आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
क्रिकेटला ‘जंटलमन्स गेम’ म्हणतात, ही ओळ एव्हाना प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात एकदम घट्ट कोरली गेली आहे. मात्र, जंटलमन्स गेम म्हटलं तरी, एका मोठ्या हिरव्यागार वर्तुळात दोन्ही टीमचे खेळाडू हसत-खेळत क्रिकेट खेळतात अशी कल्पना कधीही डोक्यात येत नाही. त्याला कारण आहे क्रिकेटचा इतिहास आणि सध्याची परिस्थिती.
साधारणपणे जेव्हापासून क्रिकेटचं मोठ्या प्रमाणात व्यावसायिकीकरण सुरू झालं तेव्हापासून वाद, शिवीगाळ, स्पॉट फिक्सिंग, मॅच फिक्सिंग यांसारख्या असंख्य असभ्य गोष्टींनी क्रिकेटला आपल्या विळख्यात घेतलं. आजवर अशा कितीतरी घटना घडल्या आहेत ज्यामुळं संपूर्ण क्रिकेट बदनाम झालं आहे. फिक्सिंगचा विचार केला तर क्रिकेट खेळणाऱ्या सर्वच प्रमुख देशांना कधीना कधी याची झळ बसलेली आहे. मात्र, पाकिस्तानचा यामध्ये वरचा क्रमांक लागतो. पाकिस्तानी खेळाडू अनेकदा विविध फिक्सिंग प्रकरणात अडकले आहेत.
अगदी पाकिस्तानी टीमच्या कॅप्टनपासून ते नवख्या खेळाडूपर्यंत अनेकांनी पैशांसाठी आपली प्रतिष्ठा आणि करियर पणाला लावल्याच्या घटना घडलेल्या आहेत. काही घटना उघड्या पडल्यामुळं संपूर्ण जगाला त्याबद्दल माहिती मिळाली. मात्र, काही घटना काळाच्या पोटामध्ये दडून राहतात. जर, कधी एखाद्यानं त्यांचा जाणीवपूर्वक उल्लेख केला तरच त्या उघड होतात. १९८० साली सर्वांच्या नजरेआड राहिलेली अशीच एक घटना आता पुस्तकाच्या रुपात समोर आली आहे. नेमकी ही घटना काय आहे? तिचा आणि क्रिकेटचा काय संबंध आहे? या प्रश्नांचा मागोवा घेणारा हा लेख..
ज्येष्ठ क्रीडा लेखक प्रदीप मॅगझिन यांनी ‘नॉट जस्ट क्रिकेट’ नावाचं नवीन पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी क्रिकेटच्या मैदानाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. प्रदीप यांचं हे पुस्तक एका खळबळजनक दाव्यामुळं चर्चेत आलं होतं. पाकिस्तानचा माजी कर्णधार आसिफ ‘इक्बाल रिझवी’नं भारतीय संघाला टेस्ट मॅच फिक्स करण्याची ऑफर दिली होती.
ही घटना १९७९-८० साली खेळवल्या गेलेल्या सहा सामन्यांच्या भारत-पाकिस्तान कसोटी मालिकेतील शेवटच्या कसोटीपूर्वी घडली होती. याबाबत खुद्द भारताचे माजी कर्णधार टायगर अली पतौडी यांनी आपल्याला माहिती दिली होती, असा दावा लेखक प्रदीप मॅगझिन यांनी केला आहे. यामुळं पुन्हा पाकिस्तान क्रिकेटचा काळा चेहरा उघडा पडला आहे.
१९७९च्या शेवटी आणि १९८०च्या सुरुवातीला पाकिस्तानचा संघ प्रदीर्घ काळासाठी भारत दौऱ्यावर आला होता. दोन्ही देशांदरम्यान सहा टेस्ट सिरीज खेळवण्यात आल्या. यातील शेवटची मॅच कोलकत्त्यातील ईडन गार्डन्सवर होणार होती. मात्र, भारताचे तत्कालीन टेस्ट कॅप्टन सुनील गावसकर यांनी काही कारणास्तव सामन्यापूर्वीच माघार घेतली. त्यामुळं त्यांच्या जागी तत्कालीन व्हाईस कॅप्टन गुंडप्पा विश्वनाथ यांना ‘स्टँड इन कॅप्टन’ होण्याची संधी मिळाली होती.
मॅचपूर्वी पाकिस्तानचा तत्कालीन कॅप्टन आसिफ इक्बालनं विश्वनाथ यांना मॅच फिक्स करण्याची ऑफर दिली. या सर्व प्रकारानं विश्वनाथ गोंधळून गेलं होते. मात्र, सुदैवानं भारताचे माजी कॅप्टन आणि टीमचे मेंटॉर टायगर पतौडी त्यावेळी टीम हॉटेलमध्ये उपस्थित होते. विश्वनाथ यांनी तत्काळ त्यांच्या कानावर हे प्रकरण घातलं. अशा प्रकारे खेळाशी बेईमानी करण्याच्या इक्बालच्या निर्लज्जपणामुळं पतौडी हैराण झाले होते.
