आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
इतर क्रिकेट फॉरमॅटच्या तुलनेत टेस्ट क्रिकेटला संथ मानलं जातं. टेस्ट क्रिकेटमध्ये पाच दिवसांच्या कालावधीसाठी संघांला स्वतःची रणनीती तयार करावी लागते आणि त्यानुसार खेळ करावा लागतो. टेस्टमध्ये कधी एखादी टीम दोन ते तीन दिवस फलंदाजी करते तर कधी संपूर्ण मॅचही दोन दिवसात संपते. क्रिकेट हा प्रचंड अनिश्चिततेचा खेळ आहे, त्याची झलक टेस्ट क्रिकेटमध्येही पाहायला मिळते. कारण टीमला सध्याच्या क्षणाला कशाची गरज आहे, हे पाहून प्लेयर्सला खेळ करावा लागतो.
एकूणच काय तर टेस्ट क्रिकेट कधी-कधी काही क्षणांच्या धुमश्चक्रीसारखं भासतं तर कधी दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धासारखं. काही बॅट्समनला टेक्निक लक्षात घेऊन इनिंग पुढे नेण्याची सवय असते. भलेही मग त्यासाठी त्यांनी कितीही वेळ मैदानावर थांबावं लागो. टेस्टमध्ये एरियल शॉट्स खेळण्यास किंवा खराब शॉट्स खेळण्याला शक्यतो मनाई असते. हातामध्ये असलेला वेळ लक्षात घेऊन बॅटिंग केली जाते.
मात्र, काही प्लेयर्स असे असतात जे आपला नैसर्गिक खेळ करण्यावर जास्त विश्वास ठेवतात. टेस्ट क्रिकेटमधील कोणत्याही सूचनांचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. काही खेळाडू तर असे आहेत त्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये एका पाठोपाठ एक असे चार-चार सिक्स मारलेले आहेत. अशा खेळाडूंमध्ये वर्ल्डकप विनर इंडियन कॅप्टन कपिल देव यांचाही समावेश होतो.
कपिल पाजींनी टीमला फॉलोऑनपासून वाचवण्यासाठी सलग चार सिक्स मारले होते. हा किस्सा नेमका काय होता, हे जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा…
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांना आजवरच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानलं जातं. ‘द हरियाणा हरिकेन’ असं टोपणनाव असलेल्या कपिल देव यांनी मैदानावर अनेक कारनामे केलेले आहेत. १९९०मधील टेस्ट मॅचमध्ये कपिल देव यांनी एका पाठोपाठ मारलेले चार सिक्सदेखील एक कारनामाचं म्हणावा लागेल.
३० जुलै १९९० रोजी भारताला फॉलोऑनपासून वाचवण्यासाठी २४ धावांची आवश्यकता होती आणि ९ गडी तंबूत परतलेले होते. त्यावेळी कपिल देव आणि नरेंद्र हिरवाणी मैदानावर होते. काहीही करून फॉलोऑन टाळला जावा अशी भारतीय टीमची अपेक्षा होती.
कपिल देव यांनी ही किमया करून दाखवली होती. त्यांनी एडी हेमिंग्जला सलग चार षटकार ठोकून आपल्या अनोख्या शैलीत परिस्थितीवर ताबा मिळवला होता. शेवटच्या क्षणी कपिल देव यांनी केलेला हा हल्ला नक्कीच एखाद्या खूनी हल्ल्यापेक्षा कमी नव्हता.
परफेक्शनसाठी आजही या बॅटिंग अटॅकची आठवण काढली जाते. षटकारांचा क्रम, कपिल देवचा सॅव्हेज लूक, बॉलची उंची या सर्व गोष्टींमुळं स्टेडियममध्ये आनंदाच्या चित्कारांच्या अक्षरश: लहरी तयार झाल्या होत्या.
भारत आणि इंग्लंड दरम्यान लॉर्ड्सवर टेस्ट मॅच सुरू होती. विकेंड संपलेला असूनही मॅच पाहण्यासाठी बऱ्यापैकी गर्दी होती. कर्णधार ग्रॅहम गूचच्या ३३३ धावांच्या जोरावर इंग्लंडनं चार बाद ६५३ धावांचा डोंगर रचला होता.
