मेजर ध्यानचंदचा खेळ बघून त्यांच्यावर एक झेकोस्लोव्हेकियन युवती फिदा झाली होती

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचे आयुष्य अनेक किस्स्यांनी भरलेले आहे. मैदानातील त्यांच्या खेळाविषयीचे किस्से तर खूपच प्रसिद्ध आहेत. जर्मनचा नेता अडॉल्फ हिटलर देखील ध्यानचंद यांच्या कौशल्याने इतका प्रभावित झाला होता की, त्याने ध्यानचंद यांना जर्मनीकडून खेळण्याचे आमिष दाखवले होते. पण, ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्ताव स्वीकारला नाही. भारत सोडणार नसल्याचे त्यांनी हिटलरला स्पष्ट सांगितले. मेजर ध्यानचंद अत्यंत संवेदनशील आणि तत्वनिष्ठ होते.

१९३२ साली ते ऍम्सटरडॅम येथील ऑलम्पिक दौऱ्यावर गेले होते तेंव्हा तर संपूर्ण युरोपात त्यांच्या नावाचे गारुड निर्माण झाले होते. याच ऑलम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने पहिले सुवर्णपदक जिंकले होते. या यशात ध्यानचंद यांचा मोठा वाटा होता हे तर सर्वांनाच माहिती आहे. या विजयानंतर भारतीय संघाने युरोपमध्ये अनेक ठिकाणी भेट दिली. परतीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी काही ठिकाणी सामने खेळले.

१९३२ साली ऍमस्टरडॅम येथे झालेल्या ऑलम्पिकमध्ये भारतीय संघाने अतिशय चांगली कामगिरी केली होती. प्रत्येक सामन्यात त्यांनी आपल्या विरोधी संघाला चारी मुंड्या चीत केले होते.

फायनल मॅचमध्येही या संघाने अभूतपर्व कामगिरी केली होती. या संपूर्ण मालिकेत ध्यानचंद यांनी आपल्या खेळाचे जे प्रदर्शन केले त्यामुळे भारतीय संघाचा दबदबा वाढला होता, हे मात्र नक्की. युरोपमध्ये तर ते हिरोच झाले होते.

ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारतीय हॉकी संघाने हॉलीवूडला भेट दिली. इथेही भारतीय संघाचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले.

त्यानंतर भारतीय संघाचा पुढील सामना झेकोस्लावीया येथे होता. झेकोस्लावीयाच्या राजधानीत हा सामना खेळला जाणार होता. ऑलम्पिक सह भारतीय संघाने युरोपमध्ये एकूण ३७ सामने खेळले होते. या सामन्यात भारतीय संघाने एकूण ३३८ गोल केले होते. या सगळ्या मालिकेत ध्यानचंद यांनी एकट्यानेच १३३ गोल केले होते, अर्थातच ही एक मोठी आणि अभूतपूर्व कामगिरी होती.

असाच एक सामना झेकोस्लोव्हेकिया म्हणजेच आत्ताचे झेक प्रजासत्ताक येथे आयोजित करण्यात आला होता. मैदानात हॉकी स्टिक घेऊन चेंडूचा पाठलाग करणारे ध्यानचंद म्हणजे देवदूतच. त्यामुळे कुणीही त्यांच्या प्रेमात पडणे साहजिक होते.

झेकोस्लोव्हेकियातील सामना संपल्यानंतर ध्यानचंद यांची एक चाहती त्यांना भेटण्यासाठी आली. ध्यानचंद यांची त्या युवतीवर अशी काही जादू झाली होती की, तिने ध्यानचंद यांना पाहताच पटकन त्यांचे चुंबन घेतले.

याने ध्यानचंद अक्षरश: भांबावून गेले. त्यांना असा काही अनुभव येईल याची सुतरामही कल्पना नव्हती. अचानक घडलेल्या या घटनेवर नेमके कसे व्यक्त व्हावे हेही त्यांना कळेना. ती युवती त्यांचा पिच्छा सोडण्यास तयार नव्हती. ध्यानचंद यांनी तिला अनेकदा सांगितले की ते विवाहित आहेत. पण, तिला त्याच्याशी काहीही देणेघेणे नव्हते. ती त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करू लागली तेंव्हा तर ध्यानचंद यांचा चेहरा पाहण्यालायक झाला होता. त्यांच्या संघातील इतर सहकाऱ्यांनी याच गोष्टीवरून त्यांची चेष्टामस्करी सुरु केली.

बोरिया मजुमदार यांनी लिहिलेल्या ‘ऑलम्पिक्स-द इंडिया स्टोरी’ या पुस्तकात हा किस्सा वाचायला मिळतो. आयएचएफचे अध्यक्ष हेमन यांनी आपल्या प्रवास वर्णनात या किस्स्याचा उल्लेख केला आहे. नाहीतर ध्यानचंद यांनी हा किस्सा कुणालाही कळू दिला नसता.

ध्यानचंद यांच्या स्नुषा डॉ. नीना उमेश ध्यानचंद यांनी लिहिलेल्या, ‘हॉकी के जादूगर ध्यानचंद, कहानी अपनोंकी’ या पुस्तकातही, या मजेदार किस्स्याचा उल्लेख केलेला आहे.

