आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतात एक असा काळ होता ज्यावेळी महिलांना चूल आणि मुल इथपर्यंतच मर्यादित ठेवलं गेलं होतं, पुढे जाऊन त्यांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला. शिक्षणामुळे महिलांच्या आयुष्यात क्रांती होऊन त्या पुढे आल्या असल्या तरी त्यांना पूर्णत: समानता कुठल्याच क्षेत्रात प्रदान करण्यात आली नव्हती. त्यांना संघर्ष करून स्वत:ला सिद्ध करावे लागले होते.
ज्या काळात मुलींना गाडी चालवण्यावर बंधनं होती, त्या काळी प्रेमा माथुर यांनी असाच संघर्ष करून त्या भारतातील पहिल्या व्यावसायिक पायलट बनल्या होत्या.
त्यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या अलिगडमध्ये १९२४ साली झाला. पण पुढे त्यांच्या वडिलांची बदली प्रयागला झाली आणि त्या प्रयागला वास्तव्यास गेल्या. प्रयागमध्येच त्यांचे बालपण गेले.
पाच भावंडांत त्या सर्वात लहान होत्या. त्या सहा महिन्याच्या असतांना त्यांच्या डोक्यावरील मातृछत्र हरवले होते.
त्यांनी प्रयागच्या ॲनि बेझंट हायस्कुलमध्ये आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. एविंग ख्रिश्चन कॉलेजमध्ये त्यांनी पुढचे शिक्षण घेऊन प्रयागच्या विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
माथुर यांचा मोठा भाऊ हा फ्लायिंग इन्स्ट्रक्टर म्हणून काम करत होता तर त्यांचा लहान भाऊ व्यवसाय करत होता. दुसऱ्या महायु*द्धानंतर त्यांच्या लहान भावाने काही जुनी विमाने विकत घेऊन भारतात आणली. त्यांनी ते विमान लंका फ्लाईंग क्लबला विकले.
ते विमान कोलंबोला नेऊन पोहचवण्यासाठी त्यांनी दिल्ली फ्लाईंग क्लबच्या कॅप्टन अटल यांना पाचारण केले. कॅप्टन अटल यांनी प्रेम माथूर यांच्यात वैमानिक बनण्याचे स्वप्न पेरले.
कॅप्टन अटल यांनी प्रेम माथूर यांना घाबरवण्यासाठी त्यांना आकाशात विमानाच्या सफरीवर नेले, त्यांना वाटलेलं की माथूर घाबरतील पण झालं उलटच.
त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट करून देखील माथुर यांच्या चेहऱ्यावर भीतीचा अंश दिसत नव्हता, उलट त्या या सर्व प्रकाराने खूप आनंदी आणि उल्हासित दिसत होत्या, यामुळे कॅप्टन अटल आश्चर्यचकित झाले होते.
पुढे त्यांनी अजून एकदा आकाशात उड्डाण केले परंतु यावेळी विमानाचे सर्व अधिकार प्रेम माथूर यांच्याकडे होते, कॅप्टन अटल यांनी जसे मार्गदर्शन केले तसे त्यांनी आकाशात उड्डाण केले होते आणि त्यांनी यशस्वीरीत्या लँडिंग देखील केले.
घरी परतल्यावर कॅप्टन अटल यांनी त्यांच्या हातात एक कागद ठेवला, त्यावर त्यांनाही लिहिलं की,’ तू खूप प्रतिभावान आहेस, तू पायलट का बनत नाही?’.
हे वाचल्यानंतर त्यांच्या मनात आशेची एक नवी पालवी फुटली आणि वैमानिक बनण्याची इच्छा त्यांच्यात जागृत झाली.
ऑक्टोबर १९४८ मध्ये त्यांनी लखनऊच्या फ्लाईंग क्लबच्या प्रमुख असलेल्या राजा बद्री यांना संधीची मागणी केली. त्यांनी नुकतीच आपली एक नवीन शाखा प्रयागला उघडली होती आणि कॅप्टन अटल यांचीच त्या ठिकाणी इन्स्ट्रक्टर म्हणून निवड करण्यात आली होती.
त्या कॅप्टन अटल यांच्या पहिल्या विद्यार्थीनी होत्या. अगदी अल्पावधीत माथूर एकट्याने विमान आकाशात उडवणे शिकल्या होत्या. हे सर्व त्यांच्या जिद्द आणि महत्त्वाकांक्षेमुळे शक्य झाले होते.
