आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब
मोठ्या कर्तुत्वाचं ओझंसुध्दा तेवढंच जड असतं. यशस्वी असणारी व्यक्ती कधीकधी छोट्या अपयशांनासुध्दा घाबरतात. आत्महत्या करण्यासाठी हवी असणारी कारणे अयशस्वी व्यक्तीपेक्षा यशस्वी व्यक्तींना लवकर भेटतात. अपयश आणि यशाबरोबर येणारा मानसिक त्रास सहन करण्यासाठी लागणारे धैर्य त्यांना सापडत नाही आणि आयुष्याचा शेवट होतो.
असंच काही घडलं होतं पुलित्जर पुरस्कार विजेता छायाचित्रकार केविन कार्टर याच्याबरोबर.
छायाचित्र म्हणजे फक्त भुतकाळ जपुन ठेवण्याचे साधनच नाही तर जगापासुन लपवल्या जात असलेल्या वर्तमानाचा आरसाही असु शकतात हे जगाला दाखवून देणाऱ्या केविन कार्टरने छायाचित्र क्षेत्रातील सगळ्यात मोठा पुरस्कार असलेला पुलित्जर पुरस्कार मिळाल्यानंतर २ आठवड्यात आत्महत्या केली होती.
केविन कार्टरचा जन्म साउथ आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे १९६०मध्ये झाला. तो एक रोमन कॅथॉलिक परिवारात रहात होता. त्याच्या आईचे नाव रोमा आणि वडीलांचे नाव जिमी होते. जोहान्सबर्गमधेच त्याचे बालपण गेले.
कार्टर राहत होता त्यावेळी वर्णभेद फार वाढला होता. त्याला हा वर्णभेद पटत नसल्याने त्याला त्या गोष्टीचा राग येत असे. आसपास होणाऱ्या या भेदभावाबाबत केविन नेहमीच सहानूभूती दाखवत असे.
या सगळ्या वातावरणात कार्टरने दक्षिण आफ्रिकन सुरक्षा दलात प्रवेश घेतला. तिथंसुध्दा वर्णभेद होत असलेलं त्याला दिसलं आणि तो अधिकच खचला. एका वेळी तर अश्वेतवर्णीय व्यक्तीला मदत केली म्हणुन ‘अश्वेतांवर प्रेम करणारा’ म्हणुन त्याला हिणवले गेले आणि मारहाणही करण्यात आली.
कार्टरला कार रेसिंग खुप आवडत असे. शालेय शिक्षण झाल्यानंतर त्याने फार्मसी शिकण्याचा विचार केला आणि फार्मसी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. इथे आपले मन लागत नाही हे लक्षात आल्यानंतर कॉलेज सोडले. १९८०मध्ये कोणालही न सांगता त्याने आपले नाव ‘डेविड’ असे सांगुन डिस्क जॉकी (डीजे) म्हणुन काम केले.
१९८३मध्ये कार्टरने झोपेच्या गोळ्या, वेदनाशामक आणि उंदीर मारण्याचे औषध खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. नोकरी गेल्यामुळे हा निर्णय त्याने घेतला होता. सुदैवाने तो त्यावेळी वाचला.
पुढे काही दिवसात कार्टरला एका कॅमेरा विकणाऱ्या दुकानात नोकरी लागली. तिथेच त्याला ‘जोहान्सबर्ग संडे एक्सप्रेस‘ या वृत्तपत्रासाठी छायाचित्रकार म्हणुन काम करण्याची संधी चालून आली.
त्यातच १९८४मध्ये आफ्रिकेत वर्णभेदावरुन दंगे भडकले. कार्टरने स्वत: दंगलीच्या ठिकाणी जाऊन छायाचित्र काढले. स्वत:च्या जिवाशी खेळून छायाचित्र काढता काढता तो ‘बँग बँग’ नावाच्या एका गटात सहभागी झाला. त्या दंगलीचे ह्रदयद्रावक चित्र या ४ लोकांच्या गटाने छायाचित्रांद्वारे जगासमोर आणले.
नेहमीच वर्णभेदाच्या विरोधात असलेल्या कार्टरसाठी ही नोकरी म्हणजे वरदान होती. वर्णभेदाविरोधात काहीतरी करण्याची त्याची इच्छा शेवटी पुर्ण होत होती. काही वर्षात त्याने बघितलेले भयंकर मृत्यू आपल्या कॅमेरात कैद केले.
ह्रदयद्रावक दंगलीनंतर कार्टरने सुदान देशामधील दुष्काळ कॅमेरात कैद करायचे ठरवले. असेच एकदा छायाचित्राच्या शोधात असताना जंगलात त्याने एक भयंकर दृश्य बघितले.
एक छोटी अर्धमेली लहान मुल खाण्याच्या शोधात असताना एक गिधाड त्याच्या मृत्यूची वाट बघत तिथे बसलेले त्याने पाहिले.
