चीनच्या विस्तारवादी धोरणाला भारताचे उत्तर काय असेल?

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


चीनचा विस्तारवाद लपून राहिलेला नाही. चीनने डोकलांग प्रकरणी भुतानी प्रदेशात घुसखोरी करून भारतीय सैन्यासमोर आव्हान उभे केले होते. डोकलांग भागात भुतान आणि भारताच्या सीमा एकत्र येतात. त्यामुळेच हा भाग लष्करीदृष्ट्या  महत्वाचा आहे.

चीनचा इतिहास पाहिला तर सीमावाद उकरून काढत दडपशाही करत भुभाग बळकावणे हीच नीती कायम बाळगली आहे. तिबेटवरदेखील चीनने अशाच प्रकारे आंतरराष्ट्रीय संकेतांचा भंग करून मिळवला आहे. भारताचाही अक्साई चीनमधील मोठा भुभाग चीनने १९६२च्या युद्धानंतर घुसखोरी करून बळकावला.

पश्चिमोत्तर भारतातही चीनने अनेकदा घुसखोरी करुन भारताला डिवचले आहे. आताही लडाखमध्ये घुसखोरी करत अशांतता माजवायचे प्रयत्न चालु आहेत.

चीन-पाकिस्तानला जोडणारा आर्थिक महामार्ग पाकिस्तानच्या आगावूपणामुळे व्याप्त काश्मीरमधून (गिलगिट-बाल्टीस्तानमधुन) गेला आहे.

भारतातुनच भारताच्या इच्छेशिवाय हा महामार्ग गेला आहे. खरे तर हे अप्रत्यक्ष रितीने भारतीय भुमीवरचे अप्रत्यक्ष आक्रमण होते पण कोणत्याही भारतीय सरकारने याबाबत कठोर आक्षेप घेतला नाही.

डोकलांग भागातील वादही त्या भागातून चीनने रस्ता बांधणी सुरु केल्यानेच निर्माण झाला. दुर्गम हिमालयीन प्रदेशात रस्त्यांचे जाळे विणायचे काम चीन खरेच व्यापारी हेतुने करतो आहे की आपल्या विस्तारवादाची मनीषा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लष्करी वापर करण्याच्या हेतूने करतो आहे हा प्रश्न उभा राहतो. असे असले तरी लष्करी हेतू प्राधान्यक्रमाने आहे हे उघड आहे.

आठव्या शतकात काश्मीरचा सम्राट ललितादित्य याने गिलगिट, बाल्टीस्तान व लद्दाख हे भुभाग भारताला जोडले. नंतर काश्मीरच्या डोग्रा राजाने भारतातून निसटलेले लद्दाख पुन्हा भारताला जोडले. आठव्या शतकात तिबेट जागतिक महासत्ता बनला होता. त्याने चीनला अनेकदा हरवले, पार चिनी राजधानीपर्यंत मजल मारली होती आणि रेशीम मार्गांवर नियंत्रण आणले होते.

ललितादित्याने तिबेटचे हे वर्चस्व उध्वस्त केले होते व काश्मीरचे आपल्या नियंत्रणाखाली आणले. हाच तिबेट आता चीनच्या स्वामित्वाखाली आहे तर दलाई लामा भारताच्या आश्रयाला आहेत. व्यापारी मार्गावर ज्याचे नियंत्रण त्याचे जगावर नियंत्रण हे तत्व आठव्या शतकापर्यंत कसोशीने पाळले गेले.

चीनने आता तेच तत्व नव्याने पाळत संपूर्ण आशियावर नियंत्रण आणण्याची रणनीती अंमलात आणायला सुरुवात करुन दशके उलटली आहेत. भारताला या वर्चस्ववादाचा सामना कसा करावा हे अद्यापही लक्षात आलेले नाही. व्याप्त काश्मीरमधुन जाणाऱ्या महामार्गांच्या कामांना सुरुवातीपासुनच जेवढा आक्षेप घ्यायला हवा होता तो तेवढ्या तीव्रतेने घेतला गेलेला नाही.

अरुणाचल प्रदेशावर चीनने हक्क सांगून फारसा काळ उलटलेला नाही. सिक्कीमच्या सीमेबाबत २००९ सालीही वाद झाला होता. सिक्कीम भारतात १९७५ मध्ये सामील झाला तेव्हाही चीनने त्याला आक्षेप घेतला होता.

२००३ पर्यंत सिक्कीम भारताचा भाग आहे हे मान्य करायला चीन तयार नव्हता.

