणी करायला गेलेल्या इस्सा आणि टोनीला विमानातले पोलीस जेरबंद करणार आणि राहिलेल्या “दोन किंवा तीन” दहशतवाद्यांना पाच स्नायपर ठार मारणार असा जर्मन पोलीसांचा प्लॅन पुरेपूर फसला.

एकूण आठ दहशतवादी होते आणि आठ दहशतवाद्यांसाठी पाच स्नायपर अपुरे होते. दहशतवाद्यांचा खरा आकडा तीस मिनीटे आधी संपूर्ण जगाला कळाला होता पण विमानतळावरील स्नायपर्सपर्यंत ही माहिती पोहोचली नव्हती. कारण…? कारण त्यांच्याकडे संपर्कासाठी रेडीओ नव्हते.

सगळे स्नायपर्स अजूनही “चार किंवा पाच” दहशतवाद्यांच्या प्रतिक्षेत होते. इस्साच्या आदेशावरून आता दहशतवाद्यांनीही गोळीबार सुरू केला. गोळ्या कंट्रोल टॉवरवरून येत आहेत हे पाहून कंट्रोल टॉवर व त्याच्या जवळील लाईट्सवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला.

यादरम्यान दहशतवाद्यांनी झाडलेली एक गोळी कंट्रोल टॉवरच्या तळमजल्यावर बंदोबस्ताला असलेल्या एका पोलीस अधिकार्‍याला डोक्यात लागली व तो तत्काळ मरण पावला. “चार किंवा पाच” ऐवजी “आठ” दहशतवादी प्रत्यूत्तर देऊ लागल्यानंतर स्नायपर्स ही गडबडले व जमेल तसे तेही प्रत्यूत्तर देऊ लागले.

कंट्रोल टॉवरवरून स्नायपरही गोळीबार करत होते, मात्र विमानतळावरचे लाईट्स आणि चुकीच्या पध्दतीने लँड झालेली हेलीकॉप्टर्स त्यांची मोठ्या प्रमाणात कोंडी करत होते, नेम धरून गोळ्या झाडणे (Precision Shots) स्नायपर्सना कठीण जात होते. त्यामुळे दहशतवाद्यांच्या अंदाधुंद गोळीबाराला तेही अंदाधुंदपणेच उत्तर देत होते. सुदैवाने दहशतवाद्यांना गोळ्या लागत होत्या, दहशतवादी जखमी होत होते. सर्वत्र गोंधळ माजला होता.

हे सर्व नाट्य ओलीस हेलिकॉप्टरमध्ये बसून पाहत होते. हात पाय बांधलेल्या अवस्थेत, असहाय्यपणे. विमानतळावर काय घडते आहे याचे अंदाज बांधून विमानतळाबाहेर असलेली “मिडीया सर्कस” त्या बातम्याही “थेट प्रक्षेपित” करत होती.

रात्रीचे ११ वाजले. गोळीबाराला थोडा वेळ उसंत मिळाली. संधी पाहून हेलिकॉप्टरचे पायलट पळून गेले. आता फक्त अपहरणकर्ते आणि ओलीस राहिले. ओलीसांनी दातांच्या सहाय्याने दोर सैल करायचा, सोडवायचा प्रयत्न केला पण त्यांना ते शक्य झाले नाही.

एक तास भयाण शांततेत गेला. अचानक दहशतवाद्यांना काही चिलखती गाड्या रनवेवर येताना दिसल्या. ते घाबरले व त्यांना आपण पकडले जाणार याची जाणीव झाली. एक दहशतवादी पहिल्या हेलिकॉप्टरकडे तर आणखी एक जण दुसर्‍या हेलिकॉप्टरकडे धावला. हेलिकॉप्टरमध्ये चढून खूप जवळून खेळाडूंवर गोळ्या झाडल्या. सर्वजण काही क्षणात मरण पावले.

