या नवाबाच्या कुत्रीच्या लग्नाचा सोहळा तीन दिवस चालला होता

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतातील पूर्वीची संस्थाने यावर एक स्वतंत्र प्रकरणच लिहिता येईल. स्वातंत्र्यपूर्व काळात भारत हा म्हणायला फक्त एक देश होता. परंतु बघायला गेलं तर अनेक संस्थानांच्या रुपात तो छोट्याछोट्या तुकड्यांत विभागला गेला होता. संस्थान म्हणजे पूर्वीच्या काळी होऊन गेलेल्या राजे महाराजांचे हे शिल्लक राहिलेले अवशेष होते.

या संपूर्ण संस्थानांनी इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करले होते.इंग्रज सरकारने नेमून दिलेल्या तनख्यावर ही संस्थाने चालत असत. मात्र पूर्वापार चालत आलेल्या परंपरा, रितीरिवाज, बडेजावपणा आणि पूर्वजांची संपत्ती याच्यावर या संस्थांनांचे मोठेपण ठरत होते.

या संस्थांवर राज्य करणाऱ्या संस्थानिकांची जीवनशैली हा कायम चर्चेचा विषय राहिलेला आहे. यांचे अनेक किस्से इतिहास प्रसिद्ध आहेत कोणी संस्थानिक पेपरवेट म्हणून अस्सल हिऱ्यांचा वापर करीत असे. तर भारतातल्या कोण्या एका राजाने कचरा फेकण्यासाठी म्हणून रोल्स रॉईसच्या अलिशान गाड्या वापरलेल्या गोष्टी आजही सांगितल्या जातात.

असेच एक प्रसिद्ध संस्थान होते जुनागढचे संस्थान.

जुनागढ हे सौराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्वीच्या गुजरातमधील प्रदेशात असणारे आणि आत्ताच्या पाकिस्तानबरोबर भौगोलिक जवळीकता साधणारे एक संस्थान होते. या संस्थानावर मुस्लिम नवाब राज्य करायचा. स्वातंत्र्यपूर्व काळात या जुनागढ संस्थानावर नबाब महाबतखान राज्य करीत होता. हा महाबतखान पहिल्यापासून पाकिस्तानच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थानिकापैकी एक होता.

15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये विलीन होण्यासाठी याने पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष महंमद अली जिन्नांबरोबर गुप्त गाठीभेटी देखील सुरू केल्या.

त्यानुसार 13 सप्टेंबर 1947 साली पाकिस्तान सरकारने जुनागढ संस्थान पाकिस्तानमध्ये विलीन होत असल्याचे भारत सरकारला कळवले. ही बातमी जेव्हा जुनागढच्या प्रजेला कळाली तेव्हा त्यांच्यासाठी तो आश्चर्याचा धक्का होता. त्यावेळी संस्थानातील जवळपास 80% प्रजा ही हिंदू होती. प्रजेला कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता नवाबाने पाकिस्तानबरोबर गुप्त करार करून टाकला होता.

या निर्णयाविरुद्ध जुनागढच्या जनतेने मोठे आंदोलन उभारले. त्याचा सामना या नवाबाला करता आला नाही. नवाब पाकिस्तानमध्ये पळून गेला. यानंतर जुनागढमध्ये शामलदास कोठिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली होती.

शेवटी सप्टेंबर 1947मध्ये पाकिस्तान सरकारने भारत सरकारला या प्रकरणी मध्यस्थी करण्याची विनंती केली. भारताचे तेव्हाचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी जुनागढ वर लष्करी कारवाई करून संस्थान ताब्यात घेतले. नंतर तेथे सार्वमत घेण्यात आले आणि जनतेने दिलेल्या कलानुसार हे जुनागढ संस्थान भारतामध्ये विलीन करण्यात आले.

महाबतखान आपल्या संस्थानाला आणि नबाब पदाला कायमचा मुकला पण जेंव्हा तो नबाब होता तेव्हा त्याच्या ऐय्याशखोर विलासी वागण्याचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत.

महाबतखान हा कुत्र्यांचा प्रचंड शौकीन होता. कुत्र्यांची त्याची आवड जगप्रसिद्ध होती. जुनागढ संस्थांनाच्या त्याच्या राजवाड्यात जवळपास नऊशेपेक्षा जास्त कुत्रे पाळले होते. यामध्ये भारतातील देशी ब्रीडच्या कुत्र्यांसह वेगवेगळ्या देशातील परदेशी ब्रीडचे देखील कुत्रे नवाबने पाळलेले होते. या कुत्र्यांची अत्यंत राजेशाही पद्धतीने देखभाल होत असे.

