आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
जनुकशास्त्र, उत्क्रांती, अनुवांशिकता, आयव्हीएफ तंत्रज्ञान, गणित अशा अनेक विज्ञान शाखांचा गाढा अभ्यास असणारे हाल्डेन हे जन्माने ब्रिटीश असूनही त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारले होते. हाल्डेनसारख्या शास्त्रज्ञांनी पूर्वी कधीच भारतात येण्याचा विचार केला नव्हता. पण, हाल्डेन भारतात आले. त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारले. शेवटपर्यंत ते भारतातच राहिले.
ते नेहमी म्हणायचे की, “सरकारला त्रास देत राहणे हे चांगले नागरिक असल्याचे लक्षण आहे.” त्यांनी भारत सरकारच्या काही गळचेपी धोरणांबद्दल आवाजही उठवला.
आपला देश सोडून भारतात येणारे आणि इथले नागरिकत्व स्वीकारून इथलेच बनून जाणारे हाल्डेन यांच्याबद्दल आज फार कमी लोकांना माहिती असेल. त्यांचे संशोधन आणि भारतात येण्यामागची कारणे याबाबत अधिक जाणून घेऊया या लेखातून.
लोकसंख्या अनुवंशिकता, जनुके आणि उत्क्रांती अशा क्षेत्रांत महत्त्वाचे संशोधन करणाऱ्या जॉन बर्डन सँडर्स हाल्डेन यांचा जन्म ५ नोव्हेंबर १८९२ रोजी ऑक्सफर्ड येथे झाला.
हाल्डेन जन्माने ब्रिटीश असूनही त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारले होते.
उत्क्रांती जीवशास्त्रासह विज्ञानातील अनेक शाखांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांचे वडील जॉन स्कॉट हाल्डेन हे स्वतः शरीरविज्ञानशास्त्रातील संशोधक होते.
जॉन स्कॉट यांचा प्रभाव त्यांचा मुलगा जॉन बर्डनवर, होता. अगदी लहान वयापासूनच त्याने वडिलांना त्यांच्या प्रयोगात सहकार्य केले. त्यांच्या अफाट बुद्धीमत्तेची चुणूक लहानपणीच जाणवली होती. वयाच्या पाचव्या वर्षापासून ते ब्रिटीश असोसिएशनच्या अहवालांचे वाचन करत होते.
वयाच्या दहाव्याच वर्षी वडिलांच्या प्रयोगासाठी वेगवेगळ्या वायूंचे मिश्रण करून त्यांच्या प्रयोगासाठीची प्राथमिक तयारी करून देत असत.
एकदा ते वडिलांसोबत ए. डी. डर्बीशायर यांचे व्याख्यान ऐकायला गेले होते. विषय होता मेंडेलीफच्या अनुवंशिकता, वर्चस्व आणि अलगीकरणाचा सिद्धांताचा.
या व्याख्यानानंतर जे. बी. एस. यांच्या आयुष्याने एक नवे वळण घेतले. या व्याख्यानाने त्यांच्यातील जनुकीय शास्त्राबद्दलची ओढ आणखी तीव्र झाली. मानवी जनुकीय शास्त्राच्या पाया रचण्यात जे. बी. एस. यांचे योगदान खूप मोठे आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठातून १९१२ साली त्यांनी गणितात पहिल्या श्रेणीतील ऑनर्स मिळवले होते. वयाच्या २०व्या वर्षी त्यांनी आपला पहिला शोधनिबंध सादर केला होता.
पहिल्या महायु*द्धाच्या वेळी त्यांच्या शिक्षणात खंड पडला. यावेळी त्यांना सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू व्हावे लागले. फ्रान्स आणि इराकमधील यु*द्धभूमीवर त्यांनी योगदान दिले. पहिले महायु*द्ध संपल्यानंतर त्यांनी पुन्हा आपले संशोधन सुरु केले.
१९१९ ते १९२२ याकाळात त्यांनी न्यू कॉलेज ऑक्सफर्ड येथे रुजू झाले. त्यानंतर ते केंब्रीज विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करू लागले. तेव्हा त्यांचे एन्झाइम्स आणि जेनेटिक्स याविषयावरील संशोधन सुरूच होते.
केंब्रीजमधील त्यांच्या एका सहकाऱ्यांनी त्यांच्याबद्दल अशी टिप्पणी केली होती की, “कदाचित ते जगातील शेवटचे असे व्यक्ती असतील ज्यांना ते सगळं माहिती आहे जे माहिती असायला हवं.” त्यानंतर ते युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
सायन्स फिक्शन लिहिणारे ब्रिटीश लेखक आर्थर सी. क्लार्क यांच्या मते, “जे. बी. एस. हाल्डेन हे त्यांच्या पिढीतील अतिशय लोकप्रिय शास्त्रज्ञ होते.” सामान्य लोकांपर्यंत विज्ञान पोहोचवायचे असेल तर विज्ञानाची लोकप्रियता वाढवली पाहिजे हे हाल्डेनला माहिती होते. म्हणूनच ते अत्यंत सोप्या भाषेत आपले लेख लिहित असत आणि त्यांच्या लेखांचे शीर्षक देखील अत्यंत सुटसुटीत असत.
‘व्हिटामिन्स’, एन्झाइम्स’, डार्विनियनिजम टुडे’ असे आगदी सोप्या भाषेत त्यांनी लेख लिहिले. अनेक प्रसिद्ध प्रकाशकांनी त्यांचे हे लेख प्रकाशित केले.
