आजन्म अनवाणी फिरून शिक्षणप्रसार करणारा खराखुरा शिक्षणमहर्षी

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

आजकाल सर्वत्र चालणारे शिक्षणसंस्थांचे कार्य केवळ व्यवहारसन्मुख होत चालले आहे. वाटेल तेवढी पदरमोड करून मुलाला इंजिनियरिंग, मेडीकल किंवा तत्सम शाखांना प्रवेश मिळवून देणे, हे पालकांचे ध्येय झाले आहे.

अकारण ४-२ महाविद्यालये काढणे हा लोकांचा छंद झाला आहे. त्यामुळे त्यांना सहज शिक्षणमहर्षी पद मिळते.

परंतु या शिक्षणमहर्षींना स्वत:च्या पोटापलीकडे समाजाच्या पोटाचे काहीही देणेघेणे नाही, म्हणून त्यांचे हे महर्षीपद समाजविकासाच्या दृष्टीने कुचकामी ठरते.

परंतु खऱ्या अर्थाने इथल्या माणसांच्या निरक्षरतेचा कलंक दूर सारणारे, देव दगडात नसतो तर माणसात असतो, हे हेरून इथल्या माणसात माणुसकी पेरणारे, महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात अनवाणी पायाने वणवण फिरून अवघ्या महाराष्ट्राला वाघिणीचं दूध पाजणारे कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे खरेखुरे शिक्षणमहर्षी.

सुद्रुढ शरिरातील विचारी मन, कर्तव्यपरायण बुद्धी व कामसू हात हे शिक्षितांचे खरे ऐश्वर्य आहे. “पदवी हे शिक्षणाचे चिन्ह आहे, पण ते शिक्षणाचे सार नाही” या विचारसरणातून निर्माण झालेला विद्यार्थी म्हणजे हाती नांगर धरणारा, प्रसंगी खडी फोडणारा व मुखाने रसभरित इंग्लिश काव्य गुणगुणणारा कर्मवीर पॅटर्न होय.

जे खऱ्या अर्थाने व्यक्तीला घडवणारे शिक्षण होते. आपला विद्यार्थी नोकरीसाठी लोकनेत्यांचे ऊंबरठे झिजवणारा बेफाम व बेकार तरूण नसावा, हा कर्मवीरांचा अट्टहास हेाता.

स्वावलंबी शिक्षण हेच त्यांचे ब्रीद हेाते.

‘रयत’च्या माजी विद्यार्थ्यांनी वर्गणीतून भाऊरावांना एक मोटार भेट दिली. तिचा फोटोही साताऱ्याच्या संग्राहालयात आहे. पण त्या मोटारीचा खर्च संस्थेने करू नये. मी स्वत:ही करू शकत नाही, म्हणून मोटार परत घ्यावी, असं त्यांनी सांगितलं.

“मी आजारी असतो. शारिरीक त्रास सहन होईल पण मानसिक त्रास सहन होणार नाही.” असं एक पत्र भिंतीवर आहे. आजचा काळ नजरेसमोर आणून ते पत्र वाचायला हवं.

सार्वजनिक संस्थांचे, शासनाचे अधिकारी, पदाधिकारी शासकीय वाहनांचा उपयोग स्वत:च्या कुटूंबासाठी कसा खुलेआम करतात, अधिकाऱ्यांच्या बच्चेकंपनीला शाळेत पाठवण्यासाठी कोणत्या गाड्या असतात?

मंत्र्यांचे गणगोत कुणाच्या गाड्यातून कसे फिरते. हे नजरेसमोर आलं की अण्णांचा त्याग आणि हल्लीचे महाभाग यांची प्रचंड कीव येते.

आपल्या मुलीच्या हातातील सोन्याच्या बांगड्या परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करणारे, समाजाच्या निरक्षरतेचा कलंक दूर सारणारे, कर्मवीर अण्णा म्हणजे समाजाची वैचारिक नांगरणी करणारे महापुरूष.

आजन्म कर्मवीरांनी पायात पादत्राण घातले नाहीत. ते गादीवर बसले नाहीत. शिक्षणप्रसारासाठी जन्मभर त्यांनी अनवाणी पायाने पायपीट केली. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतून घडलेली कर्मवीर परिक्रमा हे एक शैक्षणिक धम्मचक्र होते.

कर्मवीरांवर लोकांनी देणग्यांचा वर्षाव केला, पण त्याच पावली लोकांना पावत्या देवून त्यांनी व्यवहार पारदर्शी ठेवला. संस्थेच्या कामासाठी आरंभलेला प्रवास पुरा होताच कार्यालयात आपला जमाखर्च सादर करून कर्मवीर घरी जात असतं.

आर्थिक बाबतीत असे शुचिभूर्त जीवन जगता येते हे त्यांनी सिद्ध केले. ही त्यांची शुभ्रता हा आदर्शाचा वस्तूपाठच होता.

महात्मा फुले यांचा मानवतावाद,शाहू छत्रपतींचे निर्भय व लोककल्याणकारी जीवन, डॉ. आंबेडकरांचा लढाऊ बाणा या गुणांची विलोभनीय मूर्ती म्हणजे कर्मवीर अण्णा.

त्यांच्या शैक्षणिक कार्यातून प्रा. शिवाजीराव भोसले, शंकरराव खरात, बी. जी. पाटील इ. विद्यार्थी निर्माण झाले. ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने  रयतेच्या वटवृक्षाला यशस्वीतेचा साज चढवला.

रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लाखो निरक्षरांच्या आयुष्यात अण्णांनी प्रकाश पेरला. सद्यस्थितीतील ग्रामीण भागाचा शैक्षणिक विकास ही कर्मवीरांच्या कार्याचीच फलश्रुती आहे. अशा या महामानवाला विनम्र आदरांजली!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

यावर तुमची प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!