आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
‘टेरी फॉक्स’ हा कॅनडियन ॲथलिट आणि कॅन्सर रिसर्च ॲक्टिव्हिस्ट होता. तो केवळ १८ वर्षांचा असताना त्याला कर्करोग असल्याचे निदान झाले आणि त्यामुळे त्याला त्याचा एक पाय गमवावा लागला. त्यानंतर कर्करोग या महाभयानक रोगाप्रती जनजागृती निर्माण करण्यासाठी त्याने एक अभिनव प्रयोग करण्याचे ठरवले. तो म्हणजे कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यापासून पश्चिम किनाऱ्यापर्यंत धावायचे. या उपक्रमातून जमा होणारा सर्व निधी तो कर्करोगावरील संशोधनासाठी वापरणार होता.
दुर्दैवाने त्याचे हे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकले नाही. शरीरात झपाट्याने पसरणाऱ्या कर्करोगाने त्याला आपला प्रवास केवळ १४३ दिवसांतच आटोपता घ्यावा लागला. या काळात त्याने तब्बल ५३७३ किलोमीटर एवढे अंतर पार केले. जाता जाता तो एक वारसा मागे ठेवून गेला: त्याच्या नावाने आजही सुरू असलेली ‘टेरी फॉक्स रन’ ही धावण्याची मोहीम.
कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी सगळ्यात मोठ्या प्रमाणावर राबवली गेलेली ही मोहीम आहे. ही मोहीम ‘मॅरेथॉन ऑफ होप’ या नावाने प्रसिद्ध आहे.
१९८६ साली ‘मॅरेथॉन ऑफ होप’ सुरू झाली आणि ओंटारिओ येथे पोहोचेपर्यंत फॉक्स चांगलाच प्रसिद्ध झाला. त्याला कॅनडाच्या सर्वोच्च नागरी किताबाने देखील सन्मानित करण्यात आले. पण मोहीम पूर्ण होण्याच्या आधीच त्याचे दुर्दैव आड आले. कॅन्सर त्याच्या फुफ्फुसांपर्यंत पसरला. त्यामुळे त्याला ही मोहीम अर्धवट सोडावी लागली. त्यानंतर काही महिन्यांतच त्याचा मृत्यू झाला.
फॉक्सचा जन्म १९५८ सालचा. चार भावंडांमध्ये हा दुसरा. आई आणि वडील दोघांनीही आपल्या मुलांना चांगले घडवण्यासाठी जिवाचे रान केले. विशेषतः त्याच्या आईचा फॉक्सवर बराच प्रभाव होता. आईमुळेच त्याला हाती घेतलेल्या कामासाठी १००% प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळाली. त्यातून कुठल्याही गोष्टीत जिंकणे हेच त्याचे एकमेव ध्येय बनले. अपयशाप्रती तिटकारा निर्माण झाला.
तो दहा वर्षांचा असताना त्याचे कुटुंब ब्रिटिश कोलंबिया येथे स्थलांतरित झाले. ज्युनियर हायस्कूलमध्ये असताना त्याचा बास्केटबॉल हा आवडता खेळ होता. पण त्याची उंची आणि बास्केट बॉल खेळण्यासाठी आवश्यक असलेली नैसर्गिक क्षमता कमी होती. त्यामुळे त्याच्या एका मित्राने त्याला बास्केटबॉल ऐवजी ‘क्रॉस कंट्री रन’, कुस्ती अशा खेळांमध्ये प्रावीण्य मिळवावे, असे सुचवले.
त्याप्रमाणे फॉक्सने धावायला सुरुवात तर केली, पण म्हणून बास्केटबॉल खेळण्याचे स्वप्न सोडले नाही. रोज शाळेच्या आधी तो बास्केट बॉलचा सराव करत असे. पुढे त्याला शाळेचा ‘ॲथलिट ऑफ द इयर’ हा पुरस्कार देखील मिळाला.
