या खलाशांनी जीवावर उदार होऊन जगाचा नकाशा बनवलाय

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


शेकडो वर्षांपूर्वी लोकांना माहितसुद्धा नव्हते की जगात किती देश आहेत, किती खंड आहेत, किती समुद्र आहेत. लोक जगाच्या संपुर्ण भौगोलिक परिस्थितीशी पूर्णपणे अनभिज्ञ होते. तेव्हा जगभरातील खलाशी पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी निघाले. त्यांनी पृथ्वीवरच्या अनेक वेगवेगळ्या भागांना भेट दिली आणि त्या भागाचे आरेखन करून घेतले. याचं वेगवेगळ्या आरेखनांना जोडून जगाचा पहिला नकाशा तयार करण्यात आला.

 

पहिल्या नकाशाची निर्मिती इटलीमध्ये १४४८ साली करण्यात आली. हा नकाशा चामड्यापासून तयार करण्यात आला होता. त्याला प्लान्सफेरो असे नाव देण्यात आले. लॅटिन भाषेत प्लॅनसचा अर्थ होतो चपटा आणि स्फेरसचा अर्थ होतो गोलाकार. हा नकाशा आज ही इटलीच्या व्हेनिस शहराच्या संग्रहालयात आहे.

त्यावेळी लोकांनी अपुऱ्या माहितीच्या आधारावर हा नकाशा तयार केला, त्यामुळे हा नकाशा इतका लांब आणि पसरट होता की त्याला जर बिछान्यावर पसरवलं तर १५ मीटर पेक्षा जास्त क्षेत्रात तो पसरायचा!

 

१५ व्या शतकात छपाई यंत्राचा शोध लागला आणि याच काळात देश विदेशात समुद्रमार्गे होणाऱ्या व्यापारातपण मोठी वृद्धी झाली. हा तो काळ होता, जेव्हा व्यापारी आणि नाविक विश्व भ्रमंती करून आल्यावर त्यांचे अनुभव कथन हे छपाईखान्यात छापून प्रसिद्ध केले जायचे. या माध्यमातून लोकांना विश्व कसे आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला जात होता. हा तोच काळ होता, जेव्हा समुद्राला निळ्या आणि भूभागाला हिरव्या रंगाने संबोधले जाऊ लागले.

 

नकाशांच्या निर्मितीत तेव्हा क्रांती आली, ज्यावेळी जर्मनीच्या एक भूगोलाच्या विद्यार्थ्याने कॉस्मोग्राफिया नावाचे एक पुस्तक लिहले. सेबास्टियन मुंस्टर असे या भौगोलिक शास्त्रज्ञाचे नाव होते.

१६ व्या शतकातील काही प्रसिद्ध पुस्तकात याचा समावेश केला जातो. यात सेबास्टियनने अतिशय अभ्यासपूर्ण नकाशा तयार केला होता. यात त्याने समुद्रयात्रा करणाऱ्या खलाशी लोकांसाठी देखील महत्वपूर्ण माहिती लिहली होती. या पुस्तकाच्या २४ आवृत्त्या निघाल्या होत्या आणि देश विदेशात हे पुस्तक अतिशय प्रसिद्ध होते. अगदी सैन्य देखील कॉस्मोग्राफियाचा आधार घेऊन मोहिमा आखत.

 

त्याकाळी समुद्र सफारी हा फारच धोकादायक प्रकार होता. हजारो किलोमीटरच्या यात्रेदरम्यान अनेकांचा रस्त्यातच आजारपणामुळे मृत्यू होत असे. समुद्रात, खासकरून अटलांटिक समुद्रात प्रचंड वादळं येतात, आज देखील अनेक जहाजं या वादळी वाऱ्यांमुळे समुद्राच्या कुशीत गुडुप होतात. याच परिस्थितीमुळे त्यावेळी असंख्य नाविकानी समुद्र सफारीमध्ये आपला जीव गमावला होता.

