आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
संकटं आणि अपयश यामुळे खचून जाणाऱ्या माणसांची या जगात वानवा नाही. मात्र, याच संकटं आणि अपयशाने खचून न जाता त्याचं संधीत रूपांतर करून यशाची नवी शिखरं पादाक्रांत करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. कला, क्रीडा, राजकारणापासून ते उद्योगक्षेत्रापर्यंत अपयशाला पुन्हा पुन्हा पचवून यश प्राप्त करणारे असे लोक स्वतः यशस्वी ठरतातच; पण इतरांसाठी प्रेरणा ठरतात.
कौटुंबिक पातळीवर कोसळलेला दुःखाचा डोंगर आणि व्यावसायिक पातळीवर लागोपाठ आलेली डोंगराएवढी संकटं पचवूनही नव्या नव्या कल्पना वापरून जागतिक पातळीवर नावाजलेला उद्योग उभा करण्याबरोबरच त्यांच्या काळातल्या मुलांना क्रियाशील आणि सृजनशील बनवणारे ‘लेगो’ या खेळण्यांच्या सुप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक ‘ओले किर्क क्रिस्टियनसेन’ हे अशा नावांपैकी एक आघाडीचं नाव!
वास्तविक, ओले यांचं लहानपण काही फारसं सुखाचं नव्हतं. ओले हे डेन्मार्कमधल्या फिल्सकोव्ह इथे राहणाऱ्या गरीब कुटुंबात सन १८९१ मध्ये जन्माला आलेलं दहावं अपत्य. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना फारसं शिकता आलं नाही. अक्षरओळख होईपर्यंत औपचारिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी थोरल्या भावाकडून सुतारकामाची कला शिकून घेतली आणि जर्मनीमध्ये जाऊन त्यातच नोकरी सुरू केली.
पुढे सन १९१६ मध्ये पुन्हा डेन्मार्कला येऊन ओले यांनी सुतारकामाचं एक दुकान थाटलं. ग्राहकांना हवं तसं फर्निचर बनवून देण्याबरोबरच घरबांधणीच्या वेळी आवश्यक सुतारकाम करून देण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि अल्पावधीतच त्यांचा त्यात चांगल्यापैकी जम बसला. लग्न झालं. चार मुलं झाली. एकूण सुखाचा संसार चांगला चालला असतानाच सन १९२४ मध्ये त्यांच्यावर पहिला आघात झाला. त्यांच्या कारखान्यातल्या लाकडाच्या भुश्याने पेट घेतला. कारखाना आणि घराला आग लागली आणि मुलगाही भाजला.
तरीही डगमगून न जाता ओले यांनी पहिल्यापेक्षाही मोठा सुतारकामाचा कारखाना उभारला. मात्र, त्यानंतर काही वर्षातच सन १९३२ मध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये आलेल्या महामंदीने थैमान घातलं. अर्थातच, त्याचा मोठा फटका ओले यांच्या कारखान्यालाही बसला. नवीन घरांची बांधणी थांबली. पर्यायाने नवीन फर्निचरची मागणीही थांबली. त्यांना आपल्या कारखान्यातल्या कामगारांना कामावरून कमी करावं लागलं. मात्र, कारखाना त्यांनी नेटाने सुरू ठेवला.
फर्निचरचा व्यवसाय ठप्प झाल्याने ओले यांनी नव्या उत्पादनांकडे आपला मोर्चा वळवला. त्यांनी शिड्या, कपड्यांना इस्त्री करण्याची टेबलं अशा गृहोपयोगी वस्तू बनवणारी एक कंपनी सुरू केली.
त्यांनी त्यामध्ये लाकडी खेळणी बनवण्यासही सुरूवात केली. त्यांच्या इतर उत्पादनांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, एवढ्या महामंदीच्या काळातही लाकडी खेळण्यांना चांगली मागणी येऊ लागली. त्यांच्या खेळण्यांची सुबकता आणि लाकडाचा चांगला दर्जा यांची तारीफ होऊ लागली.
सन १९३२ मध्ये मात्र, ओले यांना आणखी मोठाच धक्का बसला. त्यांच्या पत्नीचं निधन झालं. एकीकडे व्यवसायाची रुळावरून घसरलेली गाडी सावरण्याबरोबरच ४ मुलांचा सांभाळ करण्याची, त्यांचं संगोपन करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर येऊन पडली. मोठा मुलगा १२ वर्षाचा होता. त्याला त्यांनी आपल्या व्यवसायाच्या कामात मदतीला घेतलं. त्याचप्रमाणे व्यवसाय वाढत असल्याने आणखी काही कामगारही कामावर घेतले.
