आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतात सगळ्यात जास्त लोकांचा आवडता पदार्थ कोणता? समोसा? भजी? पिझ्झा? की आणखी काही?.. या प्रश्नाचे उत्तर इतके अनपेक्षित आहे की ते ऐकल्यानंतर कोणीही चक्रावून जाईल. उत्तर आहे डोलो ही गोळी. कमाल आहे ना! पण टक्केवारी हेच सांगते.
२०२० पासून आजपर्यंत या एवढ्याशा जादुई डोलो या गोळीचा खप साधारण साडेतीन बिलियन एवढा आहे. गंमत म्हणून तुलना करायची झाली तर एवढ्या गोळ्या एकावर एक रचल्यावर तयार होणाऱ्या टॉवरची उंची बुर्ज खलिफाच्या ६३००० पट आणि माऊंट एव्हरेस्टच्या ६००० पट भरेल. भारतीय या एवढ्याशा गोळीच्या किती प्रेमात आहेत याचे हे उदाहरण.
डोलो 650 ही गोळी वेदनाशामक आहे. डोकेदुखी, ताप यासाठी वापरावयाचे हे औषध. गेल्या दोन-तीन वर्षात या गोळीचा प्रचंड खूप पाहता एक प्रश्न नक्कीच उभा राहतो, एवढ्या गोळ्या भारतीयांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्या की स्वतःच्या मनाने?
भारतातील जवळपास ५२ टक्के लोक मनाने औषधे घेण्यात माहीर आहेत. डोकेदुखी, खोकला, ताप, पोट बिघडणे यासारख्या मामुली तक्रारींवर कोणती औषधे घ्यायची हे त्यांना बरोबर माहीत असते. जोडीला हितचिंतक मित्रांचे सल्ले, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवरील ज्ञान हे या माहितीत इतकी भर घालतात की डॉक्टरची गरजच काय असे चित्र निर्माण होते. डोके दुखत आहे? डिस्प्रिन घ्या. खोकला झालाय? कफ सिरप घ्या. छातीत जळजळणे, आम्लपित्त यासारख्या तक्रारी आहेत? अँटासिड घ्या. असे सर्रास चालते. ही औषधे भारतात घरोघरी सापडतात, किंबहुना अनेक घरांमध्ये आपत्कालीन उपयोगासाठी ही औषधे ठेवूनच दिलेली असतात.
औषधे व गोळ्या साठवण्याची ही डबी म्हणजे जणू आपल्या आपत्कालीन नियोजनाचा आरसाच! या डबीच्या स्वरूपात आपल्याला एक दिलासा मिळतो, काही होत असेल तर त्याचे उत्तर आपल्याकडे आहे. पण छातीत जळजळते म्हणून आपण अँटासिड घेतली आणि छातीतली जळजळ ॲसिडिटीमुळे झालेली नसेल तर… जर हे लक्षण हृदयविकारासारख्या गंभीर आजाराचे पूर्व चिन्ह असेल तर… पण आपण सोयीस्कररित्या या गोष्टीकडे दुर्लक्ष करून स्वतः स्वतःचे डॉक्टर होतो, आणि चुकीचे निदान करून बसतो.
सेल्फ मेडिकेशनचा हा सगळ्यात मोठा धोका. आपल्याला हे माहिती असते, तरी आपण परत परत तेच करतो. असे का?
पहिले कारण म्हणजे कित्येकदा आपल्याला दुखणे इतके मामुली वाटते, की त्याच्यासाठी डॉक्टरची गरजच काय असे वाटू शकते. डोकेदुखी, खोकला, सर्दी, ताप यासारखे मामुली या प्रकारात मोडणारे आजार हे जणू घरच्या घरी औषधे घेऊनच बरे करायचे असतात असा आपला समज असतो.
दुसरे कारण म्हणजे अनेकदा डॉक्टरांची फी जास्त असते. एवढ्याशा कारणासाठी डॉक्टरला उगाच कसा कशाला पैसे मोजायचे असाही रुग्णांचा दृष्टीकोन असतो. भारतात अनेक ठिकाणी डॉक्टरची कन्सल्टेशन फी पाचशे रुपयांपासून पुढे असते. याव्यतिरिक्त त्याने लिहून दिलेल्या गोळ्या औषधांचा खर्च, तसेच त्याने काही टेस्ट्स करायला सांगितल्या त्या टेस्ट्सचा खर्च असा सगळा मिळून खर्च साडेचार ते पाच हजारापर्यंत जाऊ शकतो. हे सगळ्यांनाच परवडत नाही. काही सरकारी प्रयोगशाळा किंवा धर्मादाय संस्था अशा ठिकाणी ही फी थोडी कमी असते. पण त्या ठिकाणी नंबर लागणे कठीण असते.
अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या देशात बरेच लोक थेट केमिस्टकडूनच औषधे घेतात. त्यांना आपण डॉक्टर इतकेच महत्त्व देतो. अनेक केमिस्ट्स डॉक्टरप्रमाणे औषधे प्रिस्क्राइब करतात. ते भलेही एमबीबीएस नसतील पण त्यांच्याकडे काउंटर एक्सपिरीयन्स असतो. वैद्यकीय शिक्षण व काऊंटरवर औषधे विकण्याचा अनुभव हे दोन्ही एकच असल्याची आपण समजूत करून घेतो, जे पूर्णतः चुकीचे आहे.
स्वतःच्या मनाने औषधे घेणे धोकादायक आहे हे तर आपल्याला माहितीच आहे, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो हा भाग वेगळा. बहुतेकांच्या घरात पेन-किलर्स, ॲंटासिड्स, अँटिबायोटिक्स, कफ सिरप, स्लीपिंग पिल्स यासारखी औषधे असतातच असतात.
भारतात ही औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळतात. आपण ही औषधे अशीच खरेदी करतो आणि चुकीच्या पद्धतीने वापरतो. जे अँटासिड आपल्याला सुरक्षित वाटत असते ते अन्नाचे चुकीच्या पद्धतीने शोषण करू शकते. या गोळ्यांच्या अतिरेकी वापरामुळे लहान आतड्यावर विपरीत परिणाम होतो. अन्नघटकांमधून पोषक द्रव्ये शोषून घेण्याची त्यांची क्षमता कमी होते. यामुळे शरीराचे कुपोषण तर होतेच पण त्याचा परिणाम म्हणून हाडे ठिसूळ होणे, वारंवार फ्रॅक्चर यासारख्या गोष्टी घडतात.
आता किती अँटासिड घेतल्या म्हणजे त्या प्रमाणाबाहेर घेतल्या हे समजायचे? तर याचे उत्तर डॉक्टरच देऊ शकतील. पण दिवसाला दीड गोळी ही सुद्धा जास्त प्रमाणात आहे. पेन-किलर्स हा तर आपल्या ऑफिसबॅगचा किंवा पर्सेसचा महत्त्वाचा घटक आहे. थोडे डोके दुखायला लागले की पाण्याच्या घोटाबरोबर ही गोळी गिळली जाते.
आपण याचा प्रयोग स्वतःवर तर करतोच पण आपल्या सहकाऱ्यांवरही उदारहस्ते करतो. पण या पेन-किलर्समुळे आपल्या मूत्रपिंडांवर विपरीत परिणाम होतो हे आपल्या गावीही नसते. त्यावेळी फक्त वेदनेतून मुक्ती हवीहवीशी वाटते आणि त्या नादात आपण शरीराचे अक्षम्य नुकसान करून बसतो. जास्त प्रमाणात पेनकिलर घेतल्यामुळे किडनीवरचा ताण वाढतो. त्यामुळे किडनी फेल्युअर, पुढे जाऊन डायलिसिस, आणि क्वचित काही प्रसंगी किडनीचे प्रत्यारोपण इथपर्यंत प्रकरण जाऊ शकते.
पाठदुखी किंवा दातदुखी यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पेन-किलर्स हृदयविकाराचा धोका वाढवतात. पेन किलरचा जठराच्या व्रणांशी जवळचा संबंध आहे. पण ही माहिती बहुतेक वेळा आपल्यापर्यंत पोहोचत नाही. कारण ना कोणताही केमिस्ट तुम्हाला प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध देताना त्या औषधाचे दुष्परिणाम सांगतो, ना व्हाॅट्सॲप यूनिव्हर्सिटीची तज्ज्ञ मंडळी जास्त प्रमाणात औषधे घेणे, मनाने औषधे घेणे यावर मोलाचे मार्गदर्शन करतात.
अँटिबायोटिक्सचे उदाहरण घ्या. शरीरातील जिवाणूंना मारण्यासाठी हे औषध वापरले जाते. पेनिसिलीन या अँटिबायोटिक्सचा शोध लागला तेव्हा तो वैद्यकशास्त्रातील चमत्कार मानला गेला होता. यापूर्वी बारीकशी जखम होऊन त्यात जंतुसंसर्ग झाल्याने लोक मृत्युमुखी पडायचे, ते आता होणार नव्हते.
