The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

स्वतःचा देश सोडून आजीवन ब्रह्मचर्य पत्करून भारतीयांची सेवा करणारी भगिनी

by श्रीपाद कोठे
25 October 2021
in वैचारिक
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


भगिनी निवेदितांनी १९०४ साली कुमारी मॅकलिओड यांना एक पत्र लिहिले होते. त्या पत्रात त्या म्हणतात,

‘मी वयाच्या ४२, ४४ या सुमारास मरणार आहे असं चिरोल यांनी वर्तवलेलं भविष्य तुला आठवतं का? आता मी ३६ वर्षांची आहे. हे दशक मी पूर्ण करीन असा मला विश्वास वाटतो. मला वाटतं, मी साधारण १९१२ साली देह ठेवीन. मध्यंतरीच्या काळात भारताच्या राजकीय व सामाजिक दर्जात म्हणण्यासारखा बदल होईल का? स्वामीजींच्या दृष्टीने उपयुक्त असं माझ्या हातून काही घडल्याचं मला स्वतःला बघायला मिळेल का? आयुष्यभर एकच ओझं वागवायला मला आवडेल ते म्हणजे, स्वामींचे कार्य. त्याच्यापुढे मुक्तीसुद्धा मला तुच्छ वाटते.’

इसवी सन १९११ ची गोष्ट. निवेदिता श्री. दिनेश सेन यांना भेटायला गेल्या होत्या. त्यावेळी दिनेश बाबूंजवळ ‘प्रज्ञापारमिता’ची एक दगडी मूर्ती होती. ती निवेदितांना खूप आवडली. त्यांनी ती दिनेश बाबूंकडे मागितली.

त्यावर ते म्हणाले की, ‘ही मूर्ती मी तुम्हाला देऊ इच्छित नाही. कारण ती ज्याच्याजवळ जाते त्याला काहीतरी अशुभ भोगावं लागतं.’

निवेदिता त्यावर म्हणाल्या, ‘असल्या गोष्टी तुमच्यासारख्या इतिहासकाराच्या तोंडी शोभत नाहीत.’ असे म्हणून त्यांनी ती मूर्ती उचलुन नेली. घरी तिची प्राणप्रतिष्ठा करून त्या रोज तिची पूजाअर्चा करीत. निवेदिता यांच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनी ख्रिस्तीन त्यांच्या खोलीत गेल्या तेव्हा त्यांनी ती मूर्ती दिनेश बाबूंकडे परत केली.

त्याच सुमारास निवेदीता प्रसिद्ध नाटककार श्री. गिरीशचन्द्र घोष यांच्या भेटीलाही गेल्या होत्या. गिरीशचन्द्र आणि निवेदिता दोघेही श्री रामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद यांच्याविषयी बराच वेळ बोलत बसले. त्यावेळी गिरीशबाबू आजारी होते आणि आपलं ‘तपोवन’ हे शेवटलं नाटक लिहून पूर्ण करण्याच्या तयारीत होते.

निवेदिता त्यांना म्हणाल्या, ‘नाटक लवकर लिहून पूर्ण करा म्हणजे दार्जिलिंगहून आल्यानंतर ते मला वाचायला मिळेल.’ परंतु निवेदिता दार्जिलिंगहून परतल्याच नाहीत. त्यानंतर गिरीशबाबूंनी हे नाटक निवेदिता यांना अर्पण केलं.

हे देखील वाचा

१५ वर्षाच्या मुलीने लिहिलेली प्रौढ कादंबरी ‘द आउटसायडर्स’ इंटरनॅशनल बेस्ट सेलर बनलीय

रस्त्यावरील एक वेश्येने ब्रिटनच्या राजपरिवारालाच ब्लॅकमेल केलं होतं…!

