आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
क्रिकेट या खेळामध्ये नेहमीच काहीना काही वाद सुरू असतात. कधी दोन खेळांडूंमध्ये वाद होतात तर कधी मॅच फिक्सिंगमध्ये एखादा खेळाडू अडकलेला दिसतो. २००० हे वर्ष भारतीय क्रिकेटच्या दृष्टीनं सर्वांत जास्त वादळी ठरलं. भारतीय संघाला मॅच फिक्सिंग नावाच्या किडीनं पोखरण्यास सुरुवात केली होती. याचं किडीनं काही खेळाडूंचं संपूर्ण क्रिकेट करियर उद्ध्वस्त झालं. अशा खेळाडूंच्या यादीत एक असं नाव आहे जो भारतासाठी फक्त एकच कसोटी सामना खेळला आणि मॅच फिक्सिंगमध्ये अडकला. याचा परिणाम म्हणून त्याच्यावर आयुष्यभराची बंदी घालण्यात आली.
अजय शर्मा, असं या खेळाडूचं नाव आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर उभा करणाऱ्या अजय शर्माचं आयुष्य एका आरोपामुळं ढवळून निघालं. त्याचं डोमेस्टिक क्रिकेट करियर, मॅच फिक्संगचे आरोप आणि नंतर निर्दोष सुटका याबाबत जाणून घेण्याअगोदर मॅच फिक्सिंग स्कॅन्डल काय होत? हे पाहिलं पाहिजे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आलेला होता. आफ्रिकेचा तत्कालीन कर्णधार हॅन्सी क्रोनिए बुकींच्या संपर्कात असल्याच्या बातम्या दिल्ली पोलिसांच्या समोर आल्या तेव्हा सर्वत्र खळबळ उडाली. तत्कालीन भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, अजय जडेजा, मनोज प्रभाकर आणि अजय शर्मा यांचा देखील यात समावेश असल्याचं सीबीआय चौकशीत समोर आल्यानंतर तर हे प्रकरण आणखी गाजलं. भारतीय क्रिकेटर्सवर बंदी घालण्यात आली. कालांतरानं ही बंदी उठवण्यात आली मात्र, क्रिकेटला लागलेला मॅच फिक्सिंगचा डाग आजही कायम आहे.
या प्रकरणामुळं सर्वात जास्त परिणाम झाला अजय शर्मा यांच्यावर. स्वत:वरील बंदी उठण्यासाठी त्यांना १४ वर्षे वाट पहावी लागली. जेव्हा बंदी उठली तेव्हा त्यांचा उमेदीचा काळ निघून गेला होता.
अजय कुमार शर्मा यांचा जन्म ३ एप्रिल १९६४ रोजी झाला. लहानपणापासून त्यांना क्रिकेटचं प्रचंड वेड होतं. या वेडापायीचं त्यांनी क्रिकेटमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील मोजक्या सर्वोत्तम खेळाडूंमध्ये शर्माचा समावेश होतो. दिल्ली आणि हिमाचलच्या संघांकडून खेळताना त्यांनी ६७.४७ च्या उच्च सरासरीनं १० हजार पेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत. रणजी स्पर्धांमध्ये शर्मानं विक्रमी ३१ शतकं ठोकली आहेत. रणजीतील त्यांची तब्बल ८० इतकी होती.
सरासरीमध्ये विजय मर्चंटनंतर अजय शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. १९९६-९७ च्या रणजी हंगामात त्यांनी हजारपेक्षा जास्त धावा केल्या होत्या. प्रथम श्रेणी क्रिकेट करियरमध्ये दिल्लीच्या संघासाठी शर्मांनी सहा रणजी फायनल खेळल्या आहेत. त्यापैकी चारमध्ये शतकं झळकावली आहेत. यातील दोन वेळा (१९८५-८६ आणि १९९१-९२) दिल्लीच्या संघानं रणजी ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. गोलंदाजांमध्ये अजय शर्मा नावाची प्रचंड दहशत होती. शर्मांनी एकदा मैदानावर जम बसवला की, ते अगदी खोऱ्यानं धावा जमवायचे. दुलीप ट्रॉफीमध्ये देखील शर्मा नियमितपणे उत्तर विभागाचं प्रतिनिधित्व करत होते.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम नावावर असूनही शर्मांना राष्ट्रीय संघामध्ये जम बसवण्यात यश आलं नाही. त्यांनी भारतासाठी फक्त एक कसोटी सामना खेळला आहे. जानेवारी १९८८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्यांना संधी देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा शर्माला संघात स्थान मिळालं नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांना पुरेशी संधी मिळाली होती मात्र, तिचं सोनं करण्यात ते अपयशी ठरले.
