आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतामधील बूटांचा बाजार आज स्पर्धेने भरलेला आहे. अनेक देशी विदेशी बूट ब्रँड भारतीय बाजारावर आपला ठसा उमटवण्यासाठी आज प्रयत्न करतायत. पण त्यातही आपली अतिशय वेगळी ओळख निर्माण करुन, भारतीय बूट बाजारावर साहसी बूटच्या क्षेत्रावर आपला ठसा असणारा एकमेव ब्रँड म्हणजे वूडलॅन्ड.
गिर्यारोहणासाठी बूट घ्यायचे म्हटलं की आजही सर्वात आधी समोर येणारं नाव म्हणजे वूडलॅन्ड बूट. हिमालयात गिर्यारोहणासाठी वापरण्यात येणारया शूजमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात वापरला जाणारा हा बूट ब्रँड आता दैनंदिन जीवनात ही सर्रासपणे वापरला जातो.
चांगला,सुंदर आणि टिकाऊ या तिन्ही बाबींना न्याय देणारा हा ब्रँड आज ज्या उंचीवर पोहचलाय तिथे पोहचण्यासाठी त्याला किती अपयशाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या हे आज आपण जाणुन घेणार आहोत.
वेळ आहे ९० च्या दशकाची. भारतीय बूट बाजारात फक्त बाटा आणि कोरोना या दोनच नावांचा बोलबाला होता. याच वेळी दिल्लीमध्ये एरो क्लब नावाची एक कंपनी रशियाला बूटची निर्यात करत असे. पण रशियात झालेल्या प्रांतीय विघटनानंतर एरो क्लबच्या भवितव्याबद्दल चिंता निर्माण झाली होती.
तयार केलेला माल निर्यात करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने एरो क्लबचं भविष्य धोक्यात दिसत होते. रशियन बाजारपेठेसाठी बनवलेले मजबूत बांधणीचे बूट दुसरीकडे कुठे विकले जातील याबद्दल शंका होती.
तयार झालेला माल तसाच पडलेला असल्याने दिवाळखोरीची परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वाटत होती. याच बूटमध्ये लेदर पासुन बनवलेला एक बूट एरो क्लब कंपनीने भारतीय बाजारात उतरवण्याचा निर्णय घेतला.
संकटांना संधी मानून घेतला गेलेला हा निर्णय या कंपनीच्या भवितव्यास कलाटणी देणार याची पुसटशीसुध्दा कल्पना त्यावेळचे एरो क्लबचे चेयरमन अवतार सिंग यांना नसावी.
भारतीय बाजारपेठेत एरो क्लबने प्रवेश केला तो वूडलॅन्ड या नवीन नावाने. सुरुवातीला त्यांनी त्यांचा बूट आपल्या काही दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवला. मजबूत आणि टिकाऊ बूटांची आवड असलेल्या काही लोकांना हा शूज आवडेल की नाही हे तपासण्यासाठी त्यांनी हा बूट काही छोट्या दुकानदारांकडे विक्रीसाठी ठेवला.
मजबूत आणि टिकाऊ असलेला हा बूट भारतामध्ये अतिशय गाजला. लवकर खराब होणाऱ्या बूटची सवय असलेल्या मध्यमवर्गीय समाजाने खूप दिवस टिकणाऱ्या वूडलॅन्डला डोक्यावर घेतलं आणि तिथुन वूडलॅन्ड नावाचा ठसा भारतीय बूट बाजारात ठळकपणे दिसायला सुरुवात झाली.
नाविन्य असलेल्या या नविन बूटला जी-९२ असं नाव देण्यात आलं. ज्यात जी-जेन्टस, आणि ९२-१९९२ असा अर्थ दडलेला होता. पैशाची पुरेपुर किंमत वसुल होत असल्या कारणाने भारतीय लोकांनी या बूटाला भरभरुन प्रतिसाद दिला.
सुरुवातीला मार्केटमध्ये आणलेल्या जी-९२ चं उत्पादन आता पाच विविध रंगांमध्ये करण्यास सुरुवात झाली. नंतर २ रंगांचा वापर करून या बुटाचं उत्पादन सुरु झालं.
वूडलॅन्डचे बूट आता फक्त तरुण पिढीच नाही तर मध्यमवर्गीय कुटंबातील मोठे लोकही विविध कपड्यांसोबत वापरू लागले आणि म्हणून फक्त तरुण पिढीसाठी सुरु केलेला वूडलॅन्ड हा ब्रँड आता सगळ्याच वयातील लोकांचा आवडता बनला.