स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी महान शास्त्रज्ञ ‘निकोला टेस्ला’सुद्धा प्रभावित झाला होता

त्या अर्पणपत्रिकेत ते म्हणतात, ‘हे अश्राप मुली, माझी प्रत्येक नाट्यकृती पाहून तुला खूप आनंद होई. पण आता हे नवीन नाटक जेव्हा रंगभूमीवर येईल तेव्हा तू कुठे असशील? दार्जिलिंगला जाण्यापूर्वी आपण भेटलो होतो. त्यावेळी मोठ्या ममतेनं तू मला म्हणाली होतीस, मी परत येईल तेव्हा तुमची प्रकृती छान झालेली पाहिल. मी अजून जिवंत आहे. मग तू मला पाहायला का येत नाहीस? मृत्युशय्येवर असताना तू माझी आठवण काढली होती असं मला समजलं. आताही तू ईश्वरी कार्यात मग्न असशील. अजून माझी तुला आठवण असेल तर भरल्या डोळ्यांनी तुला अर्पण करीत असलेल्या माझ्या या भेटीचा स्वीकार करशील ना.’ – गिरीशचंद्र घोष

कोलकाता येथे निवेदिता मुलींसाठी शाळा चालवीत असत. त्यांच्या त्या शाळेला दुर्गापूजेची सुट्टी होताच निवेदितांनी दार्जिलिंगला जाण्याची तयारी केली. त्यांच्यासोबत डॉक्टर जगदीश चंद्र बोस व त्यांच्या पत्नी सौ. बोस हे दोघेही होते. दार्जिलिंगला जाण्यापूर्वी निवेदिता स्वामी सारदानंद, गोलाप मा, योगिन मा यांना भेटून आल्या.

योगिन मा यांना खाली वाकून नमस्कार करून त्या म्हणाल्या, ‘मला वाटतं मी आता कधीच परत येणार नाही. अस्वस्थ होऊन योगिन मा म्हणाल्या, असं का बोलतेस? निवेदिता त्यावर म्हणाल्या, हे मला माहीत नाही. परंतु हे सर्व शेवटचं घडतं आहे, असं मात्र मला जाणवतंय.

५ सप्टेंबर १९११ रोजी निवेदितांनी कुमारी मॅकलिऑड यांना एक पत्र लिहिले. त्या पत्रात त्या म्हणतात,

‘गेल्या १३ वर्षांतल्या अनेक गोड स्मृती आज मनात गर्दी करीत आहेत. आयुष्याच्या तिन्हीसांजेच्या वेळी गतकालातील जीवनाच्या मधूर तरंगांनी मन कसं भारावून गेलं आहे. जीवनमृत्यूच्या पलीकडील अवस्था असे स्वामीजी याला म्हणत असत. या दोघांपैकी एक शब्द उच्चारून त्यांचं कधीच समाधान होत नसे. गेल्या काही दिवसात अनेक प्रेमळ सुहृदांना मृत्यूनं ओढून नेलं आहे. अशा या सद्यस्थितीची तीव्र जाणीव आपणही ठेवणे आवश्यक आहे.’

या काळात निवेदिता एका विलक्षण शांतीचा अनुभव घेत होत्या. याच काळात त्यांनी ‘बिलवेड’, ‘डेट’, आणि ‘प्ले’ असे तीन लेख लिहिले. त्या लेखातही त्यांची मनस्थिती प्रतिबिंबित झाली आहे.

जीवन म्हणजे ईश्वराची क्रीडा आहे. त्याकडे खेळकर दृष्टीने पाहता येते. हे सांगताना त्या लिहितात, ‘जीवनात सर्व ठिकाणी क्रीडांगणावरील आदर्श आढळतात. ‘लाभ नव्हे सन्मान’ हे; प्रत्येक उदात्त जीवनाचे मार्गदर्शक तत्त्व बनते आणि हे तत्वच उत्तरोत्तर साकार होऊन आत्मतेजानं तळपू लागते. हा सन्मान म्हणजे ऐहीं कीर्ती नव्हे किंवा समाजाने दाखवलेली सहानुभूती अगर थोरवीची जाणीव नव्हे; तर एकांतातील प्रार्थनेच्या काळात अंतरात्म्याला जाणवणारी उन्नती. मंदिरात तेवत असलेली प्रकाशज्योत जीवाशिवाला एकदमच प्रकाशमान करते. मात्र हे गुपित एका देवाला ठाऊक नि एका भक्ताला.’

दार्जिलिंग येथे ‘रे व्हीला’ या ठिकाणी निवेदिता यांचा मुक्काम होता. एक दिवस ‘संदक फु’ या शिखरावर जाण्याचा सगळ्यांनी बेत केला. दोन-तीन दिवसांचा घोड्यावरचा हा प्रवास होता.

