आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
शहाजहान हा दिल्लीच्या मोगल राजघराण्यातील पाचवा बादशाह, जहांगिराचा मुलगा. त्यानेच दिल्लीचा लाल किल्ला बांधला. वास्तविक शहाजहान हा सगळ्यात थोरला मुलगा नव्हता, तसेच तो जहांगिराच्या पट्टराणीचा मुलगासुद्धा नव्हता. पण तरीदेखील शेवटी मोगल सत्ता त्याच्या ताब्यात आली. हे कसे घडले याचा प्रवास मोठा रंजक आहे.
शहाजहान त्याच्या वडिलांपासून म्हणजेच तत्कालीन मोगल सम्राट जहांगीर याच्यापासून दूर राहूनच लहानाचा मोठा झाला. त्याला कारणीभूत होता राजज्योतिष्याचा सल्ला. या सल्ल्यानुसार त्याला त्याच्या आजोळी ठेवण्यात आले. तिथे त्याची आजी रुकैया सुलताना बेगम हिने त्याचा सांभाळ केला. जरी तो राजवाड्यापासून आणि राजकारणापासून दूर राहून लहानाचा मोठा झाला, तरी त्याला राज्यकारभारासाठी आवश्यक असलेले सर्व शिक्षण मिळाले. युद्धशास्त्र, कायदा, प्रशासन, लिबरल आर्ट्स यांसारख्या विषयात त्याने ज्ञान मिळवले.
दरम्यानच्या काळात जहांगिराचा मोठा मुलगा राजकुमार खुसरो याच्याकडे दरबारातल्या सर्व महत्त्वाच्या पदांचा कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यावरून एक न एक दिवस त्याच्याच ताब्यात सत्ता येणार हे निश्चित होते. पण मध्येच माशी शिंकली. या उतावळ्या राजकुमाराने सन १६०६ मध्ये करू नये ती चूक केली. त्याने आपले वडील म्हणजेच राजा जहांगीर हयात असतानाच सिंहासनावर आपला दावा सांगितला.
त्यावेळी तो लाहोरमध्ये होता. जहांगीरने त्याचे बंड मोडून काढले आणि त्याला तुरुंगात टाकले. खुसरोचे सर्व समर्थक फासावर चढवले गेले. स्वतः खुसरोचेही डोळे फोडण्यात आले, आणि नंतर त्यालाही फासावर लटकवण्यात आले. इतकेच नाही तर त्याच्या मुलांनाही तुरुंगात डांबले गेले.
आतापर्यंत दूर असलेला शहाजहान या घटनेनंतर जहांगिराच्या अधिकच जवळ आला. त्याने या संधीचा पुरेपूर फायदा घेत राजधानीमध्ये आपला प्रभाव वाढवला. महत्त्वाच्या राजकीय आणि लष्करी जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेत त्याने आपल्या अंगी असलेल्या उत्कृष्ट नेतृत्वक्षमतेचे दर्शन घडवले.
वास्तविक जहांगिराचा दुसरा मुलगा परवेज मिर्झा हा शहाजहानपेक्षा वयाने मोठा होता. पण तो राज्यकारभार संभाळण्याइतका कर्तबगार नव्हता. त्यामुळे राजघराण्यावर आणि सत्तेवर हक्क सांगण्यास शहाजहानच पात्र होता. असं असलं तरी त्याच्यासाठी सत्ता मिळवणे इतके सोपे नव्हते.
जहांगीर व्यसनाधीन झाल्यानंतर त्याची विसावी पत्नी असलेली नूरजहां ही राणी खऱ्या अर्थाने सत्तेचे केंद्र बनली. तिने अत्यंत चातुर्याने राजकीय खेळी खेळायला सुरुवात केली. आपल्या मर्जीतील माणसांना सत्ता मिळावी म्हणून तिने आपल्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलीचा विवाह जहांगीरचा मुलगा ‘शहरयार’ याच्याशी केला आणि आपली भाची मुमताज हिचे लग्न शहाजहानशी केले. मुमताज ही नूरजहांचा भाऊ असलेल्या असफखानची मुलगी होती.
अशाप्रकारे नूरजहांने राजगादीवरील आपली पकड मजबूत केली. पण यामागे तिचा डाव होता तो आपला स्वतःचा जावई शहरयार याला सिंहासनावर बसवण्याचा. तशी संधी तिला मिळालीही. त्याचदरम्यान पर्शियन राजांनी कंदाहारचा ताबा घेतला. नूरजहांने पर्शियन लोकांशी लढण्यासाठी शहाजहानला कंदाहारला पाठवायला जहांगिरला सल्ला दिला.
पण शहाजहानची यासाठी तयारी नव्हती. त्याला सतत वाटायचे, त्याच्या अनुपस्थितीत नूरजहां जहांगिरावर विषप्रयोग करून त्याला ठार मारेल आणि शहरयारला सिंहासनावर बसवेल. पण राजाज्ञेचा अवमान केल्यामुळे शहाजहानलाच अटक करण्यात आली. त्याच्या लक्षात आले, हा डाव आपल्यावरच उलटू शकेल. त्यामुळे यापुढे काय होऊ शकते याचे चित्र रंगवून शहाजहानने माफी मागितली. जहांगिरानेही त्याला क्षमा केली. परंतु त्या क्षणी शहाजहान आणि नूरजहां यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले, ते कायमचेच.
