आज सुसाट असणारा मुंबई पुणे प्रवास दोनशे वर्षांपूर्वी कसा होता..?

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


लेखक- अनुराग वैद्य

‘मुंबई-पुणे’ हा प्रवास संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये काही सुंदर प्रवासांपैकी गणला जातो. मुळातच हा ‘मुंबई-पुणे’ प्रवास कधीच कंटाळवाणा ठरत नाही याचे मुख्य कारण म्हणजे या रस्त्यावर असलेले निसर्ग सौंदर्य. आजही कित्येक लोक हे ‘डेक्कन क्वीन’ या रेल्वेने प्रवास करतात.

‘मुंबई-पुणे’ या लोहमार्गावरील ही ‘डेक्कन क्वीन’ ही मुंबईकर आणि पुणेकर यांच्यासाठी लाईफलाईनच आहे परंतु हाच ‘मुंबई-पुणे’ प्रवास साधारणपणे 200 वर्षांपूर्वी कसा होता हे बघणे पण फार महत्वाचे आहे.

ही गोष्ट आहे इ.स. १८०९ सालामधली. ‘मराया ग्रॅहॅम’ नावाची एक पर्यटक ही मुंबईमध्ये आली होती. ‘मराया ग्रॅहॅम’ हिच्यासोबत त्यावेळेस जवळपास २०० लोक होती. यामधले सगळे प्रवासी हे मुंबईमधून निघाले नव्हते ते वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले होते. यातले काही ब्रिटिश पर्यटक हे आधी मुंबई येथून निघून पनवेल येथे जाऊन मुक्कामी होते.

‘मराया ग्रॅहॅम’ हिच्या सोबत जे काही ब्रिटिश पर्यटक होते त्या सगळ्यांनीच मुंबई येथून निघण्यापूर्वी सोबत तंबू घेतले, भांडीकुंडी, आणि स्वयंपाकाचे सामान असे घेऊन सोबत काही नोकर चाकर देखील घेतले होते. यातील काही नोकरांना ‘मराया ग्रॅहॅम’ आणि तिच्या सोबत असलेल्या ब्रिटिश लोकांनी आधी पुढे गेलेल्या लोकांच्या सोबत पुढे पाठवले होते. ते नोकर-चाकर हे देखील ‘पनवेल’ येथे मुक्कामी होते. या नोकर-चाकरांच्यामध्ये पालखीवाहक, घोडेवाले हे देखील होते.

सोबत असलेले सामान पुढे गेल्यानंतर ‘मराया ग्रॅहॅम’ आणि तिच्यासोबत असलेले ब्रिटिश सहप्रवासी हे सगळे ‘मुंबई’ बंदरामध्ये आले आणि बोटीमध्ये बसले आणि या सगळ्यांचा पुण्याकडे प्रवास चालू झाला. 

‘मराया ग्रॅहॅम’ आणि तिच्या सहप्रवाश्यांना ‘मुंबई’ येथून ‘पनवेल’ येथे पोहोचण्यास बोटीने तीन तास लागले. या तीन तासांच्या ‘मुंबई-पनवेल’ समुद्र प्रवासानंतर हे सगळे ‘पनवेल’ बंदरापासून दोन मैल अंतरावर असलेल्या शेतामध्ये विश्रांतीसाठी थांबले.

आधीच आलेल्या नोकर-चाकरांनी ‘पनवेल’ बंदरापासून दोन मैल अंतरावरील शेतामध्ये तंबू ठोकून ठेवलेले होते तसेच या सगळ्या लोकांची जेवणाची व्यवस्था देखील करून ठेवलेली होती.

‘मराया ग्रॅहॅम’ आणि तिच्यासोबत असलेले हे प्रवासी ‘पनवेल’ येथून दोन मैल अंतरावर ज्या शेतात विश्रांतीसाठी थांबले त्या शेताच्या शेजारीच एक आंब्याची बाग होती आणि तलाव देखील होता.

मराया ग्रॅहॅमने पनवेल येथील तळ्यात आढळणाऱ्या कमळांची (वॉटर लिली) या फुलांची आठवण लिहिली आहे तसेच तिने पनवेल गावामध्ये असलेल्या दुकानांबद्दल देखील आठवण लिहिली आहे त्यामध्ये ती लिहिते की, पनवेल येथील प्रत्येक छोट्यामोठ्या दुकानांमध्ये ‘तलवारी’ आणि ‘भाले’ लटकवले होते.

