पोलंडमध्ये आजही या भारतीय राजाच्या नावाने कितीतरी रस्ते आणि शाळा आहेत..

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


साम्राज्य विस्तार करण्याची राक्षसी महत्वाकांक्षा आणि पहिल्या महायुद्धातील पराजयाचा वचपा काढण्यासाठी हिटलरने १९३९ साली दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात केली. यात जर्मनीने युरोपमधील पोलंडवर हल्ला केला. यात रशियानेही जर्मनीला सहाय्य केले. पोलंड हे एक ज्यूराष्ट्र होते आणि हिटलरचा ज्यूंबद्दलचा द्वेष तर जगजाहीर होता. पोलंडमधील अनेक ज्यू नागरिकांना त्याने गॅस चेंबरमध्ये कोंडून मारले होते. महायुद्धाच्या काळातील क्रौर्याचे हे भयावह रूप पाहून पोलंडचे नागरिक अत्यंत हवालदिल झाले होते. कारण, जगण्याची कुठलीच शाश्वती उरली नव्हती. त्यातल्या त्यात मरण तरी सुसह्य असावे एवढीच इच्छा त्यांच्यात जिवंत होती.

रशियाचा हुकुमशहा स्टालिनने देखील त्याला सहाय्य करण्यासाठी पोलंडवर हल्ला केला. या दोन बलाढ्य शक्तींपुढे पोलंडचा निभाव लागणे कठीणच होते. या भीषण युद्धात अनेक सैनिक मारले गेले. सैनिकांची कुटुंबे उध्वस्त झाली. अशा कुटुंबांसाठी छावण्या बांधण्यात आल्या होत्या, मात्र पोलंडवर कब्जा केल्यानंतर रशियाने या छावण्यादेखील रिक्त करण्याचे आदेश दिले.

अशा परिस्थितीत पोलंडमधील काही सैनिकांच्या विधवा पत्नी आणि मुलांना एक जहाजातून बाहेरच्या देशात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

एकाच जहाजात तब्बल ५०० स्त्रिया आणि २०० मुले बसवण्यात आले होती. जहाजाच्या कॅप्टनला सांगण्यात आले ज्या कुठल्या देशाच्या किनाऱ्यावर यांचे स्वागत केले जाईल तिथपर्यंत यांना सुखरूप नेऊन सोड. 

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सर्व प्रकारचे मानवीहक्क आणि अधिकार यांची पायमल्ली होत होती. युद्ध हे फक्त दोन राष्ट्रांच्या सैनिकांत होते मात्र दुसऱ्या महायुद्धात काही देशाच्या नागरिकांना त्यांच्या धर्मामुळे प्राण गमवावे लागले होते. खरे तर ज्याप्रकारे हिटलरने ज्यूंची होळी केली आणि त्यांच्या संपत्तीची राखरांगोळी केली याचे वर्णन वाचल्यास हिटलर माणूस होता की हैवान अशी भावना मनात आल्याशिवाय राहत नाही.

अमानुष क्रौर्याच्या त्या घटना वाचताना आजही अंगावर काटा येतो. नुसता कटाच नाही तर आपले सारे शरीर गलितगात्र होऊन जाते. अशा वातावरणात आपली बायको आणि मुले शत्रू राष्ट्राच्या हाती लागणार नाहीत याची काळजी कोणत्याही सैनिकाला असणे स्वाभाविकच होती. म्हणूनच पोलंडच्या सैनिकांनी आपल्या बायका-मुलांना देशातूनच परागंदा केले.

५०० महिला आणि २०० लहान मुले यांनी भरलेले जहाज पहिल्यांदा इराणच्या बंदरगाह किनाऱ्यावर पोहोचले. परंतु तिथे कुणाही शरणार्थ्याला देशात राहण्याची संमती मिळाली नाही. मग हे जहाज अनेक किनाऱ्यावरून एका पाठोपाठ अनेक देशांत जाऊन आले पण त्यांना कुणीही शरण दिले नाही. शेवटी ते जहाज गुजरातच्या जामनगर किनाऱ्यावर येऊन पोहोचले.

जामनगरचे तत्कालीन राजे महाराजा जाम साहेब दिग्विजय सिंह यांनी या सगळ्या शरणार्थींना आपल्या राज्यात आश्रय दिला. फक्त आश्रयच नाही तर त्या जहाजातून आलेल्या मुलांच्या शिक्षणाची सोयही केली.

