सह्याद्रीतील या किल्ल्यांवर चक्क वर्तुळाकार इंद्रधनुष्य बघायला मिळतं

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


पावसाळ्याच्या सुरुवातीला जेव्हा काळ्या निळ्या आकाशात अर्धवर्तुळाकार ‘इंद्रधनूष्य’ आपल्याला ज्यावेळेस दिसते त्यावेळेस आपल्याला निसर्ग नवलाचे खूप कुतूहल वाटते. आकाशामध्ये दिसणाऱ्या या निळ्या रंगामध्ये अचानकपणे जेव्हा उन सावल्यांच्या खेळामध्ये फिकट सप्तरंगाची झालेली उधळण आपले चित्त वेधून घेते. हि सात रंगांची उधळण जेव्हा आपण आपल्याबरोबर असणाऱ्या  इतर लोकांना देखील  दाखवतो आणि नकळत आपल्या तोंडून उद्गार बाहेर पडतात “ते बघा इंद्रधनुष्य”.

परंतु हेच इंद्रधनुष्य जर संपूर्ण गोल वर्तुळाकार स्वरुपात आपल्याला दिसले तर…?? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो.

हा निसर्गाचा सुंदर सोहळा स्वतः अनुभवायचा असेल तर सह्याद्रीच्या कडेकपारी धुंडाळाव्या लागतात निसर्गाच्या विविध भौगोलिक रूपांचे दर्शन हे आपल्याला डोंगरयात्रे मध्येच बघायला मिळते.

इंद्रवज्राबद्दल महाराष्ट्रामध्ये म्हणजे सह्याद्री परिसरात पहिल्यांदा नोंद केली ती ‘कर्नल साईक्स’ या ब्रिटीश अधिकाऱ्याने ती देखील हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर.

इ.स.१८३५ मध्ये घोड्यावरून रपेट मारीत सकाळच्या वेळेला हरिश्चंद्रगडाच्या प्रसिद्ध ‘कोकण कड्यावर’ तो जेव्हा पोहोचला तेव्हा गिर्यारोहकांच्या लाडक्या कोकणकड्यावर  गेलेल्या ‘कर्नल साईक्सला’ मोठे विहंगम दृश्य दिसले होते. ‘कर्नल साईक्स’ आणि त्याचा घोडा तसेच त्याच्या सोबतचे सारे लोक यांच्या प्रतिमाच त्याला समोरच्या ढगांमध्ये उमटलेल्या दिसल्या. सृष्टीचे हे निसर्ग नवल पाहून सारेचजण आश्चर्यचकित झाले, कारण त्यांच्यासाठी हा प्रकार नवीन होता ‘इंद्रवज्र’ हे निसर्ग नवल पाहून कर्नल साइक्स आणि मंडळी भारावून गेली होती.

राजगड किल्यावरुन दिसलेले हे इंद्रवज्र.

अहमदनगर जिल्ह्याच्या गॅझेटीयरमध्ये इंग्रजांनी ही नोंद केलेली आपल्याला आढळून येते. नगर जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये ७१७ पानावर याची नोंद आपल्याला आढळून येते.

इंग्रजी गॅझेटकारांनी नोंदवलेय की, “Accompanying the brilliant rainbow circle was the usual outer bow in fainter colors. The foking or Glory of Buddha as seen from mount O in West Chaina tallies more exactly with the phenomenon than Colonel Sykes, description would seem to show.” या वर्तुळाची त्रिज्या साधारणतः ६० ते ८० फुट होती असे गॅझेटीयर मध्ये नोंदवलेले आहे.

इंद्रवज्राचे (Circular Rainbow) वैशिष्ट्यच असे असते की, जो हे दृश्य पाहातो तो स्वत:चे प्रतिबिंब हे इंद्रवज्रात पाहातो. हे इंद्रवज्र पाहणाऱ्यांच्या सावल्या या मध्यभागी आपल्याला बघायला मिळतात. 

मध्यभागात अत्यंत रंगीबेरंगी आणि तेजस्वी दिसणारे हे वर्तुळाकार ‘इंद्रधनूष्याचे’ सप्तरंगी तेजोवलय कडेला जाताना मात्र फिकट होत जाते. ‘इंद्रवज्र’ म्हणजे एक नैसर्गिक नवलच आहे.

इंद्रवज्रासाठी भौगोलिक परिस्थिती देखील तशी असायला हवी. इंद्रवज्रासाठी नैसर्गिक परिस्थिती कशी हवी हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडणार परंतु त्यामागचे शास्त्रीय कारण बघायला गेले तर त्याचे उत्तर आपल्याला सापडते.

दिवस पावसाळ्याचे असावेत किंवा पावसाळ्यापूर्वीचे थोडेसे किंवा नंतरचे. वेळ सकाळची असावी. हलका पाऊस पडत असणे गरजेचे आणि अक्राळ विक्राळ सह्याद्रीच्या डोंगरकड्यांमध्ये पश्चिमेकडे कोकणात उतरलेल्या रांगांवर पश्चिम दिशेकडून दाट धुके असलेले ढग पसरलेले असावेत.

