‘हम लोग’ : अशी होती दूरदर्शनची पाहिलीवहिली टीव्ही मालिका

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतात दुरचित्रवाणी चालू झाली तेव्हा तिच्याकडे फक्त एक मनोरंजनाचे साधन म्हणून बघितले गेले. हळुहळु बातम्या, काही माहितीपट सादर करण्यात येऊ लागले. नंतर लोकांचे मनोरंजन करता करता त्यांना सामाजिक संदेश देणाऱ्या मालिकांचे प्रसारण केले जाऊ लागले. या प्रकारच्या मालिकेंची सुरुवात झाली ती एका प्रसिद्ध मालिकेपासून, जिचे नाव होते- ‘हम लोग’.

नावातच ‘हम’ असणारी ही मालिका खरंच भारतीय समाजाच्या तत्कालीन बांधणीचे चित्र दाखवत होती. वेगवगळ्या जाती-धर्मातील, वेगवगळ्या आर्थिक वर्गातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे पात्र या मालिकेत साकारले गेले होते. आज आपण याच मालिकेच्या प्रवासाचा आढावा घेणार आहोत.

१९६० ते १९९० च्या काळात भारतात दुरदर्शन एवढी एकच वाहिनी होती. भारत सरकारने सुरु केलेल्या या वाहिनीवरच १९८४मध्ये ‘हम लोग’ पहिल्यांदा प्रसारित झाली.

घरगुती जीवनावर आधारित असलेली पहिली मालिका म्हणुन आजही ओळखली जाणारी ही मालिका आठवड्यातुन एकदा प्रसारित केली जात असे. मालिकेच्या प्रसारित होण्याच्या वेळेत ओसाड पडलेले रस्ते, एकत्र बसुन मालिका सुरू होण्याची वाट बघत बसलेले मित्र आणि कुटुंब यावरुन मालिकेच्या प्रसिद्धीचा अंदाज येतो.

या मालिकेची खरी ताकद होती ती या मालिकेचे लेखन. मालिकेच्या प्रसिद्धीसाठी काहीही विशेष कष्ट घेतले गेले नव्हते. मालिकेचे लेखन आणि काळजाला हात घालणारे दैनंदिन मुद्दे यामुळे मालिकेची जाहिरात करण्याची सुद्धा गरज पडली नाही. असे असुनही एका मालिकेने अख्ख्या देशाला वेड लावणे ही त्याकाळी एक अजब बाब होती.

मालिकेचे लेखक होते, मनोहर श्याम जोशी. मालिकेचे दिग्दर्शक होते, वासुदेव कुमार.
सुरुवातीला फक्त १३ भागांसाठी बनवण्यात आलेली ही मालिका १५९ भाग चालली यामागे प्रेक्षकांनी दिलेले प्रेम हे एकच कारण होते.

१७ महिन्यापेक्षा जास्त काळ चाललेली ही मालिका त्यावेळी राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध होती. मालिकेचे लेखक असलेले मनोहर जोशी स्वत: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते होते. फाळणीवर भाष्य करणारी बुनियाद नावाची मालिकासुद्धा त्यांनीच लिहिली होती.

या मालिकेतील बरेचसे कलाकार दिल्लीतील होते. त्यातील काहीजण आजही स्वत:च्या प्रसिद्धीचे श्रेय या मालिकेला देतात. प्रेक्षक कलाकारांना अक्षरश: राजासारखी वागणूक देत असत असे काही कलाकार सांगतात.

मनोरंजनाबरोबरच शैक्षणिक संदेश देण्याची ‘हम लोग’ची संकल्पना खरंतर मेक्सिकन ‘सबिडो प्रणाली’पासून प्रेरीत होती. 

१९७५ मध्ये मेक्सिकन मालिका Ven Conmigo हिच्यात या प्रकारच्या कथानकाचा वापर पहिल्यांदा केला गेला होता. ‘मिगेल सबिडो’ यांचे दिग्दर्शन असल्याने ही प्रणाली त्याच नावाने ओळखली गेली. भारतीय जनतेच्या दररोजच्या समस्या घेऊन मनोरंजन आणि सामाजिक संदेश देण्याचा असाच प्रयत्न ‘हम लोग’मध्ये केला गेला.