परंतु प्रवासाला निघण्याच्या दिवशीच निवेदितांना रक्ताची आव सुरू झाली. त्यामुळे त्या गेल्या नाहीत. कोलकात्याचे प्रसिद्ध डॉक्टर नीलरतन सरकार हे त्यावेळी दार्जिलिंगमध्ये होते. त्यांना ताबडतोब बोलावणे पाठवण्यात आले.

त्यांनी शक्य ते सर्व उपचार केले. परंतु निवेदिता यांच्या प्रकृतीत सुधारणा मात्र होत नव्हती. भेटायला येणाऱ्या मंडळींशी त्या रोज हसतमुखाने बोलत. सर्वांना धीर देत आणि निरनिराळ्या विषयांवर बोलत असत. परंतु आपला अंतकाळ जवळ आल्याची त्यांना स्पष्ट कल्पना आली होती.

या अवस्थेचं वर्णन करताना त्या लिहितात,

‘काल रात्री हा अनुभव आला. सर्व अचेतन जगताशी मिसळून गेलेली ती अवस्था, या जगाला दूर सारीत पुढे पुढे चालली होती. चिंतनाची एक पायरी म्हणा किंवा मन म्हणा. हिलाच कदाचित मृत्यू असं म्हणत असतील.

ही अवस्था अचेतन असल्यानं तिला व्यापकता हा गुण लावता येणार नाही, पण शरीर भावाच्या पलीकडे ती खोल खोल कुठेतरी जात राहते. असंच जात राहिलं म्हणजे मेलेले सर्व स्वकीय जणू सदेह आपल्याजवळ आल्यासारखे वाटतात. असं समाधानासाठी पाहिजे तर म्हणावं. पण वास्तविक तेथे मुक्त आणि आनंदयुक्त अशा अथांग परिसराखेरीज काहीच नसतं.

अमर्याद विश्व आणि मर्यादित जगाच्या जोडबिंदूशी आपण आलो आहोत, असंच यावेळी मला वाटू लागलं. दोहोंतली स्वर्गीय अवस्था प्राप्त करून घेण्याच्या पदसिद्ध योग्यतेनं !! जो जो विचार करावा तो तो असं वाटतं की, मृत्यू म्हणजे मन अंतर्मुख होऊन चिंतनाला सुरुवात करणे.

दगडाने आपल्या अस्तित्वाच्या तळाशी जाणे. मृत्यूपूर्वी या अवस्थेतच सुरुवात होते. तासंतास एका शांत वातावरणात मन रमतं आणि स्वतःच्या जीवनाचा वैशिष्ट्यपूर्ण विचार करू लागतं. हा विचार म्हणजे इतर सर्व आचार-विचार शमल्याने शिल्लक उरणारा एकच एक विचार.

या कालावधीत आत्मा शरीर सोडू लागतो. त्याच्या नव्या जीवनाची सुरुवातही झालेली असते. याच पद्धतीने सर्व जीवन म्हणजे, इतर कोणत्याही विकारांचा ज्यावर तरंगही नाही, असं एकच एक प्रेमाचं आणि आनंदाचं साम्राज्य. असा निष्कर्ष काढता येईल का? या आनंदसाम्राज्याशी आपण शेवटी एकरूप होतो आणि अनंतातील या महान कल्पनेशी आल्यावर आपल्यासुद्धा सर्वच विचारांचा लोप होतो. मग काय शिल्लक राहतं? या दुःखमय जगाला आवश्यक असलेली एक चिदानंदाची कल्पना!’

दार्जिलिंगला येण्यापूर्वी काही दिवस आधी विश्वप्रेम आणि विश्वशांती यांच्याविषयी बुद्धाची एक प्रार्थना त्यांच्या वाचनात आली होती. त्यांना ती खूप आवडली होती. ती प्रार्थना त्यांनी विनंती केल्यावरून त्यांना वाचून दाखवण्यात आली.

ती प्रार्थना अशी – ‘ज्यांनी सर्व शत्रू जिंकले आहेत, मार्गातील सर्व अडथळे दूर केले आहेत आणि दुःखावर मात करून निरामय आनंदाची प्राप्ती करून घेतली आहे; त्यांना आपला जीवनमार्ग स्वतंत्रपणे आक्रमिता यावा. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर चारही दिशांना वावरणाऱ्या अशा प्रकारच्या जीवांना आपापल्या वाटेने स्वतंत्रपणे जाता यावे.’