इ. स. १६२७ मध्ये राजा जहांगिरचा लाहोरजवळ मृत्यू झाला. त्यावेळी शहाजहान दख्खनमध्ये एका लढाईत व्यस्त होता. जहांगिराचा मृत्यू होताच लाहोरचा राज्यपाल असलेल्या शहरयारने स्वतःला सम्राट म्हणून घोषित केले. सत्तेचा खेळ सुरू झाला. अनेकजण आपापली बाही सरसावून पुढे आले. यातच एक होते ते म्हणजे शहाजहानचा सासरा असफखान. त्याने चतुराईने हालचाली करत आपल्या जावयाचे राजसिंहासनावरील स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्न केले.
सगळ्यात आधी त्याने नूरजहांच्या ताब्यातून शहाजहानच्या मुलांची सुटका केली आणि नूरजहांला अटक केली. नंतर त्याने राजकुमार दावर बक्ष याची तुरुंगातून सुटका केली आणि त्याला सम्राट म्हणून घोषित केले. दावर बक्ष हा राजकुमार खुसरोचा मुलगा. या खुसरोलाच जहांगिराने बंड केल्याबद्दल फाशीवर लटकवले होते.
दावर बक्षला शाही हत्तीवरून शहरयारशी लढण्यासाठी सैन्यासह पाठवण्यात आले. वास्तविक दावर बक्ष मध्ये कोणतेही गुण नव्हते. तो स्वतःच या अभूतपूर्व अनुभवाने चकित झाला होता. त्याचा केवळ प्यादे म्हणून वापर करण्यात आला होता आणि तेही त्याच्या लक्षात आले नव्हते. या युद्धात शहरयारच्या सैन्याचा पराभव झाला. दरम्यानच्या काळात शहाजहानही दख्खनच्या लढाईवरून परत आला.
परत येताच त्याने स्वतःला सम्राट म्हणून घोषित केले. त्यानंतर त्याने आपल्या सर्व संभाव्य प्रतिस्पर्ध्यांना फाशीवर लटकवले. यामध्ये शहरयार, त्याचे अनेक भाऊ, आणि पुतणे यांचा समावेश होता. कर्तबगारी नसलेल्या दावर बक्षचीही तीच गत झाली. त्यालाही फाशीवर लटकवण्यात आले. अखेरीस सर्व लोकांना यमसदनी धाडून शहाजहान मोगल सम्राट बनला. असफखानला मात्र त्याच्या कामगिरीबद्दल योग्य ते इनाम मिळाले. शहाजहानने त्याची पंतप्रधान म्हणून नेमणूक केली.
शहाजहानने किरकोळ बदल करून अकबराची प्रशासनव्यवस्था पुढे नेली. मात्र त्याने काही महत्त्वाचे आणि काही अन्याय्य असे बदलही केले. त्याने रयतवारी पद्धतीऐवजी जमीनदारी पद्धत अमलात आणली. त्याच्या कारकीर्दीत इस्लामचा प्रभाव वाढला. अकबराच्या काळात दंडवत किंवा नमस्कारासाठी असलेली सिजदा ही पद्धती जाऊन त्याऐवजी तहार-तस्लिमची पद्धत त्याच्या काळात रूढ झाली. तो स्वतः सुन्नी पंथाचा पुरस्कर्ता होता. त्याने मंदिरांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवले आणि प्रजेवर तीर्थयात्राकर लादला. त्याच्या काळात अल्लाहबद्दल अपशब्द काढणे हा दखलपात्र गुन्हा होता.
शहाजहानने सुलेखनकला, संगीत, चित्रकला आणि वास्तुकला यांना उत्तेजन दिले. त्यामुळे अनेक भव्य व उत्तम शैली असलेल्या वास्तू उभारण्यात आल्या. संगमरवरी पाषाणात बांधलेला ताजमहाल, आग्र्यातील दिवाण-इ-आम, दिवाण-इ-खास, मोती मशीद, दिल्लीचा लाल किल्ला, दिल्ली व आग्रा येथील जामा मशिदी, काश्मीरमधील शालिमार व निशात बाग ही सर्व या वास्तुशैलीची उदाहरणे आहेत.
त्याच्या दरबारात जगन्नाथपंडित, सहाकविराय, लालखान (तानसेनचा जावई), सुखसैन, सुरसैन हे संस्कृत पंडित व कलावंत होते. मुल्ला अब्दुल हकिम, सीयालकूटी, मुल्ला महमूद जौनपूरी हे अरबी साहित्यिकही त्याच्या सेवेत होते. कोहिनूर हिरा बसविलेले मयूरसिंहासन अर्थात तख्त-ए-ताऊस त्यानेच बनवून घेतले. एकूण शहाजहानची कारकीर्द ऐश्वर्यसंपन्न, वैभवशाली होती. आजही इतिहासात त्याचा कालखंड मोगल सत्तेचे सुवर्णयुग मानला जातो.
या मोगल सम्राटांना ‘आपला बापच जन्माला आला नसता तर किती बरं झालं असतं’ असे वाटत असेल हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं विधान खरंच आहे!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.