लोथल – भारताचा ५००० वर्षांचा सांस्कृतिक वारसा एकाच ठिकाणी उलगडून दाखवणारं प्राचीन गाव

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


तुम्ही चित्रात दिसणारी जहाजाची गोदी बघताय याचा जर इतिहास वाचला तर थक्क होवून जाल. जहाज नांगरून थांबण्याच्या जागेला गोदी असे म्हणतात. इंग्रजी मध्ये यालाच डॉकयार्ड असे नाव दिले जाते. चित्रात तुम्ही जी गोदी बघताय ती आपल्या भारतातील आहे.

जगातील सर्वात जुनी गोदी म्हणून या जागेचा उल्लेख केला जातो. होय तुम्ही बरोबर वाचलं. गुजरात राज्याची राजधानी अहमदाबाद येथून जवळपास ८५ किलोमीटर दूर अंतरावर स्थित असलेल्या लोथल या गावी आढळणारे हे स्थान जगातील सगळ्यात जुनी गोदी म्हणून ओळखले जाते.

खरे पाहता आपल्या प्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारी जी काही थोडी स्थाने आहेत त्यातील एक स्थान म्हणजे लोथल आहे.

लोथल गावाला स्वत:चा असा वारसा आहे. ५ हजार वर्षांपूर्वी जी सिंधू संस्कृती आपल्याकडे सापडली त्या सिंधू संस्कृतीचे अवशेष ज्या भागात शिल्लक आहेत त्यापैकी लोथल हे एक गाव ओळखले जाते. या गावात ५००० वर्षांपूर्वीच्या आपल्या संस्कृतीचे अनेक जुने आणि सांस्कृतिक अवशेष आढळतात.

Lothal | Harappa in marathi the postman

५००० वर्षापूर्वी बंदरे असलेली समुद्रकिनाऱ्या लगतची जी गावे होती त्यापैकी लोथल हे एक होते. त्यावेळी असलेल्या भौगोलिक स्थितीचा जर विचार केला तर लोथल ची गोदी ही  साबरमती नदीला  जोडलेली होती.

साबरमती नदी ही प्राचीन हडप्पा मोहेंजोदडो संस्कृतीमध्ये एक महत्वाची नदी मानली जाते. तिचे पूर्वी भौगोलिक, तसेच व्यापारी महत्व तर होतेच परंतु तिला सांस्कृतिक महत्व देखील होती. सिंधू संस्कृतीमधील देवीचा बहुमान या नदीला त्यावेळी दिला जात असे.

पूर्वीच्या काळी ही नदी आता पाकिस्तान मध्ये असलेल्या सिंध प्रांताला जोडली गेली होती हा एक महत्वाचा व्यापारी मार्ग म्हणून ओळखला जात असे. आत्ता ज्याला आपण कच्छचे वाळवंट म्हणतो ते पूर्वी अरबी समुद्राचा एक भाग होते. साबरमती नदीतून सिंध प्रांतात मसाल्याचे पदार्थ, रेशीम, कलाकुसरीच्या वस्तू, मातीची भांडी यांची ने आन होत असे.

Lothal - 'City of Dead'

आज लोथल गावात जी गोदी पाहायला मिळते ती पूर्वी या व्यापारी मार्गाचे एक महत्वाचे ठाणे होते. समुद्र किनाऱ्याला जोडून असल्यामुळे तिचे महत्व जास्त होते. सुमारे २०० मीटर लांब आणि ३५ मीटर रुंद असे या गोदीचे अंतर आहे. ज्यावेळी भरतीची वेळ येत असे तेंव्हा या गोदीमध्ये समुद्राचे पाणी साठून जहाजे तरंगत राहण्याची सोय केलेली असायची.

खरे पाहता ही लोथलची गोदी जहाजांना समुद्रामार्गे इस्तुरी नावाच्या नदीमध्ये जाण्यासाठी एक उत्तम स्थान होते. त्यासाठी या गोदीची रचना करण्यात आली होती असे भूगर्भशास्त्रज्ञ आणि पुरातत्वशास्त्रज्ञ मानतात. भरती  आणि ओहोटीच्या वेळी गोदी मध्ये योग्य प्रमाणात पाणी साठवून त्यावर जहाजे नांगर टाकून तरंगत ठेवली जात आणि भरती ओहोटीच्या वेळा बघून ती बाहेर काढली जात.

