ब्रिटिशांसोबत भारतात आलेल्या गोष्टी : भाग ५ – लसीकरण

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


ब्रिटीश भारतात आल्यावर त्यांनी आपल्यासोबत यंत्रयुग व शिक्षणाबरोबर आधुनिक उपचार पद्धती भारतात रुजवली. या आधुनिक उपचार पद्धतीचा एक महत्वपूर्ण भाग होता लसीकरण.

परंतु भारतात आल्यावर लसीकरणाचा लाभ ब्रिटिशांनी इथल्या सामान्य जनतेला मिळू दिला नाही, त्यांनी त्याचा वापर सुरुवातीच्या काळात स्वतःसाठीच केला.

ब्रिटीश भारतात आल्यावर त्यांनी अनेक भारतीयांना आपल्या सेवेत रुजू करून घेतले व त्यांना राबवून आपल्या साम्राज्याचा गाडा हाकू लागले.

जेव्हा भारतात प्लेग, स्पॅनिश फ्लू आणि कॉलरासारखे रोग पसरू लागले, त्यावेळी मात्र भारतीय जनतेत या आजारांचा प्रादुर्भाव रोखणे हे ब्रिटिशांसाठी क्रमप्राप्त होते. यासाठीच त्यांनी लसीकरणाचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला.

आज भारतात लसीकरणाचा प्रयोग बहुतांशी यशस्वी ठरला आहे. सध्या सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात तर ऑक्सफोर्ड आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तयार करत असलेल्या ड्युअल इम्युनिटी प्रदान करणाऱ्या लसीची सर्वत्र आतुरतेने वाट बघितली जात आहे.

प्राचीन भारताच्या इतिहासात अनेक ठिकाणी क्षयरोग अर्थात टीबीचे वर्णन आढळून येते. वेदांमध्ये देखील टीबीचे वर्णन करण्यात आले आहे. इतकंच नाहीतर, प्राचीन इजिप्त आणि चीनमध्ये देखील क्षयरोगाने अनेक लोकांना बाधले असल्याचे असंख्य दस्तावेज उपलब्ध आहेत.

ब्रिटिश भारतात येण्याअगोदर भारतात साथीच्या रोगांच्या प्रसाराचे प्रमाण कमी होते असे दिसून आले आहे कारण त्यासंदर्भातले फार कमी उल्लेख मराठेशाही व मोगलाई कागदपत्रात आढळून येतात.

छत्रपती संभाजी महाराज जेव्हा गादीवर होते, त्यावेळी त्यांना शह देंण्यासाठी खास औरंगजेब दख्खनेत उतरला होता. परंतु ४ ते ५ वर्ष असंख्य प्रयत्न करून देखील त्याला कुठल्याही प्रकारचे यश संपादन करता येत नव्हते.

संभाजी महाराजांसमोर आपले काही एक चालत नाही, हे लक्षात आल्यावर औरंगजेब आदिलशाहीवर चालून गेला होता. या काळातील दस्तावेजात असा उल्लेख करण्यात आला आहे की ज्यावेळी औरंगजेब या भागाच्या स्वारीवर निघाला होता, त्यावेळी आदिलशाहीची राजधानी असलेल्या विजापुरात ‘पटकी’ या आजराची साथ आली होती.

तसेच पानिपतच्या युद्धावेळी अहमद शहा अब्दाली सैन्य घेऊन जेव्हा हिंदुस्थानवर चालून आला त्यावेळी त्याच्या सैन्याच्या तुकडी एका अनामिक आजाराची साथ पसरली होती, ज्यात रोज २५-३० सैनिकांना आपल्या प्राणाला मुकावे लागत होते.

मध्ययुगीन युरोपात १३१९ ते १३५१च्या काळात ब्लॅक डेथ नावाच्या आजाराची साथ पसरली होती. या साथीत तब्बल २५% युरोपियन लोक आपल्या प्राणांना मुकले होते. युरोपात ज्यू लोकांचा मोठा अधिवास मध्ययुगीन कालखण्डात होता. त्यावेळी ज्यू लोक कोशर या पारंपारिक नियमावलीचे काटेकोरपणे पालन करायचे, ज्यात वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेला महत्व देण्यात आलं होतं आणि अशुद्ध मांसाहार वर्ज्य करण्यात आला होता.