जामनगरच्या राजांनी पोलंडच्या निर्वासित नागरिकांना राजाश्रय दिलाय हे समजताच इंग्रज तिथे चौकशीसाठी आले तेंव्हा महाराज म्हणाले की, मी या सर्वांना माझ्या वैयक्तिक खर्चाने पोसणार आहे. या लोकांच्या राहण्या-खाण्याचा जो काही खर्च होईल तो मी माझ्या खजिन्यातून करेन. यासाठी इंग्रजांनी तसदी घेण्याची अजिबात गरज नाही.

राजांनी पोलंडच्या या सर्व नागरिकांना सर्वतोपरी सहाय्य केले. सुमारे नऊ वर्षे हे सर्व नागरिक भारताच्या जामनगरमध्येच राहायला होते. या काळात या मुलांसाठी राजांनी सैनिकी शाळेची सोय केली. या मुलांना चांगले आणि दर्जेदार शिक्षण मिळेल याकडे कटाक्षाने लक्ष दिले. त्यांना सुरक्षित वातावरण मिळेल हे पाहिले. विशेष म्हणजे या मुलांना त्यांच्या मातृभाषेतूनच शिक्षण मिळेल, याचीही तरतूद करण्यात आली. या मुलांसाठी महाराजांनी फुटबॉलचे मैदान बनवून घेतले.

जामनगरमधील बलाचडी हे गाव या मुलांसाठी जन्मगावच बनले होते. यागावात त्यांचे सण-उत्सवही साजरे केले जात. याच शाळेत शिकलेला एक मुलगा पुढे पोलंडचा पंतप्रधान झाला. पोलंडच्या नागरिकांना या राजांबद्दल आजही प्रेम आहे.

१९४५ साली दुसरे महायुद्ध समाप्त झाले. पोलंड रशियाच्या ताब्यात गेले. १९४६ साली पोलंड सरकारने राजांना या मुलांना पुन्हा पोलंडला पाठवण्याची विनंती केली आणि त्यांना परत नेले. पोलंड जोपर्यंत सोव्हिएत रशियाच्या ताब्यात होता तोपर्यंत तिथली धोरणे ही कम्युनिस्ट पद्धतीनेच ठरवली जात. पोलंडच्या नागरिकांना ही गुलामी अजिबात मान्य नव्हती. त्यांनी सोव्हिएत संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.  १९८९ साली पोलंड सोव्हिएत संघातून बाहेर पडला. 

वॉर्सोतील एका चौकाला राजा दिग्विजय सिंह यांचे नाव देण्यात आले. २०१२ साली वॉर्सोमध्ये एक नवे गार्डन बनवण्यात आले या गार्डनला देखील महाराजांचेच नाव देण्यात आले आहे. 

महाराजा दिग्विजय सिंह यांना मरणोपरांत पोलंडच्या ‘कमांडर्स क्रॉस ऑफ दि ऑर्डर ऑफ मेरीट’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्यावेळी राजा दिग्विजय सिंह यांनी या लोकांना आश्रय दिला नसता, तर कदाचित इतर ज्यू नागरिकांप्रमाणेच यांचेही मरण अटळ होते. पण, राजा दिग्विजय सिंह यांनी या लोकांप्रती करुणा दाखवली त्यांच्यासाठी आपल्या संस्थानाचेच नाही तर हृदयाचेही दरवाजे खुले केले. तब्बल नऊ वर्षे राजांनी या लोकांना सांभाळले. म्हणून पोलंडवासी आजही भारतातील या राजाबद्दल आभार व्यक्त करतात.

पोलंडची राजधानी वॉर्सोमध्ये या राजांच्या नावाचा एक भला मोठा चौक आहे. तिथल्या अनेक रस्त्यांना राजा दिग्विजय सिंह यांचे नाव दिलेले आहे. पोलंडमधील अनेक सरकारी योजनांना देखील महाराजांचेच नाव दिले आहे. या राजांचे कार्य येणाऱ्या पिढीलाही समाजावे म्हणून तिथल्या वर्तमान पत्रातून राजांबद्दल लेख लिहिले जातात.

संपूर्ण जग वंशवाद आणि साम्राज्यशाहीच्या क्रूर स्पर्धेच्या विळख्यात सापडले असताना, भारतातील एका राजाने करुणेचा आणि प्रेमाचा वस्तुपाठ घालून दिला. ज्याबद्दल पोलंडवासीय आजही त्यांच्याप्रती कृतज्ञ आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!