प्रसिद्धी मिळवल्यानंतर स्वत:तील साहसाची जाणीव करुन देण्यासाठी अवतार सिंग यांनी साहसी बूटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि तिथून सुरुवात झाली वूडलॅन्डच्या गिर्यारोहण क्षेत्रातील एका अनोख्या आणि अविस्मरणीय प्रवासाची.
गिर्यारोहण बूट तयार करुन ते अधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी जागोजागी छोटी दुकानं उघडण्यात आली. या बूटमुळे ओबडधोबड रस्त्यांवर गिर्यारोहण क्षेत्रातील भरपुर लोकांना मदत झाली. निसर्गाच्या अद्भुत आणि भयानक अशा रूपावर विजय मिळवण्यात आज वूडलॅन्ड अनेक लोकांना मदत करत आहे.
गिर्यारोहण बूटांचा समानार्थी शब्द म्हणून वूडलॅन्डचा वापर आज हिमालयात गिर्यारोहण करणारे लोक हमखास करतात. तसेच गिर्यारोहण करताना आवश्यक असलेल्या साधनांचं उत्पादनही आज वूडलॅन्ड कंपनी करते. बूटांप्रमाणेच ही साधनंसुध्दा अतिशय टिकाऊ असल्यामुळे त्यांचाही खप आज चांगला आहे.
एरो ग्रुपचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक असलेले अवतार सिंह यांचे पुत्र, हरकीरत सिंह यांनी स्वत: ‘हिंदु कॉलेज’मधून पदवी घेतली आहे तसेच ‘हार्वड बिज़नेस स्कूल’मधून व्यवसायशिक्षण आणि ‘रशियन स्टेट युनिवर्सिटी फॉर ट्रेड ॲण्ड एकनॉमिक्स’मधून विशेष शिक्षण घेतलं आहे.
स्वत:ची साहसी क्षेत्राकडे बघण्याची आणि वूडलॅन्डसाठी साहसी क्षेत्राचं असलेलं महत्त्व सांगताना ते बोलतात,
“साहसी शोध क्षेत्राला स्वत:ची मर्यादा नसते. तसच साहसी गोष्टीसुध्दा सीमारहीतच असतात. समस्या, प्रतिबंध या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन काम करण्याची वूडलॅन्डची खासियत आज साहसप्रेमी लोकांना आवडते आणि म्हणूनच गिर्यारोहण क्षेत्रात आजही वूडलॅन्ड कंपनीला अतिशय भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक साहसप्रेमी आज वूडलॅन्डच्या उत्पादनांच्या प्रेमात आहे.”
५० च्या दशकात कॅनडा देशात सुरु झालेली एरो क्लब ही मुळ कंपनी आता भारत, श्रीलंका, बांग्लादेश, चीन, व्हीएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपीन्स, मकाउ अशा विविध देशांमधे पसरली आहे.
या देशांमध्ये लेदरचं उत्पादन आणि विविध सुविधा केंद्रे आज एरो क्लब कडे आहेत. संपूर्ण जगात आज वूडलॅन्डचे ३५० पेक्षा जास्त शोरुम्स आहेत तर ३५०० पेक्षा ही जास्त दुकानांमध्ये आज वूडलॅन्डचे बूट आणि बाकी प्रोडक्ट्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
ऑनलाइन खरेदीमध्येसुध्दा वूडलॅन्ड आज आघाडीवर आहे. समाज माध्यमं आणि बाजारीकरण तत्त्वांचा योग्यरित्या वापर करून वूडलॅन्ड आज प्रगती करत आहे. वूडलॅन्डचे आज हिमाचल प्रदेश आणी उत्तराखंडमध्ये ८ कारखाने आहेत. साहस क्षेत्रातील महत्त्वाची असणारी ही दोन्ही राज्यांचा त्यांच्या उत्पादनाच्या निर्मितीत ७० टक्के वाटा आहे.
आज वूडलॅन्ड फक्त नाव नसून बऱ्याच साहसप्रेमींसाठी एक विशेष ओळख म्हणून प्रसिद्ध आहे. १८०० कोटींची उलाढाल असलेला या ब्रँडचा इतिहास आपल्या सगळ्यांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे.
एवढी प्रसिद्धी मिळवूनही वूडलॅन्ड अजुन वेगवेगळ्या संकल्पना घेऊन येत आहे. प्रसिद्धी मिळाली तरी ती टिकवून ठेवण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागतात हेच त्यांना आपल्याला कदाचित शिकवायचं असेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.