आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सिनेमाला गेल्यानंतर चित्रपट पाहण्याशिवाय बहुतांश लोक निश्चितपणे एक गोष्ट करतात, ते म्हणजे पॉपकॉर्न खाणे. चित्रपट आणि पॉपकॉर्नचं नातं म्हणजे शोलेमधील जय-वीरूच्या नात्यासारखं. सिनेमा म्हटलं की पॉपकॉर्न आलंच. काही चाणाक्ष लोक तर घरी, ओ.टी.टी. प्लॅटफॉर्म्सवर किंवा सीडी प्लेयरवर सिनेमा लावून पॉपकॉर्न विकत आणतात. पॉपकॉर्न आणि सिनेमाचे व्यवसाय एकमेकांना पूरक आहेत. सिनेमे चालले तर पॉपकॉर्नचा व्यवसायही उत्तमरीत्या होतो. आजमितीस पॉपकॉर्नचे विविध फ्लेवर्स आले आहेत. पॉपकॉर्न आणि चित्रपट ही इतकी उत्तम जोडी का आहे, याचा परामर्श घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकवावं लागेल.
सुमारे ८००० वर्षांपूर्वी मक्याचे उत्पन्न टेओसिन्टेपासून केले जात होते. टेओसिन्टे हे पीक आजमितीला असणाऱ्या मक्याच्या कणसासारखे दिसत नाही तर साधारणतः बाजरीच्या पिकासारखे ते असते. टेओसिन्टे एक जंगली गवत होते. मध्य अमेरिकेत मक्याची सर्वप्रथम लागवड झाली. व्यापाराच्या विकासाने मक्याचे कणीस उत्तर अमेरिकेत आणले.
पॉपकॉर्न – बहुधा नावावरूनच आपल्या हे लक्षात आलं असेल की फुगलेल्या मक्याशी संबंधित आहे. पॉपकॉर्न हे मक्याच्याच दाण्याचे उसण (ताण देऊन तयार केलेले) आहे. मक्याच्या दाण्यातील दाब उष्णतेच्या मदतीने वाढवून हे पॉपकॉर्न तयार केले जातात.
पॉपकॉर्नने उत्तर अमेरिकेच्या पूर्व भागात प्रवेश केल्यानंतर वेगाने पसरले. खाणाऱ्यांना कॉर्न पॉपिंगची कृती मनोरंजक वाटली आणि १८४८ पर्यंत पॉपकॉर्न हे एक प्रसिद्घ ‘स्नॅक फूड’ म्हणून उदयास आले.
१८०० च्या शतकाच्या मध्यापर्यंत सिनेमाचा शोध लागला नसला तरी पॉपकॉर्नचा शोध मात्र लागला होता आणि युरोपात पॉपकॉर्न अतिशय प्रसिद्ध अल्पोपहार (स्नॅक) बनला होता. ज्याप्रमाणे भारतात कोणत्याही जत्रेच्या ठिकाणी जिलेबी किंवा शेव-रेवडीसारखे पदार्थ अगदी हमखासपणे दिसतात, त्याचप्रमाणे युरोपातही एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत पॉपकॉर्न प्रत्येक जत्रेच्या आणि सर्कशीच्या ठिकाणी हमखास विकले जात असत.
विसाव्या शतकात युरोपमध्ये सगळीकडे चित्रपट दाखवले जाऊ लागले. चित्रपट पाहणे ही एक आलिशान पण सार्वत्रिक गोष्ट होऊन बसली. पण तत्कालीन चित्रपटगृहे नेहमीच मीठ आणि लोण्याच्या सुंगधाने दरवळत नसत. कारण चित्रपटगृहांमध्ये पारंपरिक नाट्यगृहांसारखी भव्यता आणि शाही व्यवस्था करण्याच्या दृष्टीने मालकांनी त्यात आलिशान गालिचे आणि आसनांची व्यवस्था केली होती. या आलिशान गोष्टींना कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये या दृष्टीने त्यांनी चित्रपटगृहात खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मनाई केली होती.
सुरुवातीच्या काळात सिनेमा म्हणजे सुशिक्षित आणि श्रीमंत लोकांसाठी सादर केला जाणारा कलाप्रकार होता. कारण त्याकाळात मूक सिनेमे येत असत. अद्याप दृक-श्राव्य तंत्रज्ञान विकसित झाले नसल्याने पडद्यावर चित्र चालत असतानाच एका व्यक्तीच्या हातात संवादांची पाटी दिली जात. जसे जसे पडद्यावरील चित्र बदलत, तसे तसे ती व्यक्ती संवादांची पाटी बदलत. त्यामुळे सुशिक्षित लोकांनाच सिनेमांचा आस्वाद घेता येत असे.
दृक-श्राव्य चित्रपट यायला १९२७ साल उजाडले. दृक-श्राव्य चित्रपट आल्यानंतर सिनेमाचा आस्वाद सगळ्यांना घेता आला. १९२७ नंतर सिनेमा पाहण्याबरोबरच लोकांना सिनेमागृहात अल्पोपहार आणायचा होता. लोकांच्या आग्रहामुळे चित्रपटगृहाच्या मालकांनीही खाद्यपदार्थ चित्रपटगृहात न्यायची परवानगी देऊ केली. या संधीचं सोनं करण्याच्या दृष्टीने अनेक किरकोळ रस्त्यावरील विक्रेत्यांनी आपली दुकानं चित्रपटगृहांच्या बाहेर थाटली आणि अखेर पॉपकॉर्नला चित्रपटगृहात प्रवेश मिळाला.
पॉपकॉर्न-विक्रेत्यांना पॉपकॉर्न विकण्यातून मोठा नफा मिळत आहे असं लक्षात आल्यावर चित्रपपटगृहांच्या मालकांनी चित्रपटगृहातच पॉपकॉर्नची विक्री सुरु केली. पॉपकॉर्न विकणे हा आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट जोडधंदा ठरेल हे सिनेमागृहांच्या मालकांच्या लक्षात आले होते.
पॉपकॉर्नचा उत्पादन खर्च जास्त नसल्याने तसेच पॉपकॉर्न तयार करण्यासाठी कोणत्याही विशेष कौशल्याची गरज नसल्याने या व्यवसायात अत्यंत कमी गुंतवणूक होती. तसेच पॉपकॉर्न शिजवताना येणारा सुगंध हाच त्याच्या बाजारीकरणाचा (मार्केटिंग) मोठा मुद्दा होता. मार्केटिंगसाठी कोणताही वेगळा खर्च करण्याची गरज नव्हती. प्रेक्षकांसाठी तर चित्रपट पाहताना पॉपकॉर्नशिवाय उत्कृष्ट काहीच नव्हते. पॉपकॉर्न हाताने सहज खाता येण्यासारखे असते शिवाय ते खाताना लक्षही विचलित होत नाही.
म्हणूनच, लोक सिनेमागृहांमध्ये सिनेमा पाहताना पॉपकॉर्न खातात. हा एक साधा, व्यावहारिक अल्पोपहार आहे. पॉपकॉर्न प्रेक्षकांना आवडतो आणि सिनेमागृहाचे मालक यातून मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकतात. पॉपकॉर्नला सिनेमामगृहात यायला वेळ लागला, पण आता ते कायमस्वरूपी चित्रपटगृहातच आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.