उगवत्या तेजाच्या भास्कराची सुंदर कोवळी किरणे त्या ढगांच्या पांढऱ्या गालिच्यावर पडली की, पाहणारांच्या सावल्या आणि त्याभोवती हे वर्तुळाकार ‘इंद्रधनुष्य’समोरच्या दरीतून येणाऱ्या ढगांवर दिसू लागते.

तोरणा किल्यावरुन दिसलेले इंद्रवज्र.

पश्चिमेच्या रौद्र कड्याच्या दिशेने आपण तोंड करून उभे राहिलो की, निसर्गाचा हा अद्भुतरम्य निसर्ग आविष्कार आपल्याला पहावयास मिळतो.

पण हे इंद्रवज्र आपल्याला सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यात दिसणे हा नशिबाचा भाग आहे.

मुळात हे ‘इंद्रवज्र’ आपल्या देशात अत्यंत दुर्मिळ आहे. कर्नल साईक्सनंतर बऱ्याच वर्षांनी हे इंद्रवज्र बऱ्याच भटक्यांना बघायला मिळाले आहे. हे पाहताना अद्भूत दृश्य पाहताना  निसर्गवेडे आनंदाने अक्षरशः बेभान होतात बऱ्याचदा आपण हे दृश्य आपण आपल्या डोळ्यांनी पाहतोय यावर विश्वासच बसत नाही.

बऱ्याच भटक्यांनी हे निसर्गनवल नुसते पहिलेच नाही तर आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपले देखील आहे. याखेरीज एका भौगोलिक घटनेचे साक्षीदार आणि निसर्गनवल इंद्रवज्र पाहण्याचे भाग्य अनेक भटक्यांना आजपर्यंत लाभले आहे.

निसर्गनवल इंद्रवज्राचा नजारा पाहण्यासाठी दरवर्षी निसर्गवेडे हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर जाऊन बसतात बऱ्याचदा असे होते कि हे इंद्रवज्र पाहायला न मिळाल्यामुळे बरेच दुर्ग भटके हिरमुसले होऊन हरिश्चंद्रगडावरून परत येतात आणि मग एखाद दोन दिवसांनी जे दुर्गभटके कोकणकड्यावर मुक्काम ठोकून बसलेले असतात त्यांच्याकडून बातमी सगळीकडे पसरते कि आम्हाला इंद्रवज्र दिसले.

मग जे दुर्ग भटके त्यांच्या ‘पंढरी’च्या वारीवरून परतलेले असतात त्यांच्या तोंडात हे शब्द हमखास असतात “एखाद दोन दिवस अजून मुक्काम केला असता तर आपल्याला इंद्रवज्र नक्की बघायला मिळाले असते आपले नशिबच खराब होते, पुढच्या वर्षी नक्की परत जाऊ ” हि वाक्य बऱ्याच दुर्गभटक्यांच्या तोंडून ऐकायला मिळतात.

परंतु ‘इंद्रवज्र’ हे फक्त हरिश्चंद्रगड येथून दिसत नाही हा गैरसमज दुर्गभटक्यांनी मनातून काढावा.

हे निसर्गनवल ‘इंद्रवज्र’ रतनगड, तोरणा, राजगडच्या बालेकिल्यावरुन आणि संजीवनी माचीवरून, साल्हेर, भीमाशंकरच्या नागफण्यावरून, प्रतापगड, राजमाची, तिकोना येथून अशा अनेक ठिकाणांवरून बऱ्याच दुर्गभटक्यांना पाहायला मिळाले आहे.

त्यांनी तो निसर्ग नवलाचा अभूतपूर्व सोहळा अनुभवला आहे त्यांचे अनुभव देखील अत्यंत सुंदर आहेत.

मुळातच सह्याद्री आणि पश्चिम घाट हा निसर्ग सौंदर्याने आणि वैविध्यपूर्ण बायो डायव्हर्सिटीने नटलेला असून या पश्चिम घाटाचे वर्णन करायला शब्दच अपुरे पडतात. सह्याद्रीमध्ये खाली उतरावे ते फक्त पाण्याने आणि खाली कोकणातून वर आकाशाकडे झेपावे ते फक्त भन्नाट वाऱ्याच्या झोताने…

सह्याद्री आणि महाराष्ट्रातील किल्ले म्हणजे सौंदर्याचे मानबिंदूच जणू. त्यात येथे पुन्हा निसर्ग नवलाचे वरदान असणाऱ्या ‘इंद्रवज्राचा’ सुंदर नजारा पाहायला मिळणे म्हणजे डोंगरयात्रा करणाऱ्यांसाठी जणू  पर्वणीच म्हणावी लागेल.

रतनगड किल्यावरुन पहायला मिळालेले इंद्रवज्र.

(टीप:-इंद्रवज्राचे सर्व फोटो लेखकाचे आहेत.)


सदर लेख महाराष्ट्राची शोधयात्रा वर  पूर्वप्रकाशित.

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे.

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा.

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :
फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!