आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
विज्ञानामध्ये ‘नॉमेनक्लेचर’ नावाची एक संकल्पना आहे. याद्वारे प्रत्येक नव्याने शोधल्या गेलेल्या मूलद्रव्यांना, सजीवांना, ग्रहांना नवी पण अर्थपूर्ण नावे दिली जातात. विज्ञानातील द्विपदी नामकरणाची ‘लिनीयन सिस्टीम’ कॅरोलस लिनियस नावाच्या संशोधकाने १७५० साली सुरु केली होती. याच व्यवस्थेचा वापर आजही अनेक नव्याने शोधल्या गेलेल्या मूलद्रव्य, ग्रह इत्यादींना नावे देण्यासाठी केला जातो.
वैज्ञानिक विश्वशिवाय दैनंदिन जीवनातही प्रत्येक व्यक्तीचे, स्थानाचे कोणत्या न कोणत्या प्रकारे नामकरण केलेले असते. ठेवलेल्या प्रत्येक नावाच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असतं. उदाहरणार्थ, आपल्या देशाचे नाव भारत, हे भरत या आदर्श राजाच्या नावावरून ठेवण्यात आलं. याशिवाय हिंदुस्थान, इंडिया अशी नावेसुद्धा आपल्या देशाला आहेत.
युरोपीय लोकांना सिंधू किंवा सिंध असे सहजासहजी उच्चारता येत नसल्याने त्यांनी सिंधू नदीचा उल्लेख ‘इंडस’ म्हणून करायला सुरुवात केली. त्यावरूनच, इंडसच्या काठावरील देशाला त्यांनी नाव दिले ‘इंडिया’. त्यावेळी इंडियाच्या आजूबाजूच्या लहान लहान देशांनाही साऊथ इंडिज, इंडिज अशी नावे देण्यास सुरुवात झाली.
भारताप्रमाणे जगातील सर्वच देशांच्या नावामागे काहीतरी इतिहास आहे. त्यापैकी इराणच्या नामकरणामागे अतिशय मनोरंजक गोष्ट आहे. इराणच्या नामकरणाच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊया या विशेष लेखातून..
सध्याचे ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण’ इतिहासकाळात विविध देशांद्वारे अनेक नावांनी ओळखले जात होते. हा भाग काही हजार वर्षांपूर्वी मेसोपोटॅमियन संस्कृतीचा भाग होता. मेसोपोटॅमियाच्या उत्तरेकडे होते अचेमेनिड साम्राज्य. त्याचे सर्वांत प्रसिद्ध नाव म्हणजे पर्शिया. पर्शिया नाव खरंतर अचेमेनिड साम्राज्याच्या काळात झालेल्या एका चुकीच्या समजुतीमुळे दिले गेले होते.
अचेमेनिड साम्राज्याचा मुख्य प्रदेश म्हणून संपूर्ण इराणमधील एका लहान भागालाच ‘पर्शिया’ असे नाव होते. पण कालांतराने हेच नाव संपूर्ण साम्राज्याला दिले गेले. अनेकांच्या मते, पर्शिया हे नाव बलाढ्य रोमन साम्राज्याच्या प्रभावामुळे पडलं असावं. रोमन साम्रज्याने शहरांच्या नावांच्या आधारावर साम्राज्यांचे नामकरण केले होते. त्यांनी हाच न्याय शेजारील साम्राज्यांना देखील लावला.
रोमन संस्कृतीमध्ये एखाद्या साम्राज्याच्या मुख्य शहराच्या नावाचा उपयोग साम्राज्यांचे नामकरण करण्यासाठी केला जात होता. म्हणूनच रोमन साम्राज्याने अचेमेनिड साम्राज्याचे मुख्य ठिकाण ‘पर्सिस’ वरूनच या साम्राज्याचे नामकरण केले.
