गोलकीपर ते बेस्ट विकेटकीपर : “माही” धोनीने असे गाजवले मैदान

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


भारतीयांचा क्रिकेट हा प्रचंड आवडता खेळ आहे हे तर काही सांगायलाच नको आणि त्यातही आपला धोनी माहिती नाही असा क्रिकेटप्रेमी भारतातच काय तर भारताबाहेरही सापडणे अशक्यच आहे.

ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण न करता केवळ १२ वी पास असलेला, कुठलंही शास्त्रीय प्रशिक्षण नसूनही आपल्या जगावेगळ्या अंदाजाने क्रिकेटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा खेळाडू अफाट मेहनतीने भारतीय संघात दाखल झाला. धोनीला त्याच्या मित्रांची मिळालेली साथ, आयुष्यात आलेले चढउतार या गोष्टी तो आत्ता जिथे आहे तिथे पोहचवतात असं तो नेहमी सांगतो.

एका गरीब घरातून आलेला कष्टकरून मोठा झालेला मुलगा ते स्वतःच्या नेतृत्वाखाली देशाला तब्बल २८ वर्षांनी वन डे क्रिकेटमध्ये वर्ल्डकपमध्ये विजय मिळवून देणारा यशस्वी कर्णधार अशी त्याची ओळख आहे. धोनीच्या व्यक्तिमत्वाचे असे अनेक पैलू आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला फार माहिती नाही. तेच आपण आज जाणून घेऊयात.

रांची इथे १९८१ मध्ये देवकी आणि पानसिंग यांच्या पोटी जन्म झालेला महेंद्रसिंग धोनीला लहानपणापासूनच शालेय शिक्षणात कमी आणि इतर गोष्टींमध्येच जास्ती रस होता. हळूहळू त्याला उत्तेजन मिळत गेलं आणि तो खेळाडू म्हणून पुढे येऊ लागला.

फुटबॉल, बॅटमिंटन यांसारख्या खेळांमध्ये अगदी जिल्हास्तरीय स्पर्धा खेळलेला धोनी क्रिकेटच्या बाबतीत फारसा सिरीयस कधी नव्हता. पण, त्याच्यात असणारे गुण पारखून धोनीच्या क्रीडा प्रशिक्षकांनी त्याला क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला.

फुटबॉल खेळताना गोलकिपरची जबाबदारी सांभाळणारा हा पुढे खेळाडू गोलकिपरवरून विकेटकिपर झाला ते यांच्या सल्ल्यानेच.

विविध स्तरांवर विविध प्रकारच्या सामन्यात आपली दमदार कामगिरी दाखवणाऱ्या धोनीच्या भारतीय क्रिकेट संघात निवड होण्यामागची गोष्ट खूपच रंजक आहे.

बंगालचे माजी कर्णधार प्रकाश पोद्दार हे एकदा १९ वर्षांखालील संघाचा क्रिकेटचा सामना पाहण्यास गेले होते. तेव्हा बाजूच्या मैदानात बिहारचा संघ एकदिवसीय सामना खेळत होता. या सामन्यादरम्यान बऱ्याच वेळा चेंडू मैदानाच्या बाहेर आला तेव्हा पोद्दार यांनी चौकशी केली कि एवढ्या लांब कोण चेंडू मारतंय. तेव्हा त्यांना धोनीची माहिती मिळाली. पुढे त्यांनी भारतीय संघ निवडकर्त्यांना धोनीची शिफारस केली.

२३ डिसेंबर २००४ रोजी धोनीने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला.

पण केवळ क्रिकेटर हीच ओळख कायम न ठेवता धोनी मैदानाच्या बाहेरदेखील बऱ्याच ऍक्टीव्हीटीमध्ये भाग घेत असतो. त्यात काही त्याचे छंद आहेत, काही व्यवसाय असतील. सगळ्याच क्षेत्रात त्याने उत्तम कामगिरी बजावली आहे.

धोनीला स्पोर्ट्स बाईकचा तसेच कारचा संग्रह करण्याचा मोठा छंद आहे. त्याच्याकडे २३ महागड्या स्पोर्ट्स बाईक्स आहेत. यात हार्ले डेव्हिडसन, दुकाटी यांसारख्या गाड्यांसोबतच कॉन्फेडरेट एक्स १३२ हैलकट ही गाडी पण आहे. ही गाडी असणारा धोनी हा आशिया खंडातील एकमेव व्यक्ती आहे. कारचा विचार केला तर धोनीकडे हॅमर एच २, ऑडी क्यू ७ यांच्यासारख्या महागड्या गाड्या आहेत. धोनीचं हे वाहनांवरचं प्रेम इथेच थांबत नाही तर धोनीचा माही रेसिंग टीम नावाचा एक बाईक रेसिंगचा संघदेखील आहे.

