थायलंडमध्ये बनलेलं हे पेय आज जगात नंबर एकचं एनर्जी ड्रिंक बनलं आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


जगातील सर्वात जास्त विकले जाणारे उर्जावर्धक पेय कोणते असेल याचे उत्तर हमखासपणे ‘रेड बुल’ असे मिळते. एका वर्षात ६.३ अरब एवढ्या रेडबुलच्या कॅन विकल्या जातात यावरुनच रेडबुलच्या प्रसिद्धीचा अंदाज येऊ शकतो. एफ-१ शर्यतींमध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या खेळाडुंच्या कपड्यांवर झळकणाऱ्या रेड बुलच्या लोगोने रेड बुल हे नाव आता जगभरात प्रसिद्ध केले आहे.

बाकी कंपन्यांसारखीच रेड बुलची सुरुवातही अगदी छोट्या रुपात झाली होती हे तुम्हाला माहीत आहे का? आज ऑस्ट्रियात आपले मुख्यालय असलेली ही कंपनी खरं तर थायलंडमध्ये सुरु झाली होती. आज आपण याच रेडबुलच्या थायलंड ते ऑस्ट्रिया हा प्रवास जाणुन घेणार आहोत.

रेड बुलची सुरुवात थायलंडमध्ये १९७६मध्ये झाली. चायनीज उद्योजक ‘चेलिओ यूविध्या’ यांनी रेडबुलची सुरुवात ‘क्रेटींग डेंग’ या नावाने केली.

चेलिओ यांचा जन्म एका गरीब चायनीज स्थलांतरीत कुटुंबात झाला. बदकांचे पालन करणे हाच त्यांचा घरगुती व्यवसाय होता. १९५०च्या मध्यात चेलिओ बँगकॉकला औषधे विकण्यासाठी गेले. १९५६मध्ये त्यांनी स्वत:चा औषधे उत्पादन व्यवसाय सुरु केला. हा व्यवसाय चालवत असतानाच त्यांना एक संधी दिसली.

त्यावेळी थायलंडच्या बाजारात फक्त एक जपानी उर्जावर्धक पेय उपलब्ध होते. बाकी छोटे आणि अगदी नाव नसलेले पेय थोड्याफार प्रमाणात त्यावेळी मिळत असत. या जपानी पेयाचे नाव होते- लिपोविटन डी. (हे आजही जपानमध्ये प्रसिद्ध आहे.) १९६२मध्ये जपानमध्ये सुरुवात झालेले हे पेय जपानी लोकांनी थायलंडमध्ये आणले.

बऱ्याचशा थायलंडच्या कामगारांनी या जपानी उर्जावर्धक पेयाचा वापर करण्यास सुरुवात केली. या पेयाशी संबंध आल्यावर चेलिओ यांना एक कल्पना सुचली.

लिपोविटनच्या रेसिपीचा वापर करून त्यांनी तिचेच थोडे गोड पेय बनवले. सुरूवातीला हे पेय जास्त विकले गेले नाही. बाकीच्यांपेक्षा हे पेय अगदी वेगळे होते. त्यात सुरुवातीला मोठ्या शहरातील बाजाराकडे लक्ष न देता कामगार वर्गास मुख्य ग्राहक म्हणुन याची जाहिरात केली गेली.

चेलिओ यांनी मग आपल्या पेय कंपनीचा लोगो बनवण्याचे काम हाती घेतले. दोन जंगली बैल एकमेकांशी लढताना मागे पिवळ्या रंगात सुर्य दाखवणारा कंपनीचा लोगो तयार झाला.

दोन जंगली बैल दाखवून थायलंडमधे प्रसिद्ध बैलांच्या झुंजीची आठवण करुन देण्याचे काम हा लोगो करत होता.

सुरुवातीच्या काही ग्राहकांसाठी ‘क्रेटिंग डेंग’एक विशेष पेय होते. पारंपारिक औषधांमध्ये प्राण्यांच्या अवयवांचा वापर केला जात असे. तसाच लोगोमधील जंगली बैलांच्या अवयवांचा वापर हे पेय बनवण्यात केला जात आहे असे त्यावेळी काही लोक समजत असत.

पेयात वापरले जात असलेले टॉरिन हे रसायन बैलांच्या वीर्यापासून बनवले जात असे असा काही जणांचा समज होता. प्रत्यक्षात मात्र टौरिनची निर्मिती नेहमीच कृत्रिमरीत्या केली जात आहे.

जाहीरातींचा योग्यरीत्या वापर करण्यासाठी चेलिओ यांना आपल्या देशाचे असलेली इथंभुत माहिती कामी आली. जाहीरातीत कामगार पेय पिताना दाखवले गेले. यातून हे पेय सर्वसामान्यांसाठी आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तसेच हे पेय दारुबरोबर पिण्यासाठी योग्य असल्याचेही त्यांनी जाहीरातीत नमुद केले होते.

