आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
इंटरनेटचा शोध जरी काही दशकांपूर्वी लागला असला तरीही त्या संशोधनाने मागील काही वर्षांतच आपली ताकद दाखवून देण्यास सुरुवात केली आहे. व्हिडीओ लोड होत असताना सगळेजण बराच वेळ आपली मान त्या लोडरसोबतच हालवतानाची एअरटेल कंपनीच्या 3G नेटवर्कची जाहिरात तुम्हाला आठवत असेलच. २०१२ च्या सुमारास ही जाहिरात येत असे.
आपण एखादा व्हिडीओ युट्युबवर पाहतो म्हणजेच त्या व्हिडिओचा काही भाग आपल्या मोबाईलच्या कॅशे मेमरीमध्ये स्टोअर होत असतो. त्यासाठी तो भाग आधी इंटरनेटवरून डाऊनलोडच होतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याकाळात डाऊनलोडिंगचा स्पीड एवढा कमी होता तर अपलोडींगच्या स्पीडबद्दल न बोललेलंच बरं..!
त्यावेळीदेखील जगातील अनेक कंपन्यांनी आपली वाटचाल डिजिटायझेशनकडे सुरु केली होती. अर्थात कंपन्यांचा हा निर्णय वाया गेला नाही, पण सुरुवातीच्या काळात मात्र अनेक कंपन्यांना स्लो इंटरनेटचा सामना करावा लागत होता. आज स्वस्त असणाऱ्या ऑप्टिकल फायबर, 4G आणि 5G च्या जमान्यात त्या काळासारख्या स्लो इंटरनेटच्या समस्या क्वचितच आढळत असतील. काही mb डेटा मोठ्या किंमतीने विकत घेऊनही अनेकांना स्लो इंटरनेटचा सामना करावा लागत असे.
एका साऊथ आफ्रिकन कंपनीने कबुतराच्या वेगाची तुलना देशातील सर्वात मोठी वेब फर्म, टेलकॉमशी केली. त्यांनी जणू कबुतराची आणि टेलकॉम कंपनी पुरवत असलेल्या इंटरनेट सेवेची रेसच लावली होती. मेसेंजर किंवा मेल या प्रकारची कबुतरं अत्यंत लांब अंतरावर असूनही आपली घरटी शोधण्यात पटाईत असतात. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया…
स्लो इंटरनेटला कंटाळलेल्या एका आयटीच्या कर्मचाऱ्याची गोष्ट थक्क करणारी आहे. वर्ष होतं २००९. साऊथ आफ्रिकेमधील होविक येथील ‘अनलिमिटेड आयटी कॉल सेंटर’ या कंपनीमध्ये काम करणारा एक कर्मचारी स्लो इंटरनेटमुळे प्रचंड वैतागला होता. प्रचंड संतापलेला हा कर्मचारी तावातावाने आपल्या बॉसच्या केबिनमध्ये शिरला आणि म्हणाला, “माझं इंटरनेट एवढं स्लो आहे की त्यापेक्षा जास्त स्पीडने एखादं कबुतर या फाईल्स ट्रान्सफर करेल..”
एऱ्हवी असं झाल्यावर कंपनीमधील वातावरण तापण्याची शक्यता असते. संतापाने आणि तावातावाने तो कर्मचारी थेट आपल्या बॉसच्या केबिनमध्ये जातो म्हटल्यावर त्याची नोकरीही धोक्यात येण्याची शक्यता होती. पण ‘अनलिमिटेड आयटी कॉल सेंटर’ कंपनीत असं काहीही झालं नाही. उलट त्या कर्मचाऱ्याच्या समस्येला गांभीर्याने घेतलं गेलं आणि त्याने दिलेल्या आयडियावर कंपनीने काम करायचं ठरवलं.
‘अनलिमिटेड आयटी कॉल सेंटर’ने या कामासाठी ११ महिन्यांच्या विन्स्टन नावाच्या कबुतराची निवड केली. विन्स्टनच्या पाठीवर 4GB ची यूएसबी लावून त्याला ‘अनलिमिटेड आयटी कॉल सेंटर’च्या होविक येथील ऑफिसमधून सोडण्यात आले. त्याला ‘अनलिमिटेड आयटी कॉल सेंटर’च्या दुर्बन येथील हेड ऑफिसमध्ये जाण्याचे निर्देश दिले होते. हे ठिकाण होविक येथील ऑफिसपासून सुमारे ६० मैल म्हणजेच ९७ किलोमीटरवर होते.
ज्यावेळी विन्स्टन नावाच्या कबुतराने ‘अनलिमिटेड आयटी कॉल सेंटर’च्या होविक येथील ऑफिसमधून उड्डाण केले, त्याच वेळी तेथील कर्मचाऱ्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून हेड ऑफिसमध्ये फाईल्स पाठवण्यास सुरुवात केली होती. सुमारे १ तास ८ मिनिटांनी विन्स्टन कबुतर दुर्बन येथील ‘अनलिमिटेड आयटी कॉल सेंटर’च्या हेड ऑफिसमध्ये पोहोचले. तेवढाच वेळ त्या कबुतराच्या पाठीवरील युएसबीमधील डेटा कम्प्युटर्समध्ये ट्रान्सफर करण्यासाठी लागला.
आश्चर्याची बाब म्हणजे ‘अनलिमिटेड आयटी कॉल सेंटर’च्या होविक येथील ऑफिसमध्ये इंटरनेटवर याच वेळामध्ये केवळ ४ टक्के फाइल्सच ट्रान्सफर झाल्या होत्या. त्या कर्मचाऱ्याचा दावा खरा ठरला आणि कबुतराचा वेग (त्यावेळी उपलब्ध असलेल्या) इंटरनेटपेक्षा जास्त आहे हे सिद्ध झालं. सुदैवाने आज मात्र परिस्थिती वेगळी आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.