दुसर्‍या हेलिकॉप्टरमध्ये याचीच पुनरावृत्ती झाली फक्त या दहशतवाद्याने आणखी एक पराक्रम केला. या हेलिकॉप्टरमधल्या खेळाडूंवर गोळ्या झाडून त्याचे समाधान झाले नसावे. त्याने स्वत:जवळचा एक हँड ग्रेनेड घेतला, पीन काढली व हेलिकॉप्टरमध्ये खेळाडूंच्या पायाशी भिरकावला.

प्रचंड मोठ्ठा स्फोट झाला.

हेलिकॉप्टरसह आतल्या खेळाडूंची अक्षरश: राख झाली. गोळीबारातून वाचले ते खरे दुर्दैवी ज्यांना या यातना जिवंतपणी भोगाव्या लागल्या.

thepostman
स्फोट झाल्यानंतर झालेली हेलीकॉप्टरची अवस्था.

(“C” मार्क असलेल्या इमारतीच्या वरच्या भागात तीन स्नायपर्स व दोन्ही हेलीकॉप्टर्सच्या शेपटाच्या दिशेने जमिनीवर एक एक स्नायपर तैनात केले होते)

thepostman
कंट्रोल टॉवर, आसपासचा परिसर आणि बेचिराख झालेले हेलिकॉप्टर…

पुन्हा गोळीबार सुरू झाला. अखेर कंट्रोल टॉवरवरच्या स्नायपर्सना यश मिळाले. इस्साला गोळी लागली व तो रन वेवर कोसळला. टोनी व बाकीचे सहकारी गोळीबार करतच होते. आणखी काही दहशतवादी गोळ्या लागून कोसळले. एकूण चार दहशतवादी ठार झाले. चार जण अजूनही जिवंत होते, जखमी होते पण जिवंत होते.

एकही खेळाडू जिवंत नाही ही खात्री पटल्यावर ठार न झालेले तीन दहशतवादी पोलीसांना शरण गेले. गंभीर जखमी अवस्थेत टोनीने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याला पोलीसांनी घेरले व दरम्यान झालेल्या गोळीबारात टोनी ठार झाला. पहाटे पहाटे सुरू झालेल्या घडामोडी रात्री ०१:३० वाजता संपल्या. एकूण १७ जीव घेवून.

बाहेर उलटसुलट बातम्या येतच होत्या, दुर्दैवाने सत्यता पडताळून न पाहता त्या प्रक्षेपित होत होत्या आणि सगळेजण त्या बातम्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवत होते. अचानक एक बातमी आली की सर्व ओलीस सुरक्षित आहेत आणि दहशतवाद्यांना जेरबंद करण्यात आले आहे. सगळीकडे जल्लोश सुरू झाला.

ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये ही बातमी पोहोचली. जर्मनीमध्ये, इस्राईलमध्ये आणि जगभर ही बातमी पोहोचली. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. इस्राईलच्या राजदूतांनी सर्वांचे अभिनंदन केले.

अभिनंदनाचा स्वीकार करायला एका व्यक्तीने स्पष्ट नकार दिला – अँकी स्पिट्झर. फेन्सींग कोच अँड्रे स्पिट्झरची पत्नी. जोपर्यंत अँड्रेशी प्रत्यक्ष बोलणे होत नाही तोपर्यंत कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवायला अँकी तयार नव्हती.

विमानतळावर हळूहळू अ‍ॅम्ब्यूलन्स आणि पोलीसांच्या गाड्यांची वर्दळ वाढू लागली. अधिकृत व खरी बातमी आली, रात्री ०३:३० च्या दरम्यान.

सर्वच्या सर्व खेळाडू विमानतळावर मरण पावले”

जल्लोश करणारे इस्रायली दु:खात बुडून गेले. ऑलंपिक स्पर्धेतील एक काळा दिवस संपला. या गुणी खेळाडूंना कायमचे नाहीसे करून.

thepostman
जर्मनीच्या विमानतळावर असलेले खेळाडूंचे स्मारक.

