आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
लेखक: सत्यम अवधुतवार
गॉथम शहरात वाढत जाणारी गरीबी गुन्हेगारांना जन्म देत आहे, बेरोजगारी त्या गुन्हेगारांना पोसत आहे. मेंदू सुन्न करणाऱ्या बातम्यातुन त्याचे परिणाम दिसत आहेत.
दिवसेंदिवस गरीब श्रीमंतांमधील खोल होत जाणारी दरी, राजकीय अस्थिरता, उच्चभ्रु वर्गाविरोधात खदखदणारा राग.
हे सगळं सहन न होण्याच्या पातळीपर्यंत जात असताना, अशा वातावरणात स्वतःचा भूतकाळ शोधण्याचा प्रयत्न करणारा गॉथम शहरातील एक तरुण त्याच्या मानसिक आजाराशी झटत, जगण्याचा संघर्ष करतोय.
शारीरिक व मानसिक क्षमता वाढवत तो परिस्थितीशी दोन हात करतोय. आयुष्यातील एका वळणावर त्याची अपयश पचवण्याची शक्ती संपते. तो तथाकथित सभ्यपणाची लक्ष्मणरेषा ओलांडतो आणि गुन्हेगारांचा चेहरा बनतो.
एक असा चेहरा जो गॉथम शहराने खूप आधी पाहायला हवा होता. तो चेहरा जरी त्याचा असला तरी गॉथम शहराच्या विस्कळीत झालेल्या व्यवस्थेविरोधातली ती एक प्रतिक्रिया होती. तो फक्त निमीत्तमात्र, त्या दुष्टचक्रात ओढल्या गेलेला एक बेरोजगार अपयशी तरुण होता.
स्वतःची पाळंमूळं शोधताना शारीरिक व मानसिक पातळीवर तो कमी पडतोय, स्वतःची ओळख ज्या मुखवट्यामागे लपवली तो मुखवटा आता त्याच्यापुरता उरला नव्हता. त्याचा प्रतिकार हा वैयक्तिक कारणांमुळे जरी असला तरी त्याची व्याप्ती संपूर्ण गॉथम शहराला हादरवुन टाकणारी होती.
असंतोषाचे प्रतिक बनलेला जोकरचा मास्क शहरातील त्या प्रत्येक तरुणाच्या चेहऱ्यावर होता ज्याने कधी तरी त्या उच्चभ्रु सभ्य लोकांना संपवण्याचा एव्हाना ती दरी संपवण्याचा विचार केला होता.
स्वतःच्या वैयक्तिक समस्या सोडवताना अपयशी होता होता तो सभ्य-असभ्यपणाचं वलय ओलांडून केव्हाच त्या पलिकडे गेलाय.
अशावेळी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी निर्णय घेणं हे त्याला सकारात्मक आणि नकारात्मक ओळख देणारं ठरणार असतं. जोकरला सकारात्मक किंवा नकारात्मक ठरवणारी व्यक्ती हे ठरवण्या योग्य आहे का हा मूळ प्रश्न सर्वांपुढे उभा राहतोच.
गॉथमला आता गरज आहे एका नव्या व्यवस्थेची, त्या व्यवस्थेला पुन्हा भ्रष्ट होण्यापासून वाचवणाऱ्या बॅटमॅन नावाच्या रक्षकाची. त्या रक्षकाला घडवणाऱ्या रास-अल-घुल ची आणि गॉथमच्या त्या नविन व्यवस्थेला पुन्हा आरसा दाखवणाऱ्या शेकडो जोकर्सची.
फिलीप्स टॉड दिग्दर्शित “जोकर” हा चित्रपट मूलतः जोकर ह्या पात्राच्या उदयाविषयी भाष्य करतो. जोकर अर्थात “आर्थर फ्लिक” च्या वैयक्तिक आयुष्यातील समस्या ह्या गॉथमच्या सामजिक परिस्थितीचं अप्रत्यक्ष वर्णन करतात.
आर्थरद्वारे होणाऱ्या ह*त्या ह्या अप्रत्यक्षपणे गॉथमच्या इतिहासाशी निगडीत आहेत. आर्थरच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत आहेत. तो निमित्तमात्र जरी असला तरी त्याची ती ओळख गॉथमच्या भ्रष्ट कारभारामुळेच बनलेली आहे.
८० च्या दशकातील गॉथम शहरातला आर्थर नावाचा एक अपयशी युवक हळुहळु जोकर कसा बनतो हे चित्रपटात मांडलंय.
My death make more sense than my life. हे एक वाक्य त्याच्या आयुष्याचं वर्णन करायला पुरेसं आहे. स्वतःच्या मानसिक आजाराबद्दल सांगताना तो म्हणतो – The worst part of having mental illness is people expect you to behave as if you don’t.
नोलानच्या डार्क नाईटमधील जोकरचे पात्र हे एकविसाव्या शतकातील आहे, तर आर्थरचे पात्र हे ८० च्या दशकातील आहे (चित्रपटप्रेमींनी खुशाल तुलना करावी पण मला येथे दोघांची तुलना करायची नाहीये)
आर्थरने मुखवटा दिलेल्या अनेक जोकर पैकी एक जोकर हा डार्क नाईट्सच्या चाप्टरमध्ये असु शकतो किंवा आर्थर हाच जोकर म्हणुन पुढे बॅटमॅन समोर येऊ शकतो. या दोन शक्यता आहेत. (कॉमिक बुक्स वाचणारे “स्पॉईलर्स देऊ नकोस” असा आरडाओरडा करत नाहीत).
जोकर हा चित्रपट नोलानच्या BATMAN TRILOGY च्याही आधीच्या चॅप्टरमध्ये मोडतो. अर्थात कॉमीक बुकच्या संदर्भानुसार हा प्रिक्वेल आहे.
जॉकीन् फिनीक्सने साकारलेला जोकर हा हिथ लिजरच्या तोडीस तोड आहे. कॉमिक बुकमध्ये दोघांचाही कालखंड वेगळा असल्याने जास्त तुलना करणे योग्य ठरणार नाही. पण फिनीक्ससुद्धा इथं लिजरप्रमाणे जोकरचं पात्र जगलाय.
या भुमिकेसाठी त्याने दोन महिन्यात चोविस किलो वजन कमी केलंय. त्याने जोकर उभा करण्यासाठी घेतलेली मेहनत ही प्रत्येक फ्रेममध्ये दिसुन येते. त्याचे चेहऱ्यावरील हावभाव. विचित्र हसणं. हसता हसता रडणं हे प्रचंड भयानक आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.