आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
चांगले पैसे कमावून विश्वभ्रमंतीला जाण्याचे स्वप्न सर्वच बघतात. पण केरळमधील एक जोडप्याने चहा विक्री करून विश्वभ्रमंती करण्याचे आपले स्वप्न साकार केले आहे. या जोडप्याने आतापर्यंत २३ पेक्षा जास्त देशांना भेट दिली असून भारतातील नामवंत उद्योगसमूह महिंद्रा अँड महिंद्राचे सीईओ आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून त्यांचे कौतुक केले आहे.
आनंद महिंद्रा म्हणतात की, फोर्ब्जच्या जगातील १० सर्वांत श्रीमंत लोकांमध्ये यांचा समावेश नसला तरी माझ्या दृष्टीने हे जगातील सर्वांत श्रीमंत जोडपे आहे. संपत्ती व जगण्याच्याबाबतीत त्यांच्या दृष्टिकोनाने प्रभावित झालेल्या महिंद्रांनी कोचीला गेल्यावर त्यांच्या दुकानातील चहा पिण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
केरळच्या कोचीनमध्ये राहणाऱ्या विजयन आणि मोहाला या वृद्ध दाम्पत्याने आपल्या छोट्याशा चहाच्या दुकानाच्या बळावर विश्व परिक्रमेचे स्वप्न साकारले आहे.
विजयन ६८ वर्षांचे असून मोहाला ६७ वर्षांच्या आहेत. ‘बालाजी कॉफी हाऊस’ नावाचे चहाचे दुकान ते चालवत आहेत. विजयन आणि मोहाला रोज सकाळपासून कामाला सुरुवात करतात व रोज गरजेपुरती कमाई झाल्यावर, रोजच्या कमाईतील ३०० रुपये बाजूला काढून ठेवतात. हे ३०० रुपये रोज वाचावे म्हणून त्यांनी दुकानावर कुठला कर्मचारी देखील ठेवलेला नाही.
रोज चहा विक्री करून ३०० रुपये बाजूला काढले तरी त्यांना पैशाची कमतरता जाणवते, अशावेळी ते कर्ज काढुन आपली हौस पूर्ण करतात. पुढे ते कर्ज तीन वर्षात फेडतात. एकदा कर्ज फेडले की पुन्हा नवे कर्ज घेऊन हे जोडपे आवडत्या देशाचा दौरा करून येतात.
दोघांच्या लग्नाला आज ४५ वर्षांचा कालावधी लोटला आहे. लग्न झाले त्यावेळी दोघांना फिरण्याची प्रचंड आवड होती. त्यावेळी त्यांच्या हातात पैसे नव्हते म्हणून त्यांनी हे दुकान उघडले.
चहाच्या दुकानात चहा विक्री व कर्जाचे चक्र सांभाळत त्यांनी विश्वभ्रमण केले.
७० वर्षांच्या वयात देखील इतर वयस्कर लोकांप्रमाणे आजारपणाच्या कुठल्याच तक्रारी नाहीत. ते या वयात जगाच्या वेगवेगळ्या भागांना एक्सप्लोअर करतात. त्यांच्या दुकानात पॅरिस, सिंगापूर आणि भारत या तिन्ही देशातील ‘वेळ’ सांगणारे घड्याळ आहेत. हे घड्याळ त्यांच्या मजबूत इच्छाशक्तीचे दर्शन घडवतात. दुकानात त्यांनी वेगवेगळ्या देशात केलेल्या खर्चाचे आकडे लिहिले आहेत. त्यांच्या दुकानात चहा प्यायला गेलेल्या व्यक्तीला ते आपल्या विश्वभ्रमंतीचे किस्से सांगतात.
आतापर्यंत २३ देशांचा दौरा केलेल्या या जोडप्याचे सिंगापूर, स्वित्झर्लंड आणि न्यूयॉर्क ही आवडती ठिकाणं आहेत. चहाची विक्री करून वेगवेगळ्या देशांना भेट देणाऱ्या या जोडप्यांवर अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे.
‘इन्व्हिजिबल विंग्स‘ नावाच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन हरी मोहनन यांनी केले असून २०१८ मध्ये फिल्म फेयर आवर्ड्समध्ये या चित्रपटाला बेस्ट नॉन फिक्शन फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे.
वय वाढत आहे म्हणून त्यांच्या फिरण्या-हिंडण्यावर जरासा देखील परिणाम झालेला नाही, उलट त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. त्यांच्या घरी जगाचा नकाशा लावण्यात आला असून त्यांना ज्याठिकाणाला भेट द्यायची आहे ती मार्क केलेली आहेत. आता वाढत्या वयाबरोबर या ठिकाणांना भेट देण्याचा त्यांचा उत्साह वाढला आहे. विजयन – मोहाना यांनी आयुष्य आपल्या मर्जीने व आपल्या धुंदीत कसं जगता येतं याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.