आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
केवळ मानवांसाठीच नव्हे तर सजीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी प्राणवायू (ऑक्सिजन) हा अनिवार्य घटक आहे. अर्थात त्यामुळे त्याचं नावच ‘प्राण’वायू ठेवण्यात आलं आहे. आपण सगळेच जण अगदी लहानपणापासून विज्ञानात प्राणवायूचं महत्त्व शिकत आलो आहोतच. मात्र, कोरोना महासाथीच्या काळात त्याचं महत्त्व सर्वसामान्यांच्या मनात अधिक ठळकपणे अधोरेखित झालं आहे.
प्रदूषणाच्या महाराक्षसाने एकूण जगाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं केल्यानंतर त्याच्यावर रामबाण उपाय म्हणून पर्यावरण रक्षणाच्या चळवळी जगभरात मोठ्या प्रमाणात उभ्या राहिल्या. झाडं त्यांचं अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत हवेतला प्राण्यांसाठी धोकादायक असलेला घटक कार्बन-डायॉक्साईड शोषून घेतात आणि प्राण्यांना अत्यावश्यक असलेला प्राणवायू उत्सर्जित करतात हे ही आपण लहानपणापासून शिकत आलो आहोत. त्यामुळे वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन हा पर्यावरण संरक्षण चळवळींचा मुख्य गाभा राहिला आहे.
प्रत्यक्षात वृक्षांपासून मानवाला आवश्यक असलेल्या प्राणवायूचा पुरवठा केला जातो, ही बाब निश्चितपणे खरी आहे. मात्र, पृथ्वीतलावरच्या सजीवांना एकूण किती प्रमाणात प्राणवायूची गरज असते आणि वृक्षांपासून किती प्राणवायू उपलब्ध होतो, याबाबत आपण बहुतेक जण अज्ञानी असतो. जगातली सदाहरित जंगलं, वर्षावनं हा सृष्टीला प्राणवायूचा पुरवठा करणारा सर्वात मोठा स्रोत असल्याची आपली समजूत असते. मात्र, तो मोठा गैरसमज आहे.
जगातलं सर्वांत मोठं सदाहरित वन असलेल्या ॲमॅझॉनच्या जंगलाचा विचार केला तर जगात उपलब्ध असलेल्या एकूण प्राणवायूच्या केवळ ६ टक्के ऑक्सिजन या अरण्यातले वृक्ष प्रदान करतात. मग प्रदूषणाच्या समस्येने जगभरात कार्बन डायॉक्साईडचं प्रमाण वाढत असताना आणि प्राणवायूचं प्रमाण घटत असताना आपल्याला पुरेसा प्राणवायू मिळतो कुठून?
पृथ्वीचा तब्बल ७१ टक्के पृष्ठभाग हा पाण्याने व्यापलेला आहे तर उर्वरित भूभागापैकी अत्यंत मर्यादित प्रमाणात भूभाग वृक्षाच्छादित आहे. त्यामुळे केवळ जमिनीवरील वनस्पती आपल्यासाठी पुरेशा प्रमाणात प्राणवायू निर्माण करू शकत नाहीत. मात्र, समुद्राच्या वरच्या पृष्ठभागावर वाढणारी एकपेशीय शेवाळ वनस्पती हे कार्य करतात.
महासागराचा सर्वांत वरचा म्हणजेच २०० मीटरचा (सुमारे ६५० फूट) भाग हा ‘एपिप्लेजिक झोन’ म्हणून ओळखला जातो. ‘एपि’ म्हणजे ‘वरचा’ आणि ‘प्लेजिक’ म्हणजे ‘सागरी पृष्ठभाग.’ समुद्राच्या या भागावर येणारा सूर्यप्रकाश शोषून घेऊन एकपेशीय शेवाळ वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढतात. समुद्रातल्या खडकांना चिकटून वाढणारी ही शेवाळं खूप मोठ्या प्रमाणात प्राणवायू तयार करतात. विशेषतः महासागरातील माशांसारख्या जीवांना ही शेवाळं अन्न म्हणूनही उपयोगी पडतात आणि प्राणवायूही पुरवतात.
एऱ्हवी दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या; खरं तर उपेक्षित असलेल्या किंवा नकोशा वाटणाऱ्या या शेवाळांपासून जगातल्या एकूण प्राणवायूच्या तब्बल ५० ते ८५ टक्के प्राणवायू तयार होतो. समुद्री शेवाळाची एक प्रजाती असलेली ‘प्रोक्लोरोकोकस’ ही एकटी प्रजाती सुमारे २० टक्के प्राणवायू तयार करते. ऋतुमान, सूर्यप्रकाशाचं प्रमाण आणि भरती-ओहोटी या घटकांमुळे समुद्रात शेवाळाद्वारे निर्माण होणाऱ्या प्राणवायूचे प्रमाण कमी-जास्त होत असते.
