आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
राजेशाहीच्या काळात चीनमधील एका खेड्यात एक सामान्य दाम्पत्य वास्तव्यास होतं. त्यांना एकंच अपत्य होतं अन् तेही मुलगी. त्यावेळी कुटुंबातील किमान एका पुरुषानं तरी शाही सैन्यात सामील झालं पाहिजे, असा नियम होता. आपल्या आजारी वडिलांना शाही सैन्यात सामील होण्यास भाग पाडलं जाऊ नये म्हणून त्या कुटुंबातील मुलगी मुलाचा वेश धारण करून सैन्यात भरती होते. एखाद्या पुरुषालाही लाजवेल असा पराक्रम ती करते.
‘मुलान’ नावाच्या या मुलीची लोककथा चीनमध्ये प्रसिद्ध आहे. अगदी डिस्नेनंसुद्धा तिची गोष्ट चित्रपटाच्या माध्यमातून सांगितली आहे. या लोककथेतील मुलीसारखीचं एका खऱ्याखुऱ्या राजकुमारीची गोष्ट इतिहासामध्ये दडलेली आहे. राजकुमारी असण्याचे सर्व मापदंड तिनं झुगारून लावले होते. चीनच्या युआन राजवंशात तिची मुळं होती. कुठलाही पुरुष यो*द्धा तिला हरवू शकला नव्हता, अशी तिची ख्याती होती. मात्र, इतिहासानं महिलांना कायम दुय्यम स्थान दिलं आहे. अनेक पराक्रमी स्त्रियांना त्यांच्या हक्काची प्रसिद्धी मिळालेली नाही. मंगोलियन यो*द्धा, राजकुमारी खुटुलुनसुद्धा याच पराक्रमी स्त्रियांपैकी एक आहे. तिच्या आयुष्यावर नजर टाकणारा हा विशेष लेख..
चंगेज खानचा शाही वंशज असलेला कायदु खान हा इतिहासातील शक्तिशाली आणि प्रभावशाली शासकांपैकी एक होता. त्यानं, संपूर्ण मध्य आशिया, भारताचा काही भाग आणि मध्य पूर्वेच्या मोठ्या भागावर राज्य केलं. १२६० साली, याच कायदु खानच्या पोटी राजकुमारी खुटुलुनचा जन्म झाला होता. तिच्या जन्माच्यावेळी विशाल मंगोल साम्राज्यात गृहयु*द्ध छेडलेलं होतं. ती कुटुंबातील शेंडेफळ होती.
१४ भावांच्या गराड्यात तिचं बालपण गेलं. परिणामी कुटुंबातील इतर मुलांप्रमाणेच तिलासुद्धा यु*द्धाचं प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. तिचे वडील आणि चुलत भाऊ कुबलाई खान यांच्यात सत्ता संघर्ष सुरू होता. ऐतिहासिक कागदपत्रांचा आढाव घेतला तर ते असं सांगतात की, राजकुमारी खुटुलुन आपल्या वडिलांच्या सैन्यातील सर्वांत भीषण यो*द्धा होती. एक उत्तम यो*द्धा होण्यासाठी घोडेस्वारी, धनुर्विद्या आणि तलवारबाजी येणं गरजेचं होतं. यासाठी खुटुलुननं स्वतःला शारीरिकदृष्ट्या अधिक मजबूत केलं होतं.
आशियाची सफर करणाऱ्या मार्को पोलोनं खुटुलुनविषयी भरभरून लिहिलं आहे. तिच्या पराक्रमानं तो देखील प्रभावित होता. किशोरवयात असतानाचं ती कसलेल्या पुरुष कुस्तीपटूंना देखील हरवू शकत होती. कुस्ती हा मंगोल लोकांमध्ये सर्वात लोकप्रिय खेळ होता आणि म्हणूनच तिची प्रतिष्ठा खूप वेगानं वाढतं गेली. शिवाय ती राजकुमारी असल्यानं, जेव्हा ती वयात आली तेव्हा तर तिच्या चाहत्यांची संख्या आणखी वाढली.
तिने कुस्तीच्या सामन्यांमध्ये अनेक शक्तिशाली पुरुषांना पराभूत केलं होतं. एक वेळ तर अशी आली होती, जेव्हा तिनं एकाच वेळी दोन पुरुषांचा मैदानात सामना केला आणि विजय देखील मिळवला! घोडेस्वारी आणि तलवारीबाजीमध्ये तर ती निष्णात होती. त्यामुळं तिला यु*द्धभूमीवर जाण्याची देखील संधी मिळाली. मैदानावर तिची उपस्थिती म्हणजे कायदु खानाचा विजय निश्चित, असं समजलं जाई.
यु*द्धकलेशिवाय ती एक उत्तम मुत्सद्दीसुद्धा होती. राजकुमारी खुटुलुन एक शूर सेनानी होती. तिच्या अंगामध्ये कमालीची चपळाई होती. तिनं अनेकदा यु*द्धभूमीतून शत्रूसैन्यातील अधिकाऱ्यांना बंदी म्हणून उचलून आणलं होतं. एखादा गरूड ज्याप्रमाणं त्याच्या शिकारीवर झडप घालतो अगदी त्याचं प्रमाणं ती शत्रूवर झडप घालत असे, असं मार्को पोलोनं लिहून ठेवलेलं आहे.
