आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जगाच्या एकूण लोकसंख्या क्रमवारीत २३ टक्क्यांसह इस्लाम हा दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे. एवढी मोठी लोकसंख्या असून देखील जगातल्या सायंटिफिक कम्युनिटीमधलं प्रतिनिधित्व आणि संशोधन क्षेत्रातलं त्याचं योगदान एक टक्क्या पेक्षाही कमी आहे. आजवर फक्त तीन मुस्लीम संशोधकांना विज्ञान विषयातल्या नोबेल पारितोषिकाने सन्मानित केलं आहे.
एकूणच आजच्या काळात मुस्लीम समाजाचा शिक्षण आणि विज्ञान या क्षेत्राकडे ओढा फार कमी आहे.
त्यामुळे इस्लामचं विज्ञान व इतर ज्ञानशाखांमध्ये काहीच योगदान नाही अशी सामान्य व्यक्तींची समजूत होणं साहजिक आहे. परंतु इस्लामचा एकूणच प्रवास पाहता सध्या त्यांच्यात दिसणारी विज्ञान, तंत्रज्ञान, कला इत्यादी क्षेत्रातली उदासीनता ही अलीकडच्या काळातली आहे हे जाणवतं.
सुरुवातीच्या काळातलं साहित्य व विज्ञान या क्षेत्रातलं मुस्लिमांचं योगदान पाहता आता त्यांच्यात दिसणारी उदासीनता मन विषण्ण करणारी आहे.
इस्लामपूर्व काळापासून आशिया, आफ्रिका आणि युरोपमधले व्यापारी कलाकुसरीच्या वस्तू, रेशीम, मसाले व इतर वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर व्यापार करत. यातली सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे रेशीम कापड. रेशीम कापड हे सत्ता आणि संपत्तीचं प्रतिक समजलं जात असे. या कापडाला जगभरातून मोठ्या प्रमाणावर मागणी होती.
अनेकवेळा रेशीम कापडाचा चलन म्हणून देखील विनिमय होत असे. म्हणूनच जगातील सर्वांत प्राचीन आणि सर्वांत महत्त्वाच्या व्यापारी मार्गाला ‘सिल्क रूट’ असं नाव पडलं.
सिल्क ट्रेडच्या वाढीसाठीच तत्कालीन रोमन व पर्शियन राज्यकर्त्यांनी सिल्क रूट वर आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.
परंतु दोन्ही बाजू नेहमी यु*द्धजन्य परिस्थितीत असल्यामुळे सिल्क रूटचा पूर्ण क्षमतेने वापर होऊ शकला नाही.
आठव्या शतकात उम्माइद घराण्याच्या पतनानंतर इस्लामिक सत्ताकेंद्र अब्बसीद घराण्याकडे हस्तांतरित झालं. त्यामुळे आयबेरीअन द्वीपकल्पापासून ते चीन व भारताच्या सीमेनजीकपर्यंत अरबांची निरंकुश सत्ता स्थापन झाली.
सिल्क रूटवर असलेलं पर्शिअन रोमन संघर्षाचं सावट संपलं आणि विविध देशांमधील वस्तू आणि विचारांची देवाणघेवाण झपाट्यानं होऊ लागली.
याच काळात सिल्क रूटवरून व्यापारी तांड्यामार्फत इजिप्शिअन काचेच्या वस्तू, पर्शिअन केशर, तुर्कमेनिस्तान मधील उमदे घोडे, तमिळ पोलाद, चिनीमातीची भांडी, लाख इत्यादी वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर व्यापार झाला.
या सिल्क रूट वर पूर्णपणे अब्बसीद घराण्याचं नियंत्रण होतं. त्यांनी सिल्क रूटवर ठिकठिकाणी चेकपॉइन्ट उभे केले होते जेथे वस्तूच्या मूल्याच्या तुलनेत त्याचा जकात भरावा लागत असे.