हे चित्र बघुन कार्टरचे मन अजुनच तुटले. त्याने हा क्षण आपल्या कॅमेरात टिपला. हे चित्र टिपल्यानंतर कार्टर बराच वेळ एका झाडाखाली बसून रडत होता. हेच छायाचित्र पुढे जाऊन त्याला पुलित्जर पुरस्कार मिळवून देणार होते.
हे छायाचित्र पहिल्यांदा प्रसिध्द झाले ते २६ मार्च, १९९३ ला ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या वृत्तपत्रात. हे छायाचित्र आफ्रिकन लोकांना होणाऱ्या त्रासाचे भयावह वर्णन करणारे दर्शक ठरले. सुदानमध्ये आफ्रिकन लोकांच्या दयनीय अवस्थेवर भाष्य करणारे हे छायाचित्र जगप्रसिध्द झाले.
हे छायाचित्र प्रसिध्द केल्यानंतर ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला अनेक वाचकांनी संपर्क साधला. त्या लहानग्याचे काय झाले असे विचारणारे अनेक संदेश त्यांना आले. त्यावेळी न्यूयॉर्क टाइम्सने संपादकीय वृत्त छापून छायाचित्रकाराने त्या गिधडाला पळवुन लावल्याचे स्पष्टीकरण दिले.
या छायाचित्रासारखे अनेक छायचित्र कार्टर आणि त्याच्या गटाने काढले. दररोज असे दृश्य कॅमेरात कैद करण्याच्या कामाने त्यांच्यावर मानसिक परिणाम व्हायला सुरुवात झाली होती. कार्टर कोकेन आणि इतर नशेचे पदार्थांची मदत अशा परिस्थितीत काम करण्यासाठी घेऊ लागला.
लोकांच्या कत्तली होत असताना त्यांना वाचवायचा प्रयत्न न करता त्यांचा मृत्यू कॅमेरात कैद करताना कार्टरला स्वत:अपराधी भावनेने ग्रासले होते. या सगळ्या घटना कार्टरच्या मनावर विपरीत परिणाम करत होत्या. औदासीनतेकडे त्याची होत असलेली वाटचाल पाहुन तो आत्महत्या करु शकतो याचा अंदाज त्याच्या सहकाऱ्यांना आला होता.

त्यातच त्याच्या बँगबँग गटातील त्याचा एक सहकारी केन ऑस्टरब्रॉक याला छायाचित्र काढत असताना गोळी घालण्यात आली. त्याच्या ऐवजी आपल्याला गोळ्या घालायला हव्या होत्या असे कार्टरला वाटायला लागले. त्यादिवशी कार्टर त्यांच्याबरोबर नव्हता. गिधाड आणि छोट्या मुलीच्या त्या छायाचित्रासाठी भेटलेल्या पुलित्जर पुरस्कारासाठी तो त्यावेळी मुलाखत देत होता.
पुलित्जर पुरस्कार भेटल्यानंतर काही भागातून कार्टरवरती टीका करण्यात आली. त्या मुलीला वाचवायचे सोडुन ते छायाचित्र काढणे नैतिकतेच्या विरोधात आहे असे काही लोकांचे म्हणणे होते. या टिकेने कार्टरच्या मनात वादळ निर्माण केलेच होते. या परिस्थीतीत त्याच्याकडून एक मोठी चुक झाली. टाईम्स मासिकासाठी मोझांबिक इथे काढलेल्या छायाचित्राचे १६ रोल तो विमानातच विसरला. ते पुन्हा कधीच सापडले नाहीत.
आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यात वर्णभेदाच्या विरोधात संघर्ष करत असलेल्या केविन कार्टरला आता आयुष्य दिशाहीन वाटत होते. आयुष्य जगण्याचे कुठलेही कारण त्याला सापडत नव्हते. तो घरासमोर असलेल्या छोट्या बागेत गेला आणि गाडीत कार्बन मोनॉक्साईड घेऊन त्याने आत्महत्या केली.
आपल्या शेवटच्या पत्रात त्याने स्वत:ला होत असलेल्या मानसिक त्रासाबद्दल सांगितले. कार्टरच्या एका छायाचित्राने संयुक्त राष्ट्राला सूदानच्या दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष देण्यास भाग पाडले. मृत्यू झाल्यानंतरही कार्टर अजरामर झाला तो त्याच्या गिधाड आणि छोट्या मुलीच्या छायाचित्रासाठी. त्या मुलीला वाचवुन त्याने ते छायाचित्र काढले नसते तर सत्य परिस्थिती जगासमोर कधीच आली नसती. मोठ्या हेतुच्या पुर्ततेसाठी छोटं बलिदान द्यावं लागतं हे तत्व कार्टरने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पाळले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.