या अवलियाचं केवळ गाड्यांवरच नाही तर कुत्र्यांवर पण प्रचंड जीव आहे. या प्रेमापोटीच धोनीने त्याच्या घरी २ कुत्रे पाळले असून त्यातला एक जारा नावाचा लॅबरोडॉर असून दुसरा सॅम नावाचा अल्सिअन जातीचा कुत्रा आहे. धोनी घरी असल्यावर या कुत्र्यांशी खेळून आपला वेळ व्यतीत करीत असतो.

इतकेच काय तर तुमचा विश्वास बसणार नाही पण धोनीला प्ले स्टेशनवर विविध गेम्स खेळायलासुद्धा फार आवडतं. काँट्रा स्ट्राईक, फर्स्ट पर्सन शूटिंग, ब्लॅक हाक डाऊन मेन ऑफ वेलोर या त्याच्या आवडीच्या प्लेस्टेशन गेम्स असून धोनीला वेळ असताना तो हे गेम्स आवर्जून खेळतो असं तो सांगतो.

तुमच्या आमच्यासारखाच धोनीसुद्धा अनेक कलाकारांचा फॅन आहे. त्यात अमिताभ बच्चन तर त्याचे प्रचंड आवडते नायक. धोनीला लता मंगेशकरांचे व किशोर कुमार यांचे गाणी ऐकत असतो.

याशिवाय धोनी जॉन अब्राहमचा पण फॅन आहे, त्याचा धूम हा सिनेमा आला असताना धोनीने आपले केसं वाढवत जॉनसारखा लूक केला होता.

धोनी त्याच्या कुल अंदाजामुळे कायम चर्चेत असतो, तो चिडत नाही असंही म्हटलं जातं. पण एका मुलाखतीत त्यानेच सांगितलं कि आपल्याला मैदानात खूप वेळा राग येतो. धोनीच्या स्वभावाचं वैशिष्ट्य राग येत नाही हे नसून त्याला राग येतो पण त्याचं त्याच्या रागावर असणारं नियंत्रण हे आहे असं त्याला वाटतं.

आपल्या खेळाने मैदान गाजवत विजय खेचून आणणारा धोनी एक यशस्वी व्यावसायिक देखील आहे. धोनीचा स्वतःचा  “7 By MS Dhoni” या नावाचा  अत्तरांचा ब्रँड आहे. या कंपनीचे इतरही उत्पादने आहेत.

इतक्या गोष्टी एकाच वेळी करताना फिटनेसबाबत मात्र तो प्रचंड जागरूक आहे. तो स्पोर्ट्स फिट्स या कंपनीच्या माध्यमातून इतरांना तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. स्पोर्ट्स फिट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी देखील धोनीची भागीदारी असून सदर कंपनी विविध देशांमध्ये काम करते.

फुटबॉलच्या खेळापासून क्रीडाक्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या धोनीने अद्यापही फुटबॉलचे मैदान सोडले नाही असं आपल्याला म्हणता येईल. इंडियन सुपर लीग या प्रसिद्ध फुटबॉल स्पर्धेत धोनीकडे चेन्नईयन एफ सी या संघाची मालकी असून अभिषेक बच्चन या संघाचा भागीदार आहे. आपल्या व्यस्त वेळापत्रकातुन वेळ काढून धोनी फुटबॉलचे सामने पाहण्यास हजेरी लावत असतो.

याशिवाय धोनी अनेक कंपन्यांच्या जाहिरातीसाठी काम करतो.  SEVEN या लाइफस्टाइल कंपनीचा धोनी ग्लोबल ब्रँड अँबेसिडर असून त्याचे त्या कंपनीत काही प्रमाणात मालकी हक्कसुद्धा आहे.

तर असा हा नामवंत खेळाडू एक अतिशय आदर्श माणूस आणि यशस्वी व्यावसायिक असणारा अवलिया आज ३९ वर्षांचा होतो आहे. भारतीय क्रिकेट संघाला लाभलेल्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असणाऱ्या धोनीने आपल्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत अनेक विजय मिळवून भारतीय संघाच्या खिशात टाकले आहेत. याशिवाय, कितीतरी महत्वाचे किताबसुद्धा मिळवून दिले आहेत. असा हा खेळाडू भारतीय संघाला लाभला हे आपल्या देशाचं भाग्यच म्हणावं लागेल.

त्याने केलेल्या सांघिक विक्रमांमुळे धोनीचा कर्णधारपदाचा कार्यकाळ हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक अत्यंत यशस्वी काळ होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!