१९८८ ते ९३ याकाळात ते भारतासाठी ३१ एकदिवसीय सामने खेळले. डिसेंबर १९८८ मध्ये, त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध लागोपाठ अर्धशतकं केली होती. मार्च १९९३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद ५९ धावा केल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटमधील ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. प्रथम श्रेणीमध्ये धावांचा डोंगर उभा केलेल्या अजय शर्मांनी ३१ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये २०.१९ च्या सरासरीनं केवळ ४२४ धावा काढल्या. फलंदाजीशिवाय शर्मा डावखुरा फिरकी गोलंदाज देखील होते. त्यांनी १५ बळी घेतलेले आहेत. ऑक्टोबर १९८९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४१ धाव देऊन घेतलेले ३ बळी ही त्यांची सर्वोत्तम आकडेवारी आहे.
२००० साली वयाच्या ३६व्या वर्षी अजय शर्मा मॅच फिक्सिंग प्रकरणात अडकले. भारतीय क्रिकेट नियमाक मंडळानं त्यांच्यावर आजीवन बंदी घातली. यामुळं त्यांची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली.
सप्टेंबर २०१४मध्ये दिल्लीच्या जिल्हा न्यायालयानं अजय शर्मांना मॅच फिक्सिंगशी संबंधित सर्व आरोपांपासून मुक्त केलं. बीसीसीआयशी संबंधित कामांमध्ये त्यांना भाग घेण्याची परवानगीही देण्यात आली. बीसीसीआयनं २००० मध्ये मॅच फिक्सिंगच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी के माधवन यांची आयुक्त म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीनं शर्मावर आजीवन बंदी घातली होती. या बंदीला आणि के माधवन यांच्या नियुक्तीला अजय शर्मांनी न्यायालयात आव्हान दिलं होतं. शर्मांच्या मते, माधवन यांची नियुक्ती बीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन होतं. तर, आपण आपल्या चौकशी अहवालामध्ये अजय शर्मांचं नाव दोषी म्हणून नमूद केलंच नव्हतं. बीसीसीआयनं स्वत: त्यांच्यावर कारवाई केल्याचं माधवन यांचं म्हणणं होतं.
शर्मांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर बीसीसीआयनं त्यांना मासिक पेन्शन द्यावी, असा आदेश देखील न्यायालयानं दिलेला आहे. न्यायालयानं निर्दोष मुक्तता केल्यानंतर शर्मांनी समाधान व्यक्त केलं. मॅच फिक्सिंगच्या आरोपांतून मुक्तता झाल्यानंतर नवोदित खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची त्यांची तयारी आहे. दिल्ली क्रिकेट असोसिएशनला जर माझी गरज असेल तर आपण कायम उपलब्ध असल्याचही शर्मा म्हणाले होते. बंदी उठल्यानंतर त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सध्या त्यांनी आपल्या व्यवसायाकडं लक्ष केंद्रित केलेलं आहे. दिल्ली एनसीआर आणि पंजाबमध्ये त्यांचा ‘UClean’ नावाचा लॉन्ड्री आणि ड्राय-क्लीनिंग ब्रँड प्रसिद्ध आहे. त्याच्या अनेक फ्रँचायझी देखील आहेत.
अजय शर्मांनी फिक्सिंगमध्ये भाग घेतला होता की नाही, हे त्यांनाच माहिती. मात्र, एका आरोपामुळं त्यांना त्यांची संपूर्ण कारकिर्द पणाला लावावी लागली. नवोदित खेळाडूंनी त्यांच्याकडे एक उदाहरण म्हणून पाहिलं पाहिजे आणि चुकीच्या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.