वर्षाला १ कोटींचा नफा मिळवणं चिकूवरील छोट्याश्या प्रक्रिया उद्योगामुळे त्यांना शक्य झालंय!

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

मुंबईपासून तीन तासांच्या अंतरावर बोर्डी नावाचे छोटेसे गाव वसलेले आहे. हे गाव मुंबई शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत उत्कृष्ट असे पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपाला येत आहे. ह्या गावात असलेला सुंदर समुद्रकिनारा, बगीचा आणि दाट धुके यामुळे वातावरण अत्यंत मनमोहक असून पर्यटक आपल्या नजरेत इथला निसर्ग साठवण्यासाठी ह्या गावाला भेट देत असतात.

ह्या अत्यंत नेत्रदीपक अशा नैसर्गिक सौंदर्याबरोबरच ह्या भागातील चिकूच्या बागांसाठी देखील बोर्डी हे गाव प्रसिद्ध आहे.

ह्या गावातील चिकू इतके प्रसिद्ध आहेत की दरवर्षी ह्या ठिकाणी चिकू मोहत्सवाचे आयोजन केले जाते. दूरवरून लोक खास ह्या चिकू महोत्सवात सहभागी होण्यासाठी येत असतात.

महेश चुरी हे ह्या चिकूच्या नगरीत जन्माला आले. त्यांना बालपणापासून ह्या चिकूच्या फळावर आणि शेतकरी ज्या तन्मयतेने त्यांच्या वाढीसाठी प्रयत्न करतो ह्यावर विशेष माया होती. ह्या सर्व चिकू उत्पादनाच्या पंढरीत वावरत असतांना महेश यांना जाणीव झाली की चिकूचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या मोबदल्यात योग्य तो भाव मिळत नाही.

शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचं आणि श्रमाचं योग्य ते फळ मिळत नसल्याची खंत त्यांना होती.

चिकू हे एक आरोग्यासाठी उत्तम असं फळ आहे. त्यात विविध जीवनसत्वे आणि मूलभूत घटकांचा समावेश असून ते शारीरिक विकासासाठी मोठ्या प्रमाणावर लाभदायी आहे. सोबतच ते पचनास देखील अत्यंत सहज आहे. यामुळे अनेकदा विविध तज्ञ चिकू खाण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करत असतात. तसेच चिकूच्या अत्यंत गोड अशा चवीमुळे अनेकांना चिकू हे पसंतीस देखील पडतात.

बोर्डी गावात चिकूचे उत्पादन जरी मोठे असले तरी त्या शेतकऱ्यांच्या उत्पादनाला वाव मिळत नव्हता. ह्यामुळेच चिकू उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महेश चुरी पुढे आले आणि त्यांनी ह्या चिकू उत्पादनावर आधारित एक सामाजिक प्रकल्प उभा करण्याचा निश्चय केला.

चिकू शेतकऱ्यांचा आयुष्याला कलाटणी देण्याचा विचार घेऊन तब्बल १२ वर्षे त्यांनी चिकू उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्येवर समाधान शोधण्यासाठी वेळ खर्ची केला. अखेरीस त्यांना मार्ग गवसला व त्यांनी २०१७ साली चिकू पार्लर ह्या स्टार्ट अपची सुरुवात केली.

चिकू पार्लरच्या माध्यमातून ते चिकूपासून तयार करण्यात आलेले चोकलेट, टोफी, मिल्कशेक आणि आईस्क्रीम यांची विक्री करतात. त्यांच्या ह्या स्टार्ट अपसाठी त्यांना दिवसागणिक २५० किलो चिकू लागत असतो. ह्या चिकू पार्लरमध्ये गावातील २० महिला कार्यरत आहेत. ह्या ठिकाणी चिकू पासून तयार होणाऱ्या विविध उत्पादनांच्या निर्मितीपासून ते पॅकिंगपर्यंतच्या कामात ह्या महिलांनी स्वतःला गुंतवून घेतले आहे.

महेश यांनी १९८८ साली आपले घर सोडले आणि मुंबई गाठली. मुंबईमधील प्रसिद्ध अशा वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिटय़ूट अर्थात व्हीजेटीआयमध्ये त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या आभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.

पुढे शिक्षण झाल्यावर मुंबईच्या बीपीएल ग्रुपमध्ये ते रुजू झाले आणि त्यांनी दोन वर्षे त्यांनी तिथे नोकरी केली.

१९९६ साली त्यांनी आपल्या नोकरीला सोडचिठ्ठी दिली व ते बोर्डीला परतले. त्यांनी ह्याठिकाणी सुमो इन्स्ट्रुमेंट्स ह्या कंपनीची स्थापना केली. बोरिवलीमध्ये त्यांनी ह्या कंपनीचे ऑफिस सुरू केले आणि बोर्डीला कंपनीचा प्रकल्प उभारला. सलग १० वर्ष मेहनत घेऊन त्यांनी सुमो इन्स्ट्रुमेंट्स ही कंपनी नावारूपाला आणली. पण कंपनीत काम करत असतांना त्यांच्या मनात आपल्या गावातील शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली.

आपल्या गाव व परिसरातील लोकांना एक चांगला रोजगार व उत्तम जीवन प्रदान करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते.