अचेमेनिड साम्राज्यातील लोकांनी मात्र स्वतःचा उल्लेख ‘पर्शियन’ म्हणून कधीही केला नाही. या लोकांनी स्वतःच्या देशाचे वर्णन करण्यासाठी अरिया, एहरान, इरानशाहर अशा नावांचा उपयोग केला. या नावांमध्ये आपल्याला ‘इराण’चा उल्लेख आढळतो. ही नावे खरे तर ‘आर्य’ या शब्दावरून आली आहेत. आर्य हा इंडो-युरोपियन भाषा बोलणाऱ्या लोकांचा समूह आहे. याठिकाणी उल्लेख केलेल्या आर्यांचा आणि हिटलर ज्या ‘नॉर्डिक’ समुदायाला आर्य मानत होता त्यांचा काहीएक संबंध नाही.
रोमन साम्रज्यामुळे वर्षानुवर्षे झालेली ही चूक सुधारण्याचा विसाव्या शतकात यशस्वी प्रयत्न झाला. इसवी सन १९०० पर्यंत संपूर्ण इराणच्या भागात पर्शिया हेच नाव रूढ झाले होते. पण १९३५ साली पर्शियाचा तत्कालीन राजा, ‘रजा शाह’ने आंतरराष्ट्रीय समुदायाला या देशाला पर्शियाऐवजी ‘इराण’ म्हणून संबोधावे असे सांगितले.
रजा शाह’ने अगदी ‘लीग ऑफ नेशन्स’मध्ये जाऊन या परिषदेच्या सर्व सदस्य देशांना आपल्या देशाचा ‘इराण’ म्हणूनच उल्लेख करावा असे सांगितले. हा बदल घडवून आणल्याने देशामध्ये एकता निर्माण होईल असे रजा शाहला वाटत होते. नाव तर बदललं पण देशात एकी निर्माण झाली नाही, उलट १९७८-७९ या वर्षांत इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली आणि रजा शाहला देश सोडून जावे लागले.
जगभरातून या बदलाला चांगलाच विरोध होत होता. विशेषतः ब्रिटनचा! ब्रिटनच्या मते, हा बदल केल्याने देशामध्ये कमालीची अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता होती. ब्रिटनसाठी हे मुळीच हितकारक नव्हते. कारण त्या वेळी नव्याने नामांतरित झालेल्या अँग्लो-इराणी तेल कंपनीने उत्तम फायदा मिळवून देण्यास सुरुवात केली होती.
शिवाय त्यावेळी इमेल किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल सुविधा नसल्याने सर्व शासकीय आणि प्रशासकीय कामे तसेच व्यवहार पत्रलेखनाच्या माध्यमातून होत असे. अनेक राष्ट्रांच्या मते, जगातील सर्व राष्ट्रांपर्यंत आणि त्यांच्या सचिवालयांपर्यंत हा बदल पोहोचण्यास वेळ लागेल आणि त्यानंतरही शुद्धलेखनाच्या किंवा शब्दलेखनाच्या चुकांमुळे इराण म्हणजेच पर्शियाऐवजी चुकून इराकबरोबर पत्रव्यवहार झाले असते.
एवढ्या विरोधानंतरही १९७० च्या दशकापर्यंत बहुतेक देशांनी इराणचे नवीन नाव त्यांच्या ‘राजकीय शब्दकोषात’ समाविष्ट करून घेतले. याच दशकात १९७८-७९ या दोन वर्षांच्या कालावधीत झालेल्या इस्लामिक क्रांतीमुळे ऐतिहासिक पर्शियन साम्राज्याचा पाडाव झाला, या राज्यक्रांतीनंतरही पर्शियाचे नवीन नाव इराण हे अबाधित ठेवण्यात आले आहे, त्यालाच आज संपूर्ण जगात ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण’ म्हणून ओळखतात. यावर्षी इराणच्या इस्लामिक क्रांतीला ४३ वर्षे पूर्ण होतील. ‘क्रांती’नंतरही या देशाचा ऐतिहासिक वारसा त्याच्या नावाच्या माध्यमातूनच जपला गेला आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.