आईन्स्टाइनपेक्षा हुशार असलेल्या त्याच्या पत्नीने त्याच्यासाठी करिअरचा त्याग केलाय

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


“प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते.” पण आपण फक्त यशस्वी पुरुषच लक्षात ठेवतो. त्याच्या मागे उभी असलेली ती स्त्री कोण आहे, हे जाणून घेण्याची तसदी सुद्धा आपण घेत नाही. त्यामुळेच बऱ्याचदा इतिहासात त्यांचा उल्लेख नसतो. पण माझं सरळ म्हणणं आहे एक यशस्वी पुरुष जेवढा कौतुकास पात्र असतो, तेवढीच त्याच्यामागे खंबीरपणे उभी असलेली स्त्री सुद्धा असते. पण कौतुक तर सोडा, बऱ्याचदा त्या स्त्रीला तिचं हक्काचं श्रेयसुद्धा मिळत नाही. त्या यशाच्या झगमगाटात त्या स्त्रीचा त्याग झाकोळला जातो. आज आपण अशाच एका स्त्रीबद्दल जाणून घेणार. ज्या स्त्रीला इतिहासात पद्धतशीरपणे दुर्लक्षित करण्यात आलं. एका यशस्वी पुरुषाची बायको एवढीच काय ती तिची ओळख.

मिलेवा मारीक आईन्स्टाईन” बऱ्याच लोकांनी हे नावसुद्धा पहिल्यांदाच ऐकलं असेल आणि ज्यांना हे नाव माहिती असेल, त्यांना ती फक्त अल्बर्ट आईन्स्टाईन याची पहिली बायको एवढंच माहिती असेल. “अल्बर्ट आईन्स्टाईन” विसाव्या शतकातील सगळ्यात हुशार शास्त्रज्ञ आणि सगळ्यात बुद्धिमान मनुष्य. पण बऱ्याच कमी लोकांना माहिती असेल की त्याची पत्नी मिलेवा हीसुद्धा आईन्स्टाईन एवढीच हुशार होती.

मिलेवाचा जन्म 13 डिसेंबर, 1875 रोजी टितले, सर्बिया मधील एका श्रीमंत कुटुंबात झाला. सुरुवातीच्या शैक्षणिक आयुष्यात तिच्या शिक्षकांनी तिच्यातील अलौकिक बौद्धिक क्षमता बरोबर हेरली. त्यांनी तिच्या पालकांना सल्ला दिला, “ही मुलगी अत्यंत हुशार आहे, या शाळेत तिच्या बुद्धीला तसा वाव मिळणार नाही, त्यामुळे तिला तुम्ही एखाद्या प्रतिष्ठित शाळेत पाठवा, जिथे तिच्या बुद्धिमत्तेला अजून वाव मिळेल.”

त्यानंतर तिच्या आई वडिलांनी तिला झगरेब मधील माध्यमिक शाळेत पाठवलं. पण ही शाळा फक्त मुलांची होती. नवीन शाळा, त्यात पण सगळ्या मुलांची शाळा हा विचार करूनच घाबरायला होतं. पण मिलेवा हलक्या काळजाची नव्हती. तिने ही परिस्थिती एक आव्हान म्हणून घेतली. अभ्यासात अत्यंत हुशार असणाऱ्या मिलेवाने भौतिकशास्त्रात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करून आपल्या शिक्षकांची वाहवा मिळवली. ही तर फक्त सुरुवात होती. अजून तिला खूप सारी यशाची शिखरे सर करायची होती. माध्यमिक शिक्षण संपवून मिलेवा पुढील शिक्षणासाठी स्वित्झर्लंडला गेली. स्वित्झर्लंड हा एकमेव जर्मन-भाषिक देश होता जिथे स्त्रियांना शिक्षणाची परवानगी होती.

तिथे तिने “Polytechnic Institute of Zürich” मध्ये प्रवेश घेतला. गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांमध्ये अभ्यास करणारी ती पहिलीच महिला होती. एवढंच काय Polytechnic Institute of Zürich मध्ये प्रवेश घेणारी ती पाचवी महिला होती.

