पाकिस्तानातील हिंदूंची अवस्था ऐकून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


जेंव्हा 1947 साली फाळणी झाली आणि भारत व पाकिस्तान दोन स्वतंत्र देश अस्तित्वात आले. त्यावेळी दोन्ही देशातील लोकांना राहण्यासाठीचे स्वतंत्र पर्याय देण्यात आले होते. भारतातील मुस्लीम लोकांना ज्यांना पाकिस्तानमध्ये जायची इच्छा असेल त्यांना पाकिस्तानमध्ये जाण्याचा आणि ज्यांना भारतामध्ये रहावयाचे आहेत त्यांना भारतात राहण्याचा अधिकार देण्यात आला होता.

पाकिस्तानमध्ये मात्र असे झाले नाही. पाकिस्तानमधील हिंदू लोकांना हुसकावून लावण्यात आले होते. घरांची प्रचंड जाळपोळ झालेली होती. सामानाच्या गाड्या अडवण्यात आले होते.

एवढेच नाही तर लाहोरवरून दिल्लीला येणाऱ्या रेल्वे हिंदूंच्या मृत शरीरांनी भरून पाठविण्यात आल्या होत्या.

एकंदरीत त्यावेळी प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती. हे स्थित्यंतर दोन्ही देशातील गरीब जनतेला भयंकर ठरले होते. आता इतक्या वर्षांनंतर मागे वळून बघताना लक्षात येते भारत हा प्रजासत्ताक देश बनला आहे. आपल्या देशाचा कुठलाही अधिकृत धर्म नाही. हिंदू लोकसंख्या भलेही येथे जास्त असेल तरीही मुस्लिम ख्रिश्चन, ज्यू, शीख असे विविध धर्माचे लोक येथे राहतात.

पाकिस्तानात मात्र उलटी परिस्थिती आहे. तिथे राहणाऱ्या अल्पसंख्यांक समाजावर प्रचंड अन्याय होत राहतो. पाकिस्तान आणि भारत यांच्या बॉर्डरवर काही गावे वसलेली आहेत. त्या गावांमध्ये हिंदू लोकसंख्या जास्त आहे. आता या लोकांची गंमत अशी की यांचा धर्म तर हिंदू परंतु भौगोलिक दृष्ट्या हे राहतात पाकिस्तानमध्ये. त्यामुळे या लोकांपुढे जगण्याचा मोठा पेच पडला असतो.

धर्मानुसार भारताला पाठिंबा द्यावा तर पाकिस्तान सरकारकडून अन्याय होण्याची भीती राहते आणि जर पाकिस्तानला पाठिंबा दिला तर स्वतःच्या धर्माबरोबर प्रतारणा केल्यासारखी वाटते.

मध्यंतरी शोएब अख्तरने दानिश कनेरिया या हिंदू क्रिकेटरबद्दल आपले मत व्यक्त केले होते. पाकिस्तानच्या टीममधील दानिश हा एकमेव हिंदू बॉलर. दानिशला ड्रेसिंग रूममध्ये पाकिस्तानी क्रिकेटरकडून प्रचंड भेदभावाची वागणूक मिळत असे. दानिश कनेरिया हे पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदू समाजाचे प्रातिनिधिक उदाहरण आहे.

असे म्हटले जाते फाळणीनंतर पाकिस्तानमधील 44 लाख हिंदू भारतामध्ये आले आणि भारतामधील सव्वा करोड मुस्लिम लोक पाकिस्तानमध्ये राहण्यास गेले.

तरीही आज पाकिस्तानच्या सीमेवरील गावातील हिंदू लोकसंख्या जवळपास एकूण मुस्लिम लोकसंख्येच्या दोन टक्के एवढी आहे.

या हिंदू लोकांना मुख्य प्रवाहात सामील केले जात नाही. त्यांच्या मुलभूत गरजाही पाकिस्तान सरकार पूर्ण करत नाही.