हिमालयाच्या पर्वत रांगा आणि तेथली थंड पठारे दुर्गम असल्याने ज्या सीमारेषा आखल्या गेल्या त्या बव्हंशी नकाशावरच आणि त्याचाच गैरफायदा चीन घेत आला आहे.

१९६२ साली चीनच्या युद्धात अमेरिकेने भारताची मदत केली होती हा इतिहास आहे. आताही अमेरिका या वादात पडायची तयारी दाखवते आहे. १९६२ सालच्या युद्धात भारत हरला असला तरी लगोलग १९६७ साली नथुला खिंडीत झालेल्या लढाईत भारताने चीनला सपाटून मार देत हरवले होते हाही एक इतिहास आहे.

डोकलांग प्रकरणात भारत आपल्या भुमिकेवर ठाम राहु शकलेला नाही हेही एक वास्तव आहे. माध्यमांनी तर तेथे नेमके काय झाले याची चर्चा थांबवुन जमाना उलटलेला आहे.

भारत-चीन युद्ध होईल याची शक्यता बदलत्या राजकीय स्थितीत शक्य नसले तरी दबावांचे राजकारण चीन करतच राहणार व कुरापतीही काढत राहणार. पण तसे चीनने करू नये यासाठी चीनला शह देण्याची भारताकडे कुठलीही योजना असल्याचे दिसत नाही.

चीन-अमेरिका व्यापारयुद्ध बराच काळ चालुच आहे. त्यात कोरोनाचा विषाणु चीनमधुनच आल्याने जगभर थैमान घालत असलेल्या या जीवघेण्या साथीने चीनकडे सारे जग संशयाने पाहत आहे. अमेरिका आता तिबेटला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा देत चीनला झटका देण्याच्या हालचाली करत आहे. त्याला अमेरिकेतील येत्या निवडणुकीचीही पार्श्वभुमी आहे. अशा स्थितीत जागतिक राजकीय पटावर नजीकच्या भविष्यकाळात नेमके काय होईल याचे भाकीत वर्तवता येणे शक्य नाही.

अशिया खंडापुरते बोलायचे तर येथील स्थितीही वेगाने बदलत आहे. नेपाळसारखे तसे भारताचे पुरातन मित्र राष्ट्रही बाह्या सरसावायची हिंमत दाखवत असेल तर त्याचाही अर्थ नीट समजावुन घ्यावा लागेल. पाकिस्तानसारख्या स्वार्थी आणि भारतद्वेषाने पछाडलेल्या राष्ट्राला आपण स्वत:चे अहित करत आहोत, किंबहुना नकळत अस्तित्वच धोक्यात घालत आहोत याचे भान नाही.

भारताभोवतीचा फास आवळण्याच्या चीनच्या आकांक्षेला पाकिस्तानने बळ दिले आहे. भारताने दाखवावी तेवढी मुत्सद्देगिरी दाखवलेली नाही हेही वास्तव आपण मान्य करायला हवे.

आज भारताचे शेजारी मित्र कमी झाले आहेत. चीनने आवळलेल्या फासातुन सुटका करुन घ्यायची असेल तर युद्धसज्जता ठेऊन, युद्धखोरीची भाषा न वापरता मित्र वाढवण्यावर जोर दिला पाहिजे.

तसेही कोरोनोत्तर जगाच्या राजकीय दिशा झपाट्याने बदलणार असल्याची या घटना म्हणजे पुर्वसुचना आहेत. आज समग्र जगावर प्रभाव टाकू शकेल असे नैतिक नेतृत्व नाही. नव्या जगाच्या रचनेचे तत्वज्ञान विकसित केले गेले नाही.

व्यापार, विकास आणि जमेल तसा विस्तारवाद हा आजच्या जगाचा मुलमंत्र बनलेला आहे. यात संघर्षाचे मुद्देच अधिक असणार हे उघड आहे. सध्याचा वाद मुत्सद्देगिरीतून किंवा सध्याच्या आर्थिक अपरिहार्यतेतुन सुटला अथवा मिटला तरी तो प्रश्नांचा अंत नसेल. नवनवीन उपद्रव निर्माण केलेच जातील आणि चीन यात कायमच आघाडीवर असणार.

खरे तर जगाचे भवितव्य जागतिक नागरिकांना तयार करावे लागेल. राजकीय शक्ती ते नेहमीच अस्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत आल्या आहेत.

राजकीय व आर्थिक सत्ता सामान्य माणसांचे जीवन वेठीला धरत त्याला किती काळ विनाशक भयाच्या टांगत्या तलवारीखाली ठेवणार हा प्रश्न प्रत्येक सुजाण नागरिकाला पडला पाहिजे.


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. ThePostman.co.in संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

यावर तुमची प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!