याचवेळी त्यांच्या मनात गावातील प्रसिद्ध असलेल्या चिकूच्या फळासंदर्भात काहीतरी सुरू करण्याचा विचार आला आणि त्यांनी चिकू आधारित उद्योग निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यांना चिकूपासून अशा उत्पादनांची निर्मिती करायची होती जे शंभर टक्के नैसर्गिक प्रक्रियेने तयार केलेले असतील आणि त्यात रसायनं, विविध प्रिझर्वेटिव्ह, कृत्रिम चव व रंग यांचा वापर अजिबातच झालेला नसेल.

इतर स्टार्ट अप्सप्रमाणे महेश यांच्या उद्योगाला सुरुवातीच्या काळात अपयशाचा सामना करावा लागला होता. त्यांनी चिकूवर प्रयोग करून चिकू पावडरची निर्मिती सुरू केली होती. ह्या चिकू पावडरचा वापर मिल्कशेक, गोड पदार्थ आणि डेझर्टच्या निर्मितीत करण्याची त्यांची संकल्पना होती. चिकूच्या वाळवून त्याची भूकुटी तयार करून त्याची चिकट द्रव्यात निर्मिती केली.

चिकू फळाला छोट्या छोट्या चकट्यामध्ये कापून सोलर टेंट ड्रायरच्या माध्यमातून त्यांना वाळवले जाते. त्या चकाट्याची पावडर बनवण्यात येते. ही पावडर तयार करण्यासाठी एक वेगळी मशीन वापरली जाते ज्यामुळे चिकटपणा कमी करणे शक्य होते.

२००८ साली महेश यांनी कमी प्रमाणात ह्या पावडरची निर्मिती सुरू केली. आपल्या बोर्डी गावातील मित्रांच्या सहाय्याने त्यांनी ही पावडर मुंबईच्या इतर भागात विक्रीसाठी पाठवली. पण सुरुवातीला पावडर सपशेल अयशस्वी ठरली.

पावडर निर्मिती जरी यशस्वी झाली तरी त्यांचा तो आनंद फार काळ टिकला नाही. त्यांच्या पावडरची विक्री होऊ शकत नव्हती. २००९ साली इतकी वाईट परिस्थिती ओढवली की त्यांनी तब्बल २००० किलो पावडर अक्षरशः फेकून दिली.

एवढ्या मोठ्या अपयशानंतर देखील त्यांच्यातल्या नव उद्योजकाने हार मानली नाही. त्यांना कळून चुकलं की पावडर विक्री हा चांगला व्यवसाय नाही.

त्यामुळे त्यांनी आपला विचार बदलत चिकू पावडरऐवजी चिकू पासून निर्माण होणारे विविध खाद्यपदार्थ विक्री करण्याचा निर्णय घेतला. सोबतच पॅकेज फॉर्म मधील चिकू विक्रीची संकल्पना देखील अंगिकारली. त्यांचा मेव्हणा पालघरमध्ये कॅटरिंग व्यवसाय करायचा त्याने त्यांच्या नव्या योजनेला पाठींबा दिला.

त्यांनी चिकूपासून तयार होणाऱ्या खाद्य पदार्थाना विविध फ्लेवर्स देण्याचा कामात मदत केली. यासाठी त्यांनी सलग तीन वर्ष प्रयोग केला. अखेरीस २७ डिसेंबर २०१७ त्यांनी चिकू पार्लरची स्थापना केली. पहिल्या चिकू पार्लरची सुरुवात बोर्डीच्या समुद्रकिनारी करण्यात आली. यानंतर अजून तीन पार्लरची सुरुवात मुंबई अहमदाबाद महामार्गावर करण्यात आली आहे.

चिकू पार्लर येथे आज १० प्रकारच्या मिठाई, आईस्क्रीम आणि मिल्कशेक उपलब्ध आहेत. त्यांनी तीन प्रकारात त्यांच्या चिकू उत्पादनांची विभागणी केली आहे.

सर्वात प्रथम त्यांनी मिठा चिकू ह्या नावाने बर्फी, पेढा आणि हलवा ह्या गोड पदार्थांची विक्री केली. मग त्यांनी चिकू पावडर आणि रवा यांची सुखा चिकू म्हणून विक्री केली तर कोल्ड चिकू ह्या अंतर्गत त्यांनी थंडे पदार्थ जसे आईस्क्रीम आणि मिल्कशेक ह्या पदार्थांची विक्री केली.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाचा प्रसाद म्हणून त्यांनी विशिष्ट चिकू मोदक देखील तयार केले आहेत. आज ह्या मोदकांची मोठी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.

आज चिकू पार्लरचा व्यवसाय अजून मोठ्याप्रमाणात विस्तारत असून दिवसेंदिवस ग्राहकांचा वाढता प्रतिसाद बघता, महेश आनंदित आहेत. आज ह्या चिकू पार्लरच्या माध्यमातून स्थानिक स्त्रियांना रोजगार आणि शेतकऱ्यांना पैसे देण्यात आपण यशस्वी झाल्याचा आनंद महेश यांना वाटत आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत एखादा व्यवसाय कसा उभा करायचा याचे महेश यांचे चिकू पार्लर हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!