“काही वर्षांपूर्वी चोरांपासून वाटणाऱ्या भीतीपोटी आणि स्वतःच्या संरक्षणासाठी हे तलवार आणि भाले येथे ठेवलेले असणार, परंतु आता माणसांऐवजी रानटी आणि हिंस्त्र जनावरांच्यापासून रक्षण व्हावे यासाठी हे इथे आपल्याला पहायला मिळतात”, असे मराया ग्रॅहॅम हिने आपल्या ‘मुंबई-पुणे’ प्रवासामध्ये आलेल्या अनुभवामध्ये लिहून ठेवले आहे.

मराया ग्रॅहॅम आणि तिच्या सह प्रवाश्यांच्या पनवेलनंतरच्या विश्रांतीचे ठिकाण हे खोपोली होते. परंतु हा ‘खोपोली’ पर्यंतचा प्रवासदेखील दोन टप्प्यात केला गेला. ‘पनवेल’ ते ‘चौक’ हे अंतर रात्रीपर्यंत कापले गेले.

या प्रवासाचे वर्णन ती लिहिताना आपल्या ‘मुंबई-पुणे’ प्रवासाच्या अनुभवामध्ये ती लिहिते की “घाटाचे आणि दऱ्याखोऱ्यांचे सौंदर्य मावळत्या सूर्याच्या साक्षीने पाहताना खूप मजा वाटली”. 

जेव्हा ‘मराया ग्रॅहॅम’ आणि तिचे सह प्रवासी हे सगळे ‘चौक’ येथे पोहोचले तेव्हा रात्री बराच उशीर झाला होता. तसेच ‘मराया ग्रॅहॅम’ आणि सह प्रवासी हे ‘चौक’ गावामध्ये पोहोचले तो दिवस बाजाराचा दिवस होता.

त्या रात्री ‘चौक’ गावामध्ये ‘मराया ग्रॅहॅम’ हिने जवळपास पाचशे बैलगाड्या ‘चौक’ गावामध्ये होत्या हे ‘मराया ग्रॅहॅम’ हिने पाहिले. तसेच रात्री अंधार पडल्यानंतर बाजारसाठी आलेल्या लोकांच्या पेटलेल्या चुली आणि शेकोट्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेले घोडे आणि तंबू आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या वृक्षाच्या अंधारात सळसळणाऱ्या फांद्या हे दृष्य ‘मराया ग्रॅहॅम’ हिला खूप सुंदर वाटले.

रात्री उशिरा जेवण करून जेव्हा ‘मराया ग्रॅहॅम’ आपल्या तंबूमध्ये झोपेसाठी परतायला लागली तेव्हा तिला ती ज्याठिकाणी तंबूमध्ये जेवली तो तंबू काढताना पाहिला. याचे मुख्य कारण म्हणजे पहिले जे लोक तिथे पोहोचले होते ती सगळी लोक पुढच्या प्रवासाला निघालेली होती.

जेव्हा मागचे हे ब्रिटिश लोक पुढच्या विश्रांती टप्प्यावर येऊन पोहोचतील तेव्हा त्या लोकांसाठी ‘ब्रेकफास्ट’ तयार ठेवण्याची जबाबदारी या सगळ्या पुढे गेलेल्या लोकांवर होती. जेव्हा दुसऱ्या दिवशी ‘मराया ग्रॅहॅम’ आणि सहप्रवासी पुढच्या प्रवासाला निघाले तेव्हा ‘मराया ग्रॅहॅम’ हिच्या पालखीमधला थर्मामीटर ६८ फॅरनहिट तापमान दाखवत होता.

 ‘खोपोली’ येथे पोहोचेपर्यंत सूर्य मध्यावर येऊन तळपत होता, तेव्हा तापमान हे २२ डिग्री ने वाढले होते असे ‘मराया ग्रॅहॅम’ आपल्या प्रवास वर्णनामध्ये लिहून ठेवले आहे.

