जेआरडी टाटा एअर इंडियाच्या विमानाचे टॉयलेट साफ करायलासुद्धा लाजत नसत

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


भारतीय नागरी हवाई वाहतुकीची स्थापना करणारे उद्योजक म्हणून जेआरडी टाटा यांना संपूर्ण देश ओळखतो. टाटा एअरलाईन्सशी त्यांचे नाते इतके घट्ट जुळले होते की या कंपनीचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर देखील कंपनीच्या कामात त्यांना तितकीच रुची होती. स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी टाटा एअरलाईन्सचे एअर इंडियात रुपांतरण केले. जेआरडी टाटा त्याचे चेअरमन होते.

फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरीअट यांचा जेआरडींवर फार प्रभाव होता. त्यांनी विमान शिकण्याची प्रेरणा लुईस यांच्याकडूनच मिळाली.

जेआरडी एअरइंडियाच्या व्यवस्थापनातील अगदी बारीकसारीक गोष्टीतही रस घेत. एकदा तर त्यांनी क्रूमेंबर्स सोबत एअर इंडियाचे टॉयलेटदेखील स्वच्छ केले होते. एअर इंडियाच्या काउंटरवर धूळ जरी दिसली तरी ते स्वतःच्या हाताने ती धूळ साफ करत. अगदी छोटीछोटी कामे करताना त्यांना कसलाही कमीपणा वाटत नसे.

विमानाच्या आतील सजावट असो की एअर होस्टेसच्या साडीचा रंग, किंवा एअरइंडियाच्या जाहिरातीचे होर्डिंग अशा सर्व गोष्टींत त्यांचे बारकाईने लक्ष असे.

जेआरडी एक यशस्वी उद्योगपती तर होतेच पण, त्यांनी विज्ञान, आरोग्य आणि हवाई क्षेत्रात देखील स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. १९२६मध्ये जेआरडींच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी ते फक्त २२ वर्षांचे होते. इतक्या लहान वयात टाटा सन्सच्या डायरेक्टर पदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन पडली. त्यानतंर १२ वर्षांनी त्यांची टाटा सन्सच्या चेअरमनपदी निवड झाली.

जेआरडी टाटा यांचा जन्म पॅरीसमध्ये २९ जुलै, १९०४ रोजी झाला. टाटा स्टीलचे संस्थापक जेएन टाटा यांचे भाचे, रतन दादाभाई टाटा आणि त्यांची पत्नी सुनी यांचे सर्वात मोठे पुत्र. जेआरडी यांचे शिक्षण फ्रांसमध्येच झाले.

१९२४ साली व्यवसायाची जबाबदारी देण्याच्या उद्देशाने त्यांना मुंबईत बोलावून घेण्यात आले. बॉम्बे हाऊसमधील टाटा स्टीलचे प्रभारी संचालक जॉन पीटरसन यांच्या हाताखाली जेआरडींनी आपल्या कामाची सुरुवात केली. १९९१पर्यंत ते टाटा सन्सच्या चेअरमन पदावर कार्यरत होते.

जेआरडींनी टाटा कंपनीचा विस्तार वाढवला. जेआरडींनी टाटा कंपनीची सूत्रे स्वीकारली तेंव्हा टाटा सन्सच्या १४ कंपन्या होत्या. त्यांच्या कार्यकाळात कंपनींची संख्या वाढून ९० वर पोहोचली. रसायन, वाहन, चहा, माहिती, हॉटेल आणि तंत्रज्ञान अशा नवनवीन क्षेत्रात त्यांनी कंपनीचा विस्तार केला. चेअरमन पद स्वीकारताच जेआरडींनी या सर्व कंपन्यांना स्वायत्तता देऊन टाकली. पण, नैतिक सिद्धांताच्या पालनात कुठेही कसर राहणार नाही याची देखील दक्षता घेतली.