महासागरात तयार होणारा सगळा प्राणवायू पृथ्वीवरच्या खुल्या वातावरणात जात नाही तर त्यातला मोठा भाग पाण्यामध्ये शोषला जातो. मात्र, त्याचा उपयोग मासे आणि अन्य जलाचारांसाठी होतो. त्यांना समुद्राच्या फार वर न येता सहजपणे प्राणवायू उपलब्ध होऊ शकतो.
अर्थात, सर्वच प्रकारची समुद्री शैवालं माणसांना, पर्यावरणाला आणि जलचरांच्या जैवसाखळीला उपयुक्तच असतात असं नाही. काही प्रकारची शैवालं विषारी पदार्थांची निर्मिती करतात. हे विषारी पदार्थ आजूबाजूच्या पाण्यात आणि हवेत सोडतात. ती जलचर, मानव आणि एकूण पर्यावरणाला घातक ठरतात. या सागरी शैवालांच्या बाबतीत आणखी एक समस्या अशी आहे की, त्यांचं पाण्यातलं प्रमाण आवश्यकतेपेक्षा वाढलं तर ते ही घातक ठरतं.
पाण्यात शेवाळाचं प्रमाण मर्यादेपेक्षा वाढलं तर ते त्यांच्या वाढीच्या प्रमाणात अधिक प्राणवायू निर्माण करतील अशी समजूत होणं स्वाभाविक आहे. याउलट ते नवीन प्राणवायू तयार करण्याची ‘तसदी’ न घेता असलेला प्राणवायूचं शोषून घेतात. दुसरा भाग म्हणजे अशा शेवाळाचा जाडसर थर पाण्याच्या पृष्ठभागावर तयार होतो. त्यामुळे प्राणवायू न मिळाल्याने त्या थराखालचे माशांसारखे जलचर गुदमरून मरण पावतात. या संकटाच्या परिस्थितीला harmful algal bloom (HAB) म्हणतात.
‘एचएबी’ अथवा अतिरिक्त शेवाळाची परिस्थिती निर्माण होण्यास नैसर्गिक कारणंही असतात आणि मानवी हस्तक्षेपामुळेही हे घडू शकत. एक तर उन्हामुळे वाढणारं पाण्याचं तापमान, पाण्यात मिसळली जाणारी खतं, शेवाळाच्या वाढीला पोषक घटक, पाण्यात सोडले जाणारे सांडपाणी, मैलापाणी यामुळे ही परिस्थिती उद्भवू शकते या शिवाय जागतिक तापमानवाढीचाही शेवाळांच्या वाढीवर परिणाम होत असल्याचं वैज्ञानिकांचं मत असून त्यावर संशोधन केलं जात आहे.
अतिरिक्त शेवाळाची परिस्थिती असलेल्या भागात मासेमारी करून ते मासे खाणं, अशा पाण्यात पोहणं किंवा ते पिण्यासाठी वापरणं, इतकंच काय अशा परिसरात श्वास घेणं हे देखील मानवी आणि इतर प्राण्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. त्यामुळे या पाण्यातले विषारी घटक शरीरात जाऊ शकतात.
महत्त्वाचं म्हणजे, दूषित मासळी शिजवल्याने किंवा दूषित पाणी उकळल्याने शेवाळांमुळे त्यात निर्माण झालेले विषारी पदार्थ नष्ट होत नाहीत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. खास करून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जलस्रोतांमध्ये शेवाळांचं प्रमाण मर्यादेपेक्षा वाढलं तर मोठ्या जनसंख्येला धोका निर्माण होऊ शकतो.
जगाला जगण्यासाठी आवश्यक असलेल्या तब्बल निम्म्याहून अधिक प्राणवायूचा पुरवठा करणारं शैवाल प्रसंगी कसं प्रदूषणकारी आणि रोगराईला कारणीभूत ठरू शकतं आणि या धोक्याचं गांभीर्य किती आहे, याची जाणीव ठेऊन त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न प्रगत राष्ट्रांमध्ये केला जात आहे. शेवटी कोणतीही गोष्ट प्रमाणात असली तरंच ती उपकारक ठरते, हे धडे निसर्गही आपल्याला वारंवार देत असतो. त्यातून बोध घेणं न घेणं आपल्या हातात आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.