काही तासातच दुसरा दिवस उजाडला. सकाळी खेळ सुरू होण्याच्या वेळेस ऑलंपिक स्टेडीयममध्ये ८० हजार प्रेक्षक आणि ३ हजार खेळाडूंच्या उपस्थितीत शोकसभा सुरू झाली. मरण पावलेल्या खेळाडूंचा ओझरता उल्लेख करून ऑलिम्पिक चळवळ किती मजबूत आहे आणि त्याची महती वगैरे वगैरे भाषण सुरू झाले.

या सभेला इस्रायली खेळाडूंचे नातेवाईकही हजर होते. यांपैकी कार्मेल इलियाह या मोशे वाईनबर्गच्या बहिणीला (Cousin) ला हा ताण सहन झाला नाही, रडत रडतच ती कोसळली व हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मरण पावली. .

सकाळी जर्मनीला पोहोचून अँकीसुध्दा शोकसभेला हजर होती. मृत खेळाडूंना मानवंदना देण्यासाठी आणि शोक दर्शवण्यासाठी ऑलंपिकचा ध्वज आणि सर्व सहभागी देशांचे ध्वज अर्ध्यावर आणले गेले.

१० मुस्लिम / अरब राष्ट्रांनी त्यांचे ध्वज अर्ध्यावर आणण्यावर आक्षेप घेतला. त्यांचे ध्वज लगेचच वर घेतले गेले. (या दरम्यानची उल्लेखनीय बाब म्हणजे मुस्लिम / अरब राष्ट्रांपैकी फक्त जॉर्डनचे राजे किंग हसन यांनी या हत्याकांडाचा स्पष्ट शब्दात निषेध केला)

काही न घडल्याप्रमाणे खेळ सुरू झाले. या घटनेमुळे इतर देशांचेही अनेक खेळाडू ऑलिम्पिक सोडून परत फिरले. काही खेळत राहिले. खूप थोड्या खेळाडूंनी हेही मान्य केले की त्यांची खेळण्याची, स्पर्धा करण्याची इच्छाशक्ती मरून गेली आहे, पण ते स्पर्धेत थांबले. जड मनाने इस्रायली टीम परत फिरली. त्यांच्यासाठी एक दु:खद अध्याय संपला होता. पण काहीजणांसाठी हा अध्याय इथेच संपणार नव्हता. ही तर सुरूवात होती.

इस्त्रायलच्या पंतप्रधान गोल्डा मायर आणि मोस्साद ‘इस्रायली मार्ग’ शोधण्यात गुंतले आणि अँकी स्पिट्झर तिचा स्वत:चा.

म्युनिकमध्ये पोहोचल्यावर अँकीने इस्रायली खेळाडूंच्या अपार्टमेंटला भेट दिली; जिथे दोन खेळाडूंची हत्या झाली होती, जिथे सर्वांना ओलीस ठेवले गेले होते व जिथे जगाने अँड्रे स्पिट्झरला खिडकीतून ऑलंपिक अधिकार्‍यांशी बोलताना शेवटचे जिवंत बघितले होते.

thepostman

पुढे २० वर्षे अँकीने जर्मन सरकारचा सतत पिच्छा पुरवला. या घटनेचा अधिकृत अहवाल मिळावा म्हणून जंग जंग पछाडू लागली. अँकीची एक खूप साधी अपेक्षा होती. या घटनेची जबाबदारी कुणीतरी स्वीकारावी. पण तिच्या हाती काहीच लागले नाही. जर्मन सरकारने असा कोणताही अहवाल नाही हेच पालूपद कायम ठेवले.

अचानक १९९२ च्या दरम्यान एक अज्ञात व्यक्ती अँकीला या घटनेचे जर्मनीचे सरकारी अहवाल आणि कागदपत्रे पाठवू लागली. या अज्ञात व्यक्तीने किती कागदपत्रे पाठवावीत? तब्बल ३८०० फाईल्स.

