आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
मानवाची उत्क्रांती होऊन त्याच्या मेंदूचा बराच विकास झाल्याचं मागच्या अनेक वर्षांत समोर आलं आहे. भारतातील शंकुतला देवी हे त्याचं मुख्य उदाहरण. त्यांची ह्युमन कॅल्क्युलेटर म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने दखल घेतली होती. तथागत अवतार तुळशी या भारतीय विद्यार्थ्यानेही वयाच्या अकराव्या वर्षी विज्ञान शाखेत पदवी मिळवली. पुढे त्याने आय.आय.टी. मुंबईमध्ये शिक्षकाचेही काम केले.
बाल-वयातील बहुतेक मुले व्हिडिओ गेम्स, मोबाईल किंवा अन्य प्रलोभनांनी वेडावलेले असतात, पण, लॉरेन्ट सिमन्सकडे आधीपासूनच आधुनिक युगातील महान वैज्ञानिक होण्यासाठीची क्षमता आहे.
त्याचप्रमाणे अकरा वर्षीय लॉरेन्ट सिमन्स जगातील दुसरा सर्वांत तरुण पदवीधर बनला आहे. बेल्जीयममधील लॉरेन्ट सिमन्सने अलीकडेच अँटवर्प विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदवी पूर्ण केली. तरी जगातील सर्वात तरुण पदवीधर मायकेल केर्नी आहे. त्याने सन १९९४ मध्ये दक्षिण अलाबामा विद्यापीठातून १० वर्षांच्या वयात मानव-वंशशास्त्रात (अँथ्रोपॉलॉजी) पदवी पूर्ण केली होती.
डच दैनिक डी टेलिग्राफशी बोलताना, जगातील दुसरा सर्वात तरुण पदवीधर म्हणाला, “मी सर्वात लहान आहे की नाही याची मला खरोखर काळजी नाही. हे सर्व माझ्यासाठी ज्ञान मिळवणे आहे.”
पुढे जाऊन ‘अमरत्वा’चा पाठलाग करणाऱ्या या ११ वर्षीय मुलाने म्हटले, “शरीराच्या अवयवांना यांत्रिक भागांनी रिप्लेस करण्याचे कोडे सोडवणे ही माझ्या ध्येयापर्यंत नेणारी पहिली पायरी आहे. मला शरीराचे जास्तीत जास्त अवयव यांत्रिक भागांनी रिप्लेस करायचे आहेत. माझे हे ध्येय आहे, आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मी तयार केला आहे. क्वांटम फिजिक्स हा त्या कोड्याचा पहिला भाग आहे.”
आपण फक्त कल्पनाच करू शकतो अशा वेगाने अभ्यास करून त्याने माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शेल्डन कूपर किंवा यंग शेल्डनसारख्या प्रसिद्ध काल्पनिक लहान विद्वानांसारखेच लॉरेंटने शिक्षण घेतले आहे. वयाच्या आठव्या वर्षी अवघ्या दीड वर्षात त्याने उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. बॅचलर पदवी पूर्ण करण्यासाठी लौरेन्टला फक्त एक वर्ष लागले, सहसा किमान तीन वर्षांचा हा कोर्स असतो.
भविष्यात, त्याला जगातील सर्वोत्तम प्राध्यापकांसोबत काम करायचे आहे, त्यांच्या मेंदूत कसं काम चालतं हे पाहायचे आहे आणि ते कसे विचार करतात हेही शोधायचे आहे. शास्त्रीय यांत्रिकी आणि क्वांटम भौतिकशास्त्राचे काही कोर्सेसही लौरेन्टने सुरू केले होते. त्याला या विषयांबद्दल लवकरात लवकर सर्व काही जाणून घ्यायचे होते.
लॉरेंटने २६ डिसेंबर २०१९ रोजी त्याच्या वाढदिवसापूर्वी पदवीधर व्हावे अशी त्याच्या पालकंची इच्छा होती जेणेकरून तो १० वर्षाखालील पहिला विद्यापीठ पदवीधर होऊ शकेल. परंतु लॉरेन्टला त्याआधी बऱ्याच परीक्षा पास करणे आवश्यक असल्याचे आयंडहोव्हन विद्यापीठाने त्यांना सांगितले होते.
त्याच्या पालकांनी २०२० च्या पदवीच्या तारखेची ऑफर नाकारली आणि लगेचच त्याला कोर्समधून काढून टाकले. लॉरेन्टला फक्त १० महिन्यांत तीन वर्षांची इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी पूर्ण करायची होती जेणेकरून तो त्याच्या वाढदिवसाची अंतिम मुदत पूर्ण करू शकेल. ‘विद्यापीठाने मुलाच्या मीडिया कव्हरेजवर वारंवार टीका केल्याने त्यांच्यावर आक्षेप घेतल्याचे’ लॉरेन्टचे वडील अलेक्झांडर सिमन्स यांनी डच माध्यमांना सांगितले.
लॉरेन्ट सिमन्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटने गेल्या महिन्यात विद्यापीठाने डिसेंबरच्या संभाव्य पदवीच्या तारखांबद्दल त्यांना पाठवलेल्या ईमेलचा स्क्रीनशॉट देखील पोस्ट केला होता, या पोस्टचे कॅप्शन होते. “लायर लायर, पँट्स ऑन फायर”
“लॉरेन्टला वयाची १० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य होणार नाही, तसेच ‘इन्साईट्स, सर्जनशीलता आणि क्रिटिकल अनालिसिस’ विकसित करणे देखील शक्य होणार नाही. जर त्याने कोर्सला घाई केली तर त्याच्या शैक्षणिक विकासास फटका बसेल.” असे आयंडहोवेन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीने आपल्या याविषयीच्या निवेदनात म्हटले आहे.
लौरेन्टला आता अँटवर्प विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवायची आहे. त्याचबरोबर तो त्याच्या पीएचडीवरही काम करणार आहे. १४५ इतका प्रचंड बुद्ध्यांक (इंटेलिजन्स कोशण्ट) असलेल्या लॉरेन्टची तुलना आईन्स्टाईनसारख्या महान शास्त्रज्ञाशी केली गेली आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.