म्हणून या मुस्लीम देशातील लोक ज्वालामुखीवर असलेल्या गणेश मूर्तीची आजही पूजा करतात

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


इंडोनेशिया या देशात तब्बल १४१ ज्वालामुखी असून त्यापैकी १३० ज्वालामुखी अजूनही सक्रिय आहेत. याच ज्वालामुखींपैकी एक म्हणजे माउंट ब्रोमोवरील ज्वालामुखी. हा जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असल्याने इंडोनेशियात जाणाऱ्या पर्यटकांना या ज्वालामुखीच्या जवळपासच्या भागात जाण्याची परवानगी नाही. परंतु असे असूनही इंडोनेशियातील लोक तिथे असणाऱ्या गणेश मंदिरात दर्शनासाठी जात असतात. त्यांची अशी श्रद्धा आहे कि तिथे रोज होत असलेल्या गणेशपूजनामुळेच त्या ज्वालामुखीचा उद्रेक होत नाहीये.

माउंट ब्रोमो या शब्दाचा अर्थ स्थानिक जावानी भाषेत ब्रह्मा असा होतो. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की ही मूर्ती सुमारे ७०० वर्षांपासून तिथे आहे. इतकेच नाही तर सदर मूर्तीची स्थापनासुद्धा त्यांच्या पूर्वजांनी केली असल्याचा दावा ते करतात. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ही गणेश मूर्ती तिथे असल्यामुळेच आजपर्यंत तिथे असलेल्या ज्वलंत ज्वालामुखीचा उद्रेक होत नाहीये.

या ज्वालामुखीच्या पूर्वेकडील भागात टिंगरासी म्हणून आदिवासी समाज राहतो, तेच या मंदिरातील गणेशाची पूजा करतात. या गणेश मंदिराला पुरा लुहूर पोतेन म्हणून ओळखले जाते.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील गणरायाच्या मूर्ती ज्वालामुखीच्या गोठलेल्या लावापासून तयार करण्यात आलेल्या आहेत.

या आदिवासी जमातीचे सुमारे १ लाखांहून अधिक लोकं ब्रोमो डोंगराभोवती वसलेल्या ३० गावांमध्ये राहतात. ते स्वत: ला हिंदू मानतात इतकेच नाही तर त्यांचा हिंदू रूढींवर परंपरांवर प्रचंड विश्वास आहे. बदलत्या काळासोबतच या समाजात काही बौद्ध प्रथा देखील जोडल्या गेल्या आहेत. आणि त्या प्रथेप्रमाणे या समाजातील लोकं ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रीदेवांची तसेच भगवान गौतम बुद्धांची पूजा करतात.

या सर्व रीतिरिवाजांपैकी एका विशेष पूजेला टिंगरासींमध्ये खूप महत्त्व आहे. ते दरवर्षी वर्षातून १ दिवस गणपतीची पूजा करतात. या पूजेला त्यांच्याकडे यज्ञ कसदा असं म्हटलं जातं. ही पूजा तेराव्या किंवा चौदाव्या शतकापासून सुरू झाली असे मानले जाते, आणि त्यामागे एक लोककथा देखील आहे. या लोककथेनुसार, 

येथील राजाला मुलबाळ होत नव्हतं. पुत्रप्राप्तीसाठी राजाने या देवतेची उपासना केली तेव्हा देवाने त्यांना संतती होईल असा वर दिला परंतु राजाला होणारे २५ वे अपत्य डोंगराला अर्पण करण्याची अट घातली. 

तेव्हापासून याठिकाणी दरवर्षी पूजा आणि यज्ञ करण्याची परंपरा सुरू झाली. आत्ताही तिथे ही परंपरा पाळली जाते, यात बकऱ्यांचा बळी दिला जातो.

या यज्ञाव्यतिरिक्त ज्वालामुखीला फळे फुले तसेच हंगामी भाज्या अर्पण केल्या जातात. गणपतीच्या मूर्तीची पूजा केल्याने आणि ज्वालामुखीला फळ अर्पण केल्याने ज्वालामुखीचा उद्रेक होण्यास प्रतिबंध होते आणि जर असे केले नाही तर या ज्वालामुखीचा उद्रेक होऊन तिथे असणारा आदिवासी समाज जळून जाईल अशी इथल्या लोकांची मान्यता आहे.

या आदिवासी जमातीचे स्वतःचे कॅलेंडर आहे. त्या कॅलेंडरनुसार दरवर्षी १४ दिवसांची गणेश पूजा केली जाते. 

१४ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला एक्सोटिका ब्रोमो फेस्टिव्हल असे म्हणतात. 

इथे केल्या जाणाऱ्या अनेक पूजा हिंदू धर्माच्या पद्धतीने केल्या जातात. आपल्या मंदिरातील पुजार्‍यांप्रमाणेच येथेही पुजारी आहेत, ज्यांना रेसी पूजंगा म्हणतात. न्यायदानाच्या कामात  लोकांना मदत करतात. 

जेव्हा मंदिरातील पुजाऱ्याचा कार्यकाळ समाप्त होतो तेव्हा त्याचा मुलगा त्याच्या जागी पुजारी म्हणून काम करतो. वर्षातील १४ दिवस चालणार्‍या गणेशपूजनाच्या मोठ्या उत्सवात मुख्य पुजाऱ्याचे तीन सहकारी लेगेन, सेपुह आणि दंडन म्हणून ओळखले जातात.

या उत्सवाच्या वेळी डोंगरावर एक मोठी जत्रा भरतो. या जत्रेत स्थानिक आदिवासी लोक त्यांच्या विविध कलांचं प्रदर्शन भरवतात. परदेशी पर्यटकही खास हे कार्यक्रम बघण्यासाठी येथे येतात. ज्वालामुखीच्या ज्वलनशीलतेमुळे इथले तापमान जास्त असते. त्यामुळे जर एखाद्या पर्यटकास अस्थम्याचा आजार असेल तर त्या पर्यटकाला या उत्सवात सहभागी होण्याची परवानगी दिली जात नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

यावर तुमची प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!