काही वर्षानंतर त्यांनी थायलंडमधील प्रसिद्ध आणि घरगुती खेळ असलेल्या म्यु-थाई या खेळाच्या चाहत्यांसाठी हे पेय असल्याची जाहिरात केली.

काही वेळानंतर म्यु-थाई म्हटलं की ‘क्रेटिंग डेंग’ असे समजले जाऊ लागले. याच खेळातील मोठमोठ्या खेळाडुंना कंपनीने स्पॉंसर करण्यास सुरुवात केली.

कंपनीच्या जागतिक स्तरावर जाण्याची वेळ आली ती १९८४ मध्ये. ऑस्ट्रियन असणाऱ्या एका भटक्या बाजारतज्ञाने ‘क्रेटिंग डेंग’ हे पेय पिले आणि त्याला प्रवासाने आलेला थकवा दुर झाला. ‘डेट्रीक मेटेशिट्ज’ हे त्याचे नाव. तो स्वत: टूथपेस्ट विक्रेता होता. त्याने चेलिओ यांच्याशी संपर्क साधला आणि ऑस्ट्रियात हे पेय विकण्यासाठी चेलिओ यांच्याशी करार केला.

क्रेटिंग डेंगचे नाव बदलुन रेड बुल करण्यात आले. पेय बनवण्याची रेसिपी तीच ठेऊन त्याने कार्बनीय प्रमाण वाढवून दारुबरोबर मिश्रणासाठी अधिक योग्य असणारे पेय बनवले. पेय बाटलीत न विकता त्याने चंदेरी आणि निळ्या रंगांच्या कैनमध्ये पेय विकण्यास सुरु केले.

मध्यमवर्गीय ग्राहकांवरुन तरुण लोक, साहसी खेळात सहभागी होणारे खेळाडू आणि इतर खेळासाठी या पेयाची जाहिरात करण्यास सुरू केले. आजही हाच वर्ग रेड बुलचा मुख्य ग्राहक वर्ग आहे.

२००५ साली दिलेल्या मुलाखतीत डेट्रीक मेटेशिट्ज यांनी “रेड बुलसाठी आत्ता जरी बाजार उपलब्ध नसला तरी तो आम्ही निर्माण करु” असे सांगितले होते.

डेट्रीक मेटेशिट्ज यांनी रेड बुल सतत चर्चेत आणि विक्रीत राहण्यासाठी अनेक मोठमोठ्या खेळाडुंशी करार केले. अनेक मोठमोठ्या स्पर्धांचे आयोजन केले. क्लिफ डायव्हिंग, स्केटबोर्डींग, एअर रेसिंग अशा साहसी स्पर्धा आजही रेड बुलकडून आयोजित केल्या जातात.

एखाद्या मोठ्या व्यावसायिक उत्पादनाचे रुपांतर मोठ्या भावनात्म्क वस्तूमध्ये कसे करायचे याचे रेड बुल हे एक उत्तम उदाहरण आहे. रेड बुलने ऑस्ट्रियामध्ये आपले पदार्पण केले ते १९८७ मध्ये.

“रेड बुल तुम्हाला पंख देते” अशा अर्थाचे ब्रीदवाक्य घेऊन रेड बुल बाजारात आणले गेले.

तेव्हा पासून ‘रेड बुल जीएमबएच’ जे कंपनीचे नाव आहे, त्यांनी अब्जावधी रेड बुलचे कॅन विकले आहेत. १७१ देशांमध्ये कार्यरत असलेल्या या कंपनीची वार्षिक उलाढाल आता अब्जांच्या घरात आहे.

रेड बुल आज जागतिक बाजारात सगळ्यात मोठी उर्जावर्धक पेय कंपनी आहे. अमेरीकन अर्थव्यवस्थेत सुद्धा एकुण उर्जावर्धक पेयांच्या बाजारातील ४३% हिस्सा रेड बुलच्या मालकीचा आहे.

थायलंडमढे आजही ‘क्रेटिंग डेंग’ विकले जाते. विक्री कमी झाली असली तरीही थायलंडमधील यूविध्या कुटूंब थायलंडमधील सर्वात श्रीमंत कुटूंबापैकी एक मानले जाते. फोर्ब्जच्या अहवालानुसार त्यांच्याकडे १३ बिलियन डॉलर्स एवढी संपत्ती आहे. रियल इस्टेट आणि फरारीच्या उद्योगातही या कुटूंबाने आता गुंतवणुक केली आहे.

रेड बुल आज प्रसिद्ध आहे ती योग्य जाहिरात आणि योग्य ग्राहक वर्गावर दिल्या गेलेल्या गरजेच्या वेळेमुळे. एका विशिष्ट ग्राहक वर्गावर लक्ष केंद्रित करुन जागतिक बाजारपेठ बळकावता येते याचे हे एक उत्तम उदाहरण. आजही रेडबुलची जाहिरात करणाऱ्या खेळांडूच्या संख्येकडे लक्ष दिले तर रेड बुल इतक्यात तरी थांबण्याची काही चिन्हे दिसत नाहीत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!