खालीफाने व्यापार उदिमाला चालना देण्यासाठी सिल्क रूट वर समरकंद, बाल्ख, ताब्रीज इत्यादी शहरं वसवली होती. याच काळात वैभवशाली ‘मर्व’ शहराला ‘मदर ऑफ अर्थ’ म्हणून आणि या शहराचा प्रतिस्पर्धी असलेल्या ‘अरे’ शहराला ‘गेट ऑफ कॉमर्स’ म्हणून ओळखलं जात असे.
अब्बासिद घराण्याचा दुसरा खलिफा अल मन्सूर ने टायग्रीस नदीच्या काठावर शाळा, दवाखाने, बाजार, मशिदी अशा सर्व सोयींनी संपन्न असं बगदाद शहर वसवलं आणि राजधानी दमास्कस वरून बगदादला हलवली. पुढे हेच बगदाद ज्ञानाचं जागतिक केंद्र बनलं.
बगदादच्या आर्थिक भरभराटीनंतर एकूणच लोकांची ज्ञान, कलाकुसर, भांडी, नवीन कपडे इत्यादींसाठीची मागणी वाढली. यात चीनी कागदाला सर्वात जास्त मागणी होती.
खिलाफतीच्या प्रशासनात देखील चीनी कागदाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असे. मागणी वाढली, कागद सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात आला. साहित्य निर्मितीला चालना मिळाली.
मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्मिती होऊ लागली. विचाराला चालना देण्यासाठी खलिफ अल रशीद याने खिलाफतीच्या तिजोरीतून भव्य ग्रंथालयाची निर्मिती केली.
खलीफ अल रशीद याने संस्कृत, ग्रीक, चायनीज, फारसी भाषेतलं भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, ज्योतिष, भूगोल, तत्वज्ञान, अंकशास्त्र इत्यादी विद्याशाखांमधील ज्ञान अरबी भाषेत भाषांतरित करून घेतलं. त्यासाठी त्याने अनेक बुद्धिमान लोकांना आपल्या दरबारात स्थान दिलं.
तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे रोज भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण झाले. उदाहरणार्थ खगोल आणि त्रिकोणमिती मधील प्रगतीमुळे मक्केची दिशा शोधणं, नमाजाच्या वेळा पाळणं सोपं झालं.
अभियांत्रिकी, शेती इत्यादी क्षेत्रामध्ये अनेक मुलभूत बदल झाले. शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाली. इतर भाषेतील नवनवीन शोध, संशोधनपर लेखन झपाट्याने अरबी मध्ये भाषांतरित केलं जात होतं. अरबी भाषा ही जागतिक स्तरावर ज्ञानभाषा म्हणून नावारूपास येत होती.
एकेकाळी लष्करी, आर्थिक आणि सांस्कृतिक सत्ताकेंद्र अशी ओळख असलेली अब्बासीद खलीफत विचारवंतांचा स्वर्ग म्हणून ओळखली जाऊ लागली. याच काळात जगभरातील विविध क्षेत्रातील अनेक विद्वानांनी संशोधन, लेखन करण्यासाठी बगदादला स्थलांतर केलं.
भारत, चीनपासून ते इटली, स्कॅन्डेनेव्हियामधून अब्बासीद खलिफतीमध्ये मोठ्या प्रमाणावर अभ्यासकांची स्थलांतरं झाली.
ज्याला संशोधन करायचं आहे त्याने बगदादला स्थलांतर करावं असा अलिखित नियम बनून गेला होता. सातवा खलीफा अल ममूनच्या काळात संशोधनातल्या गतीला अजून चालना मिळाली. त्याने शाही ग्रंथालयाला ‘हाउस ऑफ विज्डम’ असं नाव देऊन शिक्षणाचं केंद्र सुरु केलं.
त्याच्याच काळात इब्न इशाक अल किंडी या बहुशाखीय विद्वानाला भाषांतराचा प्रमुख नेमलं.
‘हाउस ऑफ विज्डम’ हा ज्ञान निर्मितीमधला एक महत्त्वाकांक्षी प्रयोग होता. पुढे खलीफाच्या तिजोरीतून खिलाफातीमध्ये सर्वदूर ठिकाणी अशा अनेक केंद्रांची स्थापना केली. त्यामध्ये निशापूर, बुखारा, काबुल या शहरातील विद्यापीठांनी वेगळी उंची गाठली.