निवेदिता हळूहळू चिंतनात शांत झाल्या. तोंडाने रुद्र स्तुती सुरू होती. १३ ऑक्टोबरची सकाळ उजाडली. त्यावेळी त्या म्हणाल्या,

‘ही क्षीण झालेली नाव आता बुडण्याच्या पंथाला लागली आहे. तरीही मी सूर्यप्रकाश पाहीन.’ हे शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडतात न पडतात तोच खिडकीतून सूर्याची कोवळी किरणे आत आली आणि त्याच क्षणी त्यांच्या आत्म्याने कुडीची शीव ओलांडली.

निवेदितांनी या जगाचा निरोप घेतल्याची वार्ता सर्व दार्जिलिंगभर लगेच पसरली. कोलकात्यातील अनेक नामवंत मंडळी त्यावेळी दार्जिलिंगला होती. ते सर्वजण निवेदिता यांच्या अंत्यदर्शनासाठी आले. दुपारी त्यांची अंत्ययात्रा निघाली. शेकडो लोक त्या अंत्ययात्रेत सामील झाले होते. दार्जिलिंगने एवढी मोठी अंत्ययात्रा त्यापूर्वी कधीच पाहिली नव्हती.

बाजारातून अंत्ययात्रा जात असताना सगळ्यांनी आपल्या टोप्या काढून निवेदिता यांना अभिवादन केले. दुपारी सव्वाचार वाजता हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला. तेथील रामकृष्ण आश्रमाचे प्रमुख गणेश महाराज यांनी हिंदू पद्धतीनुसार सर्व धार्मिक विधी केले.

ज्या ठिकाणी निवेदिता यांचा दहनविधी झाला त्या ठिकाणी एक समाधी बांधण्यात आली आहे. हिमालयाच्या मांडीवर त्या प्रशांत वातावरणात आजही ही समाधी आपल्याला पाहायला मिळते. त्या समाधीवर कोरलेले आहे – ‘जिने आपले सर्वस्व भारताला वाहिले त्या निवेदितांनी इथे देह ठेवला.’

दार्जिलिंगला गेलो असताना मीही भगिनी निवेदिता यांच्या या समाधीचे दर्शन घेतले. खरं तर त्यासाठीच दार्जिलिंगला गेलो होतो. अर्थात तिचे महत्व अगदी बोटांवर मोजता येणाऱ्या लोकांसाठी. बाकी कोणाला ते नावही माहिती नसते. मी मात्र आवर्जून गेलो.

स्वत:चा देश, माणसे, नाती, भाव सगळे सगळे सोडून पूर्ण अंतर्बाह्य भारतमय होऊन, भारतमातेच्याच चरणी देह समर्पित करणाऱ्या भगिनी निवेदितांना वंदन करणे क्रमप्राप्तच होते.

शहराच्या मुख्य रस्त्याच्या खूप खाली उतरत उतरत आपण दार्जिलिंगच्या स्मशानभूमीत पोहोचतो. येथेच निवेदितांची समाधी आहे. आताआतापर्यंत ती पडून होती. अलीकडील १०-२० वर्षात तिची देखभाल होऊ लागली आहे. रामकृष्ण मिशनने ती जबाबदारी घेतलेली आहे. या ठिकाणी त्यांची छोटीशी मूर्ती आणि त्यावर एक छत्री आहे. चारही बाजूंनी कुंपण घातले आहे. आजूबाजूला झाडी अन अंत्यसंस्कारासाठी काही चौथरे. शिवाय एक शिवमंदिर.

निवेदितांच्या मूर्तीपुढे जरा वेळ बसलो. एका अनिर्वचनीय भावाने मन भरून गेले. याच ठिकाणी निवेदिता नावाचा तो देह होत्याचा नव्हता झाला होता. हिमालयाचा शीतल वारा त्यांच्याशी त्या क्षणी काय बोलला असेल? काय हितगुज झाले असेल त्या दोघात?