‘खोपोली’ येथून निघून घाट चढून प्रवास करायला मराया ग्रॅहॅमला चार तास लागले. परंतु हा प्रवास फक्त १२ मैलांचा झाला. परंतु या सगळ्या प्रवासाचा तिने मनमुराद आनंद घेतला. घाटामधून प्रवास करताना आणि घाटाचे सौंदर्य न्याहाळताना आपल्याला स्कॉटलंड येथील निसर्गरम्यतेची आठवण झाली असे ‘मराया ग्रॅहॅम’ हिने लिहिलेले आहे.

दिनांक १४ डिसेंबर रोजी ‘पनवेल’ येथून निघालेली ही सगळी ब्रिटिश मंडळी दिनांक १६ डिसेंबर रोजी खोपोली येथे पोहोचली. ‘मराया ग्रॅहॅम’ आणि मंडळी यांचा पुढचा टप्पा होता तो ‘कार्ले लेणी’ येथे. तो १७ डिसेंबर रोजी गाठला गेला. 

‘मराया ग्रॅहॅम’ पालखीमध्ये बसून ‘कार्ले लेणी’ पाहायला गेली. तेव्हा दुपारचे १२ वाजले होते. ‘कार्ले लेणी’ पाहात असताना ‘मराया ग्रॅहॅम’ हिला पुण्यावरून आलेला ‘चोपदार’ भेटला.

पुण्यावरून आलेल्या या ‘चोपदाराला’ पुण्याच्या तत्कालीन ब्रिटीश रेसिडेंट याने पाठवले होते. ‘मराया ग्रॅहॅम’ आणि तिच्यासोबत असलेले ब्रिटिश प्रवासी येणार हे समजल्यामुळे रेसिडेंट ‘रसेल’ स्वतः ‘कार्ले’ येथे तिच्या स्वागताला आलेला होता.

रेसिडेंट ‘रसेल’ यानेसुद्धा ‘कार्ले लेणी’ बघितली नव्हती म्हणून तोपण या मंडळीमध्ये सामील झाला. दिवसभर ‘कार्ले लेणी’ इथे थांबून दुसऱ्या दिवशी हे सगळे लोक ‘तळेगाव’ येथे पोहोचले. ‘तळेगाव’ येथे एका तळ्याकाठी त्यांनी आपले तंबू टाकले.

१९ डिसेंबर रोजी मजल दरमजल करत ‘मराया ग्रॅहॅम’ आणि मंडळी ‘चिंचवड’ येथे पोहोचले. ‘मोरया गोसावी’ यांच्या शिष्याचे – १२ वर्षांच्या मुलाला गणेश देव मानले जात असे. त्याचे मराया ग्रॅहॅमने दर्शन घेतले, ते देखील नदीच्या काठावर असलेल्या प्रशस्त वास्तूमध्ये ‘देव वाड्यामध्ये’.

ब्राम्हण दुभाष्याच्या मदतीने ‘देव’ ‘मराया ग्रॅहॅम’ हिच्याशी बोलले. देव वाड्यापालिकडच्या नदीच्या काठावर ‘मराया ग्रॅहॅम’ आणि मंडळी तंबू ठोकून थोड्यावेळ विश्रांतीसाठी राहिली आणि असा सगळा टप्याटप्याने ‘मुंबई-पुणे’ प्रवास ‘मराया ग्रॅहॅम’ आणि मंडळी यांनी केला.

जवळपास पाच दिवसांनी म्हणजे १९ डिसेंबर रोजी मुळा-मुठा नद्यांच्या संगमावर बांधलेल्या रेसिडेंट याच्या निवासस्थानी ‘मराया ग्रॅहॅम’ आणि मंडळी पोहोचली.

या सगळ्या ‘मराया ग्रॅहॅम’ हिच्या वर्णनावरून आपल्याला ‘मुंबई-पुणे’ हा प्रवास किती खडतर होता हे समजते. परंतु त्यापूर्वी ‘मुंबई-पुणे’ प्रवास कसा असेल याची कल्पना केलेलीच बरी…!!!


सदर लेख महाराष्ट्राची शोधयात्रा वर  पूर्वप्रकाशित.

संदर्भग्रंथ:-

१. A Journal of Residence In India:- Maria Graham, George Ramsay and Company, 1813.


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :
फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!