हे सगळे विश्लेशण करून नक्की काय झाले हे समजण्यासाठी अँकीने एका तज्ञाची मदत घेतली – लीरॉय थॉमसन. लीरॉय थॉमसन हा निवृत्त अमेरिकन आर्मी अधिकारी. ओलीस आणि अपहरण क्षेत्रातील तज्ञ.

निघालेले निष्कर्ष आणि परिस्थिती धक्कादायक होती..

(१) ऑलिम्पिक व्हिलेजची सुरक्षाव्यवस्था फक्त कागदावर मजबूत दिसत होती. प्रत्यक्षात सुरक्षाव्यवस्था अत्यंत ढिली व अकार्यक्षम होती. सहा सात फुटी कुंपणावरून कुणीही ये जा करू शकत होते. चेकपोस्ट व सिक्यूरीटी गार्ड्सचा कोणाताही वचक नव्हता.

(२) ओलीसांच्या सुटकेचा पहिला प्रयत्न ओलीस आणि अपहरणकर्ते अपार्टमेंटमध्ये असताना केला गेला. या प्रयत्नाच्यावेळी दहशतवाद्यांची नक्की संख्या, त्यांच्याकडे असलेली शस्त्रे, शस्त्रांची क्षमता, दारूगोळा, दहशतवाद्यांचा नक्की ठावठिकाणा (कोणत्या खोलीमध्ये आहेत, एकत्र आहेत की विखूरलेले आहेत) इमारतीची रचना, नकाशे व प्लॅन.

ओलीस जखमी आहेत की नाही याची वस्तुस्थिती, ओलीसांना कोणत्या अवस्थेत ठेवले आहे, कुठे ठेवले आहे, अशी अत्यंत महत्वाची माहिती नसताना आणि कोणत्याही रेस्क्यू प्लॅनशिवाय दहशतवाद्यांवर हल्ला करायला निघालेले हे पोलीस यशस्वी ठरले असते तर ते बहुदा मोठे आश्चर्य ठरले असते.

ट्रॅकसूटमध्ये रेस्क्यूसाठी निघालेल्या या टीमकडे फक्त सब मशिनगन होत्या. ही रेस्क्यू टीम ट्रॅकसूटमध्ये अवघडून वावरत होती. शस्त्रांच्या हाताळणीत सराईतपणा नव्हता आणि त्यांच्या हालचाली नवशिक्यासारख्या होत्या. हे सगळेजण कोणतेही कमांडो पथक किंवा स्पेशल युनीट वगैरे नव्हते. हे सगळे जण स्ट्रीट पोलीस / साधे पोलीस होते. ज्यांच्याकडे अशाप्रकारच्या परिस्थितीत काय करावे याचे विशेष ज्ञान आणि प्रशिक्षण नव्हते.

thepostman

वरील फोटो निरखून बघितला तर लक्षात येते की हे पोलीस बंदुका नवशिक्यासारख्या हाताळत आहेत. बंदुकीची नळी स्वत:कडे करून देवाणघेवाण सुरू आहे. कोणत्याही परिस्थीतीत बंदूक हाताळताना किंवा बंदूक घेऊन कोणतीही हालचाल करताना बंदुकीची नळी स्वत:कडे किंवा आपल्या सहकार्‍याकडे करायची नाही हा शस्त्रे हाताळायचा महत्वाचा संकेतही पाळला जात नव्हता (हा संकेत आपल्याकडे NCC पासून शिकवायला सुरू करतात व नियम म्हणून मनावर बिंबवला जातो) यावरून या रेस्क्यू टीमचे कौशल्य लक्षात यावे.