कोशरच्या नियमांमुळे ज्यू लोकांमध्ये इतरांच्या तुलनेत साथीचे आजार पसरण्याचे प्रमाण कमी होते. परंतु यामुळे इतरांचा असा ग्रह झाला की ज्यू लोक पिण्याच्या पाण्यात विष टाकून इतरांचे हत्याकांड करत आहेत. या गैर समजातून पुढे दंगली झाल्या, ज्यात असंख्य ज्यू लोकांना त्यांच्या प्राणाला मुकावे लागले होते.

बेल्जीयमच्या नागरिकांचा तर असा ग्रह झालेला की ज्यू लोक पाण्यात उंदीर मारून टाकतात आणि त्यामुळे प्लेग व उत्तर आजार पसरतात, या कारणांमुळे बेल्जीयममध्ये असंख्य ज्यू लोकांचो कत्तल करण्यात आली होती.

१६६५ मध्ये इंग्लंडमध्ये प्लेग पसरला. या प्लेगमध्ये लाखभर लोकांचा बळी गेला. प्लेगला नियंत्रणात तरी कशा प्रकारे आणता येईल यासाठी प्रशासन प्रयत्नशील असतानाच लंडन शहराला एक भीषण आग लागली, इतिहासात ही आग ग्रेट फायर ऑफ लंडन म्हणून प्रसिद्ध आहे.

या आगीत ३० लोकांचा बळी गेला, पण या बरोबरच लाखभर उंदरं होरपळून मेली होती. हे उंदीर मेल्यामुळे प्लेग आटोक्यात आणणे प्रशासनाला शक्क झाले होते. एक प्रकारे ती आग लंडनचा लोकांसाठी वरदान ठरली होती.

१७९६ मध्ये एडवर्ड जेनर नावाचा शास्त्रज्ञ देवीच्या साथीचा अभ्यास करत होता. हा अभ्यास करत असताना त्याला असे आढळून आले की गुरांची राखण करणाऱ्या लोकांना खासकरून महिला वर्गाला देवीची बाधा होण्याचे प्रमाण कमी आहे.

त्याने संशोधन केल्यावर त्याला असे आढळून आले की गुरंढोरं पाळणाऱ्या या महिला ज्यावेळी दुध काढायचे काम करतात, त्यावेळी त्यांच्या शरीरात काऊपॉक्सचा बॅक्टरीया चंचूप्रवेश करतो. परिणामतः या लोकांमध्ये काऊपॉक्सच्या बॅक्टरीयामुळे या लोकांमध्ये देवीच्या आजाराचा सामना करण्याची रोग प्रतिकार शक्ती वाढत जाते.

एडवर्डने यावर अधिक संशोधन करून काऊपॉक्सच्या जिवाणूच्या बळावर लसीची निर्मिती केली आणि फिलिप नावाच्या एका आठ वर्षीय लहान मुलावर या लसीचा प्रयोग केला, या लसीमुळे फिलिपला काही दिवसातच बरा झाला आणि पुढे या लसीच्या बळावर देविची साथ नियंत्रणात आणण्यात यश संपादन करता आले.

लसीच्या शोधानंतर काही वर्षातच लस भारतात चेन्नईमध्ये आली, पण ही सामान्य लोकांसाठी नव्हती. फक्त गोऱ्या ब्रिटिशांना या लसीचा लाभ मिळत होता.

१८१७ मध्ये बंगालमध्ये कॉलराची साथ पसरली, या साथीमुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले. १८९७ मध्ये मुंबईत ब्रिटिश जहाजातून आलेल्या उंदरांमुळे प्लेगची साथ पसरली. शेकडो लोक या साथीत आपल्या प्राणाला मुकले.

