आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
कल्पना करा की एका ई-कॉमर्स कंपनीला एका दिवसाला एखाद्या गोदामातून ५,००० वस्तू लोकांच्या घरापर्यंत नेऊन पोहचवायच्या आहेत आणि एका डिलेव्हरी बॉयच्या डोक्यावर २५ वस्तू लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम सोपवण्यात आले आहे.
यासाठी त्या कंपनीला कमीत कमी २०० कामगारांची डिलेव्हरी बॉय म्हणून गरज पडेल आणि प्रत्येक डिलेव्हरी बॉयला पिनकोडप्रमाणे एखाद्या भागाचे दायित्व देऊन त्या भागात त्या वस्तू लोकांच्या घरी पोहचवाव्या लागणार आहे.
यात कुठल्याही प्रकारच्या दिरंगाईची आणि हलगर्जीपणाला वाव नाही. अशा वेळी हे काम करायला नक्कीच दोन ते तीन तास वेळ द्यावा लागेल. प्रत्येक पार्सलचं वर्गीकरण आणि त्याच्या वितरणाची प्रक्रिया खूप कठीण नसली तरी थकवून टाकणारी आहे.
भारतात या कामाचा जीडीपीमध्ये १३ % वाटा आहे.
लॉजिस्टिक हा भारतातील एक मोठा व्यवसाय असून इतर देशांच्या तुलनेत भारतात लॉजिस्टिकचे प्रमाण खूप जास्त आहे आणि इतर देशात लॉजिस्टीकचा जीडीपीमधील वाटा हा फक्त ८-१० टक्के इतका आहे. याला भारतातील तंत्रज्ञानाचा अभाव कारणीभूत असून भारत दरवर्षी लॉजिस्टिकवर ३०० बिलियन डॉलर इतका खर्च करत असतो.
या संपूर्ण समस्येवर मात करण्यासाठी लॉजीनेक्स्ट या संकल्पनेची आणि व्यवसायाची सुरुवात मनिषा रायसिंघानी या तरुणीने केली.
२०१४ साली ध्रुवील संघवी या आपल्या कार्नेगी विद्यापीठातील मित्रासोबत तिने आपल्या कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून ती डिलेव्हरीसाठी एक अत्यंत साधा, सरळ आणि किफायतशीर मार्ग लोकांना उपलब्ध करून देते.
तिच्याकडे एक अल्गोरिदमिक यंत्रणा यासाठी कार्यरत असून त्या यंत्रणेच्या मदतीने ती सहजरित्या २०० लोकांमध्ये आपल्या ५००० ऑर्डर्सचे काही क्षणांत वितरण करू शकते.
इतकंच नाही ऑर्डर डिलेव्हरी करण्यासाठी कोणत्या वाहनाचा वापर करायचा आणि कुठल्या रस्त्याचा वापर करायचा यासारखी प्रत्येक माहिती प्रत्येक डिलेव्हरी बॉयला व्यवस्थितपणे देऊन त्याला मार्गी लावण्याचे काम देखील त्यांची कंपनी अगदी सहजरित्या पार पाडत असते.
वातावरण आणि ग्राहकाची उपलब्धता याची देखील माहिती दिली जाते. यामुळे ऑर्डर लवकरात लवकर ग्राहकापर्यंत पोहचवणे सहज शक्य होतेच पण सोबतच या मार्गाने डिलेव्हरी बॉयचा रोजचा एक किलोमीटर प्रवास देखील वाचतो, जर एखाद्या संस्थेत ५००० डिलेव्हरी बॉय कामाला असतील तर त्यांचे तब्बल ५००० किमी अंतराचे इंधन रोज वाचते.
७-८ टक्के पैसे लॉजिनेक्स्टमुळे लॉजिस्टिक वाल्यांचे वाचतात.
डी मार्ट, डीकॅथलॉन आणि मारुती सुझुकी हे त्यांचे कस्टमर असून त्यांच्या अत्यंत जड सामानाच्या डिलिव्हरीची जबाबदारी देखील लॉजीनेक्स्टच्या खांद्यावर त्यांनी सोपवली आहे.
इतकंच नाही तर लॉजीनेक्स्टने आता पेटीएमच्या धर्तीवर एका सेस नावाच्या सॉफ्टवेअर स्टार्टअपची सुरुवात केली असून हे संपूर्णतः ios ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारे सॉफ्टवेअर आहे. लॉजीनेक्स्टचे जगभरात ८० कस्टमर्स आहेत, जे त्या सेवेचा लाभ घेत आहेत. आजही तब्बल १० देशात लॉजीनेक्स्ट ही सेवा पुरवत आहे.
सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या नावीन्यतेमुळे आणि सोबतच सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या रिअल टाइम ॲनॅलिटीक्स, सोपी कार्यपद्धती तसेच व्यवसाय शिक्षण यामुळे लॉजीनेक्स्टला मोठी मागणी मिळत आहे.
आज लॉजीनेक्स्ट ही आर्थिकदृष्ट्या एक सक्षम कंपनी असून स्टॅटिस्टिका आणि फायनान्शियल टाइम्सच्या हवाल्यानुसार २०१७ ह्या आर्थिक वर्षात कंपनीची उलाढाल ही २.३ करोड अमेरिकन डॉलर्स इतकी वाढली आहे.
२०१४ ते २०१७ या कालावधीत कंपनीने १७५.५ टक्के इतक्या वेगाने प्रगती केली आहे.
या क्षेत्रात स्वतःचा उद्योग निर्माण करणारी मनीषा ही पहिली महिला असून कदाचित जगात तिच्या तोडीच्या तंत्रज्ञानाची निर्मिती कोणाला करता न आल्याने आज तिला मार्केटमधे कॉम्पिटिशनचा सामना करावा लागत नाही आहे.
जगभरातील तंत्रज्ञान उद्योगात महिलांचा सहभाग वाढत असून त्यांच्या नेतृत्वाचा स्वीकार देखील केला जातो आहे. मनीषा एक दृढ निश्चयी उद्योजक असून त्या स्वतःचं विश्व निर्माण करू बघणाऱ्या कुठल्याही महिलेसाठी एक प्रेरणा आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.