विद्यापीठात शिक्षण घेत असताना वयाच्या अठराव्या वर्षी त्याला कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्याआधी त्याचा एक छोटासा अपघात झाला होता. एक दिवस त्याच्या गुडघ्यांमध्ये प्रचंड वेदना व्हायला सुरुवात झाली, हा त्या अपघाताचा परिणाम असेल असे सुरुवातीला त्याला वाटले पण प्रत्यक्षात त्याला ‘ऑस्टिओसार्कोमा’ या विकाराने ग्रासले होते. त्यामुळे त्याचा पाय गुडघ्यापासून कापावा लागला.
त्याच्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशी त्याच्या बास्केटबॉल कोचने त्याला ‘डिक ट्रॉम’ नावाच्या एका खेळाडूविषयीचा एक लेख वाचायला दिला. हा खेळाडू स्वतः पाय कापलेला असूनही न्यूयॉर्क सिटी मॅरेथॉनमध्ये धावला होता.
फॉक्सला या लेखाने प्रेरणा दिली. त्यानेही अशा प्रकारे कृत्रिम पायाच्या साहाय्याने धावण्याचा निश्चय केला. कृत्रिम पायाच्या साहाय्याने तो धावू लागला. हे तंत्र त्याने चांगलेच आत्मसात केले. एखाद्या वर्षातच त्याला या कृत्रिम पायांच्या साहाय्याने मॅरेथॉन शर्यत पूर्ण करता आली. काही महिन्यांनी त्याने संपूर्ण कॅनडाची प्रदक्षिणा धावून पूर्ण करण्याचा निश्चय केला. तीच ही ‘मॅरेथॉन ऑफ होप’.
त्या आधी काही काळ तो व्हीलचेअर बास्केटबॉल टीम तर्फे देखील खेळला. हे सगळे सुरू असताना एकीकडे केमोथेरपीचे सत्रही सुरू होते. शरीरात जाणारी औषधे आपला प्रभावही दाखवत होती आणि दुष्परिणामही दाखवून देत होती. पण तरीही हार न मानता फॉक्स खेळत होता. व्हीलचेअरवर तर त्याने इतके प्रभुत्व मिळवले, की या व्हीलचेअरच्या साह्याने त्याने ‘वेस्टवूड’ आणि ‘वर्न-बी’ यासारखी पर्वत शिखरे देखील सर केली!
मॅरेथॉन ऑफ होप दरम्यान धावताना फॉक्स दररोज सरासरी ४२ किलोमीटर धावत असे. त्यावेळी त्याच्याबरोबर साथ द्यायला त्याचा एक मित्र आणि त्याचा भाऊ हे देखील सहभागी झाले होते. सुरुवातीला त्यांच्या या मोहिमेला फारसा प्रतिसाद नव्हता, पण जसजसा फॉक्स पुढे पुढे जाऊ लागला तसतसे तेथील माध्यमांनी त्याला प्रसिद्धी द्यायला सुरुवात केली. ओंटारिओ येथे पोहोचेपर्यंत तो स्टार खेळाडू बनला होता.
त्याला अजून धावण्याची इच्छा होती, पण १ सप्टेंबर १९८० हा त्याच्या स्वप्नाचा अखेरचा दिवस ठरला. त्या दिवशी त्याला मॅरेथॉन अर्धवट सोडावी लागली. कर्करोगाने आता फुफ्फुसांवर घाला घातला होता. तोपर्यंत त्याने मोठे अंतर कापले होते. कर्करोगावर उपचार सुरू असताना जून १९८१ मध्ये त्याला न्यूमोनिया झाला, २७ जून रोजी तो कोमात गेला आणि २८ जून च्या पहाटे आपल्या तेविसाव्या वाढदिवसाच्या एक महिना आधी त्याचा मृत्यू झाला.
‘टेरी फॉक्स’ आज या जगात नसला तरी आशा, जिद्द, हिंमत आणि प्रखर आत्मविश्वास यांच्या जोरावर माणसाला काय काय करता येते याचा आदर्श त्याने अनेक तरुणांना घालून दिला आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.