महिनोमहिने जहाजावर राहिल्याने अन्न पाण्याच्या अभावात मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त होती. बऱ्याचदा जीव-जंतूंचा हल्ला देखील मृत्यूचे कारण बनायचा. यामुळेच व्यापारी सागरी सफरी वेळी सोबत नकाशे आणि सैन्य घेऊन जायचे.

 

जगातील सर्वात पहिला ऍटलास नकाशा २२ मे, १५७० मध्ये छापण्यात आला. यानंतर नकाशांच्या युगात एक क्रांती आली. डच नकाशाकार अब्राहम ओर्टीलियसने पहिला ऍटलास तयार केला होता. ज्याला थिएटर ऑफ वर्ल्ड नावाने ओळखले जात होते. यात अनेक ठिकाणांचे बारकाईने वर्णन केलेले असे.

यात वाळवंटाला ऊंट आणि खजूर असे चिन्ह वापरुन संबोधले जात होत. सोबतच त्या व्यापारी आणि खलाशी वर्गाचे देखील आभार मानण्यात आले होते, ज्यांनी तयार केलेल्या लहान लहान नकाशांमुळे हा मोठा नकाशा अस्तित्वात येणे शक्य झाले होते. अॅटलास नकाशा हा स्टँडर्ड नकाशा समजला जाऊ लागला. अनेक पुस्तकालयात आणि श्रीमंत लोकांच्या घराच्या भिंतीवर हा नकाशा टांगला जाऊ लागला.

१६१२ साली जर्मन नकाशाकार आणि भूगोलतज्ञ जेरांड्स मेर्केटरने जगाचा नकाशा तयार केला, जो आधीच्या नकाशाच्या तुलनेत अधिक सुंदर होता. याचे नामकरण अॅटलास असेच करण्यात आले. पुढे नकाशात सुधारणा होत गेल्या आणि अजून योग्य आणि अभ्यासपूर्ण नकाशे निर्माण होऊ लागले.

 

याच काळात अनेक साहसी खलाशी जहाज आणि नावांमध्ये बसून जगाच्या सफरीवर निघालेले होते. अंटॉनियो पिगफेटा हा देखील असाच एक खलाशी होता. तो एका पोर्तुगीज नाविकाचा साथीदार म्हणून विश्वभ्रमंती वर निघालेला होता. या संपूर्ण समुद्र यात्रेच्या दरम्यान त्याच्या नाविकाचा फिलिपाईन्समध्ये मृत्यू झाला. पण अंटॉनियो थांबला नाही. एक एक करत त्याने समुद्राला गवसणी घातली.

समुद्र सफारीवरून तो ज्यावेळी परत आला त्यावेळी त्याने आपले अनुभव एका डायरीत लिहण्यास सुरुवात केली. त्याने त्या डायरीला :- Report on the first voyage around the world असे नाव दिले. अंटॉनियो असा पहिला व्यक्ती होता, ज्याने सागरी सफारीचा अनुभवांना नोंदवण्यासाठी सोबत वही घेतली होती. तो फक्त जगाचा नकाशाच नाही, तर भेट देईल त्या ठिकाणाच्या जैविक संपदेबद्दल देखील नोंदणी करत होता.

 

जगाचा नकाशा निर्माण करायला सुरुवात कधी झाली हा मुद्दा सध्या तरी विवादाचा आहे. युरोपाप्रमाणे अशियातील खलाशी देखील जगाच्या प्रवासावर बाहेर पडत होते. त्यांनी देखील नकाशांची निर्मिती केली होती. चीनमध्ये देखील नकाशांची निर्मिती करण्यात आली होती.

जगाचा सर्वात बेसिक नकाशा भूगोल तज्ञ आणि नकाशाकार अनक्सीमंडर ने तयार केला होता. इसवी पूर्व ५४६ मध्ये या नकाशाची निर्मिती करण्यात आली होती. त्याने सर्वप्रथम पृथ्वी ही गोलाकार आणि चपटी असल्याचे वर्णन केले होते. त्याचे विचार त्या काळातील लोकांच्या विचारांपेक्षा खूप प्रगत होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!