याही पुढची बाब म्हणजे रेस्क्यू प्लॅन रद्द झाल्यानंतर एक पोलीस अपहरणकर्त्यांच्या इमारतीवरून सिगरेट फुंकत खाली उतरला. यावरून रेस्क्यू दरम्यान ते किती गंभीर होते हेही लक्षात येते आणि हास्यास्पद बाब म्हणजे या सगळ्याचे “थेट प्रक्षेपण” सुरू होते. रेस्क्यू टीमच्या ठावठिकाण्यासहित.

(३) या घटनेदरम्यान बघ्यांची गर्दी वाढतच होती व ती नियंत्रणात आणण्याचे कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत की ती गर्दी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. गर्दीमध्ये एकूण बघ्यांची संख्या होती तब्बल ७५ ते ८० हजार!
अपहरणकर्त्यांनी एखादा ग्रेनेड किंवा ऑटोमेटीक रायफलची एखादी फैर झाडली असती तर ओलीसांपेक्षा कित्येक पटीने जास्त बळी गेले असते.

(४) अतिउत्साही मिडीया सर्कसला आवरण्याचे कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत.

(५) विमानतळावर घडलेल्या घटनांदरम्यान जर्मन पोलीसांनी केलेल्या चुका पाहिल्या तर या हत्याकांडाला जर्मनीचा पाठिंबा होता की काय असा प्रश्न पडतो.

(अ) दहशतवाद्यांचा खरा आकडा अर्धा तास आधी कळून सुध्दा प्लॅनमध्ये कोणताही बदल केला गेला नाही.
विमानतळाभोवती असलेल्या ५ स्नायपर्सकडे बुलेटप्रूफ जॅकेट, हेल्मेट आणि रेडीयो नव्हते. या स्नायपर्सकडे स्नायपर गन नव्हत्या, ज्या साध्या गन होत्या, त्याला दुर्बीणी नव्हत्या, नाईट व्हिजन नव्हते आणि हे स्नायपर्स सुध्दा स्ट्रीट पोलीस / साधे पोलीस होते, त्यांना स्नायपर शूटींगचे कोणतेही प्रशिक्षण दिले गेले नव्हते.

जर्मनीच्या नियमाप्रमाणे लष्कर अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करू शकत नव्हते त्यामुळे स्नायपर बॅटलमध्ये दुसर्‍या महायुध्दात नावलौकीक मिळवणार्‍या जर्मनीने या अत्यंत महत्त्वाच्या क्षणी महत्त्वाच्या ठिकाणी साधे पोलीस नेमले.

(ब) संपूर्ण हल्ल्यादरम्यान कंट्रोलरूम / लीडर, स्नायपर्स व विमानातले वेष बदललेले पोलीस यांच्यात कोणताही ताळमेळ नव्हता, कोणतेही संभाषण नव्हते.

(क) विमानातल्या पोलीस टीमने हेलीकॉप्टर लँड होण्याच्या केवळ अर्धा सेकंद आधी प्लॅनमध्ये बदल केला व ‘इंधन भरलेल्या विमानात दहशतवाद्यांनी एका ग्रेनेडचा स्फोट केला तर कोणीच जिवंत राहणार नाही’ या भीतीने ते पळून गेले. या बदलाची कोणालाही काहीही माहिती दिली गेली नाही. (यामुळे ८ दहशतवादी विरूध्द ५ स्नायपर्स अशी स्थिती तयार झाली.)

(ड) ठरलेल्या प्लॅनप्रमाणे हेलीकॉप्टर्स कंट्रोल टॉवरकडे बाजूचे दरवाजे करून उतरणार होते जेणेकरून सर्व स्नायपर्सना दहशतवाद्यांवर गोळ्या झाडणे सोपे गेले असते पण काही अनाकलनीय कारणामुळे दोन्ही हेलीकॉप्टर्स कंट्रोल टॉवरकडे तोंड करून उतरले. त्यामुळे स्नायपर्स ना दहशतवाद्यांचा वेध घेणे अवघड गेले.

