काळा पैसा चलनात आणण्याची हवाला पद्धत नेमकी काय आहे..?

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


फार पूर्वीच्या काळामध्ये वस्तूची देवाणघेवाण करण्यासाठी बार्टर सिस्टीम उपयोगात आणली जायची. म्हणजे ज्या काळात पैशाचा शोध लागलेला नव्हता त्या काळामध्ये एकमेकांच्या गरजा पुरविण्यासाठी एकमेकांकडे असलेल्या वस्तू देवघेव करणे ही पद्धत अस्तित्वात होती. शेतकरी स्वतःजवळचे धान्य देऊन बाकीच्या बलुतेदारांकडून उपयोगाच्या वस्तू घेत असे. असेच बाकीचे बलुतेदार देखील आपल्याकडच्या वस्तू देऊन आपल्याला हव्या त्या वस्तू दुसर्‍यांकडून घेत असत.

चलन हा प्रकार नंतर अस्तित्वात आला.

हळूहळू वस्तूंच्या विनिमयासाठी एकाच प्रकारच्या व्यवस्थेची गरज भासू लागली आणि त्यातूनच पुढे नाण्यांचा उगम झाला. कोणतीही वस्तू अथवा सेवा विकत घेण्यासाठी लोक नाण्यांचा वापर करू लागले.

धातु युगामध्ये जेव्हा धातूंचा शोध लागला तेव्हा लोक वस्तुविनिमय यासाठी धातूंच्या नाण्यांचा वापर करू लागले. हा नाण्यांचा वापर अगदी आजतागायत कायम आहे.

जसजशी वस्तूंची खरेदी विक्री वाढत गेली तशी तशी आर्थिक व्यवहारांमध्ये सुधारणा होत गेली. यामध्ये नंतर व्यापाराला त्याला पूरक पतपेढ्या आल्या. आर्थिक पुरवठा करणाऱ्या संस्था निर्माण झाल्या. नोटांचा शोध लागला.

पूर्वी लोक फक्त सोने आणि जमीन यांना खरी प्रॉपर्टी समजायचे. त्यानंतर चलनाचा बाजारामध्ये उगम झाला. जितका जास्त पैसा तुमच्याकडे असेल तितके तुम्ही श्रीमंत असे नवीन समीकरण हळूहळू रूढ झाले.

मग असे कुठलेही व्यवसाय ज्याच्यातून प्रचंड पैसा मिळतो त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. याच यातूनच बाजाराला समांतर अशा ग्रे मार्केटचा किंवा ब्लॅक मार्केटचा उगम झाला. मेन स्ट्रीममधल्या अर्थव्यवस्थेला टक्कर देईल अशी समांतर काळ्या बाजारातली अर्थव्यवस्था उभी राहिली.

वेगवेगळ्या अनैतिक मार्गांनी पैसे मिळवण्याचे उद्योग सुरू झाले. काळ्या मार्केटमध्ये कमावलेला पैसा ओपन मार्केटमध्ये आणण्यासाठी आणि त्याला कायद्याच्या चौकटीत बसवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या शोधल्या जाऊ लागल्या. यातून वेगवेगळ्या प्रकारच्या मनी लॉन्ड्रिंगच्या प्रयुक्त्या लढवल्या गेल्या.

यातलीच एक कुप्रसिद्ध पद्धत आपण आज बघणार आहोत. ही पद्धत म्हणजे हवाला पद्धत.

हवाला म्हणजे विश्वास हा मूळचा अरबी शब्द आहे. हवाला पद्धत म्हणजे विश्वासावर चालणारी पद्धत. नावाप्रमाणे ही संपूर्ण पद्धती विश्वासावर चालते आणि मुख्यतः काळा पैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी हवाला पद्धतीचा वापर होतो.

यात एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही कायदेशीर मार्गाने कमावलेला असेल तो पैसा हस्तांतरित करण्यासाठी तुम्ही बँकिंग प्रणालीचा वापर करता कारण तुम्हाला त्या व्यवहारांमध्ये कुठलीही भीती नाही. परंतु जेव्हा कुठलाही आर्थिक व्यवहार हा गैर मार्गाने केला जातो तेव्हा कर चुकवण्यासाठी म्हणून तो पैसा बँकेच्या माध्यमातून न फिरवता हवालाच्या माध्यमातून फिरवला जातो.

