आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
एखाद्या मोठ्या संकटाचा किंवा आपत्तीचा सामना करण्यासाठी सुरक्षा दलांना प्रशिक्षण देऊन त्याची रंगीत तालीम करून घेतली जाते. ही रंगीत तालीम इतकी खरी वाटते की, आपल्यासारखी सामान्य जनता सहज फसते. मात्र, हे सर्व ‘मॉक ड्रील’ असल्याचं जेव्हा समजतं तेव्हा मात्र, आपला पोपट झाल्याची फिलिंग येते. खरंतर मॉक ड्रील्समधून आपलं काही नुकसान होत नाही. पण अशाच प्रकारच्या मॉक लढाया मात्र केल्या जातात. यालाच फॉल्स फ्लॅग अ*टॅक म्हणतात. कधीकाळी असाच फॉल्स फ्लॅग अॅटॅक करून फिलिपीन्सच्या जनतेची फसवणूक करण्यात आली होती.
१३ ऑगस्ट, १८९८ रोजी फोर्ट सँटियागोवर अमेरिकन ध्वज उभारला गेला आणि फिलिपिन्समध्ये अमेरिकन वसाहतवादाची सुरुवात झाली. त्याअगोदर एक तथाकथित लढाई करण्यात आली होती. त्यात अमेरिकन आणि स्पॅनिश सैन्यात धुमश्चक्री झाली. इतिहासामध्ये याला ‘मनिलाची लढाई’ या नावानं ओळखलं जातं. ही लढाई स्पॅनिश-अमेरिकन यु*द्धातील संघर्षाच्या मोठ्या रंगभूमीचा एक लहानसा पण महत्त्वपूर्ण अंक होता. मात्र, हे यु*द्ध केवळ क्रांतीकारी फिलिपिनो लोकांना विश्वासात घेण्यासाठी रचल्याची सत्यता नंतर समोर आली.
अमेरिकेचे कमोडोर (अॅडमिरल व कॅप्टन यांच्या दरम्यानचा नाविक अधिकारी) जॉर्ज डेव्ही आणि स्पॅनिश गव्हर्नर जनरल फर्मिन जोडनेस यांच्यात झालेल्या गुप्त वाटाघाटीचा हा परिणाम होता. जेव्हा मनिलाच्या लढाईचं सत्य समोर आलं तेव्हापासून तिला ‘मॉक बॅटल ऑफ मनिला’ अर्थात मनिलाची फसवी लढाई, असं म्हटलं जातं. नेमकं या लढाईमध्ये काय झालं होतं? त्याबाबत हा विशेष लेख…
२५ एप्रिल १८९८ रोजी अमेरिकन काँग्रेसनं स्पेनच्या विरोधात यु*द्ध घोषित केलं. अमेरिकन नेव्ही सेक्रेटरीनं कमोडोर जॉर्ज डेव्हीच्या हाती एशियाटिक स्क्वाड्रनचं नेतृत्व दिलं. शत्रूला फक्त कॅरिबियन बेटांवरच नाही तर दुसऱ्या टोकाला असलेल्या फिलिपिन्समध्येसुद्धा रोखण्याची जबाबदारी डेव्हीकडं होती. निर्णायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनिलाच्या लढाईत डेव्हीच्या स्क्वाॅड्रनला स्पॅनिश फ्लोटिलाचा सामना करावा लागला.
डेव्हीनं नाकाबंदी करून मनिलाच्या खाडीवर नियंत्रण ठेवले असताना, फिलिपिनो जनरल एमिलियो अगुइनाल्डो आणि त्याच्या सैन्याने स्पॅनिशांना जमिनीवर घेरलं होतं. मे महिन्याच्या अखेरीस, अगुइनाल्डोच्या सैन्यानं ५ हजार स्पॅनिअर्ड्सला ताब्यात घेतलं.
१२ जून रोजी फिलिपिनो क्रांतिकारक दलानं फिलिपिन्सच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. अमेरिकेने मात्र, त्याला मान्यता दिली नाही. यूएस नेव्हीनं खाडीची नाकाबंदी केली होती, फिलिपिनो सैन्यानं शहरावर नियंत्रण ठेवलं होतं आणि स्पॅनिश सैन्यानं स्वतःला क्रांतीकाऱ्यांपासून दूर ठेवलं होतं. कितीतरी दिवस फिलिपीन्समध्ये अशीच परिस्थिती होती.
पुढील दोन महिन्यांत, अमेरिकेतून डेव्हीसाठी मजबूत मदत आली. मनिलाच्या उत्तरेला ७ हजार जणांनी लँडिंग केलं याशिवाय २० हजार सैन्य आणि दोन यु*द्धनौका देखील अमेरिकनं पाठवल्या. तोपर्यंत डेव्हीनं, बेल्जियमचे वाणिज्यदूत एडवर्ड आंद्रे यांच्या मदतीने स्पॅनिश गव्हर्नर जनरल बेसिलियो ऑगस्टिनशी गुप्त वाटाघाटी सुरू केल्या होत्या.
फिलिपिनो सैन्यानं ऑगस्टिनच्या कुटुंबाला बंदी बनवलं होतं. शिवाय स्पॅनिश सैन्याला उपासमार, आजारपण यांचा सामना करावा लागत होता. याबाबत त्यानं आपल्या वरिष्ठांना एक टेलिग्राम पाठवला होता आणि आपण माघार घेऊ असं सुचवलं होतं. मात्र, फिलिपिन्सवर किमान १५६५ पासून नियंत्रण असलेले स्पॅनिश इतक्या सहजासहजी शरण जाणार नव्हते. परिणामी ऑगस्टिनवर कारवाई करण्यात आली आणि त्याला जनरल फर्मन जॉडेन्सकडं पदभार हस्तांतरित करण्याचा आदेश देण्यात आला.