एक स्नायपर दहशतवाद्यांपासून केवळ ५० मीटर अंतरावर होता. पण चुकीच्या पध्दतीने लँड झालेल्या हेलीकॉप्टरमुळे तो कंट्रोल टॉवरवरच्या स्नायपर्सच्या थेट मारक्षेत्रात आला. सरळ त्याच्या दिशेने येणार्‍या त्याच्याच सहकार्‍यांच्या गोळ्यांमुळे जमिनीवरच्या स्नायपरला एकही गोळी झाडायची संधी मिळाली नाही. (५ स्नायपर्स पैकी एक निकामी – म्हणजे ८ दहशतवादी विरूध्द ४ स्नायपर्स)

(इ) रात्री ११ च्या दरम्यान गोळीबार थांबल्यानंतर चिलखती गाड्या (APC) विमानतळावर येण्यासाठी तब्बल एक तास लागला. कारण? चिलखती गाड्या म्युनिकमध्ये संरक्षणासाठी नेमल्या होत्या व जर्मन पोलीस या गाड्यांना बोलवायचे विसरले! (हो! विसरले!)

लक्षात आल्यावर रेडीयोने संपर्क साधून या गाड्यांना अवताण धाडले गेले पण या गाडयांचा मार्ग मिडीया आणि बघ्या प्रेक्षकांनी व्यापलेला होता, जर्मन पोलीस हा मार्ग मोकळा करायचेही विसरले. म्युनिकमधून विमानतळावर येण्यासाठी या गाड्यांना बरेच अडथळे पार करावे लागले व त्यात बराच वेळ वाया गेला.

(फ) या गोळीबारादरम्यान स्नायपर्ससुध्दा अंदाधुंद गोळीबार करत होते. नेम धरून गोळ्या मारण्याचा प्रयत्न (Precision Shots) खूप कमीवेळा केला गेला.

(ग) संपूर्ण रेस्क्यू प्लॅनवर, चालू घडामोडींवर कोणाचेही नियंत्रण नव्हते.

या सर्व चुकांची परीणीती ९ खेळाडूंच्या दुर्दैवी मृत्यूत झाली. ऑलिम्पिक खेळ चालू राहतील तोपर्यंत ही रक्तरंजीत घटना कुणीही विसरू शकणार नाही. ऑलिम्पिकच्या पाच कड्यांपैकी एक रक्तवर्णी कडे कदाचित ही घटना विसरू देणार नाही.

या घटनेनंतर दीड महिन्यातच एका लुफ्तान्सा एअरलाईन्सच्या बोईंगचे अपहरण झाले. अपहरणकर्त्यांनी Munich Massacreमधल्या तीन जिवंत दहशतवाद्यांच्या सुटकेची मागणी केली आणि जर्मनीने ती मान्य करत तीनही दहशतवाद्यांना लगेचच सोडून दिले. या बोईंगचे अपहरण हाही एक विवादास्पद मुद्दा आहे.

या अजस्त्र विमानात त्यावेळी फक्त १२ प्रवासी होते, एकही स्त्री आणि लहान मूल नव्हते आणि Munich Massacre मधल्या तीन जिवंत दहशतवाद्यांना मुक्त करताना जर्मनीने इस्राईलला कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतले नाही.


Munich Massacre ही घटना इथेच जरी संपली असली तरी इस्राईलने हे सगळे सहजासहजी संपवले नाही. म्युनिकमधून जिवंत बाहेर पडलेल्या तीन पैकी दोन अपहरणकर्त्यांना ते लपलेल्या देशात, त्यांच्या ठिकाणी घुसून ठार मारले. यासोबत Munich Massacre “प्लॅन” करणारे डझनभर प्लॅनरही असेच ठार ‍मारले गेले.

(या मालिकेचा पुढील भाग – Operation Wrath of God)


सर्व फोटो आणि माहिती अंतर्जालावरून साभार.या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!