या कंपनीचं नाव काय असावं, हे सुचवण्यासाठी ओले यांनी स्पर्धेचं आयोजन केलं. मात्र, कोणत्याच स्पर्धकाने सुचवलेलं नाव त्यांना पटलं नाही. अखेर त्यांनी स्वतःच कंपनीचं नामकरण केलं ‘लेगो!’ हे नाव डॅनिश शब्द ‘लेग’ आणि ‘गॉट’ वरून बनलं आहे. त्याचा अर्थ ‘चांगलं खेळणं! ‘लेगो’ या ब्रँडखाली सुरुवातीला जी खेळणी बनवण्यात आली ती यो-यो, ट्रक्स आणि चाकं असलेलं बदक अशी साध्या स्वरूपाचीच होती. तरीही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत होता.
याच काळात ब्रिटनमध्ये हिलरी फिशर पेज यांनी प्लॅस्टिकच्या ठोकळ्यांची जोडणी करण्याची खेळणी विकसित केली. त्याचं ब्रिटनमध्ये पेटंट घेतलं. त्यांची ‘ब्रि-प्लॅक्स’ या ब्रँडखाली विक्री सुरू केली. त्याच्या या नव्या स्वरूपाच्या आणि हाताळायला सोप्या खेळण्यांना मागणी वाढली आणि त्याने ‘लेगो’समोर आव्हान उभं केलं.
इकडे ओले यांच्या कारखान्याला सन १९४२ मध्ये पुन्हा एकदा मोठी आग लागली. या आगीत त्यांचं अतोनात नुकसान झालं. हे नुकसान स्थावर आणि जंगम मालमत्तेचं, अर्थात आर्थिक स्वरूपाचं तर होतंच. शिवाय, त्यांनी नवी खेळणी विकसित करण्यासाठी तयार केलेले आराखडे, ‘लेगो’च्या आगामी कामगिरीसाठीची ‘ब्लू प्रिंट’ हे सगळं या आगीत जाळून खाक झालं.
या वेळी मात्र ओले निराशेच्या गर्तेत जाण्याच्या मार्गावर होते. मात्र, त्यांनी काही काळातच स्वतःला सावरलं. कंपनी मोठी करण्याच्या निर्धाराने त्यांनी कंपनीची पुन्हा उभारणी केली. दुसऱ्या महायुद्धानंतर प्लास्टीक सगळीकडे उपलब्ध होऊ लागलं होत.
ओले यांनी प्लास्टिकची खेळणी बनवण्यासाठी स्वतःची ‘इंजेक्शन मोल्डींग’ यंत्रणा विकत घेतली. त्यासाठी त्या काळात मोठी गुंतवणूक करावी लागली. ‘लेगो’नेही प्लास्टिकच्या एकमेकात अडकणाऱ्या (इंटरलॉकिंग) ठोकळ्यांची खेळणी बनवायला सुरुवात केली. सन १९४९ पर्यंत ‘लेगो’ने प्लास्टिक आणि लाकडाची २०० प्रकारची खेळणी बाजारपेठेत आणली.
केवळ ठोकळ्यांचे खेळ बनवून लेगो थांबली नाही. सन १९४९ मध्ये ‘ऑटोमॅटिक बाइंडिंग ब्रिक्स’ हा खेळ विकसित केला. हा खेळ दुसऱ्या महायुद्धात विजय मिळवणाऱ्या दोस्त राष्ट्रांच्या सैन्याला समर्पित करण्यात आला. ‘लेगो’च्या ठोकळ्याच्या खेळाला मोठी मागणी असली तरी त्याला खेळण्यांच्या बाजारपेठेतली आघाडी मिळाली नव्हती. विशेषतः तकलादूपणा हा ‘लेगो’च्या आघाडीचं स्थान मिळवण्यातला मोठा अडसर ठरत होता. त्यामुळे त्यांनी काही काळ ब्रिटिश उत्पादकांकडून खेळांचे उत्पादन करून घेण्याचा निर्णय घेतला आणि आपलं लक्ष्य नवीन खेळ विकसित करण्यावर केंद्रित केलं.
सन १९५८ या वर्षी कंपनीचे संस्थापक ओले मरण पावले. त्यांचा मुलगा गॉडफ्रेड याने पदभार स्वीकारला. त्यांनी ‘लेगो’च्या अधिकाऱ्यांना खेळात अधिकाधिक सुधारणा करण्यास प्रोत्साहन दिलं. मुलं हे खेळ कसे खेळतात याचं निरीक्षण करा. कंपनीचे भविष्य हे केवळ ठोकळे बनवण्यात नाही, तर हे ठोकळे काय काय निर्माण करू शकतात, त्यावर अवलंबून आहे, हे त्याने अधिकाऱ्यांच्या मनावर बिंबवलं.