डेव्हीनं जॉडेन्सला देखील बोलणीसाठी निमंत्रण दिलं. या बोलणीदरम्यान सॅन फ्रान्सिस्को स्थित VIII कॉर्प्सचे कमांडर आणि यूएस आर्मी जनरल वेस्ले मेरिट यांनी फिलिपिनोबद्दल त्यांची भूमिका मांडली. स्पॅनिश जरी शत्रू असले तरी फिलिपिनोसुद्धा आपले मित्र नाहीत, ही गोष्ट मेरिटच्या मनात पक्की होती. स्पॅनिश जनरल जॉडेन्ससुद्धा काहीसा याच विचारसरणीचा होता.
स्पॅनिश सैन्याकडं माघार घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. ते श्वेतवर्णीय अमेरिकन लोकांना शरण जाण्यास तयार होते मात्र, फिलिपिनोंना नाही. म्हणून अमेरिकन आणि स्पॅनिश लोकांनी एकत्र येऊन एक बनाव रचण्याचा निर्णय घेतला. एका खऱ्याखुऱ्या लढाईचा बनाव! या योजनेनुसार फिलिपिनो सैन्याला शहराबाहेर ठेवलं जाणार होतं आणि यूएस व स्पॅनिश सैन्यं स्थानांची देवाणघेवाण करणार होतं.
१३ ऑगस्टच्या सकाळी जगप्रसिद्ध मनिलाची (बनावट) लढाई सुरू झाली. पॅसिफिकमध्ये तैनात असलेल्या ब्रिटिश क्रूझर ‘HMS Immortalité’ या जहाजावरील बँडनं अमेरिकन सैन्याला मानवंदनाही दिली होती. या ह*ल्ल्याची सुरवात डेव्हीच्या प्रमुख संरक्षित क्रूझर ‘ऑलिम्पिया’सह झाली. ऑलिम्पियाच्या शेजारी तोफा डागून यु*द्धाची परिस्थिती निर्माण करण्यात आली.
त्यानंतर अमेरिकन सैन्यानं देखील मालाटे येथील जुन्या किल्ल्यावर काही तोफा डागल्या. तर नुकत्याच दाखल झालेल्या नवीन अमेरिकन सैन्याने फिलिपिनोंना मध्यवर्ती शहराबाहेर रोखलं, जेणेकरून त्यांना लढाईचं सत्य समजू नये. ठरलेल्या योजनेनुसार, डेव्हीच्या ताफ्यानं स्पॅनिश जनरल जॉडेन्सला आत्मसमर्पण करण्यासाठी एक कोड ट्रान्समिट केला आणि स्पॅनिशांनी पांढरा झेंडा फडकवून माघार घेतल्याचं दाखवलं.
त्यानंतर पुन्हा ब्रिटिश आर्मर्ड क्रूझर ‘HMS Immortalité’ च्या क्रूनं फोर्ट सँटियागोवर फडकवलेल्या अमेरिकेच्या ध्वजाच्या सन्मानार्थ एकवीस तोफांची सलामी दिली! आणि ही बनावट लढाई संपुष्टात आली!
मनिलाच्या लढाईनं स्पॅनिश लोकांची फिलिपीन्सवरील सत्ता काहीशा सन्मानानं (कारण त्यांना फिलिपिनो लोकांसमोर शरण जावं लागलं नाही) संपुष्टात आली. याउलट अमेरिकेला फिलिपीन्समध्ये वसाहतीकरणाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. जेव्हा स्पॅनिश आणि अमेरिकन लोकांचा डाव फिलिपीनी स्वातंत्र्ययो*द्ध्यांच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी अमेरिकेला जोरदार विरोध सुरू केला.
त्यामुळे १८९९ ते १९०२ पर्यंत फिलिपिन्स आणि युनायटेड स्टेट्सच्या दरम्यानं अनेक चकमकी झाल्या. ज्यात ४ हजार २०० अमेरिकन आणि किमान २० हजार फिलिपिनो सैनिकांना आपला जीव गमवावा लागला. अमेरिकन परराष्ट्र विभागातील इतिहास कार्यालयाच्या अंदाजानुसार या काळात २ लाख नागरिकांचा देखील बळी गेला.
मनिलाच्या लढाईची घटना पाहता एक गोष्टी सर्वांना मान्य करावी लागेल की, अमेरिकेनं अतिशय शुद्रपणे मायभूमीपासून दूर असलेल्या ठिकाणी देखील एकाचं वेळी दोन शत्रूंना मार्गातून हटवण्याचं काम केलं होतं. आता अमेरिकेचं जे परराष्ट्र धोरण आपल्याला दिसतं आहे, मनिलाची लढाई कदाचित त्याचीच झलक होती! यामुळे अमेरिका स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकते हे सिद्ध होते. अमेरिकेच्या अशा प्रकारच्या इतिहासामुळेच ९/११ चा ह*ल्ला असाच एक अनेक कॉन्स्पिरसी थिओरिस्ट्स फॉल्स फ्लॅग अ*टॅक होता असं म्हणतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.