त्यांनी विश्वनाथला इक्बालकडं दुर्लक्ष करण्याचा सल्ला देऊन या प्रकरणाकडं दुर्लक्ष केल्याचं प्रदीप यांच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. प्रदीप यांच्या मते, या घटनेला पतौडी यांनी गांभीर्यानं घेण्याच्या लायकीचं मानलंच नाही. यातून त्यांचा आपल्या खेळाडूंवर असलेला प्रचंड विश्वास दिसून येतो. शिवाय जर पतौडी यांनी त्यावेळी ही गोष्ट उघड केली असती तर कठोर पावलं उचलली गेली असती आणि त्यामुळं क्रिकेटच्या विश्वासार्हतेला मोठा धक्का बसला असता.
भारत-पाकिस्तान दरम्यानची ईडन गार्डन्सवरील हीच टेस्ट मॅच यापूर्वीही वादग्रस्त राहिलेली आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू आणि आसिफ इक्बालचा सहकारी सरफराज नवाज यानं देखील आपल्या कॅप्टनवर खेळभावनेच्या विरोधात गेल्याचे आरोप केले होते. नवाजच्या म्हणण्यानुसार, मॅच सुरू होण्यापूर्वी टॉस करताना गुंडप्पा विश्वनाथनं नाणं पाहण्या अगोदरचं इक्बालनं ते उचलून घेतलं होतं.
वास्तविक पाहता टॉस पाकिस्ताननं जिंकला होता, मात्र, इक्बालनं उलट सांगितलं. ही नक्कीच विचित्र गोष्ट होती, असं नवाज म्हटला होता. शिवाय, हातात सहा विकेट्स शिल्लक असताना आणि पाकिस्तान आपल्या टार्गेटपासून केवळ ५९ धावांनी मागे असताना पहिला डाव घोषित करण्याच्या इक्बालच्या निर्णयावरही नवाजनं प्रश्न उपस्थित केले होते. सर्वांत जास्त आश्चर्याची गोष्ट म्हणजे नवाज पाकिस्तानच्या १९७९-८० मधील भारत दौऱ्याचा भाग नव्हता. तरी देखील त्याला टॉस प्रकरणाची माहिती मिळाली. सरफराज नवाज तोच खेळाडू आहे ज्यानं दिग्गज भारतीय फलंदाज आणि माजी कर्णधार सुनिल गावसकर यांच्यावर देखील मॅच फिक्सिंगचे आरोप केले होते.
पाकिस्तानच्या ज्या कॅप्टनवर प्रदीप मॅगझीन यांनी मॅच फिक्सिंगचे आरोप केले आहेत तो आसिफ इक्बाल रझवी आणि भारताचं अतिशय घट्ट नातं आहे. त्याचा जन्म भारतातील हैदराबादमध्ये झाला होता. तो उस्मानिया विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे. त्याच्या कुटुंबाला क्रिकेटची मोठी पार्श्वभूमी होती. भारताचे माजी कर्णधार आणि ऑफस्पिनर गुलाम अहमद यांचा तो पुतण्या आहे.
एकदा लहान असताना इक्बालनं ईडन गार्डन्सला भेट दिली होती. भविष्यात याच मैदानावर भारताकडून खेळण्याचं स्वप्न त्यानं पाहिलं होतं. मात्र, १९८० साली याच मैदानावर त्यानं आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला मात्र, पाकिस्तान संघाचा कर्णधार म्हणून. जेव्हा तो शेवटी मैदानातून बाहेर पडत होता तेव्हा त्याला स्टँडिंग ओव्हेशन मिळालं होतं.
२००० साली जेव्हा मॅच फिक्सिंग प्रकरण उघडकीस आले तेव्हा आसिफ इक्बालचं नाव त्यात आलं होतं. फिक्सिंगमध्ये मुरलेल्या काही मोजक्या क्रिकेटपटूंपैकी तो एक असल्याचं म्हटलं जातं. त्याचा शारजाहतील सट्टेबाजीशी संबंध असल्यासं म्हटलं गेलं होतं. मात्र, त्यानं आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.
आसिफ इक्बालचा वादग्रस्त क्रिकेट इतिहास पाहता, प्रदीप मॅगझीन यांच्या पुस्तकातील दाव्यांमध्ये तथ्य वाटतं आणि गुंडप्पा विश्वनाथ व टायगर पतौडी यांचं कौतुकही वाटत. त्यांनी खेळाशी आणि आपल्या देशाशी कुठल्याही प्रकारची तडजोड न करता इक्बालची ऑफर धुडकावून लावली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.