‘हम लोग’मधील कोणत्या ना कोणत्या पात्रात प्रेक्षक स्वत:ला बघत असत. मग ती पुस्तकी किडा असलेली ‘चुटकी’ असेल, किंवा ध्येयहीन आयुष्य जगणारा तिचा मोठा भाऊ ‘लल्लू’ असेल. सगळी पात्रे आपल्या आसपास असणारी लोकं आहेत ही भावना मालिकेच्या यशामागे होती. उत्तम लिखाण असलेली ही मालिका एका नविन प्रकारच्या मनोरंजनाची सुरुवात होती.

सबिडो प्रणालीवर लिहिली गेलेली ही मालिका सुरु होण्यामागे सुद्धा ‘मिगेल सबिडो’ यांचाच हातभार होता. भारतात आल्यावर त्यांनी मालिकांचे प्रसारण आठवडयात ५ दिवस करावे अशी संकल्पना मांडली. त्यावेळी मालिकेचे प्रसारण आठवड्यातुन ५ दिवस करणे हे मोठे क्रांतिकारी काम होते.

सबिडो यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी चर्चा केली आणि ‘हम लोग’ ची संकल्पना उदयास आली. सबिडोंनी सांगीतल्या प्रमाणे आठवड्यातुन ५ वेळा मालिका प्रसारित करणे त्यावेळी शक्य नव्हते. म्हणुन आठवड्यातुन एक दिवस मालिकेचे प्रसारण करण्याचा निर्णय घेतला गेला.

मालिकेत दाखवलेल्या ६-८ पात्रांमध्ये आधुनिक विचारांच्या गर्दीत जुन्या विचारांची चाललेली घुसमट, आधुनिक भारताचे एक कल्पित चित्र प्रेक्षकांना दिसत होते. मालिकेच्या एका भागाला सरासरी ५ करोड एवढा मोठा प्रेक्षकवर्ग त्यावेळी उपलब्ध होता.

 मालिकेच्या प्रत्येक भागाच्या शेवटी अशोक कुमार यांच्या आवाजातला संवाद असायचा. कल्पकतेतील वास्तविकता दाखवणारा हा शेवटचा संवाद लोकांचा मालिकेतील सगळ्यात आवडता भाग होता.

या मालिकेत पितृसत्ताक समाजापासून दारुच्या नशेत झिंगणाऱ्या आधुनिक समाजावर अगदी स्पष्टपणे भाष्य करण्यात आले होते. भारतात होत असलेल्या अनेक सामाजिक, आर्थिक, तांत्रिक बदलांचे दर्शन मालिकेद्वारे प्रेक्षकांना होत होते.

जसे की एकत्र कुटुंब पद्धती लुप्त होत असताना मालिकेतील मोठे एकत्र कुटुंब बघण्यात लोकांना आनंद वाटत होता. कम्युनिस्ट विचारसरणी संपुष्टात येऊन खाजगीकरणाकडे होत असलेली वाटचाल एका अरहिवासी भारतीय असलेल्या पात्राच्या रुपात दर्शविली जात होती.

तसेच मालिकेचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे भारतात रंगीत टिव्हीची सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीच्या काही मोजक्या मालिकांपैकी ही मालिकासुद्धा रंगीत टिव्हीवर प्रसारित करण्यात आली.

मालिकेची ताकद अवघड अवघड सामाजिक प्रश्न सहजतेने हाताळण्यात होती. मुलींना दिली जात असलेली मुलांपेक्षा वेगळी वागणूक, पुरुषांच्या मर्दानगीचे पाखंडी रुप, दारुच्या नशेचे परिणाम अशा अनेक नाजुक मुद्द्यांवर अगदी सहजतेने केले गेलेले भाष्य लोकांच्या मनात घर करुन गेले.

‘हम लोग’ म्हणजे आपण सगळेच. ही मालिका कोणत्याही एका वर्गासाठी नव्हतीच. नावाप्रमाणेच ती सगळ्यांची मालिका होती. मध्यमवर्गीय आदर्शवाद दाखवणारी ही मालिका भारताच्या प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करत होती.

आधुनिकतेच्या चक्रव्युहात आपण मुलभुत तत्वांची आहुती देत तर नाही आहोत ना हा प्रश्न आजही ही मालिका आपल्याला तेवढ्याच समर्थपणे विचारते आहे यातच त्या मालिकेचे यश सामावले आहे..!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!