या खलीफाकडे योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी नेमण्याचं कौशल्य होतं. याच खलीफाच्या काळात भारतीय आणि ग्रीक साहित्य अरबी मध्ये आणणारा आणि बीजगणितामध्ये महत्वाचं योगदान देणारा ‘अल-खवारीज्मी’, युरोपिअन रसायनशास्त्राला अमूल्य योगदान देणारा ‘इब्न-हय्याम’, मध्य आशियाच्या इतिहाचं इतिवृत्त लिहिणारा ‘अल-ताब्बारी’, भूमिती मध्ये महत्वाचं योगदान देणारा ‘बानू-मुसा’ यांनी संशोधनात विशेष भर घातली. यात ‘अल-अस्त्रुलाबी’, ‘लुबना ऑफ कॅर्डोबा’ अशा स्त्रिया देखील आघाडीवर होत्या.
ग्रीक तत्वज्ञान, भारतीय अंकशास्त्र, पर्शिअन प्रशासन व्यवस्था, चीनी साहित्य याचा अरब विद्वानांवर विशेष प्रभाव पडला. ते सोक्रेटीस, अरीस्टोटल, प्लेटो, टोलेमी, ब्रह्मगुप्त, सुश्रुत इत्यादी विद्वानांचे अनुयायी बनले.
त्यांनी त्यांच्या संशोधनात मोलाची भर घातली. त्यातूनच ऍरिस्टोटलीएन आणि निओ प्लेटोनिजममधून एका नव्या विचाराचा जन्म झाला त्याला अरबी लोक ‘मुताझीलाईट’ म्हणून ओळखत असत.
मुताझिलाईट तत्त्वज्ञान हे ग्रीक तत्त्वज्ञानाचं इस्लामला अपेक्षित असलेलं रूप होतं. तरीही त्यावर कुराण, हादीसचा विशेष प्रभाव नव्हता. ते तत्वज्ञान उदारमतवादी होतं.
खिलाफतीमधील ख्रिश्चन, ज्यू, शिया मुस्लीम इत्यादी अल्पसंख्यांक समुदायांना सौहार्दाची वागणूक मिळत असे. इस्लाम, कुराण, हादीस यांची कठोर चिकित्सा केली जात असे.
नवव्या शतकाच्या मध्यात सातवा खलीफ अल ममून याने राजकीय ताकदीबरोबर धार्मिक ताकद हस्तगत करण्यासाठी मुतझीला तत्वज्ञानाची सर्वांवर सक्ती केली. विरोध करणाऱ्यांना जाहीर शिक्षा दिल्या.
खलीफ अल ममून याचं त्याच वर्षी निधन झालं परंतु त्याच्या उत्तराधिकारी खलीफाने त्याचं धोरण चालूच ठेवलं. अनेक लोकांनी या बुद्धीप्रमाण्यावादी तत्वज्ञानाचा विनाअट स्वीकार केला. परंतु बगदाद मधील ‘इब्न-हम्बाल’ या विद्वानाने व त्याच्या अनुयायांनी कुराण आणि हादीस हेच सर्वोच्च आहेत त्याच बरोबर त्याची चिकित्सा केली जाऊ शकत नाही असं म्हणत बुद्धीप्रामाण्यवादी मुताझीला तत्त्वज्ञानाचा स्वीकार करण्यास नकार दिला.
त्याने केलेल्या बंडामुळे इब्न हम्बाल याला खलीफाने कैदेत टाकलं, यातना दिल्या, बगदाद मधून हाकलून दिलं. या कारणाने इब्न हम्बालच्या प्रती एक सहानुभूतीची लाट साम्राज्यात पसरली.
अनेक लोक त्याच्या समर्थनात रस्त्यावर उतरले. अशातच खलीफाचे निधन झाले आणि खलीफ अल मुत्तावकील वयाच्या २६व्या वर्षी जगातील सर्वात मोठ्या साम्राज्याच्या सत्तेवर आला.