फॉलोऑन टाळण्याचं ओझं डोक्यावर घेऊन भारतीय संघाच्या दिवसाची सुरुवात झाली होती. सोमवारी मैदानात उतरलेल्या भारताच्या हातात फक्त चार विकेट्स शिल्लक होत्या. मोहम्मद अझरुद्दीन आणि कपिल देव खेळत होते. आदल्या दिवशी दोघांनी ११७ धावा केल्या होत्या आणि सोमवारी फॉलोऑन टाळण्यासाठी आणखी ७८ धावांची गरज होती.
सकाळच्या तिसऱ्या षटकात एडी हेमिंग्सनं अजहरला माघारी धाडलं. त्यावेळी अजहर १२१ धावांवर खेळत होता. लॉर्ड्सवरील कुख्यात स्लोपमधून आलेल्या विलक्षण ब्रेकमुळं तो आऊट झाला होता. भारतीय कर्णधार बाहेर पडल्यानंतर आलेल्या दोन टेल एंडर्सकडून अपेक्षा न ठेवलेलीच बरी होती. दिवसातील १४वी ओव्हर एंगस फ्रेझर टाकत होता. कपिल देव त्यावेळी ५३ धावांवर खेळत होते. ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर फ्रेझरनं दोन टेल एंडर्सला दोन बॉलच्या फरकानं आउट केलं. भारताला फॉलोऑन मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली.
सर्वात शेवटी लेग-स्पिनर नरेंद्र हिरवाणी फलंदाजीसाठी बाहेर पडला. आपल्या १० कसोटी सामन्यांमध्ये नरेंद्रनं ४.६६ च्या विलक्षण सरासरीनं केवळ २८ धावा केलेल्या होत्या! त्यापैकी १७ धावा तर न्यूझीलंडविरुद्ध निघालेल्या होत्या. यावेळी त्याचं नशीब चांगलं होतं म्हणून त्याला फ्रेझरच्या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूचा कसा तरी सामना करता आला.
आता हेमिंग्ज नवीन ओव्हरची सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला होता. त्यावेळी भारताची अवस्था ९ बाद ४३० अशी होती आणि फॉलोऑन टाळण्यासाठी आणखी २४ धावांची गरज होती. स्ट्राईकवर असलेल्या कपिलनं सरळ साधी आकडेमोड केली. चार सिक्स मारले तर २४ धावा होतील, असं ते गणित होतं.
कपिल देव यांनी ओव्हरमधील पहिले दोन चेंडू योग्यरित्या ब्लॉक केले. त्यानंतर मात्र, त्यांनी सलग चार जबरदस्त स्ट्रोक मारून धमाल उडवून दिली. भारताचा फॉलोऑन टाळला गेला. कपिल देवनं ७५ चेंडूंत ८ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७७ धावा केल्या.
इंग्लंडला पुन्हा फलंदाजी करावी लागली. शेवटी भारताला पराभवाचा सामना करावाचा लागला. मात्र, कपिलच्या चार षटकारांनी हा सामना जास्त गाजला. कारण, कसोटी क्रिकेटमध्ये सलग चार सिक्स मारणारा कपिल देव त्यावेळचा एकमेव खेळाडू ठरला होता.
त्यानंतर पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदी आणि दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सनं अशी कामगिरी केली आहे. २००६ मध्ये भारताविरुद्धच्या लाहोर कसोटीत आफ्रिदीनं हा पराक्रम केला होता. भारताकडून हरभजन सिंग गोलंदाजी करत होता. शाहिद आफ्रिदीनं हरभजनच्या ओव्हरचे पहिले चार चेंडू हवेतून सीमारेषेच्या बाहेर पाठवले होते. आफ्रिदीनं या डावात एकूण सात षटकार आणि शतकही ठोकलं होतं.
आफ्रिदीशिवाय, एबी डिव्हिलियर्सनं २००९ मध्ये केपटाऊन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात अँड्र्यू मॅकडोनाल्डच्या चेंडूवर सलग चार षटकार ठोकले होते. दक्षिण आफ्रिकेनं हा सामना एक डाव आणि २० धावांनी जिंकला होता तर एबी डिव्हिलियर्सनं १६३ धावांची शानदार खेळी केली होती.
आफ्रिदी आणि डिव्हिलियर्स स्फोटक फलंदाज होते यात शंकाच नाही. मात्र, कपिल पाजींनी लॉर्ड्सवर केलेल्या धमाक्याची सर त्याला नाही, हेही तितकंच खरं आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.