उदाहरणार्थ-अमेरिकेमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला भारतामध्ये आपल्या आई-वडिलांना पैसे पाठवायचे आहेत. जर त्या माणसाने हवालाची मदत घेऊन पैसा पाठवण्याचे ठरवले तर तो त्याच्या आसपास असलेल्या हवाला एजंटला गाठेल आणि त्याला संपूर्ण पाठवण्याची रोख रक्कम आणि भारतातल्या आई वडिलांचा पत्ता देईल.

हा हवाला एजंट या अमेरिकेतल्या व्यक्तीला भारतातल्या हवाला एजंटचा नंबर आणि एक विशिष्ट पासवर्ड देऊन ठेवेल.

भारतात राहणाऱ्या आई-वडिलांना हा अमेरिकेतला व्यक्ती आपल्याकडचा पासवर्ड पाठवेल आणि भारतातल्या हवाला एजंटचा नंबर देखील पाठवेल. आता भारतामध्ये त्याच्या आई-वडिलांनी फक्त या एजंटला फोन करायचा आणि स्वतःकडे असलेल्या विशिष्ट पासवर्ड सांगायचा.

जर तो पासवर्ड मॅच झाला तर भारतातला हवाला एजंट आपले कमिशन कापून बाकी रक्कम या अमेरिकेतील व्यक्तीच्या आई-वडिलांच्या ताब्यात देऊन टाकणार. हे झाले हवाला व्यवहाराचे स्वरूप.

या हवाला व्यवहारांमध्ये तुमची कुठलीही ओळख लागत नाही. तुमचे कुठलेही डॉक्युमेंट्स कुणीही मागत नाही. तुमचा नाव गाव पत्ता देखील कुणी विचारत नाही. हा संपूर्ण व्यवहार विश्वासावर चालतो आणि यासाठी कुठल्याही प्रकारची कागदपत्रांची पूर्तता करण्याचे बंधन व्यक्तीवर नसते. त्यामुळे हे व्यवहार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये लोकप्रिय आहेत.

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल परंतु कोणे एके काळी हा हवाला व्यवहार पूर्णपणे कायदेशीर होता. मग नंतर नंतर आर्थिक व्यवहारांमध्ये सुधारणा होत गेली. पारदर्शकता आली, बँकिंग सिस्टीमची सुरुवात झाली करपद्धती सुधारित रूपाने संपूर्ण जगभरात लागू झाली तेव्हा मात्र हे हवाला व्यवहार कायद्याने बेकायदेशीर ठरवले.

आज हवाला व्यवहार हे ब्लॅक मार्केटमधले म्हणूनच ओळखले जातात. मोठमोठे राजकारणी, मोठमोठे अभिनेते, क्रिकेटर्स हे स्वतः कमावलेला काळा पैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी या हवाला पद्धतीचा आधार घेतात.

देशामध्ये अनेक प्रकारचे अवैध धंदे चालतात. याच्यामध्ये जुगार, रेस, मटका, सट्टा, शेअर बाजारातील गैरप्रकार अशी मोठ्या उद्योगांची यादी येईल. या उद्योगांमध्ये फिरवला जाणारा पैसा हा हवाला मार्गाने फिरवला जातो.

याचा दुसरा अर्थ असा होतो की अर्थव्यवस्थेमध्ये पैसा येत नाही. विकास कामे खोळंबून राहतात. ब्लॅक मार्केटमध्ये प्रचंड पैसा बँकेशिवाय फिरवला जातो. या पैशाचा कुठेही तपास लागत नाही. त्याच्यामुळे सरकारचे खूप मोठे कर उत्पन्न बुडते. या पैशाचा वापर करून जगभरामध्ये अशांतता माजवण्याचे दहशतवादी कारवाया पेरण्याचे कार्य केले जाते.

या हवाला प्रकरणात वेगवेगळ्या देशातील ड्रग डीलर्स आणि माफीयांचे मोठे जाळे उभे राहिलेले आहे. या व्यवहारामध्ये कुठल्याही प्रकारची ओळख लागत नाही. त्यामुळे या हवालाचे मोठे नेटवर्क अंडरवर्ल्डने उभे केलेले आहे.

दुर्देवाने या व्यवहारांमध्ये काही चांगल्या चांगल्या बँकादेखील सामील आहेत. भारतामध्ये एचएसबीसी बँकेची या हवाला प्रकरणात चौकशी झालेली होती. भ्रष्टाचार केलेला प्रचंड पैसा याच हवाला माध्यमातून बाहेरच्या देशांमध्ये नेला जातो याचे अनेक वेळा पुरावे समोर आलेले आहेत. त्यामुळे हवालाच्या मागे प्रत्येक देशातली कायदे व्यवस्था लक्ष ठेवून असते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!