आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपल्या आयुष्यात खेळाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. खेळ म्हटलं की सगळ्यात आधी आठवते स्पर्धा. स्पर्धा म्हणजे तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात कुठे आहात याचा मापदंडच. भावी आयुष्यात वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जाण्याची तयारी छोट्यामोठ्या स्पर्धांमधूनच होत असते. अगदी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या खेळांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. आणि यातही ऑलिम्पिक हा वलयांकित प्रकार आहे.
जागतिक स्तरावर एखाद्या खेळातील सर्वोत्तम खेळाडू ठरविण्यासाठी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केल्या जातात. ऑलिम्पिक खेळांची सुरुवात कधी झाली याबद्दलची निश्चित माहिती उपलब्ध नाही. प्राचीन ग्रीक साम्राज्यामध्ये या स्पर्धा दर चार वर्षांनी घेतल्या जायच्या.
पहिल्या प्राचीन ऑलिम्पिक स्पर्धा इ.स. पूर्व ७७६मध्ये घेण्यात आल्या. या स्पर्धा ग्रीक देव ‘झीयस’ यांच्या सन्मानार्थ ऑलिंपिया या शहरात घेण्यात येत. सर्वप्रथम हे गेम्स ग्रीसमधल्या ऑलिंपिया या शहरात खेळले गेले.
आधुनिक ऑलिम्पिक खेळांची सुरुवात १८९६ मध्ये अथेन्स (ग्रीस) येथे झाली. यामध्ये एकूण १४ देश सहभागी झाले होते. आधुनिक ऑलिम्पिक सुरू करण्यामागे फ्रेंच इतिहासकर व शिक्षणतज्ज्ञ ‘प्येर दी कुर्बेर्ती’ यांचा हात आहे. ते ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’चे संस्थापक होते. त्यामुळे ‘कुर्बेर्ती’ हे आधुनिक ऑलिम्पिकचे जनक मानले जातात.
सध्या पॅरिस ऑलिम्पिकमुळे सर्वत्र ऑलिम्पिकची चर्चा आहे. २०२१ साली मात्र या खेळाची टप्पा पृथ्वीच्या कक्षा ओलांडून पलीकडे गेला होता. होय! तुम्ही बरोबर वाचलंय. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरील एस्ट्रोनॉट्सवर ऑलिम्पिक खेळांनी गारुड निर्माण केलं होतं.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे पृथ्वीपासून सुमारे चारशे किलोमीटर उंचीवर लो ऑर्बिट कक्षेत असलेलं स्पेस स्टेशन. या स्पेस स्टेशनध्ये अवकाशात काम करणाऱ्या चार यंत्रणा कार्यरत आहेत. यामध्ये अमेरिकेच्या नासाचाही समावेश आहे.
२०२१ साली तब्बल पाच वर्षांनी टोकियो येथे ऑलिम्पिक गेम्सचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी जगभराला कोरोना महामारीने ग्रासल्याच्या आणि विविध देशांमध्ये लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर हे गेम्स अनेकांना वाळवंटातल्या ओऍसिसप्रमाणे वाटत होते. सगळे क्रीडारसिक ऑलिम्पिक्सचा आनंद घेत असताना एस्ट्रोनॉट्सही मागे राहिले नाहीत. त्यांनीही अवकाशातून त्यांच्या स्पेस स्टेशनमधून ऑलिम्पिक सामन्यांच्या उद्घाटनाचं प्रक्षेपण पाहिलं. आपल्या आपल्या देशासाठी चिअर अप देखील केलं. त्यासाठी त्यांनी राबवला एक अनोखा उपक्रम. काय होता तो?
तर, टोकियो ऑलिम्पिक्स सुरू व्हायच्या एक आठवडा आधी स्वतःचं स्पेस ऑलिम्पिक विकसित केलं. अगदी खऱ्याखुऱ्या ऑलिम्पिक्समध्ये विजेत्यांना देतात तशी मेडल्सपण त्यांनी ऑलिम्पिकच्या दरम्यान दिली.
फ्रेंच एस्ट्रोनॉट असलेल्या थॉमस पेस्केट याने एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत, ‘आम्ही पहिलं स्पेस ऑलिम्पिक्स आयोजित केलं!’ अशी घोषणाही केली. स्पेस ऑलिम्पिक्ससाठी दोन टीम्स तयार केल्या गेल्या- सॉयूज टीम आणि क्रू ड्रॅगन टीम. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा कमांडर म्हणून अकिहिको होशिदे तेव्हा कार्यरत होता. उरलेल्या क्रू मेंबर्समध्ये शेन किंबरो, मेगन मॅकार्थर, मार्क वांदे हेई, प्योत्र दुब्रॉव्ह, ओलेग नोव्हित्स्की आणि थॉमस पेस्केट यांचा समावेश होता.
आता या स्पेस ऑलिम्पिकमध्ये गेम्स कोणकोणते असतील? याची उत्सुकता सगळ्यांनाच असणार. इथं गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे खेळाचे स्वरूप पृथ्वीवरच्या खेळांपेक्षा वेगळे असणार हे तर नक्कीच. त्यासाठी- ओरिजिनल आयडिया मिळावी यासाठी- क्रू मेम्बर्समध्ये बरंच विचारमंथन होऊन अखेरीस काही गेम्स निश्चित करण्यात आले.
थॉमस पेस्केटने वर्णन केल्याप्रमाणे या इव्हेंटमध्ये सिंक्रोनाइज्ड फ्लोटिंग, लांब उडी (अंतर जास्त असलेली), लॅक ऑफ फ्लोअर रुटीन, नो हँडबॉल असे गेम्स होते.
या स्पर्धांना अस्सल रूप देण्याकरता स्पेस स्टेशनमधील लॅबच्या छतावर असलेल्या जगाच्या नकाशावर विविध देशांच्या स्थानी त्या त्या देशांचे मिनी फ्लॅग्ज लटकवले गेले होते. या स्पेस स्टेशनच्या क्रू मेम्बर्समध्ये पेस्केटसह इतरही काही जण क्रीडाप्रेमी आहेत आणि संपूर्ण क्रू दररोज अडीच तास व्यायाम करत असे.
ऑलिम्पिकच्या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजवर पेस्केटने एका व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश पाठवला. पृथ्वीपासून चारशे किलोमीटर अंतरावर असलेल्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधून आम्ही टोकियो ऑलिम्पिक गेम्स पाहायला उत्सुक आहोत. सर्व खेळाडूंना मी अंतराळातून शुभेच्छा देतो असा हा संदेश त्याने पाठवला होता.
स्पेस ऑलिम्पिक्सच्या आयोजनातून आणि स्पेसमधून ऑलिम्पिक्स एन्जॉय करण्याच्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या कल्पनेतून जणू अवकाशही पृथ्वीशी जोडलं गेलं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.