साधारणपणे चंद्राच्या कला आणि भारती ओहोटीच्या वेळा यासाठी लक्षात ठेवल्या जात असत. या गोदीला एक लाकडी दरवाजा सुद्धा बसवलेला होता जेणेकरून तळाला जास्तीत जास्त पाणी साठवून ठेवण्याची सोय करता यावी आणि जेंव्हा गरज लागेल तेंव्हा पाणी सोडून  जहाजाला बाहेर जाण्यासाठी कृत्रिम लाट तयार व्हावी.

गोदीच्या किनाऱ्याला जहाजाची जी मालवाहतूक केली जात असे तो माल साठवून ठेवण्यासाठी एका मोठ्या गोदामाचे देखील निर्मिती केलेली होती. ह्या गोदामामध्ये संपूर्ण शहरातील वस्तू एकत्रित केल्या जात असत. महापूर आणि लाटांच्या भरतीपासून वस्तूंचे संरक्षण व्हावे हा उद्देश त्याच्या पाठीमागे असे.

गोदीपासून या गोदामापर्यंत जाण्यासाठी खास एक हमरस्ता देखील बांधण्यात आलेला होता. याचं गोदामामध्ये बाहेरून येणाऱ्या जहाजामधील माल देखील साठवून ठेवण्यात येत असे.

लोथल गावाचे जर वैशिष्ट्य पहिले तर इतर हडप्पाकालीन शहराप्रमाणे या शहराची रचना देखील आटोपशीर काटकोनी आकारात केलेली होती. संपूर्ण बाजूनी तटबंदी,  पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारे रुंद चौसोपी रस्ते हे या शहराचे वैशिष्ट्य होते.

चकचकीत फुटपाथ, रुंद आणि भुयारी मार्गाने केलेली सांडपाण्याची व्यवस्था, सार्वजनिक स्नानगृहाची व्यवस्था या पद्धतीचे अवशेष देखील याच शहरात सापडलेले आहेत जे साधारणपणे सिंधू संस्कृतीची ओळख मानले जातात.

lothal godi the postman

लोथल शहराच पहिलं उत्खनन हे १९५५ साली केलं गेलं. त्यावेळी जेंव्हा वर सांगितलेली गोदीची जागा पुरातत्व खात्याला सापडली त्नेव्हा बहुसंख्य शास्त्रज्ञांचे मत पडले की ही गोदी नसून पाणी जमा करण्याचा एक हौद असावा.

त्यानंतर बारीच वर्षे हा समज कायम होता त्यानंतर बरेच संशोधन झाले. या लाकडी गोदीवर समुद्रात सापडणाऱ्या मिठाचे, जिप्समचे आणि समुद्रातील जैविक घटकांचे अवशेष सापडले. तेंव्हा हे सिद्ध झाले ही ही गोदी पूर्वी समुद्राच्या पाण्याने भरलेली असायची. आज ही जागा आखातामार्गे अरबी समुद्राला जोडलेली नाही जशी ती पूर्वी जोडलेली होती. इतक्या वर्षात नदीने जो आपला प्रवाह मार्ग बदलला त्यामुळे कदाचित हे झाले असावे.

लोथल गाव हे हडप्पा मोहेंजोदडो संस्कृतीमध्ये अनेक वर्षे टिकले. परंतु त्यांनतर होणारी मौसमी वादळे आणि समुद्रातील पूर यामुळे शेवटी इथल्या लोकांनी ही जागा हळूहळू सोडून जायला सुरुवात केली आणि त्यानंतर तर हे ठाणे निर्मनुष्य बनले.

आज या गावातले अवशेष मात्र आपल्या जुन्या ५००० वर्षाच्या सांस्कृतिक वारशाचे महत्व जगाला सांगत उभे आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

यावर तुमची प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!