सलाम तिच्या जिद्दीला, दोन्ही हात नाहीत म्हणून ती पायाने विमान उडवायला शिकली..

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


आयुष्यात कुठलीही नवी गोष्ट आत्मसात करत असताना सुरुवातीला आपण खूपच बिचकत असतो. मनात कितीतरी शंकांचे काहूर माजलेले असते. हे आपल्याला जमेल का? आपण हे करू का? यात आपल्याला यश तरी येईल ना? यश नाही मिळाले तर लोक आपल्याला हसतील, नाव ठेवतील. अशा नानाविध नकारात्मक विचारांनी आपण आधीच खचून जातो.

कामाला सुरुवात करण्याआधीच आपण अपयशाची लाख कारणे शोधलेली असतात. हातापायांनी धडधाकट असूनही कित्येकदा आपण हातपाय गाळून बसतो. अशा वेळी अपंग असूनही गगनाला गवसणी घालणाऱ्या जेसिका कॉक्सविषयी वाचल्यावर, ऐकल्यावर आपल्याला आपल्याच कर्मदरिद्रीपणाची जाणीव होते.

आपण कधी विचार केला आहे का, की आपल्या दोन पायांच्या सहाय्याने आपण एखाद्या मित्राला टेक्स्ट मेसेज करू शकतो, पियानो वाजवू शकतो, किंवा विमान चालवू शकतो? नाही ना? हातांशिवाय या गोष्टी कशा केल्या जाऊ शकतात? याची कल्पनाही करणे आपल्यासाठी कठीण आहे. पण ३७ वर्षाच्या जेसिकाने ही अशक्यप्राय गोष्ट सहज शक्य करून दाखवली आहे.

जन्मतःच जेसिकाला दोन्ही हात नव्हते, तरीही आज ती पायलट आहे, परवानाधारक पायलट! हात नसलेली ती आपल्या दोन्ही पायांनी विमान उडवते.

लहानपणी ती कृत्रिम हाताच्या सहाय्याने आपली कामे करत असे. नंतर हे कृत्रिम हातही तिने काढून टाकले आणि स्वतःची कामे करण्यासाठी तिने पायांचा वापर सुरु केला.

२ फेब्रुवारी १९८३ मध्ये अमेरिकेच्या एरिजोना येथे तिचा जन्म झाला. अगदी लहानपणीच तिला तिचे हात गमवावे लागले. वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत तिने प्रोस्थेटिक म्हणजे कृत्रिम हातांचा वापर केला नंतर तिने हे हातही काढून टाकले. शाळेचा अभ्यास असो कि घरातील छोटीमोठी कामे, यासाठी तिने आपल्या पायांचाच वापर सुरु केला. सुरुवातीला तरी हे अजिबात शक्य नव्हते. लहानपणीच तिने निश्चय केला की आपण जसे आहोत तसंच राहायचं.

आपल्या शारीरिक दुर्बलतेचा तिने बाऊ न करता धैर्याने स्वीकार केला. तिच्याकडे पाहताना लोक किती कुतूहलाने आणि आश्चर्यकारक नजरेने पाहतात हे तिला स्पष्ट दिसत होते. परंतु, तिने त्याकडे साफ दुर्लक्ष केले.

कृत्रिम हातांचे ओझे बाळगण्याऐवजी हातांशिवाय काम करताना तिला जास्त हलके वाटत होते. हात नसल्याने लहानपणी तिला मैदानावर इतर मुलांसोबत खेळायला मिळत नसे. पण, याचेही तिने कधी वाईट वाटून घेतले नाही. उलट मोठे झाल्यावर आपण सुपर वूमन होऊ आणि इतरांसाठी काहीतरी करू असे स्वप्न तिने पहिले.

या सगळ्या प्रवासात तिचे वडील एखाद्या वटवृक्षाप्रमाणे तिच्या पाठीशी उभे राहिले. त्यांना आपल्या लेकीची क्षमता आणि हिंमतीवर पूर्ण विश्वास होता. त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे जेसिकाचा आत्मविश्वास दुणावत होता.

तिला नृत्याची फार आवड. आपल्याला दोन्ही हात नाही ही बाब आड येऊ न देता तिने नृत्याचे धडे घेतले.