Polytechnic Institute of Zürich हे एक अतिशय प्रतिष्ठित विद्यापीठ होतं, तिथे सहजासहजी कोणालाही प्रवेश भेटत नसे. यावरून आपण अनुमान लावू शकतो की मिलेवा किती हुशार होती ते. गणित आणि भौतिकशास्त्र या विषयात पदविका घेण्यासाठी त्यावर्षी मिलेवा बरोबरच अजून 5 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता, त्यामध्ये अल्बर्ट आईन्स्टाईनचाही समावेश होता. मिलेवा आणि अल्बर्टची पहिली भेट याच विद्यापीठात झाली आणि इथूनच त्यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात झाली.

ते दोघे प्रत्येक ठिकाणी एकमेकांच्यासोबतच असत. एकत्र जेवण करणे, एकत्र अभ्यास करणे. ते दोघेही एकमेकांच्या आयुष्याचे अविभाज्य घटक बनले होते. अतिशय बुद्धिमान असलेले दोघेही, सारखे एकमेकांना मानसिकरीत्या आव्हान द्यायचे. बुद्धिमत्तेत मिलेवा अल्बर्टपेक्षा अजिबात कमी नव्हती. अल्बर्टला वर्गात जायला अजिबात आवडत नसायचं, तो घरी राहूनच अभ्यास करायचा. याच्याउलट मिलेवा ही अतिशय संघटित आणि पद्धतशीर होती. अल्बर्ट आणि मिलेवा यांच्या पत्रव्यवहारात अल्बर्टने कायम उल्लेख केलाय की, मिलेवाने त्याला कशी त्याची इतर गोष्टींत वाया जाणारी ऊर्जा एकवटून, ती संशोधनात केंद्रित करण्यास मदत केली.

एका पत्रात अल्बर्ट मिलेवाला म्हणला देखील होता,”मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी मुलगी आहे. जी माझ्या बरोबरीची तर आहेच आहे, पण माझ्या एवढीच स्वतंत्र देखील आहे.” 1900 साली जेव्हा त्यांची अंतिम परीक्षा झाली तेव्हा त्यामध्ये दोघांनाही सरासरी गुण सारखेच होते. अल्बर्टला 4.7 आणि मिलेवाला 4.6. उपयोजित भौतिकशास्त्रामध्ये तर मिलेवाला 5 पैकी 5 गुण होते आणि अल्बर्टला फक्त 1. तिने अतिशय उत्तम प्रयोग केले होते, म्हणूनच तिला पैकीच्या पैकी गुण होते. 

तोंडी परीक्षेत मात्र प्रा.मिनकोवस्की यांनी सरळ सरळ भेदभाव केला. सर्वांना त्यांनी 12 पैकी 11 गुण दिले, पण मिलेवाला मात्र फक्त 5 च गुण दिले. यामुळे तिला तिची पदवी मिळवता आली नाही. अल्बर्टला मात्र आता पदवी मिळाली होती.

अल्बर्ट आणि मिलेवा यांच्या प्रेमाला अल्बर्टच्या आईचा खूप विरोध होता. मिलेवा ही पैशाने जरी श्रीमंत असली तरी ती ज्यु नव्हती आणि जर्मनही नव्हती. त्यामुळे तिला आपल्या घरची सून करून घेण्यास अल्बर्टच्या आईचा विरोध होता. अल्बर्टच्या वडिलांचा लग्नाला विरोध नव्हता पण त्यांचं असं मत होतं की आधी अल्बर्टने नोकरी करावी आणि नंतर लग्न.

ऑक्टोबर 1900 मध्ये त्यांचं प्रबंधाचे (Thesis) काम पूर्ण करण्यासाठी दोघे पुन्हा Zürich मध्ये परतले. त्यांच्या बाकी तिन्ही वर्गमित्रांना सहाय्यक म्हणून विद्यापीठातच नोकरी मिळाली, पण अल्बर्टला नाही. त्याचे आणि प्रा. वेबर यांच्यामध्ये वैयक्तिक वाद होते. त्यामुळेच ते त्याला अडवत होते. नोकरी न मिळाल्याने त्याने मिलेवाशी लग्न करण्यास नकार दिला. याच काळात तिच्या पोटात अल्बर्टच मूल वाढत होतं. पण नोकरी मिळत नसल्याने अल्बर्टने तिला लग्नासाठी नकार दिला.