माणसापेक्षा मशिन्स महत्वाच्या नसल्या तरी मशिन्स माणसाइतक्याच महत्वाच्या आहेत असे त्यांचे मत होते. कामगारांच्या हितासाठी त्यांनी खाजगी विभागाची स्थापना केली. समाज कल्याणकारी योजना सुरु केल्या. या योजनांमध्ये दिवसातून आठ तास काम, मोफत आरोग्यसेवा, भविष्य निर्वाह निधी आणि अपघात विमा योजना अशा पायाभूत गोष्टींचा समावेश होता. पुढे याच योजना केंद्र सरकारने सर्व उद्योग व्यवसायांसाठी बंधनकारक केल्या.

टाटा घराण्याने आज जी उंची प्राप्त केली आहे, त्यापेक्षाही अजून अधिक उंची गाठणे टाटा उद्योगसमूहाला शक्य होते. पण, नैतिक सिद्धांताला हरताळ फासून कोणतेही यश संपादन करणे टाटा घराण्याला मान्य नसल्याने आज आम्ही ज्या उंचीवर आहोत तिथे समाधानी आहोत असे वक्तव्य त्यांनी आपल्या भाषणातून केले होते. त्याच्या कार्यकाळात उद्योगसमूहाच्या विस्तार आणि क्षेत्र तर वाढलेच पण, हे करत असताना त्यांनी तत्वांशी जराही फारकत घेतली नाही.

विज्ञान आणि कलेच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान लक्षणीय आहे. त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, द टाटा मेमोरियल कॅन्सर रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटल, द टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, द नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स अँड नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ऍडव्हान्स स्टडीज यासारख्या संस्थाच्या स्थापनेत त्यांनी पुढाकर घेतला. देशाच्या सर्वात मोठ्या उद्योगसमूहाला त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

त्यांनी देशात नागरी उड्डाणाच्या पर्वाला सुरुवात केली. ते देशाचे पहिले कमर्शियल पायलट होते. १९३२मध्ये त्यांनी टाटा एअरलाईन्सची स्थापना केली. या एअरलाइन्समध्ये ते स्वतः पायलटचे काम करत. त्यांनी स्वतः कराची ते मुंबई दरम्यान विमान वाहतुक केली. ७८ वर्षांचे असताना त्यांनी सोलो उड्डाण केले. अशा प्रकारच्या उपक्रमातून देशातील तरुणांमध्ये साहसाचे धडे बिंबवले पाहिजेत असे त्यांचे मत होते.

१९५५ साली जेआरडींना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची आणि सन्मानाची यादी भरपूर मोठी आहे. १९९२ साली भारत सरकारने त्यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने पुरस्कृत केले. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे ते देशातील पहिले उद्योगपती होते.

जेआरडी यांच्यातील उदारता, खुलेपणा आणि सभ्यता हे गुण कायम स्मरणात राहतील.

सत्ता आणि सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात राहूनही त्यांचे पाय जमिनीवरच राहिले. तब्बल चाळीस वर्षे ते टाटा सन्सच्या चेअरमनपदी होते. याकाळात त्यांनी जमशेदपूरला एक विकसित शहर बनवून दाखवले. जेआरडींनी देशाच्या औद्योगिक विकासात अतुलनीय योगदान दिले आहे. उद्योजक कसा असावा याचा आदर्श त्यांनी आपल्या वर्तनातून घालून दिला.

माझ्या कामातूनच माझे अस्तित्व जाणवत राहील असे ते नेहमी म्हणायचे. देशातील सामान्य लोकांचा आणि देशाचा जोपर्यंत विकास होत नाही आणि त्यांच्या गरजा भागवल्या जात नाहीत तोपर्यंत एक उद्योजक म्हणून मिळणारे कोणतेही यश अपूर्ण आहे, असेही ते नेहमी म्हणत.

२९ नोव्हेंबर, १९९३ रोजी वयाच्या ८९व्या वर्षी स्वित्झर्लंड येथील जिनीव्हा शहरात त्यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यादिवशी भारतीय संसद बरखास्त करण्यात आली होती. केवळ लोकसभेचे सभासद असणाऱ्या व्यक्तींनाच हा सन्मान दिला जातो. मात्र, जेआरडी याला अपवाद होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!