खुटुलुनचा चुलत भाऊ कुबलाई खान मंगोल लोकांच्या जीवशैलीला आणि रानटी पद्धतींनी कंटाळला होता. आपल्या राज्यात रोमन साम्राज्यासारखी किंवा भारतीय राजेशाहींसारखी राजकीय व्यवस्था आणि सभ्यता नांदावी, अशी त्याची इच्छा होती. मात्र, जेव्हा कायदू खान सत्तेवर आला तेव्हा त्यानं पारंपरिक मंगोल जीवनशैलीच स्विकारली.
पुढे अशी देखील अफवा पसरली होती की, कायदूचे आपली मुलगी खुटुलुनशी अनैतिक संबंध आहेत. म्हणून कुबलाई खान त्याच्या विरोधात गेला. शिवाय त्यानं चीनमध्ये एक अतिशय मजबूत युआन राजवंश देखील स्थापन केला होता. यासर्व घडामोडींमुळं कायदू खान आणि कुबलाई खान यांच्यात अनेक लढाया झाल्या. या लढायांमध्ये राजकुमारी खुटुलुननं मोठा पराक्रम गाजवला होता.
विशाल मंगोल साम्राज्यातील लोकप्रिय राजकन्या असलेल्या खुटुलुनला विवाहाचे अनेक प्रस्ताव आले होते. मात्र, तिनं बराच काळ लग्न करण्यास नकार दिला. कदाचित याच कारणामुळं तिच्या वडिलांसोबत तिचे लैंगिक संबंध असल्याच्या अफवा उठल्या असाव्यात, असा इतिहासकारांचा अंदाज आहे. शेवटी तिनं लग्न करण्यास सहमती दर्शविली पण तिच्या काही अटी होत्या, ज्यामुळे तिच्या वडिलांना आणखी त्रास झाला.
खुटुलुनला तिच्यापेक्षा अधिक कुशल आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत असलेल्या माणसाशी लग्न करायचं होतं. त्यामुळं कुस्तीमध्ये तिला पराभूत करणाऱ्या पुरुषाशी लग्न करण्याची तिनं अट घातली. अनेक पुरुषांनी तिच्यासमोर आपली शक्ती आणि नशीब आजमावलं. परंतु, कुणालाही यश आलं नाही. असं म्हटलं जात, जी व्यक्ती तिच्याशी कुस्ती खेळत असे त्याला पराभूत झाल्यानंतर १०० घोड्यांचा दंड भरावा लागत असे. खुटुलुनजवळ कुस्तीमध्ये जिंकलेले १० हजार घोडे होते!
वयाच्या तीशीपर्यंत खुटुलुन अविवाहित राहिली कारण कुस्तीच्या सामन्यात तिला कोणीही हरवू शकलं नाही. एकदा तिच्या वडिलांनी एका ठिकाणी तिचं लग्न करण्याचा विचार केला होता. तिच्या वडिलांना त्या व्यक्तीच्या कुस्ती कौशल्याबद्दल आत्मविश्वास होता. जर तिनं त्याला व्यक्तीला पराभूत करून दाखवलं तर खुटुलुनला १ हजार घोडे देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. खुटुलुननं हे आव्हान स्विकारलं आणि सामन्याच्या शेवटी ती हजार घोडे घेऊन घरी गेली!
जेव्हा तिच्यासाठी परिपूर्ण मुलगा शोधणं जवळजवळ अशक्य झालं, तेव्हा खुटुलुननं काहीसं सौम्य होण्याचा निर्णय घेतला. तिच्या लग्नाबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. असं म्हटलं जातं की तिनं दोनदा लग्न केलं होतं. तिनं पहिल्यांदा एका यु*द्ध कैद्यासोबत आणि नंतर तिच्या वडिलांच्या सैन्यात असलेल्या एका शिपायासोबत लग्न केल्याची माहिती आहे.
खुटुलुन आपल्या वडिलांची आवडती होती. ती सिंहासनावर बसावी अशी त्यांची इच्छा होती. मात्र, ती एक स्त्री आणि भावंडांमध्ये सर्वात लहान असल्यानं हे शक्य झालं नाही. १३०१ साली कायदूचा मृत्यू झाला त्यानंतर तैमूर खान सत्तेवर आला. तिला स्वतःसाठी सिंहासन नकोचं होतं. परंतु वडिलांचा उत्तराधिकारी कोण असावा याबद्दल तिच्या काही कल्पना होत्या.
वडिलांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी १३०६ साली वयाच्या ४६व्या वर्षी तिचं निधन झालं. तिचा मृत्यू कसा झाला, याची मात्र माहिती उपलब्ध नाही. इतिहासातील एक महान यो*द्धा आणि महिला कुस्तीपटूची माहिती येणाऱ्या पिढीसमोर यावी यासाठी आता काही मंगोलियन इतिहासकार धडपड करताना दिसत आहेत. जर मार्को पोलोनं आपल्या प्रवासाची माहिती लिहून ठेवली नसती तर राजकुमारी खुटुलुन नक्कीच इतिहासात हरवून गेली असती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.