जनुकीय शस्त्रात त्यांनी अनेक शोधनिबंध सादर केले. त्यांचे हे सारे शोधनिबंध संक्षिप्त रुपात त्यांच्या ‘द कॉज ऑफ इव्होल्युशन’ या पुस्तकामध्ये एकत्र करण्यात आले आहेत. हे पुस्तक ‘पॉप्युलेशन जेनेटिक्स’मधील एक मुलभूत पुस्तक मानले जाते.
संसर्गजन्य रोगांमुळे निर्माण होणाऱ्या रोगप्रतिकारशक्तीचा मानवी उत्क्रांतीमध्ये महत्त्वाचा वाटा असल्याचेही त्यांनी दाखवून दिले.
ऑक्सफर्डमध्ये असताना त्यांचा राजकारणात रस निर्माण झाला. ते ऑक्सफर्डच्या लिबरल क्लबचे सदस्य झाले. तिथल्या वादविवादात आणि चर्चेत सहभागी होऊ लागले. ते स्वतःला मार्स्कवादी आणि नास्तिक समजत. पहिल्या महायु*द्धाच्या वेळी त्यांची ओळख समाजवादी अशी झाली होती. ग्रेट ब्रिटनच्या कम्युनिस्ट पक्षाला त्यांनी जाहीर पाठींबा दिला होता.
ते स्वतः एकदा म्हणाले होते, “लेनिन आणि इतर लेखक वाचल्यानंतर मला कळाले की, आपल्या समाजात नेमकं कुठं चुकतंय आणि त्यावर कोणता उपाय अवलंबला पाहिजे.”
दुसऱ्या महायु*द्धाच्या अखेरीस त्यांचा या सत्ताधीशांकडूनही अपेक्षा भंग झाला आणि १९५० मध्ये त्यांनी पक्षाला कायमचा रामराम ठोकला. स्युएझ क्रायसिसमध्ये ब्रिटीश सरकारने जी भूमिका बजावली त्यामुळे ते ब्रिटीश सरकारवर नाराज झाले. तेव्हाच त्यांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला.
भारतातील उबदार वातावरण आणि माजी पंतप्रधान नेहरू यांचे देशात चाललेले समाजवादी प्रयोग या गोष्टींमुळे ते भारताकडे आकर्षित झाले. पत्नी हेलेनसह त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारले. त्यांच्या पत्नी हेलेन देखील प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ होत्या.
१९५७ साली ते भारतातील भारतीय सांख्यिकी संस्था कोलकत्ता येथे दाखल झाले. १९६१पर्यंत त्यांनी इथे संशोधक प्राध्यापक म्हणून काम केले.
नंतर ते ओडीसामध्ये गेले. तिथे जनुकीय आणि जीवसांख्यिकी अभ्यासासाठी एक स्वतंत्र संस्था स्थापन करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी स्टडी ऑफ जेनेटिक्स इन इंडिया यावर स्वतंत्र काम सुरु केले.
आंध्रप्रदेशमधील प्रजनन आणि तेथील रंगांधळेपणा यावर त्यांनी संशोधन केले.
भारतातल्या वास्तव्यात त्यांनी मानवी जनुके आणि प्राण्यांमधील जनुके याबद्दल सखोल संशोधन केले. नितीनियमांमुळे प्रजनन शास्त्रावर होणाऱ्या परिणामांवर त्यांनी जास्त भर दिला आणि त्याचे विट्रो फर्टिलायझेशनवर काय परिणाम होतील याबाबत ही सावध केले.
अ*ण्वस्त्रातून उत्सर्जित होणाऱ्या किरणांमुळे ह्युमन म्युटेशन रेटवरील परिणाम आणि जनुकीय नुकसान याबाबत त्यांनी केलेल्या संशोधनामुळेच खुल्या हवेत अ*ण्वस्त्र चाचणी करण्यावर बंदी घालण्यात आली.
मलेरिया आणि थॅलेस्मिया या आजारामागील कारणांचाही शोध त्यांनीच लावला.
आपल्या वडिलांप्रमाणेच संशोधन आणि प्रयोगासाठी ते कोणतीही धोका पत्करायला तयार असत. कधीकधी एखाद्या वायूचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी ते स्वतः श्वासातून तो वायू आत शोषून घेत.
कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड यांचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी त्यांनी स्वतःवरच प्रयोग केला होता आणि त्यांचे परिणाम सिद्ध केले होते.
त्यांना स्वतःला संशोधन, प्रयोग आणि विज्ञान याबाबत जितकी ओढ होती तितकीच ओढ त्यांनी त्याच्या विद्यार्थ्यांच्यातही निर्माण केली.
ते नेहमी म्हणत, “हे विश्व समजून घ्यायचे असेल तर आपल्याला त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. आपण जितके समजतो तितके हे जग अकल्पित नाही तर हे जग इतके अकल्पित आहे की त्याचा आपण विचारही करू शकत नाही.”
१ डिसेंबर १९६४ साली वयाच्या ७२व्या वर्षी कॅन्सरमुळे त्यांचे निधन झाले. संशोधनाबद्दल कमालीची आस्था असणाऱ्या हाल्डेन यांनी मृत्युपुर्वीच देहदान केले होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.