मुलांच्या कल्पकतेला वाव देऊन त्या ठोकळ्यातून इमारती, रस्ते, शहरे, माणसं, वाहनं, झाडं-झुडपं तयार झाली पाहिजेत, यावर भर देण्यात आला. ‘लेगो’च्या खेळण्यांसोबत तुम्ही पुढे पुढे जाऊ शकता, सतत काही तरी बनवत रहा. घडवत रहा. ‘लेगो’ तुम्हाला कधीही कंटाळा येऊ देणार नाही, अशा संकल्पनेवर आधारलेली प्रचार मोहिम कंपनीने राबवली.
सन १९६० मध्ये ‘लेगो’च्या लाकडी खेळण्यांच्या गोदामाला आग लागली. त्यानंतर कंपनीने लाकडी खेळण्यांचं उत्पादन बंद करून पूर्णतः प्लास्टिक खेळण्यांवर लक्ष्य केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण युरोप पादाक्रांत करून त्यानंतर निर्यातीची व्याप्ती अमेरिका आणि कॅनडापर्यंत पोहोचवण्यासाठी कंपनीने सॅमसोनाईट कॉर्पोरेशनबरोबर सहकार्य करार केला.
सन १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात ‘लेगो’च्या ‘इंटरलॉकिंग ब्रिक्स’चं पेटंट कालबाह्य झाल्यानंतर ठोकळ्यांच्या पलीकडे जात मुलांसाठी नवीन आकर्षक खेळ तयार करणं आवश्यक होतं. त्या दृष्टीने लेगो व्हील्स, लेगो सिटीज, लेगो स्टार वॉर्स या पासून ते लेगो हॅरी पॉटर, बायोनिकल लेगोपर्यंत अनेक नवनवीन संकल्पनांवरचे खेळ कंपनीने बाजारपेठेत आणले आणि जगातल्या खेळण्यांच्या बाजारपेठेत ८० टक्के हिस्सा मिळवून आपलं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं.
एवढं यश अनुभवल्यानंतरही सन २००३ च्या सुमारास ‘लेगो’ दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली. कंपनीची विक्री आदल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल ३० टक्क्यांनी कमी झाली. तज्ज्ञांच्या मते ‘लेगो’ त्याच्या मूळ व्यवसायाकडे पुरेसं लक्ष न देता बाहुल्या, मुलांचे कपडे आणि इतर अनेक नव्या उत्पादनांच्या भानगडीत पडली आणि आपल्या पायावर धोंडा मारून घेतला. किरकोळ विक्रेत्यांनी सर्वाधिक विकल्या जाणार्या खेळांचा पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी केल्या. ‘लेगो’ कंपनी लवकरच विक्रीला निघणार, अशा बातम्या पसरायलाही सुरुवात झाली.
या संकटातून बाहेर पडण्यासाठी अखेरीस ‘लेगो’ने आपल्या अनेक न चालणाऱ्या उत्पादनांना कात्री लावली. अनेक थीम पार्क बंद केले. लेगो सिटी, डुप्लोस, बायोनिकल, स्टार वॉर्स आणि हॅरी पॉटर या मुलांना आवडणाऱ्या खेळांच्या उत्पादनासाठी अधिक गुंतवणूक केली आणि खेळांच्या बाजारपेठेवरचा आपला प्रभाव पुन्हा प्रस्थापित केला.
दरम्यानच्या काळात माहिती तंत्रज्ञान आणि संगणकाच्या युगात खेळण्यांनाही ‘व्हर्च्युअल’ स्वरूप आलं. ‘लेगो’नेही व्हिडीओ गेम्समध्ये हात मारण्याचा प्रयत्न केला. आर्थिक विश्लेषक आणि खेळणी तज्ज्ञांच्या आग्रहानुसार ‘लेगो’ने डिजिटल खेळांमध्ये प्रवेश केला. मात्र, यात त्यांना फार यश मिळाले नाही. तरीही मूळच्या ‘ब्रिक्स’वर आधारीत खेळांमध्ये आघाडी कायम ठेऊन कंपनी ओले यांचा ‘बाजीगर’ वारसा कायम ठेऊन आहे आणि एपिक गेम्ससारख्या कंपनीच्या साथीने व्यवसायवृद्धीचे प्रयत्न करत आहे.
एका सुतारकामाच्या छोट्याशा दुकानापासून जगाला गवसणी घालणाऱ्या ‘लेगो’चा हा प्रवास निश्चितपणे प्रेरणा देणारा आहे. अडथळ्यांना न जुमानता त्यावर मात करून पुढे जाण्याची प्रेरणा, एकाच चाकोरीत अडकून न पडता नवनवे प्रयोग करत राहण्याची प्रेरणा, केवळ अर्थप्राप्तीकडे लक्ष न देता समाजाला उपयुक्त नवीन, अभिनव काहीतरी देण्याची प्रेरणा आणि कितीदा ही अपयश आलं तरी त्यातून नव्यानं उभं राहण्याची प्रेरणा!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.