भविष्यात काय होईल याची काहीच माहिती नसताना तिने एक शेवटची तोंडी परीक्षा दिली. पण नशीब एवढं वाईट प्रा. वेबरच नेमका परीक्षक म्हणून तिथे होता. त्याने कसलाही विचार न करता तिला नापास केलं. निराश झालेली आणि भविष्याबाबत अनिश्चित असलेली मिलेवा पुन्हा सर्बियाला निघून गेली. पण अल्बर्टशिवाय तिचं मन लागत नव्हतं. शेवटी पुन्हा एकदा लग्नासाठी त्याची मनधरणी करण्यासाठी ती Zürich ला परत आली. नोकरी नसलेल्या अल्बर्टने पुन्हा एकदा नकार दिला. जानेवारी 1902 साली मिलेवाने मुलीला जन्म दिला. पण तिचं पुढे काय झालं हे कोणालाच काही माहिती नाही. ऑक्टोबर 1902 मध्ये एका मित्राच्या वडिलांच्या वशिल्याने अल्बर्टला पेटंट ऑफिस मध्ये नोकरी लागली. नोकरी लागल्यानंतर जानेवारी 1903 मध्ये मिलेवा आणि अल्बर्ट दोघेही लग्नबंधनात अडकले.

लग्नानंतर मिलेवाच पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. ती दिवसातला पूर्णवेळ आता घरकामात देऊ लागली. अल्बर्टसुद्धा आठवाड्यातले 6 दिवस रोज 8 तास ऑफिसमध्ये काम करत असे. पण रात्री अल्बर्ट त्याच्या संशोधनात व्यस्त असे आणि मिलेवा सुद्धा त्याला बरोबरीने साथ देत असे. दोघांनी आता स्वतःला कामात पूर्ण गुंतवून घेतलं होतं. 14 मे, 1904 रोजी त्यांना मुलगा झाला “हॅन्स-अल्बर्ट”.

1905 म्हणजे अल्बर्टचं “जादुई वर्ष”. या वर्षी त्याने 5 लेख प्रकाशित केले त्यातील एक होता, “Photoelectric Effect” – ज्याच्यामुळे पुढे जाऊन 1921 साली अल्बर्टला नोबेल पुरस्कार मिळाला आणि दुसरा लेख होता, तोच जगप्रसिद्ध “E = mc2“. या प्रत्येक लेखात मिलेवाचा सुद्धा तेवढाच हिस्सा आहे जेवढा अल्बर्टचा.

मिलेवाचा भाऊ “मिलोस ज्युनिअर” हा सांगतो, “ही तरुण जोडी रात्र रात्र भौतिकशास्त्राच्या समस्यांवर टिपणं काढत बसत. जेव्हा पूर्ण zurich झोपलेलं असे, तेव्हा हे दोघे डायनिंग टेबल वर कागदांचा पसारा मांडून, कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करत बसत. मिलेवाने कधीच अल्बर्टला एकटं नाही सोडलं.” त्यामुळे प्रत्येक लेख हा जेवढा अल्बर्टचा होता, तेवढाच मिलेवाचा देखील होता. एके ठिकाणी एका मैफिलीत भाषण देताना अल्बर्ट हे देखील म्हणाला होता, ” मला माझ्या बायकोची खूप गरज आहे, कारण माझ्या गणितातल्या समस्या तीच दूर करते.”

बऱ्याच ठिकाणी दोघांनी लिहिलेल्या लेखांमध्ये फक्त अल्बर्टच नाव असायचं. याचं कारण मिलेवाला विचारलं असता ती कायम सांगायची की “त्याचं नाव होतंय म्हणजेच माझं नाव होतंय.” 1908 साली या जोडप्याने “कोनराड हॅबीष्त” (Conrad Habicht) सोबत मिळून एक ‘अतिसंवेदनशील वोल्टमीटर’ बनवले. जेव्हा पेटंटवर नाव द्यायचा विषय आला, तेव्हा ते उपकरण आईन्स्टाईन आणि हॅबिष्त यांच्या नावावर नोंदवल गेलं. हॅबीष्तने जेव्हा मिलेवाला तिच्या नावाबद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली, “अल्बर्ट आणि मी एकच आहोत.” अतिशय हुशार असलेली मिलेवा मनानेसुद्धा तेवढीच मोठी होती.

