आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून भारताची ओळख सर्वमान्य आहे. अशा लोकशाही देशात निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव मानला जातो, यासाठी प्रशासनसुद्धा कसून तयारी करतं. राज्य आणि जिल्हा स्तरावर निवडणूका सुरळीतपणे पार पडाव्यात यासाठी काही अपवाद वगळता नागरिकही संपूर्ण सहकार्य करून निवडणुका फलित होण्यासाठी हातभार लावतात.
मतदानाच्या हक्कापासून कोणीही वंचित राहू नये या साठी स्थानिक पातळीवरील शासन संस्थेपासून ते राज्य आणि केंद्र सरकारही प्रयत्नशील असतात. तरी दुर्दैवाने आपल्याकडे ओढून ताणून कसबसं ५५-६० टक्के मतदान होतं. म्हणजे जेमतेम ५० टक्के जनताच मतदानासाठी बाहेर पडते, आणि लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्याचं काम करते.
ज्या देशांमध्ये लोकशाही नाही त्या देशांमध्ये लोकशाहीच्या मागणीसाठी टीयान्मेन स्केअरसारख्या घटना घडतात. रणगाड्यांखाली हजारोंच्या संख्येने चिरडल्या जाणाऱ्या त्या विद्यार्थ्यांना लोकशाहीचं महत्त्व पटलंय, आणि ते लोकशाही राज्यव्यवस्थेची कदर करतात. पण आपल्याला सहजपणे जी गोष्ट प्राप्त झाली आहे, त्याची बहुधा माणसाला किंमत नसते.
अनेकदा आपण सत्तारूढ सरकारवर टीकाही करतो, पण फक्त शाब्दिक टीका करण्याऐवजी मतदानाच्या दिवशी बाहेर जाऊन मतदान केलं तर निश्चितच सरकारचं चित्र काहीसं बदलेलं दिसेल. शिवाय सर्व जाणकारांनी आणि तज्ज्ञांनी मतदान केल्यास पक्षांना जाती आणि धर्माच्या माध्यमातून समाजात फूट पाडून राजकारण करणं काही प्रमाणात थांबवावं लागेल. यामुळे शाश्वत विकासाला प्राधान्य देण्यात येईल.
यातून आपसूकच जनसामान्यांचे प्रश्न सुटायला सुरुवात तरी होईल. काही भारतीय मात्र मतदानाच्या बाबतीत अत्यंत शिस्तप्रिय असतात, अशाच एका भारतीयाची ही कथा..
जपानमध्ये एका प्रवासीसाठी ट्रेन सुरु ठेण्यात आली होती, ही बातमी आपल्याला कदाचित माहिती असेल, पण भारतात चक्क एका मतदाराला त्याचा मतदानाचा हक्क बजावत यावा यासाठी एक मतदानकेंद्रच संपूर्ण क्षमतेने निवडणूक आयोग सुरु करत होतं. कदाचित ही अतिशयोक्ती वाटेल, पण तसं मुळीच नाही.
देशातील सर्वात प्रसिद्ध मतदारांपैकी एक, गुजरातच्या सोमनाथ जिल्ह्यातील गिर जंगलातील बनेज येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एकमेव व्यक्ती येत असे, किंबहुना त्यांच्यासाठीच निवडणूक आयोगाने तेथे मतदान केंद्र उभारले.
भारतीय निवडणूक आयोग प्रत्येक निवडणुकीच्या वेळी महंत भरतदास दर्शनदास यांच्यासाठी गुजरातमधील गिर जंगलात एक मतदान केंद्र उभारत असे. मागच्या दोन दशकांपासून निवडणूक आयोगाकडून हे कौतुकास्पद कार्य होत आहे. २०१९ साली या महंतांचे राजकोटमध्ये दीर्घाजाराने निधन झाले. पण त्या निमित्ताने भारताची आणि भारतीयांची लोकशाही जपण्याची तळमळ जगासमोर आली.
महंत भरतदास हे गिर जंगलातील बाणगंगेश्वर महादेव मंदिराचे पुजारी होते. हा भाग उना विधानसभा मतदारसंघात येतो आणि भारतीय निवडणूक आयोग जवळजवळ दोन दशकांपासून प्रत्येक मोठ्या निवडणूकीत, बानेज येथे, मंदिराजवळील वन चौकीवर मतदान केंद्र उभारत आहे. प्रत्येक निवडणुकीत महंत भरतदास या गिर जंगलातील मतदान केंद्रावर एकमेव नोंदणीकृत मतदार होते आणि हा साधू तेथे बिनदिक्कतपणे आपले मत देत असे.
निवडणूक आयोग सुमारे पाच ते सहा कर्मचाऱ्यांची एक टीम या गिर जंगलातील या स्थानावर पाठवत असे. हीच टीम त्या घनघोर जंगलात एक मतदार केंद्र उभारत आणि त्या एका साधूचे मत नोंदवून घेत असे. याचं महत्वाचं कारण म्हणजे नियमानुसार एका मतदाराला आपल्या घरापासून मत देण्याच्या ठिकाणापर्यंत २ किलोमीटरपेक्षा जास्त चालण्याची आवश्यकता पडू नये. बाणगंगेश्वर महादेव मंदिरापासून जवळचं मतदान केंद्र सुमारे २० किलोमीटर लांब आहे.
सरकारी नोंदींनुसार, महंत भरतदासांनी २००७ पासून प्रत्येक लोकसभा आणि गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत मतदान केले होते, या प्रक्रियेत १०० टक्के मतदान झालेलं बानेज हे देशातील एकमेव बूथ बनले.
निवडणूक आयोगाने २०१९ साली एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान बानेजमध्ये मतदान केंद्र उभारले होते आणि महंत यांनी यावेळीही मतदान केले होते. याच गोष्टीचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात केला होता आणि आपलं कर्तव्य पार पडणाऱ्या साधूचे आणि ते कर्तव्य पार पडायला मदत करणाऱ्या निवडणूक आयोगाचे एकप्रकारे त्यांनी कौतुकच केलं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.