आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
१९६६ साली आलेल्या मद्रास ते पौंडेचेरी ह्या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक तयार करण्याची योजना प्रसिद्ध विनोदी अभिनेते महमूद यांनी आखली होती. चित्रपटाच्या कास्टिंग अर्थात कलाकार निवडीच्या कामात ते व्यस्त होते. त्याचवेळी अमिताभ बच्चन आपल्या बालपणीचे सवंगडी राजीव गांधी यांना सोबत घेऊन महमूद यांच्याकडे येऊन पोहचले.
महमूद यांचे भाऊ अन्वर या दोन्ही मुलांना आधीपासूनच ओळखत होते. त्यांनी महमूद यांच्याशी त्या दोघांचा परिचय करून दिला. थोड्यावेळाने महमूद यांनी आपल्या ड्रॉवरमधून पाच हजार रुपये आपले बंधू अन्वर यांच्या हातात दिले आणि सांगितले की हे पैसे अमिताभ यांच्या त्या मित्राला जाऊन दे आणि परवापासून शूटिंगवर रुजू व्हायला सांग. हे ऐकून अन्वर जरा गडबडले.
त्यांनी महमूद यांना पैसे देण्याचे कारण विचारले, त्यावर महमूद उत्तरले की,
हा मुलगा अमिताभपेक्षा जास्त गोरा आहे. हा उद्या जाऊन एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा कलाकार म्हणून नावारूपास येऊ शकतो. त्याच्या हाती हे पैसे दे आणि आपल्या पुढच्या चित्रपटात अभिनय करायला त्याला सांग.
हनिफ झवेरी नावाच्या एका लेखकाने महमूद यांचे आत्मचरित्र लिहीलं आहे. त्यात त्यांनी असा दावा केला आहे की महमूद त्याकाळी कम्पोज नावाच्या एका अंमली पदार्थाच्या हवाली गेले होते. जेव्हा अमिताभ आणि राजीव गांधी त्यांना भेटायला गेले होते त्यावेळी ते त्या अंमली पदार्थाच्या नशेत धुंद होते.
जेव्हा त्यांचे बंधू अन्वर यांनी महमूद यांना राजीव गांधी यांचा पुन्हा परिचय करून देताना सांगितले की हे भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधींचे सुपुत्र राजीव गांधी आहेत, त्यावेळी महमूद यांच्या लक्षात सर्वप्रकार आला. मग त्यांनी अमिताभ यांना त्यांच्या आगामी बॉम्बे टू गोवा ह्या चित्रपटासाठी अभिनेता म्हणून निवडलं. ह्या चित्रपटाने अमिताभ यांचं आयुष्य बदलून टाकलं होतं.
ह्या ‘बॉम्बे टू गोवा’ चित्रपटातील एका दृश्यात अमिताभ हे सँडविच खात असतात आणि तितक्यात शत्रुघ्न सिन्हा तिथे येतात व अमिताभ यांच्या तोंडावर एक जोरदार मुक्का मारतात. ह्या चित्रपटात शत्रुघ्न सिन्हा यांनी खलनायकी भूमिका साकारली होती. आपल्या संघर्षाच्या काळातील मित्र अमिताभच्या सांगण्यावरून त्यांनी ही भूमिका स्वीकारली होती.
चित्रपटातील ह्या दृश्यात मुक्का खाल्ल्यानंतर अमिताभ उठतात आणि सँडविच खाऊ लागतात, हे बघून सलीम जावेद ह्यांची जोडी प्रचंड प्रभावित झाली. त्यांना त्यांच्या जंजिर ह्या चित्रपटातील विजय खन्ना ह्या पात्राच्या भूमिकेसाठी अमिताभच्या रूपाने एक सर्वोत्तम पर्याय दिसला.
अमिताभ यांच्याकडे जावेद अख्तर जाऊन पोहचले आणि त्यांना ह्या चित्रपटातील भूमिकेसाठी विचारणा केली व अमिताभ यांनी आपला होकार कळवला. जंजिर चित्रपट हा अमिताभ यांच्या अभिनय क्षेत्रातील करियरला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला. अमिताभ यांच्या अगोदर धर्मेंद्र आणि देवानंद यांनी जंजिरमध्ये काम करण्यास नकार दिला होता यामुळे जंजिर हा जणू अमिताभ यांच्यासाठी बनलेला चित्रपट होता.