१९४९ साली त्यांना कोलकाता येथे होणाऱ्या राष्ट्रीय विमान स्पर्धेचे आमंत्रण देण्यात आले होते. स्पर्धेसाठी जेव्हा त्या कोलकाताला पोहचल्या त्यावेळी त्यांच्या अवतीभवती सर्व पुरुष वैमानिक होते आणि त्यांचे इन्स्ट्रक्टर देखील प्रशिक्षित दिसत होते, यामुळे त्यांना धक्का बसला.
त्यांच्याकडे जे विमान होते ते देखील निम्न दर्जाचे होते. त्यात फक्त १०-११ गॅलन इंधन बसत होते आणि त्यात त्यांना कोलकाता ते जमशेदपूर, जमशेदपूर ते पाटणा, पाटणा ते आसनसोल आणि आसनसोल ते कोलकाता असा प्रवास करण्याचा होता.
सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती असताना देखील त्यांनी या स्पर्धेत पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वडिलांनी त्यांना शेवटपर्यंत प्रोत्साहन दिले. त्या काळात रेडियो नव्हते जर कोणाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असेल तर त्या व्यक्तीला नकाशाचा सहारा होता. त्या रात्री पाटणा येथे पोहचल्या होत्या. कुठल्याही प्रकारचा अनुभव नसताना त्यांनाही रात्रीतून विमान पाटणा येथे उतरवलं होतं आणि सकाळी त्या कोलकाताच्या दिशेने निघाल्या.
जेव्हा त्या सकाळी कोलकाता येथे पोहचल्या त्यावेळी त्यांना कळून चुकलं की ती स्पर्धा त्यांनी जिंकली होती, त्यांनी सर्व ठिकाणांहून दोन दिवसात परतण्याचा विक्रम केला होता.
फक्त १०० तासाच्या तोकड्या उड्डाणाच्या अनुभावावर त्यांनी हे साधले होते.
एका महिलेने हा पराक्रम केला म्हणून विजयालक्ष्मी पंडित, जनरल करिअप्पा, लाल बहादूर शास्त्री या प्रमुख व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन केले. वृत्तपत्रांच्या मथळ्यांवर त्यांच्या यशाची गाथा छापून आली होती.
पुढे त्या दिल्ली येथे गेल्या, त्या ठिकाणी त्यांनी पुढील प्रशिक्षण घेतले आणि त्या भारतातील पहिल्या व्यवसायिक महिला वैमानिक झाल्या. त्यांच्या मेहनतीला अखेरीस यश आले होते, पण त्यांच्या पुढे अडचणींचा पाट वाढून ठेवला होता.
त्यांनी आठ विमान कंपन्यांत वैमानिक पदासाठी अर्ज केला होता, पण त्या महिला असल्यामुळे त्यांना त्याठिकाणी नोकरी नाकारण्यात आली. महिला म्हणून पहिल्यांदा भेदभावाचा सामना करावा लागला होता.
पण त्यांनी प्रयत्न थांबवले नाहीत, त्यांच्या प्रयत्नामुळे त्यांना अखेरीस डेक्कन एयरवेजमध्ये सहा महिन्यासाठी सह वैमानिक म्हणून नोकरी मिळाली, यासाठी देखील त्यांना मोठा संघर्ष करावा लागला होता.
ही नोकरी करत असतांना त्यांना एका गोष्टीची जाणीव झाली की त्यांना सतत डावललं जात आहे, अखेरीस त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.
या काळात त्यांनी भारतातील प्रमुख नेत्यांची वैमानिक म्हणून कार्य केले होते.
इतक्यावरच माथुर थांबल्या नाहीत त्यांनी १९५३ साली जी.डी. बिर्ला यांच्या खाजगी विमानाच्या वैमानिक म्हणून काम केले.
पुढे इंडियन एयरलाईन्समध्ये त्यांना नोकरी मिळाली, ही नोकरी करताना त्यांना आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक मंडळाचे सभासदत्व प्रदान करण्यात आले. ते मिळवणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला होत्या. पुढे १९८४ पर्यंत त्या तेथे कार्यरत होत्या. १९९२ साली त्यांचे रहस्यमयरित्या निधन झाले.
आपल्या उत्कृष्ट स्किल्स आणि लढाऊ बाण्यामुळे त्यांनी अशक्य शक्य करून दाखविले होते. त्यांच्यामुळे महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाही हे सिद्ध झाले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.