आता अल्बर्टच चांगलं नाव झालं होतं. 1909 साली त्याला Zürich विद्यापीठात शैक्षणिक पद भेटलं. मिलेवा अजूनही त्याला साहाय्य करत होती. त्याच्या पहिल्या व्याख्यानाची 8 पानांची टिपणं सुद्धा मिलेवानीच काढली होती. आजही ती कागदपत्रे जेरुसलेम मधील आईन्स्टाईनच्या संग्रहालयात आहेत. अल्बर्ट आता जर्मन बोलणारा सर्वोत्कृष्ट भौतिकशास्त्रज्ञ झाला होता. यामुळेच आता मिलेवाची चिंता वाढत होती. जसा जसा अल्बर्ट मोठा माणूस बनत चालला होता, तसा तसा तो माणुसकी विसरत चालला होता.

एवढ्या प्रसिद्धीमध्ये त्याने त्याच्या परिवाराकडे सरळ सरळ दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती. दोघांमध्ये आता पहिल्यासारखे संबंध राहिले नव्हते. मैत्रिणीला लिहिलेल्या एका पत्रात तिने ही चिंता बोलूनसुद्धा दाखवली होती. “परिवार असाच असतो. एकाला मोती मिळतो तर दुसऱ्याला फक्त शिंपला.”

28 जुलै, 1910 रोजी त्या दोघांना दुसरा मुलगा झाला ” Eduard”. मुलगा झाल्यानंतर तरी आता त्यांचं प्रेम पुन्हा फुलून येईल ही वेडी अपेक्षा मिलेवाला होती. पण नियतीच्या मनात दुसरंच काहीतरी होतं. 1911 पर्यंत अल्बर्ट मिलेवाची विचारपूस करण्यासाठी कायम पत्र पाठवत असे. आता तर ते पण बंद झाले होते. बर्लिनला स्थायिक झालेल्या आपल्या आईन्स्टाईन परिवाराला भेटण्यासाठी अल्बर्ट कायम जात असे. यातच त्याचं एल्सा या आपल्या मावसबहिणीसोबत प्रेमप्रकरण चालू झालं. यामुळेच 1914 मध्ये अल्बर्ट आणि मिलेवा यांच लग्न मोडलं.

आपल्या दोन्ही मुलांना घेऊन मिलेवा 1914 साली Zürich मध्ये स्थायिक झाली. पुढे 1919 साली एका अटीवर तिने त्याला घटस्फोट दिला. ती अट अशी होती ,”जर अल्बर्ट नोबेल पारितोषिक जिंकला, तर त्या पारितोषिकाचे सगळे पैसे मला देण्यात यावे.” म्हणजे तिला एवढा विश्वास तर नक्कीच होता, की अल्बर्ट नोबेल पारितोषिक जिंकेल. 1921 साली जेव्हा अल्बर्टला नोबेल पारितोषिक मिळालं, तेव्हा ठरल्याप्रमाणे पुरस्काराची रक्कम मिलेवाला देण्यात आली. त्यातून तिने दोन छोटे अपार्टमेंट घेतले. त्यातून येणाऱ्या पैशातुनच तिचा उदरनिर्वाह चालत असे. 1930 साली तिचा मुलगा Eduard ह्याला Schizophrenia झाला. त्याच्या औषधाच्या खर्चासाठी तिने दोन्ही अपार्टमेंट विकून टाकले आणि अख्खं आयुष्य हलाखीतच काढलं.नंतर नंतर तर अल्बर्टने पोटगी देणं सुद्धा बंद केलं होतं .

एकेकाळी अल्बर्टच्या प्रत्येक लेखात त्याला मदत करणाऱ्या त्याच्या बायकोला घटस्फोटानंतरच आयुष्य खूप हलाखीत काढावं लागलं. 1948 साली तिने हे जग कायमचं सोडलं. कायम मोठेपणा दाखवून अल्बर्टला जगविख्यात बनवलं आणि तीच बायको नंतर अल्बर्टला नकोशी झाली. एक शास्त्रज्ञ म्हणून आईन्स्टाईन खूप मोठा होता, पण माणूस म्हणून खूप लहान. मिलेवा कायम शांत राहिली, हाच तिचा गुन्हा होता. त्याच्या यशात तिचा आनंद होता ही पण गोष्ट तेवढीच खरी. इतिहासात तर तिला स्थान नाही मिळालं पण निदान लोकांच्या मनात तरी तिला स्थान मिळावं म्हणून हा प्रयत्न.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!