या कुत्र्यांना खेळण्यासाठी म्हणून शेकडो एकराचे पटांगण नवाबने उभारलेले होते. या कुत्र्यांच्या रोजच्या खाण्यापिण्याचा खर्च लाखांच्या घरात जायचा.

नवाबाने खास त्यांच्यासाठी म्हणून चाळीस खाटीक नेमून दिले होते. या कुत्र्यांच्या खाण्यासाठी रोज हजारो कोंबड्यांची कत्तल केली जायची. कहर म्हणजे या सर्व 900 कुत्र्यांना वेगळ्या खोल्या नवाबाच्या हवेलीमध्ये देण्यात आल्या होत्या.

प्रत्येक कुत्र्याच्या तैनातीत एक स्वतंत्र नोकर ठेवण्यात आलेला होता. प्रत्येक कुत्र्याच्या रूममध्ये स्वतंत्र नोकर आणि टेलिफोनची देखील व्यवस्था करण्यात आलेली होती. हा सगळा प्रकार बघून जुनागढचे लोक त्या काळी गमतीने म्हणायचे की, जर पुढचा जन्म मिळाला तर तो नवाबाच्या घरात कुत्र्याच्या रुपात असावा.

या नऊशे कुत्र्यांमध्ये रोशन आरा नावाची एक कुत्री होती. ही कुत्री नवाबाची अत्यंत लाडकी होती. इतकी लाडकी की नवाबाने चक्क राजेशाही थाटात लग्न देखील लावून दिले होते.

रोशन आराचे लग्न या नवाबाने बॉबी नावाच्या कुत्र्याबरोबर थाटामाटाने लावून दिले होते असा उल्लेख आहे. हा लग्न सोहळा भव्यदिव्य स्वरूपात पार पाडण्यात आलेला होता.

या लग्नासाठी रोशन आराचे दागिने खास सुरतवरून मागवण्यात आले होते. रोशन आराचा लग्नाचा पोशाख काश्मीरच्या रेशीम व्यापाऱ्यांकडून तयार करून घेण्यात आलेला होता. लग्नासाठी नवाबाने आपली संपूर्ण हवेली सजवली होती. लग्नाला भारतभर जवळपास बाराशे संस्थानिकांना तसेच इंग्रज अधिकाऱ्यांना आमंत्रणे धाडण्यात आले होते.

इतकेच काय पण त्यावेळी सौराष्ट्र राज्याचा कारभार पाहणाऱ्या व्हॉईसरॉयला देखील या शाही लग्नासाठी निमंत्रित केले होते. परंतु व्हाइसरॉयने या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी नकार दिला.

लग्नाच्या दिवशी जेव्हा रोशन आराच्या नवऱ्याचे आगमन अलिगढ रेल्वे स्टेशनवर झाले तेव्हा त्याला 300 गार्ड सलामी देण्यासाठी उपस्थित होते. अत्यंत थाटामाटाने बॉबीची रेल्वे स्टेशनपासून नवाबाच्या हवेलीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्याकाळी या लग्नामध्ये जवळपास दीड लाख लोकांनी आपला सहभाग नोंदवला होता.

तब्बल दहा दिवस हा शाही विवाह सोहळा चालला. मुस्लिम लग्नामध्ये असलेल्या सगळ्या रिवाजाचे याच्यामध्ये पालन करण्यात आलेले होते. विवाह लावण्यासाठी खास लखनऊवरून काझी बोलावण्यात आलेले होते.

लग्नासाठी दहा दिवस संपूर्ण हवेली आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये हजारो काचेचे दिवे बसवले गेले. यासाठी लाखो लिटर तेल इंधन म्हणून वापरण्यात आले. या लग्नासाठी नवाबाने जवळपास दोन करोड रुपये खर्च केले होते. ज्यामध्ये साडेसहा लाख लोकांचे महिनाभर दोन वेळचे जेवण आणि इतर गरजा भागल्या असत्या.

या अशा कहाण्या ऐकल्यानंतर भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टीला आणि धैर्याला सलाम करावासा वाटतो. जनतेच्या पैशावर हे असले कुत्र्यांची लग्ने लावणारे नवाब आज सरदार वल्लभाई पटेल यांच्यामुळे नामशेष झाले ही भारतासाठी चांगली गोष्ट म्हटली पाहिजे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!