आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारत म्हणजे फक्त अस्वच्छ गल्ल्या, गरीबी, पडके वाडे आणि मागासलेला देश नसून कलाकारांची खाण आहे हे कळायला पाश्चिमात्त्य सिनेसृष्टीला वेळ लागला असला तरीही आता कित्येक भारतीय वंशाचे कलाकार तिथे आपली छाप सोडत आहेत. पाश्चिमात्त्य मनोरंजनाचा मोठा भाग असलेल्या वेबसिरीज क्षेत्रात मुख्य भुमिकेत काम करुन आपल्या अभिनयाच्या जोरावर वेबसिरीजचे खुळ भारतात पसरवण्यात मोलाचा हातभार लावणाऱ्या अशाच भारतीय वंशाच्या ७ अभिनेत्यांची ओळख आज आपण करुन घेणार आहोत.
प्रियंका चोप्रा
बॉलिवुडमध्ये आपल्या अभिनयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रियंका चोप्राने हॉलिवुडमध्ये पाय रोवायला सुरुवात केली ती ‘क्वांटिको’ नावाच्या वेबसिरीजद्वारे. ‘अलेक्स पेरीश’ नावाच्या एका एफबीआय एजंटची भूमिका तिने अगदी सहजरीत्या साकारली. यासाठी कराव्या लागणाऱ्या विविध फाईट सीन्ससाठी तिने विशेष प्रशिक्षणसुद्धा घेतले होते.
मालिकेत तिच्या भारतीय वंशाचा आधार घेत भारत-पाकिस्तान संबंधांवर कथानकाचा काही भागसुद्धा दाखवला गेला आहे. या भूमिकेसाठी तिला २०१६ साली ‘पीपल्स चॉईस’ पुरस्कारही देण्यात आला. हा पुरस्कार जिंकणारी प्रियंका दक्षिण आशियातील पहिली महिला ठरली.
कुणाल नायर
कुणाल नायरने ‘बिग बँग थिअरी’ या सुप्रसिद्ध मालिकेत ‘राजेश कुथ्रापाली’ या भारतीय तरुणाची भुमिका साकारली आहे. ४ हुशार पुस्तकी किडे असणाऱ्या वैज्ञानिक मित्रांवर आधारित असलेल्या या मालिकेत राज एका साधारण भारतीय तरुणाची व्यथा अगदी मिश्किलपणे मांडतो. स्त्रियांशी बोलताना अडखळणारी जीभ, लग्नासारख्या निर्णयात सततचा घरच्यांचा हस्तक्षेप या बाबी राज अगदी सहजतेने हाताळतो. कुणाल नायरला आपल्या अभिनयासाठी गोल्डन ग्लोबसारख्या मोठ्या पुरस्काराचे नामांकन प्राप्त आहे.
अजीज अंसारी
अजीज अंसारीने ‘मास्टर ऑफ नन’ या एका विनोदी मालिकेत देव शाह नावाची भूमिका साकारली आहे. मालिकेत देव शहा हा एक स्ट्रगलींग अभिनेता असतो. त्याचा वंश, रंग या बाबी त्याला एक अभिनेता म्हणून यशस्वी होण्यासाठी कसा अडथळा निर्माण करतात याचे वर्णन मालिकेत केले आहे. मालिकेचा निर्माता स्वत: अजीज अंसारीच आहे. विनोदी मालिकेत उत्कृष्ट अभिनेत्यासाठी गोल्डन ग्लोब हा मानाचा पुरस्कार मिळवणारा तो पहिला अभिनेता आहे.
मिंडी कलिंग
‘द ऑफिस’ नावाच्या विनोदी मालिकेत एक बडबडी ‘ग्राहक सेवा कार्यकारी’ असलेली ‘केली कपूर’ या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक भन्नाट मेजवानीच आहे. आपल्या बॉयफ्रेंडला सतत त्रस्त करुन सोडण्यात पटाईत असलेली ही केली कपूरची भूमिका मिंडी कलिंगने उत्तमरित्या साकारली आहे. फक्त एक अभिनेत्री म्हणूनच नाही तर ती या मालिकेची लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शकसुद्धा होती. या मालिकेच्या लेखनासाठी तिला ‘रायटर्स गिल्ड अवार्ड फ़ॉर बेस्ट कॉमेडी सिरीज’ हा पुरस्कारही मिळाला आहे.
सेंधिल रामामूर्ती
हिरोज नावाच्या एका थ्रिलर मालिकेत ‘मोहिंदर सुरेश’ नावाची भूमिका सेंधिल रामामूर्तीने साकारली आहे. या भूमिकेत तो एका भारतीय प्राध्यापकाची भूमिका साकारत असून हा प्राध्यापक मद्रासच्या महाविद्यालयात अनुवंशशास्त्र शिकवत असल्याचे मालिकेत दाखवले आहे.
मालिकेत तो आपल्या मृत वडिलांचा शोध घेत असून एका सुपरह्यूमन सूत्रावर काम करत असतो.
मालिकेचे मुख्य कथानक याच गोष्टींभोवती फिरत असते. पात्राच्या संवादात असणारे तत्त्ववादी विचार या मालिकेच्या सौंदर्यात आणखी भर घालतात.
देव पटेल
२००८ साली ऑस्कर सोहळ्यात धुमाकूळ घालणाऱ्या ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या चित्रपटाद्वारे भारतीय प्रेक्षकांच्या नजरेत आलेला देव पटेल न्यूजरुम नावाच्या मालिकेत नील संपत या वृत्त सहकाऱ्याची भूमिका साकारतो. कष्टाळू आणि जिद्दी असलेले हे पात्र त्याच्या विविध थरांवरती तेवढ्याच विविधतेने हाताळण्याचे अवघड काम देव पटेल अगदी सहजरीत्या सांभाळतो.
अर्चना पंजाबी
अर्चना पंजाबी हिने ‘द गुड वाईफ’ या मालिकेत ‘कालिंदी शर्मा’ नावाच्या एका खाजगी इन्वेस्टीगेटरची भूमिका साकारली आहे. तत्त्वांची पर्वा न करता आपले काम वेळेत आणि योग्यरित्या पूर्ण करणारी कालिंदी शर्मा अर्चना पंजाबीने योग्यपणे साकारली आहे. या भूमिकेसाठी तिला २०१० सालचा प्राईम टाईम एमी पुरस्कार देण्यात आला होता.
भारतीय कलाकारांना जगभर मिळणारी ही प्रसिध्दी भारतात असणाऱ्या अभिनेत्यांच्या कलेच्या उत्कृष्टतेचे प्रतिक आहे. ओटीटी क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे मनोरंजन क्षेत्राचे जागतिकीकरणच झाले आहे असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. लोकसंख्या आणि स्मार्टफोन वापरात भारताचा असलेला प्रथम क्रमांक बघता भारतीय प्रेक्षकांना मध्यभागी ठेऊन भरपूर सिनेमे, मालिका निर्माण केल्या जातील यात शंकाच नाही. त्यामुळे आणखी अनेक भारतीय वंशाचे कलाकार आपल्याला हॉलीवूडमध्ये बघायला मिळतील यात तिळमात्र शंका नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.