आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
९ एप्रिलपासून भारतात एकच वारं वाहतंय. इंडियन प्रीमियर लीगचं. IPL. भारतातील क्रिकेटप्रेमींसाठी आपले आवडते खेळाडू एकत्र खेळताना बघण्याची पर्वणीच!
यंदा मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या मॅचने आयपीएलची सुरुवात झाली. आयपीएलमधे खेळणाऱ्या आठही टीमच्या मालकांनी फक्त खेळाडूंना विकतच नाही घेतलं तर त्यांचं ट्रेनिंग, त्यांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था, इतर सुविधा या सगळ्यातच पाण्यासारखा पैसा ओतलाय.
पण, या सगळ्यांवर एवढा पैसा खर्च करणाऱ्या या आयपीएलच्या टीमची कमाई कशी होत असेल? हा प्रश्न तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना पडत असेल. आजच त्याचंच उत्तर जाणून घेऊया.
२००८ साली आयपीएलची सुरुवात झाली. त्यावेळी आठ शहरातील मोठमोठ्या हस्तींनी या टीम आपल्या नावे केल्या. या टीमची फ्रान्चाईझी घेण्यासाठी त्यांनी बीसीसीआय मोठी रक्कमदेखील चुकावली होती.
यानंतर बीसीसीआयने खेळाडूंवर बोली लावायला सुरुवात केली. प्रत्येक टीम जास्तीत जास्त २५ खेळाडूंना विकत घेऊ शकते ज्यात भारताबरोबरच विदेशातील खेळाडूंचा देखील समावेश असतो.
तर, आयपीएलच्या संग्रामात उतरणाऱ्या या टीमकडे कमाईचे वेगवेगळे मार्ग असतात. जसं की, जाहिराती, वेगवेगळे पुरस्कार जाहीर होतात त्याची आणि टीमच्या सामानांचा लिलाव.
जाहिराती किंवा स्पॉन्सर
आयपीएलमधे खेळणाऱ्या या टीम्सना वेगवेगळ्या कंपन्या स्पॉन्सर करत असतात. त्या कंपनीची जाहिरात या टीम आपल्या टी-शर्ट्सवर वगैरे करून त्या बदल्यात कंपनीकडून पैसे घेतात. एका टी-शर्टवर अनेक कंपन्यांच्या जाहिराती असतात. आता कंपनीचा लोगो कुठे प्रिंट करण्यात आला असेल यावरून त्याची किंमत ठरत असते. याशिवाय इतरही वस्तूंवर लोगो छापण्यात येतो.
या टीम्सच्या कमाईचा हाच मुख्य स्त्रोत असतो. जेवढी मोठी टीम तेवढे स्पॉन्सर जास्त आणि साहजिकच त्या टीमची कमाई पण.
तिकिटांतून होणारी कमाई-
आयपीएलमधे होणाऱ्या साखळी सामन्यात सात मॅच एखाद्या टीमच्या होमग्राउंडवर खेळल्या जातात तर सात बाहेर. आता ज्या टीमच्या होमग्राउंडवर हे सामने होतील त्या टीमला ते पैसे मिळतात. पण यंदा कोरोनामुळे ही कमाई तर गेली.
मिडीया राईट्स
या टीम्सच्या मुख्य कमाईचा अजून एक स्त्रोत म्हणजे मिडीया राईट्स अर्थात ब्रॉडकास्टिंगचे अधिकार. म्हणजेच कुठल्या चॅनेलवर आयपीएल दाखवली जाईल. सध्या तरी हे राईट्स स्टार ग्रुपकडे आहे. आपल्या चॅनेलवर मॅच दाखवू देण्याच्या बदल्यात स्टारकडून बीसीसीआयला काही ठराविक रकम दिली जाते.
सध्या बीसीसीआय आणि स्टार ग्रुपचा पाच वर्षांचा करार झाला आहे. २०१८ साली स्टारने तब्बल १६ हजार करोडहून अधिक रकम देऊन हे राईट्स आपल्याकडे घेतले आहेत. याच रकमेतील काही हिस्सा टीम्सला दिला जातो.
आता जी टीम जास्त टिकून राहते तिचा तेवढाच फायदा जास्त होतो. आजकाल सगळेच ऑनलाईनकडे जास्त वळले आहेत त्यामुळे बीसीसीआयकडून ब्रॉडकास्टिंगचे ऑनलाईन अधिकार पण विकले जातात. सध्या तरी हे अधिकार हॉटस्टारकडेच आहेत.
पुरस्कार राशी
प्रत्येक टीमला आपल्या एकूण आयपीएलच्या सामन्यांत केलेल्या परफॉर्मन्सनुसार रँकिंग दिलं जातं आणि त्याच अनुषंगाने काही रकम दिली जाते. साहजिकच विजेत्या टीमला जास्त धनराशी दिली जाते आणि शेवटचा नंबर आलेल्या टीमला कमी.
आयपीएल जिंकणाऱ्या टीमला यंदा तब्बल १० करोडची धनराशी मिळेल. २०१९ साली ही रकम २० करोड होती पण गेल्या वर्षभरात कोरोनाने घातलेल्या धुमाकुळामुळे ही रकम कमी करण्यात आली आहे.
टीमच्या सामानाची विक्री (टीम मर्चंडाइज)
हे सगळं काय कमी होतं की आयपीएलच्या या टीम्सचे मालक वेगवेगळे मर्चांडाइज विकतात आणि त्यातूनही आपापले खिसे भरण्याचं काम करतात. जी टीम जेवढी लोकप्रिय तेवढे त्याचे मर्चंडाइज जास्त विकले जातात.
तर, अशाप्रकारे आपली आवडती टीम त्यांचा गुजारा करत असते. हा लेख कसा वाटला ते आणि आयपीएलमधे तुमची आवडती टीम कोणती हे आम्हाला कमेंट बॉक्समधे नक्की कळवा!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.