ध्यानचंद यांच्या धाकट्या स्नुषा डॉ. नीना उमेश ध्यानचंद यांनी आपल्या पुस्तकात त्यांच्याबद्दलच्या कित्येक आठवणी नोंदवल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे, “१९६९ मध्ये माझे लग्न झाले तेंव्हा मी त्या घरात अगदीच नवीन होते. लग्नाच्या निमित्ताने घरी काही पाहुणे आले होते. त्यांनी मला काही कामानिमित्त बाहेर बैठकीत बोलावून घेतले. त्या घरात मी नवीनच असल्याने मी त्यांच्या समोर खाली जमिनीवरच बसले. त्याचवेळी अचानक बाबूजी (ध्यानचंद) तेथे आले. मला जमिनीवर बसलेली पाहून ते नाराज झाले. त्या पाहुण्यांसमोरच ते घरातील लोकांना बोलू लागले. तुमचे लक्ष नाही का आपली सून खाली जमिनीवरच बसले आणि तुम्ही खुर्चीवर बसला आहात? त्याक्षणी त्यांनी मला जमिनीवरून उठवून खुर्चीवर बसवले.”

पुढे त्या लिहितात,

“ध्यानचंद यांनी घरात कधी मुलगा-मुलगी असा भेदभाव केला नाही. मुलगा असो वा मुलगी दोघांनाही समान अधिकार दिले. मुलगा असो कि मुलगी दोघांनाही समान शिक्षण आणि समान अधिकार मिळाले पाहिजे, असे त्यांचे मत होते.”

त्यांच्याविषयीच्या आणखी काही आठवणी सांगताना त्या लिहितात, घरातील सुनांची त्यांना फारच काळजी असे. ते म्हणायचे आपल्या घरी सून म्हणून येणारी मुलगी ही कुणाच्या तरी घरची लेक असते. घरातील एक जरी सून आजारी पडली तर ते खूप अस्वस्थ होत. स्वतः त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जात. त्यांनी वेळेवर औषधे घेतली की नाही याची ते आवर्जून चौकशी करत.

आपल्या पत्नीला ते नेहमी सांगत, “आपल्या घरातील सुना आनंदी राहिल्या पाहिजेत. आपल्या समाजात मुली लग्नानंतर आपल्या आई-वडिलांना, नातलगांना सोडून सासरी येतात. त्यांना सासरच्या घरातही तितकेच प्रेम आणि आदर मिळाला पाहिजे. या घरातही त्यांना आपलेपणाची वागणूक मिळाली पाहिजे. म्हणजे त्यांना कधीच माहेरची आठवण येणार नाही.”

भारतीय संघ जेंव्हा भारतात परत आला तेंव्हा त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. झाशीमध्ये तर क्लब झाशी हिरोजने ध्यानचंद यांच्या सत्काराप्रीत्यर्थ एक जोरदार कार्यक्रमही केला. झाशीमध्ये असताना त्यांनी झाशी हिरोजच्या वतीने झाशी सैन्याच्या संघाविरोधातही एक सामना खेळला.

या सामान्यानंतर ध्यानचंद सैन्यातील नोकरी सोडून भारतीय रेल्वेमध्ये रुजू होणार असल्याच्या चर्चेचे पेव फुटले. अर्थात ही चर्चा आगदीच तथ्यहीन होती असे नाही. कारण आयएचएफचे अध्यक्ष हेमन हे रेल्वे बोर्डाचे सदस्य होते. त्यांनी ध्यानचंद यांना रेल्वेमध्ये एक चांगली नोकरी देण्याचा शब्द दिला होता.

सैन्यातील नोकरी सोडून रेल्वे मध्ये जावे की न जावे हा ध्यानचंद यांच्यासमोरील एक मोठा पेच होता. परंतु ध्यानचंद यांच्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर जनरल डंकन यांनी सैन्यात ध्यानचंद यांची सर्वतोपरीने काळजी घेतली जाईल आणि त्यांना बढती मिळेल याचे आश्वासन दिले. जनरल डंकन यांच्या या भेटीनंतर ध्यानचंद यांनी सैन्यातच नोकरी करण्याचा निर्णय घेतला.

डंकन यांची ही भेट झाली नसती तर मात्र कदाचित त्यांनी रेल्वेतील नोकरीचा प्रस्ताव मान्य केला असता. परंतु, सैन्यातील नोकरी सोडावी लागली नाही याचाही त्यांना आनंद होताच. पुढे त्यांना लवकरच बढती मिळाली.

आज एखादा “स्टार प्लेअर” जसा राहतो त्याच्या अगदी उलट राहणीमान हॉकीच्या या जादुगाराचे होते. त्यांचे भारतावरचे प्रेम आणि तत्त्वनिष्ठता त्यांनी वेळोवेळी सिद्ध केली होती. त्यांच्या कर्तुत्वाने त्यांनी भारताचा डंका जगभर वाजवला. त्यांना द पोस्टमनचा सलाम!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!