त्याच्या कारकिर्दीची खडतर सुरुवात झाली होती. खलीफाने इब्न हम्बाल पुढे नमतं घेत मुताझील तत्त्वज्ञान नाकारून हम्बालने सांगितलेला कुराणचाच पारंपारिक मार्ग स्वीकारला. या घटनेचा दूरगामी परिमाण इस्लामवर झाला.
मुताझीला तत्त्वज्ञान मुख्यप्रवाहातून बाहेर पडले, खलीफाचे हक्क मर्यादित केले गेले, तसेच इस्लामिक मूलततत्त्ववादी तत्त्वज्ञानाला पोषक वातावरण निर्माण झालं. त्यातूनच पुढे इस्लाममध्ये अनेक कट्टर पंथ उदयाला आले.
सिल्क रोड आणि गुलामांच्या उपलब्धतेमुळे जागतिक अर्थव्यवस्था चांगलीच भरभराटीला आली होती. अंगभूत गुणवत्तेमुळे आणि लढवय्या प्रवृत्तीमुळे गुलामांच्या बाजारात तुर्कांना विशेष मागणी असे. अब्बासीद साम्राज्याच्या सैन्यामध्ये अशा गुलाम तुर्कांचा मोठ्या प्रमाणावर भरणा होता.
अरब लोक साहित्य, ज्ञान याच्या निर्मितीमध्ये मश्गुल असताना सैन्यातील महत्त्वाच्या पदावर तुर्क लोक मांड ठोकून बसले होते.
खलिफापासून राजघराण्यातील अनेकांचे अंगरक्षक देखील तुर्क होते. आपण एका झटक्यात सत्ता हस्तगत करू शकतो हे तुर्कांच्या ध्यानात आलं. तुर्की अंगाराक्षांनी दहाव्या खलीफाची ह*त्या करून त्याच्या मुलाला खलीफ बनवलं. पुढे सहा महिन्यात त्याची देखील विष देऊन ह*त्या केली आणि तुर्कांनी सत्ता हस्तगत करून खलिफाला नामधारी प्रमुख बनवलं.
या घटनाक्रमाला इस्लामी इतिहासत ‘समाराची अराजकता’ म्हणून ओळखतात. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात बंडाळी माजली. स्थानिक सरदारांनी स्वतःचं सार्वभौमत्व घोषित केलं.
अब्बासीदांच्या पतनानंतर देखील बुद्धिवादी अरबी विद्वानांचं संशोधन आणि चिकित्सा सुरूच राहिली. याच काळात अरबी विद्वानांमध्ये ‘अणु’ वर संशोधन सुरु झालं होतं. परंतु अरबी विद्वानांमध्ये कुराणची चिकित्सा, विज्ञानातलं संशोधन, अध्यात्मिक तत्वज्ञान या विषयांवरून मतभेद वाढत गेले.
त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथा पालथ झाली. राजकीय सत्ताकेंद्र बगदाद पासून कॉन्स्टॅन्टिनोपल येथे स्थलांतरित झालं. वैभवशाली बगदाद शहराला अवकळा आली. हिं*सक तुर्कांकडे इस्लामचं नेतृत्व गेलं. उदारमतवादी, चिकित्सक मुताझीला तत्त्वज्ञान पूर्णपणे बाजूला फेकलं गेलं आणि इस्लामची घोडदौड आजच्या दूरवस्थेकडे सुरु झाली.
एकेकाळी खुल्या मनाने परकीय तत्त्वज्ञान, चिकित्सक दृष्टीकोन, विज्ञान, साहित्य यांचा स्वीकार करणारा इस्लाम आणि आज समाजाच्या, ज्ञानाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेला इस्लाम हा इस्लामचा प्रवास नक्कीच चिंताजनक आहे.
मुस्लिमांच्या आजच्या धर्मवादी मानसिकतेला दोष देऊन त्याचं उत्थान होणार नाही. परंतु त्यांना जर त्यांच्याच उदारमतवादी, चिकित्सक मुताझीलाईत तत्वज्ञानाच्या इतिहासाची जाणीव करून दिली तर थोडाफार बदल घडण्याची पुसटशी आशा नक्कीच आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.