१९६९ साली अमिताभ यांनी ‘सात हिंदुस्तानी’ ह्या चित्रपटातून पदार्पण केले होते पण त्यांना ओळख मिळवून दिली होती ती महमूद यांच्या बॉम्बे टू गोवा ह्या चित्रपटानेच. ह्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एक अजून मजेदार किस्सा घडला होता. अमिताभ हे कितीही चांगले नट असले आणि त्यांचा अभिनय कितीही चांगला असला तरी सुरुवातीच्या काळात डान्स करण्याचा बाबतीत अमिताभ हे फारच कच्चे होते. बॉम्बे टू गोवाच्या एका गाण्याच्या शूटिंग दरम्यान त्यांना एक बसच्या मध्ये आपली सह अभिनेत्री अरुणा ईराणी यांच्यासोबत नाचायचे होते.
अमिताभ यांच्या नृत्य कौशल्याची परीक्षा म्हणून महमूद यांनी त्यांना ताज हॉटेलच्या फ्लोअर वर नाचायला लावलं होतं. पुढे काही दिवसांत ‘देख ना हाय रे’ ह्या गीताचे चित्रीकरण सुरू होणार होते, यासाठी अमिताभ यांना नृत्याचे धडे देण्याची जबाबदारी देवराज लुईस ह्या कोरियोग्राफरच्या खांद्यावर होती.
मुंबईतील एका जुन्या गिरणीत अमिताभ यांच्याकडुन देवराज नृत्य करवून घेत होते. जितका वेळ अमिताभ चुकायचे तितके फटके त्यांच्या पायावर हे देवराज बाबू मारायचे. अगदीच जबरदस्तीने अमिताभ नृत्य शिकले. हे शिकताना त्यांना पायावर छडीचे जे फटके देवराज यांनी मारले होते, याची वाच्यता त्यांनी कुठेच केली नव्हती. मोठ्या मुश्किलीने मिळालेलं चित्रपटाचं काम हातून जाईल ही भीती त्यांना होती.
बॉम्बे टू गोवाच्या वेळी अजून एक गोंधळ झाला होता. ह्या चित्रपटासाठी १९५२ साली आलेल्या चार्ली चॅप्लिनच्या लाईमलाईट ह्या चित्रपटातील एका धुनीच्या आधारावर पंचमदा यांनी एक धून तयार केली होती. पण ही धून त्यांना चित्रपटात वापरता आली नाही, त्यांनी ह्या धुनीवर जे एक गाणं चित्रपटाला जोडलं होतं ते सबंध गाणं चित्रपटातून हद्दपार करण्यात आलं. पंचमदा ह्यांनी या अगोदर गुरुदत्त यांच्या एका चित्रपटासाठी देखील ह्या धुनीचा अयशस्वी प्रयोग केला होता. पुढे मुक्ती ह्या चित्रपटात किशोर कुमारांच्या गाण्याला त्यांनी ही धून वापरली होती.
‘बॉम्बे टू गोवा’ चित्रपटाने अमिताभ आणि महमूद यांच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू केला होता. या चित्रपटानंतर अमिताभ यांनी इतिहास घडवला होता. महमूद यांना एकदा एका मुलाखतीमध्ये अमिताभ यांच्याबद्दल विचारणा करण्यात आली त्यावेळी ते म्हणाले होते,
अमिताभ हे एका वेगवान अश्वासारखा आहे, ज्यावेळी तो पळायला सुरुवात करेल त्यावेळी तो आजच्या सर्व फिल्म स्टार्सला मागे सोडेल.
महमूद यांचे हे शब्द आज तंतोतंत खरे ठरले आहेत. अशाप्रकारे राजीव गांधींना ऑफर झालेल्या ह्या बॉम्बे टू गोवाने अमिताभचं आयुष्य बदलून टाकलं होतं.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.