शाळेच्या स्नेहसंमेलनात जेंव्हा जेसिकाला व्यासपीठावर नृत्य सादर करण्याची संधी मिळाली तेंव्हा ती आपल्या शिक्षिकेला म्हणाली, “मॅडम, मला सगळ्यात पाठीमागच्या लाईनमध्ये उभी करा. मला पाहून लोकं हसतील.” यावर तिच्या शिक्षिका म्हणाल्या, “या नृत्यासाठी आम्ही एकच लाईन बनवली आहे. त्यामुळे तुलाही इतर मुलांच्या बरोबरीने उभे राहूनच हा परफॉर्मन्स करावा लागेल.” जेसिकाने जेंव्हा सर्व मुलांसोबत व्यासपीठावर नृत्य सादर केले तेंव्हा प्रेक्षकांनी तिच्यासाठी जोरजोरात टाळ्या वाजवल्या. या प्रोत्साहनाने जेसिका भारावून गेली.

वयाच्या १४व्या वर्षी तिने तायक्वांदोमध्येही ब्लॅकबेल्ट मिळवला. एकदा एका एनजीओने जेसिकाला विमान उडवण्याची इच्छा आहे का? असे विचारले. क्षणाचाही विलंब न करता तिने होकार दिला. बाविसाव्या वर्षापासून जेसिकाने विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. पंचविसाव्या वर्षापर्यंत तिने हे प्रशिक्षण पूर्ण केले.

सर्वसाधारणपणे पायलटचे प्रशिक्षण पूर्ण करण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागतो पण, जेसिकाला हे प्रशिक्षण पूर्ण करण्यास तीन वर्षे लागली. हात नसताना विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेणे, ही काही खायची गोष्ट नव्हती. अगदी रात्रीचा दिवस करून तिने हे अवघड प्रशिक्षण पूर्ण केले. ८० तासांचे हे प्रशिक्षण तिने तीन वेगवेगळ्या टप्प्यात पूर्ण केले.

तायक्वांदोत ब्लॅकबेट मिळवणारी ती पहिली आर्मलेस महिला आहे. फक्त तायक्वांदोच नाही तर, तिने जिम्नॅस्टिक्स, डान्सिंग आणि स्विमिंगमध्येही अभूतपूर्व कौशल्य प्राप्त केले आहे. स्वतःतील अत्मिविश्वास वाढवण्यासाठी तिने लहानपणापासूनच स्वसरंक्षणाचे धडे घेतले. यामुळे स्वतःतील भीतीवर विजय मिळवणे तिला सोपे गेले.

२०१२ मध्ये तिने तायक्वांदोतील सिनियर ब्लॅकबेल्ट धारक पॅट्रिक चेंबरलेनशी विवाह केला. आपल्या पतीसोबत तिने सर्व महाद्विपांचा दौरा केला आहे. वेगवेगळ्या देशांत जाऊन तिने आपल्या प्रेरणादायक वक्तृत्वाने हजारो लोकांच्या आयुष्यात आशेचे दीप प्रज्वलित केले आहेत.

युनिव्हर्सिटी ऑफ एरिजोनामधून तिने मानसशास्त्रातील पदवी मिळवली आहे. स्वतःच्या आयुष्यातील कमतरतेवर तिने कशाप्रकारे विजय मिळवला, याचे धडे ती इतरांनाही देते. स्वतःच्या उदाहरणातून ती इतरांनाही प्रेरणा देते.

ती एक उत्तम मोटिव्हेशनल स्पीकर आहे. समुद्राच्या खोल पाण्यात सूर मारून वर येणारी एक उत्तम जलतरणपटू आहे.

इतर लोकांप्रमाणे ती कार चालवते. पियानो देखील वाजवते. ही सगळी कामे करताना ती फक्त आपल्या पायांचाच वापर करते.

अगदी धडधाकट माणसालाही एकाच वेळी इतकी सारी कौशल्ये आत्मसात करणे कठीण वाटते. पण, जेसिकाने हे करून दाखवले आहे. तिच्या मते तुमचे विचारच तुमच्या जीवनात प्रभावी ठरतात. तुमचे विचार आणि भावना सकारात्मक असतील तर तुम्ही हवे ते साध्य करू शकता. तुमची शारीरिक दुर्बलता यामध्ये कुठेही आड येत नाही.

एक अर्मलेस पायलट म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनेही तिची दाखल घेतली आहे.

जेसिकाच्या आयुष्याचा हा संपूर्ण प्रवास पाहता, इतकेच म्हणता येईल की शारीरिक सक्षमतेपेक्षाही आपली मानसिक सक्षमता खूप महत्वाची आहे. मानसिकदृष्ट्या खचलेला, खंगलेला माणूस फक्त तक्रारींचा पाढा वाचू शकतो. पण, ज्याच्याजवळ मानसिक सक्षमता आहे आणि आहे त्या परिस्थितीला स्वीकारण्याची तयारी आहे, तोच त्या परिस्थितीवर मात करून पुढे जाऊ शकतो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!