ADVERTISEMENT

कैलासराणाच्या या घरी तो कैलासपती आपल्या या लाडक्या लेकीशी काय बोलला असेल? ज्या कार्यासाठी देह धारण केला होता ते कार्य आटोपून घरी परतलेल्या आपल्या लेकीला त्या चंद्रमौळीने कसे जवळ घेतले असेल? त्या अलौकिक लेकीलाही काय काय वाटले असेल? तिच्याही भावनांची आंदोलने याच हिमसमीराने कान देऊन ऐकली असतील !! असेच काहीबाही.

थोडा वेळ त्या भावात घालवून परत माघारी वळलो. उतरताना काही वाटत नाही, पण तेथून पुन्हा वर येताना मात्र चांगलाच दम निघतो. शेवटी हिमालयच तो. दोन ठिकाणी टेकावे लागले होते.

दुपारी रामकृष्ण मिशनच्या आश्रमात गेलो. तिथे निवेदिता राहत होत्या. वास्तविक ते डॉ. जगदीशचंद्र बोस यांच्या नातेवाईकांचे निवासस्थान. निवेदिता डॉ. बोस यांच्या पाहुण्या म्हणूनच तेथे मुक्कामाला होत्या. बोस पतीपत्नीही त्यांच्यासोबत होते. तेथेच त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला.

बोस दांपत्य त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांच्याजवळ होते. ते पडीक घर आता मिशनने घेतले असून ते जसे होते तसे ठेवण्याचे आणि त्यात नवीन भर घालण्याचे काम सुरु आहे.

निवेदिता राहत असत ती खोली नीट करण्यात आली आहे. तेथे निवेदितांची तैलचित्रातील मोठी तसबीर आहे. शिवाय मां सारदादेवी आणि निवेदिता यांच्या भेटीचे छायाचित्र फ्रेम करून भिंतीवर लावले आहे.

निवेदितांच्या वापरातील वस्तू आहेत. तेथे बसता येते. खालील मजल्यावर श्रीरामकृष्ण प्रार्थना कक्ष आहे. कोणीही नसल्याने आणि कसलाही अडथळा वा गतिरोध नसल्याने दोन्ही ठिकाणी निवांत बसता आले. या महान आत्म्यांसोबत मौन सुखसंवाद करता आला. खिडकीतून होणारे हिमालयाचे दर्शन, हिरव्यागार दाट वनराईचे दर्शन, क्षणात सूर्यप्रकाश तर क्षणात अंधारगुडूप अशा विलक्षण खेळाची साथ आणि सोबतीला हिमशिखरांवरून येणारा शीतल वारा… वेळ कसा गेला कळलेच नाही.


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :
 फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweetShare
Previous Post

या अधिकाऱ्याने राजीव गांधींच्या तोंडातून बिस्कीट खाता खाता काढून घेतले होते

Next Post

या बटूग्रहावर पृथ्वीपेक्षाही जास्ती पाण्याचा साठा आहे..

श्रीपाद कोठे

श्रीपाद कोठे

Related Posts

वैचारिक

१५ वर्षाच्या मुलीने लिहिलेली प्रौढ कादंबरी ‘द आउटसायडर्स’ इंटरनॅशनल बेस्ट सेलर बनलीय

12 November 2021
इतिहास

रस्त्यावरील एक वेश्येने ब्रिटनच्या राजपरिवारालाच ब्लॅकमेल केलं होतं…!

14 January 2022
विश्लेषण

स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी महान शास्त्रज्ञ ‘निकोला टेस्ला’सुद्धा प्रभावित झाला होता

21 September 2021
इतिहास

मॅकीयावेलीचे विचार ऐकून हिटलर, मुसोलिनीचे पण फ्युज उडाले असते..!

20 June 2021
वैचारिक

थोर तत्वज्ञ प्लेटोला राजकारणात यायचं होतं पण…

8 June 2021
वैचारिक

ज्याच्या विचारावर चीन आज उभा आहे तो कन्फ्युशिअस कोण होता..?

2 January 2022
Next Post

या बटूग्रहावर पृथ्वीपेक्षाही जास्ती पाण्याचा साठा आहे..

नेहरूंनी अहमदनगरच्या कारागृहात असताना लिहिलेल्या पुस्तकावरची ही मालिका प्रचंड गाजली होती

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!