ब्रिटिश सरकारला जरी भारतीयांच्या प्रति ममत्व नव्हते तरी भारतीय लोकांची साम्राज्य चालवण्यासाठी असलेली गरज ओळखून ब्रिटिशांनी व्लादिमीर हाफकिन यांना मुंबईत पाचारण केले. प्रोफेसर हाफकिन यांनी संशोधन करून प्लेगवर एक लस शोधून काढली.

या लसीचा प्रयोग तुरुंगातील काही प्लेगग्रस्त गुन्हेगारांवर करण्यात आला आणि काही काळात तुरुंग प्लेगमुक्त झाले. या लसीचे यश बघता, ब्रिटिशांनी १९०३ पर्यंत मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून शेकडो लोकांचे प्राण वाचवले.

१९१८ साली युरोपात पहिल्या महायुद्धाला ब्रिटिशांच्या बाजूने लढायला गेलेले सैनिक भारतात परतले. भारतात पाऊल ठेवल्यावर त्यांनी सोबत स्पॅनिश फ्लूचा प्रसाद भारतीय जनतेसाठी आणला होता. काही काळातच स्पॅनिश फ्लू पश्चिम तटावरून दक्षिणोत्तर सर्वदूर पसरला.

२०-४० वयोगटातील असंख्य तरुण या आजाराला बळी पडले. हा आजार मोठ्या जलदगतीने भारतभर फोफावला होता. या आजारामुळे भारताची लोकसंख्या वाढ खुंटली होती.

स्पॅनिश फ्लूच्या उच्चाटनासाठीसाठी तीच नियमावली जारी करण्यात आली होती, जी १८९७ साली प्लेगच्या वेळी जारी करण्यात आली होती. आज कोरोना काळात तीच नियमावली भारतात लागू करण्यात आली आहे.

स्पॅनिश फ्लू नंतर भारतात दुष्काळ देखील पडला, ज्यामुळे भारतीय लोक प्रचंड त्रस्त झाले होते. स्पॅनिश फ्लूच्या तीन लाटांमध्ये देश पार मोडकळीस आला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर भारतात व्यापक लसीकरण मोहीम १९४६मध्ये हाती घेण्यात आली होती. या मोहिमेतून विशेष काही फायदा होणार इतक्यात १९४७ला भारताच्या फाळणीमुळे ही मोहीम थांबली.

पुढे भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये लसीकरणाच्या मोहीमेला चालना देण्यात आली. क्षयरोगावरील बीसीजी लस भारतीय नागरिकांना देण्यात आली.

भारताच्या लसीकरणाच्या इतिहासात अजून एक महत्वपूर्ण भूमिका जर कोणी बजावली तर ती सायरस पुनावाला या पुणेस्थित उद्योगपतीने. १९६६ साली सायरस पुनावाला यांनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली. आधी विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या अँटी व्हेनमपासून लसी व रोगप्रतिकार औषधांच्या निर्मितीत ही संस्था अग्रणी राहिली आहे.

ऑक्सफोर्ड विद्यापीठ, अमेरिकन-इस्त्रायली संशोधन संस्था यांच्यासोबत सिरम इन्स्टिट्यूट एकत्रितपणे कार्यरत असून, आजवर सिरमने असंख्य लसींची निर्मिती केली आहे.

सिरम इन्स्टिट्यूट सध्या कोरोनावर ऑक्सफोर्ड तयार करत असलेल्या लसीचे उत्पादन करणार असून, यापैकी ५०% लसी भारताला देण्याची तयारी सिरम इन्स्टिट्यूटच्या आदर पुनावाला यांनी दर्शवली आहे.

कोरोनाच्या संकट काळात लोक आज लसीची आतुरतेने वाट बघत असून, मानवी संस्कृतीचा इतिहास हा अशा आजारांच्या साथींशी सामना करण्यात गेला आहे. आपण लवकरच या ही संकटातून निश्चितच बाहेर निघू!


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!