ही हिंदू लोकसंख्या एका तऱ्हेने जीव मुठीत धरून पाकिस्तानमध्ये जगत राहते हे प्रातिनिधिक चित्र आहे. अनेक लोक शरणार्थी म्हणून भारतात दरवर्षी येत राहतात परंतु त्या लोकांना भारतीय नागरिकत्व मिळण्याची आत्तापर्यंत कसलीही सोय नव्हती. ते निर्वासित म्हणूनच आपले जीवन भारतात व्यतीत करत होते.

या नागरिकांना नागरिकत्व मिळावे यासाठी नागरी बिल सुधारणा कायदा लोकसभेमध्ये सादर करण्यात आला आहे. परंतु असेही लोक आहेत ज्यांना आपली जमीन सोडून कुठेही जायचे नाही हे लोक पाकिस्तानबद्दल कायम निष्ठा बाळगून असतात.

अगदी उदाहरण घ्यायचे झाले तर पाकिस्तानच्या सिंध प्रांतांमधील थारपारकर नावाच्या जिल्ह्याचे उदाहरण घेता येईल. हा थारपारकर जिल्हा गुजरातच्या कच्छ वाळवंटाच्या पार वसलेला आहे. हा भाग भौगोलिक दृष्ट्या सध्या पाकिस्तानात येतो. परंतु या जिल्ह्यांमध्ये जवळपास 80 टक्के लोकसंख्या हिंदू आहे. या जिल्ह्यातील लोकांनी अलीकडे आपल्या घरांवर आपल्या गाड्यांवर तसेच मंदिरांवर देखील पाकिस्तानी झेंडे उभारण्याचे प्रकार पाहायला मिळाले.

भारताने काश्मीरमधील कलम 370 हटवले आणि काश्मीरचा विशेष दर्जा हिरावून घेतला. भारताच्या या कृतीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा परिणाम झाला. पाकिस्तानचा प्रचंड जळफळाट झाला आणि त्यांनी सोशल मीडियावरून भारत विरोधी निदर्शने देखील केली.

थारपारकर जिल्ह्यातील हिंदू हे पाकिस्तान सरकारच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी आपली निष्ठा देशा बरोबर आहे हे दाखवण्यासाठी आपल्या घरांवर गाड्यांवर तसेच आपल्या मंदिरांवर देखील पाकिस्तानचा हिरवा झेंडा लावला.

याप्रकारे निषेध करण्याची या जिल्ह्यातील लोकांची ही पहिलीच वेळ नाही मागच्या वर्षी पाकिस्तानकडून काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानातील बालाकोट येथे एअर स्ट्राइक करून अनेक दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले होते. त्यावेळी देखील थारपारकर जिल्ह्यातील लोकांनी रस्त्यावर उतरून भारताच्या विरोधात निदर्शने केली होती.

खरे पाहता थारपारकर जिल्हा हा अत्यंत गरीब जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील लोकांचे जीवन अत्यंत हलाखीचे आहे. हिंदुबहुल लोकसंख्या असल्यामुळे पाकिस्तान सरकारने या भागाचा विकास करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत.

या जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई पहायला मिळते, जिथे शिक्षणाची सोय देखील नाही. उद्योगधंदे विशेष कुणी करत नाही. लोक अगदी मोलमजुरी करून कशीबशी आपली उपजीविका चालवतात.

परंतु येथील लोकांना वाडवडिलांपासून चालत आलेले आपले घर आणि आपली जमीन सोडायची नाही, त्यामुळे त्यांना आपली निष्ठा नाईलाजाने पाकिस्तान बरोबर ठेवावी लागते.

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक हिंदू समाजावर अनेक वेळा अन्याय केला जातो. अगदी खुलेआम ते हिंदू समाजाचे शिरकाण करू शकत नाहीत इतकाच काय तो दिलासा. परंतु हिंदूंना जगण्याचे मूलभूत अधिकार देखील फारसे मिळत नाहीत ही सत्य परिस्थिती आहे. अशा स्थितीत या बॉर्डर भागातून आपल्या भारत देशात निर्वासित हिंदू लोकांचा लोंढा येत राहतो त्या लोकांना आपल्या देशाचे नागरिकत्व मिळाले पाहिजे ही आपल्या भारत देशाची भूमिका योग्य वाटते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!