आज मात्र हीच अँटिबायोटिक्स आपल्यासाठी अतिवापर केल्याने घातक ठरत आहेत. भारत हा तर अँटिबायोटिक्सचा सगळ्यात मोठा ग्राहक आहे. आपणही अँटिबायोटिक्सचा इतका वापर केला आहे की ते ज्यांना मारण्यासाठी बनवले ते जीवाणूच आता त्यांना दाद देईनासे झाले आहेत. त्यामुळे आज एखाद्याला युरिन इन्फेक्शन झाल्यावर डॉक्टरने अँटिबायोटिक लिहून दिले तर ते प्रभावी ठरेलच ही शाश्वती राहिलेली नाही. हा प्रकार अत्यंत धोकादायक आहे. अँटिबायोटिक रेझिस्टन्स किंवा ड्रग रेझिस्टन्स हे जगभरात मृत्यूचे कारण बनत आहे.
स्वतःच्या मनाने औषधे घेण्याचा अजून एक मोठा धोका आहे. तो म्हणजे या औषधांची आपल्या अन्नाबरोबर कशाप्रकारे प्रक्रिया होते याची आपल्याला माहिती नसते. प्रत्येक औषधाचे काही साईड इफेक्टस् असतात.
उदाहरणार्थ मॉलन्यूपायरावीर हे अँटीव्हायरल औषध कोरोना व्हायरसवर प्रभावी म्हणून वापरले जात होते. आपल्याकडे त्याच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाली, तसे लोकांनी धावत जाऊन त्याचा स्टॉक करून ठेवण्याचा प्रयत्न केला.
परंतु ही गोळी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणारी नाही. मग लोकांनी काय केले? तर व्हाॅट्सॲपवरून प्रिस्क्रिप्शन शेअर करायला सुरुवात केली. मात्र ही गोळी प्रजननक्षम वयातील महिलांना वापरासाठी योग्य नाही, कारण यामुळे नवजात अर्भकामध्ये काही जन्मजात दोष निर्माण होऊ शकतात. या गोष्टी अर्थातच सर्वसामान्यांना माहीत नसतात. त्यामुळेही मनाने औषधोपचार करणे धोकादायक आहे.
आज साधी शिंक आली तरीही आपण कोविड झाला असे समजून उपाय योजना सुरू करतो. घरातील एक सदस्य पॉझिटिव्ह निघाला, की लगेच घरातील बाकीचे, काही होत असो वा नसो, औषध घ्यायला सुरुवात करतात.
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, मॉलन्यूपायरावीर, रेमडेसिविर यांसारखी औषधे कशी काम करतात हे आपल्याला माहिती नसते. या अज्ञानातून उद्भवलेले अनेक सेल्फ मेडिकेशनचे भयानक अनुभव डॉक्टर लोकांना विशेषतः कोविड काळात आले आहेत.
इतर अनेक देशांप्रमाणे भारतामध्येही औषधे वेगवेगळ्या कॅटेगरीजखाली विकली जातात. त्यापैकी एक म्हणजे प्रिस्क्रिप्शन ड्रग, दुसरी म्हणजे प्रिकॉशनरी लेबल किंवा सावधानतेच्या इशाऱ्यासह विकली जाणारी औषधे. परंतु ओव्हर द काउंटर ड्रगसाठी भारतात विशिष्ट कॅटेगरी नाही. आणि याहून वाईट गोष्ट म्हणजे बरीशी प्रिस्क्रिप्शन ड्रग्जदेखील प्रिस्क्रिप्शनशिवाय विकली जातात.
हे सुधारायचे असेल तर त्यासाठी आपल्याकडे कठोर कायदे आणि त्यांची तितकीच कठोर अंमलबजावणी दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. खेडोपाडी डॉक्टरांची उपलब्धता वाढवणे आणि वैद्यकीय उपचारांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणे याही गोष्टी प्राधान्यक्रमाने व्हायला हव्यात.
दुसरे म्हणजे सर्वच बाबतीत केवळ आरोग्य यंत्रणा किंवा सरकार यांच्यावर अवलंबून न राहता रुग्णांनी स्वतः देखील जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. किमानपक्षी मनाने औषधे न घेणे, केवळ इतरांचे ऐकून उपचार न करणे, त्यासाठी तज्ञ व्यक्तीशीच संपर्क साधणे, व्हाॅट्सॲपसारख्या माध्यमांवरून औषधोपचार आणि प्रिस्क्रीप्शन्स शेअर न करणे एवढे जरी केले तरी पुष्कळ गोष्टी साध्य होतील.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.